Wednesday, June 6, 2018

‘शहा’जोगपणा

पालघर निकालानंतर शिवसेनेने पुढल्या सर्व निवडणूका स्वतंत्रपणे स्वबळावर लढवायची घोषणा केली आणि तितक्याच आवेशात मुख्यमंत्र्यांनी सेनेशिवाय निवडणूका लढायला सज्ज होण्याचा आदेश आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिलेला होता. अर्थात निकालानंतर भाजपाने चुचकारणारी भूमिकाच घेतली होती. पण नंतर त्यात बदल करून स्वबळाची भाषा आली. पण मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत विरण्यापुर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईभेटीत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे वृत्त आले. मग ही भेट युती वाचवण्यासाठी व आगामी लोकसभेत एकत्र लढण्यासाठीचीच असल्याचा पत्रकारांनी निष्कर्ष काढायला पर्यायच नव्हता. सहाजिकच त्यानुसार शिवसेनेने प्रतिक्रीय़ा देणेही स्वाभाविक आहे. सेनेच्या प्रवक्त्याने पालघरचा दणका बसला म्हणून अमित शहा मातोश्रीला शरण आल्याची प्रतिक्रीया दिली आणि नंतर अमित शहांच्या मुंबईभेटीचा कार्यक्रम जाहिर झाला. यात फ़क्त मातोश्रीचीस भेट नसून रतन टाटा, लता मंगेशकर, माधुरी दिक्षीत यांचाही थेट समावेश असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे अमित शहा मातोश्रीच्या भेटीसाठी खास मुंबईत येत नसून, इतर कामाच्या गदारोळातला एक मुक्काम मातोश्री असल्याचे स्पष्ट झाले. सध्या २०१९ च्या लोकसभेपुर्वी भाजपाने एक संपर्क अभियान हाती घेतलेले आहे. मोदींना शुभेच्छा मिळवण्यासाठी थोरामोठ्यांच्या व मान्यवरांच्या भेटी अमित शहा घेत आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल दलबीर सुहाग यांची अशीच भेट झाली. मुंबईत तशाच भेटी व्हायच्या असून, त्यापैकी एक मान्यवर उद्धव ठाकरे असावेत, इतकाच यातून मतितार्थ निघतो. त्यामुळे अमित शहा मातोश्री भेटीला जाणार ही बातमी किंवा अफ़वा, निव्वळ ‘शहा’जोगपणा म्हणावा लागेल. भाजपाची निती धुर्तपणाची असते, त्याचाच हा नमूना आहे. अर्थात सेना यावेळी त्यात फ़सलेली दिसत नाही.

आजकाल शिवसेना संघटनात्मक बळावर चालवली जात नसून सामना चालतो आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून शिवसेना चालवली जात असते. म्हणूनच अमूक एका बाबतीत सेनेचे धोरण भूमिका काय आहे, त्याचा शोध ‘सामना’त घ्यावा लागतो. बहुतेक वर्तमानपत्रे व माध्यमे शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्ये म्हणूनच गंभीरपणे घेत नाहीत. पण सामनातली विधाने सेनेचे धोरण निती म्हणून स्विकारत असतात. आता अमित शहांच्या मातोश्रीभेटीवर सामना काय म्हणतो, त्याला म्हणूनच तर महत्व आहे. प्रवक्त्याने पालघरचा दाखला देऊन भाजपाला वठणीवर आणल्याची भाषा केलेली होती. त्यामुळे शहाच्या मातोश्रीभेटीने युती होणार असे सर्वांना वाटले असले तरी ती शक्यता सामनाने धुडकावून लावलेली आहे. ताज्या फ़तव्यानुसार शिवसेनेला भाजपाशी युती करण्याची अजिबात गरज नसून, मोदींच्या चेहर्‍यावर मतेही मिळवण्याची सेनेची इच्छा नसल्याची भाषा अधिक निर्णायक व निर्वाणीची वाटते. थोडक्यात युतीसाठी मातोश्रीवर येण्याआधीच शहांचा प्रस्ताव सेनेने फ़ेटाळून लावला, असाही अर्थ काढला जात आहे. पण तोच अंतिम मानण्य़ाचे कारण नाही. नवा फ़तवा जुन्या फ़तव्याला रद्दबातल करत असतो. पण यानिमीत्ताने भाजपाने वा शहांनी त्यांचा हेतू साध्यही केलेला असू शकतो. भाजपाने युतीच्या बाबतीत नेहमीच संयमाची व समजुतीची भाषा केलेली असली, तरी भाजपाची कृती कधीही समजुतीची नव्हती. ती नेहमी धुर्त व दुटप्पी राहिलेली आहे. ज्याला मराठीत शहाजोगपणा म्हणतात, तशीच भाजपाची सेनेच्या बाबतीतली भूमिका राहिलेली आहे. यात योगायोग असा की बिहार वा बंगालमध्ये ज अक्षराचा उच्चार बहुतांश य असा होतो. त्यामुळे अमित शहांच्या मातोश्रीभेटीचा योग हा शहायोग मराठीतला असला तरी उच्चाराने बघता यो शहाजोग होऊ शकतो आणि तीच बहूधा त्यामागची रणनिती असावी.

अजून शहा मातोश्रीवर आलेले नाहीत व त्यांनी कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. इतक्यात त्याचा इन्कार वा तो झटकून टाकण्याची सेनेला काहीही गरज नव्हती. परंतु सेनेने कधीच प्रचलित राजकारण केले नाहीत, की त्यातले नियम पाळलेले नाहीत. म्हणून तर सत्तेत राहून त्याच सत्तेला शिव्याशाप देण्याचा नवा पायंडा पाडलेला आहे. मग प्रस्ताव येण्याआधीच तो फ़ेटाळण्यासाठी सेनेला दोष देता येणार नाही. तो अलिकडल्या काळात सेनेचा स्थायीभाव झालेला आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्‍यावर मते नकोत ही भूमिका योग्यच आहे. आपल्याला पोस्टरबॉय नको म्हणजे युतीच्या नावाने मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला निवडणूका लढणे मान्य नाही, असा तो स्पष्ट इशारा आहे. पण शहा यांचा तोच प्रस्ताव आहे की नाही? की नुसती मातोश्री भेट घेऊन अमित शहा काही देखावा उभा करू बघत आहेत? असेल तर तो देखावा तरी काय आहे? त्यातून त्यांना काय साधायचे आहे? मागल्या साडेतीन वर्षात सेना भाजपाचा महाराष्ट्रात अखंड कलगीतुरा रंगलेला आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादीने भाजपावर जितकी जहरी टिकाटिप्पणी केलेली नसेल, इतकी आवेशपुर्ण झोड शिवसेनेने उठवलेली आहे. मात्र भाजपाच्या राज्यातील वा केंद्रातील नेतृत्वाने कायम सेनेला चुचकारत असल्याचा देखावा उभा केलेला आहे. बदल्यात आपल्या दुय्यम वा कनिष्ठ नेत्यांकडून सेनेला डिवचण्याचा उद्योगही चालू ठेवलेला आहे. त्याच्याशी झूंज देताना सेनेने मात्र थेट भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्ष्य केलेले आहे. त्यामुळे सेनाच कायम मोदींना लक्ष्य करते, असे चित्र रंगवून घेण्यात शहा मोदी यशस्वी झालेले आहेत. आता सुद्धा पोस्टरबॉय नको ती बोचरी टिका मोदींवरची आहे आणि तीच प्रतिक्रीया शहांना अपेक्षित नसेल, असे कोणी म्हणू शकत नाही. आपण युती टिकवायला बघतो व सेनेलाच हिंदूत्वाची मते दुभंगण्याचा हव्यास आहे, असे चित्र शहांना निर्माण करायचे असले तर?

म्हणूनच त्याला शहाजोगपणा म्हणावे लागते. कनिष्ठ नेत्यांकडून सेनेला दुखवायचे आणि सेनेच्या प्रमुख नेत्यांकडून मोदी शहांना शिव्याशाप मिळवायचे, हा नियमच होऊन गेलेला आहे. काही प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस टोकाची भूमिका घेतात वा बोचरी टिका करतात. पण बहुतांश प्रसंगी ते नेमस्त असतात व युती चालवायची भूमिका मांडत रहातात. त्यात शिवसेनेची भूमिका मात्र कायम आहे. मोदी सोडून उरलेला भाजपा सेनेला मान्य आहे आणि मोदीशिवाय आज भाजपा असू शकत नाही. सहाजिकच जनमत बनवताना हिंदूत्वासाठी दोघांनी एकत्र यावे असे वाटणार्‍या मतदाराची मनस्थिती द्विधा होऊन जाते. मतविभागणीने कॉग्रेस वा युपीए सत्तेत येतील अशी भिती वाटणारा हिंदूत्वाचा पुरस्कर्ता मतदार मग लोकसभेच्या मतदानात स्थानिक हेवेदावे बाजूला ठेवून एका बाजूला झुकू लागतो. त्यालाच धृवीकरण म्हणतात. भाजपाला निदान महाराष्ट्रात तरी तशा मतांचे धृवीकरण आपल्या बाजूने करून घ्यायचे आहे. म्हणूनच अमित शहांच्या आकस्मिक मातोश्री भेटीचे प्रयोजन राजकीय डावपेच वाटतो. त्यात साधायचा हेतू एक व बातम्यांचा परिणाम भलताच असू शकतो. अशावेळी टोका़ची भूमिका टाळ्या मिळवून देणारी असली, तरी व्यवहारात मतांचे नुकसान करणारी असते. पण सेनेने स्वभावानुसार अशा परिणामांची कधीच पर्वा केलेली नाही. मग ती आताही मोक्याच्या क्षणी केली जाण्याची अपेक्षा कशी बाळगता येईल? आपल्या अनुयायांना जोश आला पाहिजे याला शिवसेना नेतृत्व नेहमी प्राधान्य देते. पण म्हणून कायम युद्धप्रसंग नसतो आणि कायम युद्धसज्ज असल्याचा आवेशही कामाचा नसतो. उलट अशा आवेशाचा लाभ शत्रूच उठवित असतो. सेनेच्या बाबतीत तेच नेहमी होत गेले आहे. ती अशा ‘शहा’जोगपणाला नेहमीच बळी पडली आहे. आताही काही वेगळे घडताना दिसत नाही.

2 comments:

  1. फार balanced views aahe भाऊ तुमचे स्पेशली भाजप बद्दल.
    मला वाटते शिवसेनेचे एवढे आपमान केल्यावर ( डोक्यात हवा गेल्याने) शिवसेनेनं पुन्हा युती करावी हे अपेक्षा बालग्न हे मूर्खच करू शकतो.शिवसैनिक आता किमान 4 वेळा तरी शाहनी मातोश्री चे उंबरठे झिजवावे अशी अपेक्षा करीत असेल तरच युती वैगरे.
    आणि भाजप जर शिवसेनेला संपवायची भाषा करत असेल ( किंबहुना सर्व प्रादेशिक पक्षांना) तर शिवसेनेनं स्वबळावर ladhne योग्यच. नाहीतरी भाजप ने ही 40 वर्षे वाट पाहिली सत्ता मिळवण्यासाठी तशी तयारी शिवसेने ही असेल. आणि सध्या भंडारा गोंदिया आणि पालघर नंतर शिवसेनेची गरज भाजप ला जास्त आहे. हे निश्चित.

    ReplyDelete
  2. छत्तीसगढ आणि राजस्थान निकालापर्यंत अमित शहा टाईम प्लिज म्हणत आहेत .
    सेनेने लगोलग संघटनात्मक बांधणीला हात घालावा म्हणजे जोर का धक्का धिरेसे लगेंगा .

    ReplyDelete