Tuesday, June 12, 2018

जायाचं का आंबराईत?

sambhaji bhide के लिए इमेज परिणाम

मागल्या दोनचार दिवसात अनेक शहाण्यांनी आपल्या नसलेल्या अकलेचे प्रदर्शन जाहिरपणे मांडले आणि मोठी गंमत वाटली. हिंदूस्तान प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी यांच्या नाशिकच्या भाषणातील एक वाक्य उचलून, त्यांची खिल्ली उडवण्याची जणू स्पर्धाच सोशल माध्यमे व मराठी वाहिन्यांवर चाललेली होती. ज्या वेगाने हा विषय उफ़ाळून आला, तेव्हाच त्यात काही दिशाभूल असल्याची शंका आलेली होती. म्हणूनच त्यावर काही भाष्य करण्याचे टाळलेले होते. कारण आता ही एक मोडस ऑपरेन्डी होऊन गेलेली आहे. समोरचा काय बोलता किंवा न बोलता, तरी तो तसेच काही म्हणाला असे भासवून गवगवा केला जातो. त्यावरून गहजब सुरू होत असतो. पहिली गोष्ट म्हणजे त्याने काही बोलण्याची गरजच नसते. तो बोलला तर तसेच काही बोलणार, हे गृहीत इतके पक्के असते की त्याने बोलण्याची गरजही उरलेली नाही. आता तो बोलला नसेल तर ते सिद्ध करण्यासाठी त्याने दहाबारा वर्षे देशाच्या सगळ्या कोर्टाच्या पायर्‍या झिजवत बसावे, हा खाक्या होऊन गेला आहे. त्यात आपले विधान असल्याचे वा नसल्याचे सिद्ध करण्याची ज्यांना हौस नसते, असे लोक खरे शहाणे असतात. म्हणूनच ते अशा वांझोट्या विषयांना बगल देऊन आपले काम करीत रहातात. वांझोटे शहाणे मात्र त्यांच्या आंबराईत जाऊन आपला वंश वाढवण्याचे नवस व्रतवैकल्ये करीतच रहातात. आताही भिडे गुरूजी यांनी संतानाला वंचित रहाणार्‍यांसाठी कुठला आंबा देऊ केल्यावर म्हणूनच इतकी झुंबड उडाली. या दाव्याची सत्यता तपासण्याची म्हणूनच इच्छा झाली. त्यातून एक शोध असा लागला, की आंबे खाऊन कोणाला मुले झाली. तर विविध वाहिन्या व माध्यमातील शहाण्याचेच इतके पीक, हा आंबामहात्म्याचा मोठा पुरावा आहे. कल्पनेतले आंबे इतके सृजनशील असतील, तर वास्तवातले आंबे कसे असतील?

या आंबेपुराणातून कोणाला संतती प्राप्त झाली, त्याचा शोध बातम्या रंगवणार्‍यांनी घेतलेला नाही. पण अशा माध्यमातील अनेकांनी मागल्या चारसहा महिन्यात एका नव्या पराक्रमी बालकाचा जन्म दिलेला आहे. त्याचे नाव मनोहर भिडे असल्याचे लक्षात येते. लोक म्हणतात संभाजी भिडे गुरूजी हे ऐंशी वर्षाचे गृहस्थ आहेत. पण मनोहर भिडे हे बालक अवघ्या सहा महिन्याचे आहे. पुण्यातल्या एल्गार परिषदेनंतर या बालकाचा जन्म झाला. तोपर्यंत कुठल्या वाहिनीने वा वर्तमानपत्राने त्याचा कुठे उल्लेख केल्याचे आमच्या तरी ऐकीवात वाचनात आले नाही. १ जानेवारीनंतर भीमा कोरेगावला दंगल झाली आणि मनोहर भिडे नावाच्या बालकाचा अवतार झाला. कारण बहुतांश माध्यमे व पुरोगामी लोक या मनोहर भिडेच्या अटकेसाठी पाण्यात देव बुडवून बसलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी तर त्यासाठी महाराष्ट्र बंदचे होमहवनही केले आणि कालपरवा पुण्याच्या स्थापनादिन सोहळ्यात जाणता राजा पवारांनीही त्यांचाच आडोशाने उल्लेख केला. खरेच मनोहर भिडे नावाचे हे बालक इतके उचापतखोर व पराक्रमी असेल, तर इतक्या वर्षात त्याचा उल्लेख कुठल्याच माध्यमात कशाला आलेला नव्हता? कारण त्याचा जन्मच झालेला नव्हता. एल्गार परिषदेच्या निमीत्ताने जमलेले लोक, विश्रांतीसाठी आंबराईत गेले आणि मग विविध शहाण्यांना गर्भधारणा झाली. त्यातून एका बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव मनोहर भिडे असे ठेवले गेले. पुढला इतिहास आपल्या समोर आहे. हे कोवळे बालक काय काय बोलते, त्याचे बोबडे बोल नित्यनेमाने माध्यमात झळकू लागले. आता बालक म्हटले, की त्याने बोबडेच बोलले पाहिजे. माध्यमांनाही त्या बालकाचे सगळे बोलणे सांगून कसे चालेल? त्यातले बोबडे बोल शोधून तितकेच प्रसिद्ध करावे लागणार ना? आणि पोर बोबडे बोलतच नसेल, तर आपणच त्याच्या तोंडी बोबडे बोल घालावे लागणार ना?

योगायोग असा, की दिल्लीत व इतरत्र कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष हाताला लागतील ती फ़ळे व फ़ुले खाऊन विविध शोध लावत आहेत. शिकंजी नावाचे पेय जत्रेत विकणार्‍या कुणा इसमाने कोकाकोला नावाची कंपनी काढली. हायवेवर ढाबा टाकून पराठे थापत बसलेल्या कोणी मकडोनाल्ड नावाची कंपनी काढली, असे मोठमोठे शोध कॉग्रेसच्या अध्यक्षांनी लावले. त्यांचे बोबडे बोल कोण ऐकणार? कोणाला कौतुकाने सांगणार? दुसर्‍याच्या कार्ट्याचे कौतुक आपण कशाला करायचे? आपला मनोहर भिडे बरा. त्याचे कौतुक करावे. त्याने कुठल्या परिचित मित्राच्या शेतातल्या आंब्याची दंतकथा सांगितली, तर ती त्याच्याच शेतातले आंबे ठरवून खपवायची, याला कौतुक म्हणतात. पण त्याच दरम्यान पवार साहेबांनी एक अशाच आंबे अननसाचेही महात्म्य कथन केले नाही का? त्यांना म्हणे कोणी एक मोठा जुना निवृत्त पोलिस अधिकारी भेटला. तर त्याच्याकडे साहेबांनी पंतप्रधानांच्या हत्याकांडाच्या पत्राविषयी विचारणा केली. असे किती पोलिस अधिकारी साहेबानी मंत्री व मुख्यमंत्री म्हणून राबवलेत. पण आज साहेबांची किती दुर्दशा झालीय बघा. असे पत्र मिळालेच तर सत्ताधीशांनी काय करावे, हे साहेब अधिकार्‍यांना विचारतात. असे पत्र आल्यास त्याला प्रसिद्धी देत नाहीत, तर तपास यंत्रणा व पोलिसांकडे सोपवून त्याचा शोध घेण्याचे आदेश दिले जातात, असे तो निवृत्त अधिकारी साहेबांना म्हणाला. मग इतकी वर्षे मंत्री मुख्यमंत्री म्हणून साहेब काय करीत होते? तशी पत्रे आल्यावर काय करावे ते खुद्द साहेबांनाच ठाऊक नव्हते काय? त्यांनाच ठाऊक नसेल तर आजच्या मुख्यमंत्र्याला तरी कसे कळणार? म्हणजे आजचा मुख्यमंत्री जितका खोटारडा वा मुर्ख अकार्यक्षम आहे, तितकाच आपल्या कारकिर्दीत आपणही बेअक्कल होतो, असेच पवार सांगत नाहीत का? मग त्यांच्या या बोबड्या बोलांची दखल कोणी घ्यायची? त्या बालकाचे कौतुक कोणी करायचे?

बातमी कशाला म्हणतात, याचेही भान आजकाल कसे निसटून गेले आहे आणि प्रत्येक माध्यम कसे अजेंडा घेऊन चाललेले असते, त्याचे हे नमूने आहेत. आंबराईत जायची ही घाई बघून दादा कोंडक्यांच्या गाण्याची आठवण होते. पत्रकारिता कशी त्या सखूच्या चालीवर गेलीय ना? म्हणून याला मोदीयुग म्हणतात. २००२ सालात संजीव भट नावाच्या एका भामट्या पोलिस अधिकार्‍याने मुख्यमंत्री निवासात झालेल्या बैठकीत मोदींनी हिंदूंना सूड घ्यायला मोकळीक द्या आणि दंगलीवर कठोर कारवाई करू नका, असे आदेश दिल्याची थाप मारली होती. पुढली बारा वर्षे त्याचा खोटारडेपणा सुप्रिम कोर्टात सिद्ध होईपर्यंत ती थाप चालू राहिली. तो अधिकारी मुख्यमंत्री निवासातल्या बैठकीला गेला नव्हता की त्याला आमंत्रणही नव्हते. पण गदारोळ कसा होत राहिला? मोदींवर दंगली पेटवल्याचा आरोप करणारा प्रत्येकजण त्या बैठकीला हजर असल्यासारखाच बोलत नव्हता काय? आताही भिडेगुरूजींनी सांगितलेले आंबामहात्म्य किती लोकांनी प्रत्यक्ष वा रेकॉर्ड केलेले ऐकले आहे? पण नुसत्या त्या कथापुराणातून हजारो शहाण्य़ांच्या वांझोट्या बुद्धीची गर्भधारणा होऊन गेली आहे. त्यापेक्षा त्या शेतातील आंब्याचे आणखी कोणते महात्म्य उलगडून सांगण्याची गरज आहे काय? त्या गाण्यातली सखू, दाजिबाला उतावळेपणाने म्हणते, ‘दाजिबा तुम्हाला म्हाईत, जायाचं का आंबराईत’, त्यापेक्षा दोनचार दिवसातला धसमुसळेपणा किंचीत तरी वेगळा आहे काय? त्यामुळे भिडे गुरूजी काय बोलले वा बोलतील, ते ऐकायचीही गरज उरलेली नाही, ते काय बोलणार ते आम्ही आधीच ठरवून ठेवलेले आहे आणि त्यापेक्षा वेगळे काही गुरूजी बोलले तरी आम्ही आमच्या मनातले मनोहर भिडे म्हणून नवजात अर्भकाच्या तोंडी तेच बोबडे बोल घालून आमचा गाजावाजा चालविणार आहोत. बाकी सत्याची चाड कोणाला उरली आहे?

18 comments:

 1. ज्याप्रमाणे भंपक पाखंडी लोकांनी श्री मोदींवर काहीही आरोप करून त्यांना प्रचंड जनाधार मिळवून दिला , अगदी त्याचप्रमाणे आंबेडकरादी लोकांच्या निरर्थक आरोपांमुळे श्री गुरुजींच्या कार्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली आहे.

  ReplyDelete
 2. Bhau Waa, Ekdum Sansanit Chaprak Dili Aahe Tumhi...!!!

  ReplyDelete
 3. कडक भाऊ . आपण एकमेव पत्रकारितेसंबंधित व्यक्ती आहात ज्यांना भिडे गुरुजींच्या अंतकरणाचे वर्म कळले आहे

  ReplyDelete
 4. ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे, हिंदुस्तान प्रतिष्ठान नव्हे.

  ReplyDelete
 5. ह्या आंबे प्रकरणावरून सध्याची पत्रकारिता किती रसातळाला गेलेली आहे हे संपूर्णत: उघड झाले आहे. सामान्य माणसाला आता कुठल्या माध्यमांवर वा सोशल माध्यमांवर विश्वास ठेवायचा व खरी बातमी कुठे व कशी शोधायची हा एक मोठाच प्रश्न पडलाय. आत तर २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणूकांचे पडघम वाजू लागतील अश्या वेळी सामान्य मतदारांनी आपले मत कश्यावर आधार ठेवून बनवायचे ही एक भीषण समस्या भेडसावू लागली आहे. माझ्या मते भाऊ , आपण ह्यावर काही उपाय शोधावा असे मला वाटते.

  ReplyDelete
 6. भाऊ धन्यवाद..तटस्थ पणे योग्य भूमिका मांडल्याबद्दल

  ReplyDelete
 7. अहो पार राजू परुळेकर पासून अतुल कुलकर्णी देखील आम्रईतील आंबट कैरी खाऊन आले.. हे असले विचारवंत असताना शाळा कॉलेज ची काय गरज. त्या परुळेकर साहेबांची " anatomy of Pawar family" अजून येतेच आहे..

  ReplyDelete
 8. भाऊ सणसणीत एकदम....भाऊ आणखी एक तुमचा ब्लॉग अनेक झुंडीतील माणसे वाचतात तुमची माफी मागून त्या झुंडीतील लोकांना एवढेच सांगु इच्छीतो की येत्या वर्षाभरात क्षेत्र रायगड इथे "३२ मण सुवर्ण सिंहासन" स्थापन होणार , संकल्पपूर्ती सोहळयासाठी जरूर या.

  एक कडवट धारकरी

  ReplyDelete
  Replies
  1. तिथे ३२ मण सोन्याचे सिंहासन परत स्थापन करुन काय होईल असे वाटते ??
   त्यापेक्षा तोच निधी गडाच्या डागडुजी साठी वळवणे हे शहाणपणाचे लक्षण ठरणार नाही का ??

   Delete
 9. भाऊ, आचार्य अत्रेंच्या झंझावाती लिखाणाची आठवण झाली हो! एव्हढे आसूड ओढलेत आपण! पण यांना काही शरम आहे का? अजूनही असल्या लोकांच्या मागे काही लोक कसे काय जातात, देव जाणे!
  तरी अजून आंबे प्रकरणात धाकले ठाकरे उयरले नाहियेत. त्यांचा वेगळाच तमाशा असतो.

  ReplyDelete
 10. भाऊ पाना विषयी आपले काय मत आहे ??

  ReplyDelete
 11. आजकाल बातमी देताना ती सत्य आहे का,किवा त्या पाठीमागे काही उद्देश आहे का हा विचार वाहिन्या सुद्धा करीत नाही टीआरपी व सनसनाटी हा मसाला लावून बातमी रंगविणे हा उद्द्दोग,साहेबांच्या बाबतीत काय बोलणार आजकाल त्यांची पातळी इतकी खली गेली की हे राष्ट्रीय नेते नसून गल्ली दादा वाटतात

  ReplyDelete
 12. सत्य जगा समोर ठेवणारे आपल्या सारखे पत्रकार कालबाह्य होत आहेत.अभ्यास न करता बातमी करायची आणि trp घ्यायचा हा जमाना आलाय.

  ReplyDelete
 13. ब्राह्मणद्वेष हा बाहेरच्या गोऱ्या लोकांच्या घातल्या पाण्याने वाहणारा नाला आहे .त्याला भारतीय परिपेक्ष नाहि .हि मंडळी मिशनऱ्यांच्या मुशीत तयार झालेली असून त्यांना इंग्रजांचा उघड राजाश्रय आणि फंडिंग होती व आहे. त्यामुळे समाजसुधारणेच्या नावाखाली परकीय राजव्यवस्थेला आव्हान देण्याऐवजी एतद्देशीय समाजात तोडफोडीचा पॅटर्न अवलंबिला गेला आणि स्वातंत्र्याच्या मागणीला खीळ घातली गेली. ब्राह्मणद्वेष जोपासणाऱ्यांना धर्मांतरण करवणाऱ्या ख्रिश्चन पाद्री लोकाबाबत असलेले ममत्व त्याचेच द्योतक आहे .

  ReplyDelete
 14. आदरणीय भाऊ, आजच्या जमान्यात लोकशाही मूल्ये आत्मसात केलेला वास्तववादी आणि समाजवादी , निर्भीड व खोचक आणि तितकेच विवेक जागा ठेवून लिखाण करणारा पत्रकार विरळा ! सलाम आपल्या लेखणीला आणि बुद्धीला !

  ReplyDelete