Sunday, June 3, 2018

कौनजी ‘माकन’ खायो



सध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकाभा निवडणूकीचे वेध लागलेले असून, त्यात मोदी व भाजपा विरोधात एकास एक उमेदवार उभे करण्याची चाचपणी सुरू आहे. त्यात मग कोणकोणते पक्ष एकत्र येऊ शकतील, याची छाननी अनेक पुरोगामी विचारवंतही करीत आहेत. त्यासाठी विविध पक्षांना व त्यांच्या नेत्यांनाही भंडावून सोडले जात आहे. अशा गदारोळात देशाच्या राजकारणात आमुलाग्र परिवर्तन घडवायलाच अवतरलेले अरविंद केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष ओढला गेला असेल तर नवल नाही. सहाजिकच विविध राज्यात कॉग्रेसखेरीज कोणी दुसरा तिसरा पक्ष असेल, तर त्याला कॉग्रेसच्या गोठात नेवून दावणीला बांधण्याचे टेंडर अनेक संपादक व पत्रकारांनी मिळवलेले आहे. त्यामुळेच दिल्लीत दुसरातिसरा पक्ष आम आदमी पक्षच असेल, तर केजरीवाल यांनी कॉग्रेसच्या सोबत हातमिळवणी करण्याला पर्याय उरत नाही. पण एक हाताने टाळी वाजत नसल्याने कॉग्रेस त्यासाठी कितपत राजी आहे, त्याची चाचपणी करण्यात आली. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी सडेतोड भूमिका घेतली. मोदी नावाचा राक्षस ज्यांनी उभा केला, त्यांच्याशी हातमिळवणी अशक्य असल्याचे त्यांनी जाहिर करून टाकले. पण त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे अजिबात कारण नाही. हे माकन महाशय जिथल्या तिथे थुंकलेली थुंकी गिळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे सुदैव इतकेच, की पत्रकार परिषदेत त्यांनी ही डरकाळी फ़ोडली, त्याच दरम्यान राहुल गांधी तिथे पोहोचले नाहीत. राहुल यांनी केजरीवाल यांचे समर्थन केले असते तर माकन यांनी आपलेच शब्द फ़िरवुन केजरीवाल हे महान संत असल्याचाही हवाला तिथल्या तिथे देऊन टाकला असता. पण तसे होऊ शकले नाही, कारण राहुल दिल्लीतच नाहीत. म्हणून तर केजरीवाल आणि माकन दोघेही बचावले.

पाच वर्षापुर्वी मोदी नावाचा माकनकथित राक्षस अजून उदयाला यायचा होता आणि अशी एक पत्रकार परिषद माकन यांनी भरवलेली होती. त्याचे निमीत्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढलेला एक अध्यादेश हे होते. तेव्हा सुप्रिम कोर्टाने एक निकाल दिला होता. ज्या व्यक्तीला दोन वर्षापेक्षा अधिक मुदतीची कारावासाची शिक्षा झालेली आहे, त्याचे अपील वरच्या कोर्टात असले तरी त्याच्या निकालाची प्रतिक्षा न करता त्याची निवडणूक रद्द करावी; असा त्या निकालाचा आशय होता. त्यात मग बिहारचे कॉग्रेस सन्मित्र लालूप्रसाद यादव आणि कॉग्रेसचेच नेते रशीद मसूद फ़सलेले होते. त्यांचे संसद सदस्यत्व तात्काळ रद्दबातल होऊ घातलेले होते. तोच निर्णय फ़िरवण्यासाठी मनमोहन सरकारने अध्यादेश काढलेला होता आणि त्यावरून राजकीय कल्लोळ माजलेला होता. आधीच भ्रष्टाचार व घोटाळ्यांच्या जंजाळात फ़सलेल्या कॉग्रेसला हा अध्यादेश म्हणूनच आरोपीच्या पिंजर्‍यात आणून उभा करत होता. त्या संबंधातील अनेक प्रश्न कुठल्याही कॉग्रेस नेत्याला कुठेही विचारले जात होते आणि त्याचीच सफ़ाई देण्यासाठी मुख्य प्रवक्ते म्हणून माकन यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. ते हिरीरीने तो अध्यादेश कसा पुरोगामी व न्याय्य असल्याचे सांगत होते आणि अचानक तिथे राहूल गांधी येऊन टपकले. त्यांनाही पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला आणि राहुल उत्तरले, हा अध्यादेश म्हणजे शुद्ध मुर्खपणा असून तात्काळ तो फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकला पाहिजे. इतकेच बोलून राहुल गांधी उठले आणि अंतर्धान पावले. मग माकन यांचा चेहरा बघण्यालायक झालेला होता. कारण आधी ३०-४० मिनीटे ते त्याच अध्यादेशाचे गुणगान करीत होते आणि राहुल गेल्यावर तोच अध्यादेश भिकार असल्याचे खुलासे देत बसण्याची नामुष्की त्यांच्यावरच आलेली होती. सहाजिकच आज माकन काय म्हणत आहेत, त्याच्यावर किंचीतही विश्वास ठेवण्याचे काही कारण उरत नाही.

कारण कॉग्रेसचे धोरण म्हणजे ‘आले राहुलच्या मना, तिथे कोणाचे चालेना’ अशी स्थिती आहे. सहाजिकच राक्षस, मोदी, वा अण्णा किंवा केजरीवाल अशा बाबतीत आज व आता कॉग्रेसचे जे काही मत असेल, तेच थोड्यावेळाने वा उद्या असेल असे नाही. जोवर राहुल आपले मत बदलत नाहीत, तोपर्यंत ते सत्य असते. पण ते कायमचे सत्य नसते. राहुलचे मत बदलण्यापर्यंतच ते सत्य असते. म्हणूनच मोदी नावाचा राक्षस केजरीवाल यांनी उभा केला म्हणून त्यांच्याशी हातमिळवणी शक्य नसल्याचा निर्वाळा माकन यांनी देण्याला अर्थ नाही. कॉग्रेस कार्यकर्तांना तसे वाटते किंवा कार्यकर्त्याचे तसे मत असल्याचे दावे निरर्थक आहेत. कॉग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना कुठलेही मत नसते. राहुल यांचे सातत्याने बदलणारे मत, हेच कॉग्रेसचे धोरण असते आणि म्हणूनच ते आपोआप कार्यकर्त्याचे मत असते. सहाजिकच केजरीवाल यांना सोबतीला न घेण्याच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेला अजिबात किंमत नाही. किंबहूना मोदी नावाचा राक्षस असेही मानण्याचे कारण नाही. उद्या अचानक राहुलना मोदी म्हणजे कोणी महान साधूसंत असल्याचाही साक्षात्कार होऊ शकतो. तेव्हा माकन यांची मोदींना राक्षस ठरवण्याची बिशाद आहे काय? कर्नाटकात निवडणूक प्रचारात राहुल अखंडवेळ काय सांगत होते? जनता दल सेक्युलर ही भाजपाची बी टीम असल्याची ग्वाही देत होते ना? मग त्याच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? ए टीम राक्षस आणि बी टीम परमेश्वराचा अवतार असू शकतो काय? पण राहुल गांधींच्या महान तर्कशास्त्रात असेही घडू शकते आणि असूही शकते. आताही केजरीवाल यांच्यावरचा माकन यांचा आक्षेप काय आहे? ते केजरीवालांना लोकपाल आंदोलनातील भाजपाची बी टीम संबोधत आहेत ना? मग उद्या तीच बी टीम कॉग्रेसला पुरोगामी साधूसंत वाटणार नसल्याची कोणी ग्वाही देऊ शकतो काय?

अर्थात हा सगळा तर्कवाद बाजूला ठेवून या विषयाकडे बघता येईल. आपला दावा मांडताना माकन आपल्या पक्षाची दिल्लीतली ताकद वाढत असल्याचे दावे करताहेत. विधानसभा जिंकताना आपची ५६ टक्के मते होती आणि दोन वर्षात महापालिका मतदानात केजरीवालांची लोकप्रियता २३ टक्क्यांवर आली. म्हणजे झपाट्याने आपची लोकप्रियता घटते आहे, असे गणित त्यांनी पुढे केले आहे. पण त्याच पालिका मतदानात वाढलेल्या टक्क्यांनी कॉग्रेसला किती नगरसेवक मिळाले? कुठल्या पालिकेत सत्ता मिळाली, हे मात्र सांगत नाहीत. दरम्यान विधानसभेच्या दोन पोटनिवडणूका झाल्या आणि त्यापैकी एकही जागा कॉग्रेसला मिळवता आली नाही, त्यावर माकन यांचा काय खुलासा आहे? राजोरी गार्डन ही जागा आपने गमावली व ती भाजपाने जिंकली. मग नंतर बवानाची जागा राखताना आपने भाजपाला पराभूत केले होते. पण पालिकेसह विधानसभा पोटनिवडणूकीत कुठेही मतदाराने कॉग्रेसला पुन्हा जवळ करत असल्याचा पुसटसाही इशारा दिलेला नाही. आप व भाजपा यांच्या हाणामारीत कॉग्रेसचे पुरते सॅन्डविच होऊन गेले आहे. दोघांमध्ये कॉग्रेस सतत चिरडली जात आहे. त्यामुळे आपल्या पदरात थोडेतरी यश पडण्यासाठी कॉग्रेसला केजरीवालांची मदत घेण्याची गरज आहे. उलटी स्थिती नाही. हातमिळवणी केली नाही तर आपचे नुकसान जरूर होईल. भाजपाला लाभ जरूर होईल. पण कॉग्रेसला पुन्हा जिवदान मिळेल अशी स्थिती दृष्टीपथात अजिबात नाही. मग छातीठोकपणे केजरीवालांना झिडकारून लावण्याची मस्ती कशाला आहे? केजरीवाल अजून तरी कॉग्रेसच्या दारात वाडगा घेऊन उभे राहिलेले नाहीत आणि जेव्हा २०१३च्या अखेरीस कॉग्रेसने सरकार बनवायला पाठींबा दिला, तेव्हाही लाथा मारूनच केजरीवालांनी तो पाठींबा कुठल्याही अटी नाकारूनच घेतला होता. मग माकन कुठल्या मैयेला आपण माखन खाणार नसल्याचे सांगत आहेत? कौनजी माकन खायो असला सुर कशाला आळवत आहेत?

No comments:

Post a Comment