कुठल्याही शब्दाला एक ठराविक अर्थ असतो आणि वेगवेगळ्या संदर्भाने त्याचेही अर्थ बदलत असतात. पण सरसकट जर त्याच त्याच शब्दाचा वाचाळतेने उपयोग करीत राहिले, मग त्या शब्दामागचा अर्थ गुळगुळीत होऊन जातो आणि त्याचा जनमानसावर कुठलाही परिणाम होऊ शकत नाही. १९९० च्या दशकात मुंबईनजिक उल्हासनगर या छोटेखानी शहरामध्ये शालांत परिक्षा चालू होती आणि तिथल्या एका वर्गात घुसून हरीष पटेल नावाच्या माथेफ़िरू प्रेमिकाने एका मुलीला जीवंत जाळलेले होते. तिचे नाव रिंकू पाटिल. त्या घटनेने इतकी खळबळ माजवली, की पुढला महिनाभर वर्तमानपत्रात त्याचीच उलटसुलट चर्चा चाललेली होती. त्याच दरम्यान जळगाव भागात एक वेगळे प्रकरण उघडकीस आले. शाळकरी वा गृहिणी असलेल्या मुली महिलांचे अर्धनग्नावस्थेतील फ़ोटो काढून, त्यांचे राजरोस लैंगिक शोषण करणारी एक टोळीच पोलिसांनी पकडली होती. त्यानंतर वासनाकांड हा शब्द राजरोस बातम्यातून झळकू लागला आणि त्यातली तीव्रता संपून गेली. पुढे कुठल्याही गावात शहरात किरकोळ घटनेलाही वासनाकांड हा शब्द वापरला जाऊ लागला आणि त्यातले गांभिर्य संपून गेले. रिंकू पाटिल वा जळगाव प्रकरणांनी अवघा महाराष्ट्र खरोखर हादरून गेलेला होता. पण नंतर तशा घटनांची कोणाला दखलही घ्यायची संवेदना शिल्लक राहिली नाही. जणु अशा घटना नेहमीच्या जीवनाचा एक भाग बनून गेल्या. शब्दांचा उपयोग म्हणून काळजीपुर्वक करणे अगत्याचे असते. मग ते शब्द गुणगौरवाचे असोत वा शिव्याशाप असोत. आजकालच्या पत्रकार किंवा समालोचक भाष्यकारांना त्याचेच भान राहिलेले नाही. म्हणून तर पुरोगामी प्रतिगामी, जातीवादी वा कुठल्याही शब्दांना काहीही अर्थ उरलेला नाही, की त्यांचा परिणाम होत नाही. मग फ़ुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या शब्दावलीची काय अवस्था झालेली असेल?
कालपरवा खानदेशातील जळगाव जिल्ह्याच्या एका गावात अशीच लज्जास्पद घटना घडली. विहीरीत दलित समाजातील मुले पोहायला उतरली, म्हणून त्यांची नग्न करून धिंड काढली गेली. त्याच अवस्थेत त्यांना अमानुष मारहाण करून त्याचे चित्रणही करण्यात आले. हे चित्रण विविध वाहिन्यांनी अगत्याने प्रक्षेपित करून पुन्हा तीच पुरोगामी महाराष्ट्राची टेप वाजवली. अशा घटनेचे गांभीर्य त्यांनाही नसेल तर सामान्य लोकांना कशाला असेल? मग सोशल माध्यमातून निषेधाचे उपचार सुरू झाले आणि राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाची पोपटपंची दाखवून झाली. अशी चित्रणे आजकाल सगळीकडे उपलब्ध असतात. कुठे मुलीची छेड काढण्यापासून बलात्कार हत्येची चित्रणेही उपलब्ध होत असतात. जे कोणी असे हिडीस कृत्य करतात, त्यापैकीच कोणीतरी अगत्याने त्याचे मोबाईल कॅमेराने चित्रण करत असतो. ह्याला गुन्हा म्हणायचे असेल, तर त्यातले गुन्हेगारच आपल्या कृत्याचे चित्रण रुपाने पुरावेही तयार करीत असतात. अशा चित्रणाने आपणच पकडले जाऊ, याचीही त्यांना फ़िकीर नसते. कुठलाही सराईत गुन्हेगार गुन्हा करताना पुरावे नष्ट करण्याची काळजी घेत असतो आणि पकडले जाऊ नये, याची व्यवस्था आधीच करत असतो. पण अशा स्वरूपाचे गुन्हे चित्रणासह जगासमोर येतात, तेव्हा त्याचे चित्रण त्यांनी कशाला केले? आपल्याच गळ्यात कायद्याचा फ़ास कशाला अडकवून घेतला, ही बाब दुर्लक्षणिय नाही. त्यांना पकडले जाण्यापेक्षाही आपल्या कृतीतून प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळण्याचा हव्यास दिसून येतो आणि तीच चिंताजनक बाब आहे. इथेही जे चित्रण उपलब्ध आहे, ते गुन्हा करणार्यांनीच चित्रित करून ठेवलेले आहे आणि ती बाब आता नित्याची झाली आहे. यामागे गुन्हेगारीवृत्ती असती तर असले चित्रण त्यानीच टाळले असते. पण तसे होत नाही ही बाब खरी चिंताजनक आहे. पण त्याचा उहापोह चर्चेत बातमीत कुठेही दिसून येत नाही.
अशा बातम्या व घटना रंगवून सांगणार्यांना आपण पत्रकार वा अभ्यासक विश्लेषक म्हणत असतो. पण त्याच्याच वाचाळतेने अशा गोष्टी व कृत्यातील गांभीर्य पुरते रसातळाला गेलेले आहे. दलित, मुस्लिम वा तत्सम वर्गातील कोणालाही कुठे खरचटले, तरी तो भीषण अन्याय अत्याचार असल्याचे चित्र रेखाटण्याला सामाजिक न्याय समजण्यातून ही विकृती आलेली आहे. आताही यात दलित मुलांचा विषय आहे. पण त्यांच्यावर अन्याय करणारे कोणी सवर्ण वा उच्चवर्णिय नाहीत. भटक्या जमातीचे कोणी लोक त्यात आहेत. म्हणजेच सामाजिक न्यायाच्या प्रकारात एका वंचितानेच दुसर्या वंचितावर अन्याय केलेला आहे. पण त्याचा मागमूस कुठे या बातमीत वा चर्चेत आढळून आला नाही. अशा चर्चेत आणखी एक बाष्कळपणा चालतो. फ़ुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. असे शब्द ऐकले मग महाराष्ट्र त्या घटनेपुर्वी कसा ताठ मानेने जगत वागत होता, असाच समज निर्माण व्हावा. जणू ती घटना घडण्यापुर्वी महाराष्ट्रात असे कधी कुठे घडलेले नाही, असे या दिडशहाण्यांना सुचवायचे असते काय? अशा घटना खेडोपाडी नित्यनेमाने घडत असतात. अगदी मुंबई पुण्यासारख्या महानगरात घडत असतात. त्याची बातमी झाली नाही, म्हणून महाराष्ट्र ताठ मानेने चालतोबोलतो असे अजिबात नाही. वस्तुस्थिती अशी आहे, की आपण ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, तिथे आजही जातीयवादी भेदभाव गुण्यागोविंदाने नांदत असतात. एकमेकांना संभाळून घेत प्रत्येक जातीची अस्मिता जपली जात असते आणि त्याची प्रचिती शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या उक्तीकृतीतूनही सतत मिळत असते. पुणेरी पगडी नाकारून फ़ुले पागोट्याचा आग्रह धरण्यातून पवार कुठला समभाव शिकवत होते? जळगावच्या विहीरीत उतरलेल्या दलित मुलांना खड्यासारखे बाजूला काढणारे आणि पगडीला आपल्या समारंभातून हद्दपार करणारे, कुठल्या निकषाने वेगळे असतात?
जळगावला त्या मातंग मुलांना आपल्या विहिरीत उतरल्याशी शिक्षा फ़र्मावली गेली. त्यांना एका जातसमुहाच्या विहीरीजवळ येण्यालाही प्रतिबंध घातला गेला आणि त्याचा धडा सर्वदूर संदेश म्हणून जावा, यासाठी त्याचे चित्रण झाले. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनादिन सोहळ्यात पुणेरी पगडीला आपल्या समारंभातून हद्दपार करण्यासाठी जी इव्हेन्ट पवारांनी घडवली, ती जशीच्या तशी ‘जळगावी’ नाही काय? पगडी आणणार्या महिला नगरसेविकेला नंतर समजावून सांगणे शक्य होते. पण पवारांनी त्याची मोठी इव्हेन्ट केली. जळगावच्या त्या भटक्या जमातीच्या मुलांनी मारहाण करून संदेश दिला. एकाजागी शब्दाचा मार होता आणि दुसर्या जागी प्रत्यक्षातली मारहाण झाली. पण दोन्हीकडला ‘जातीवंत’ आशय जातीअंताचा नव्हे तर जातीय अस्मितेचाच नाही काय? फ़ुल्यांची पगडी पुरोगामी आणि पुणेरी पगडी जातीय. दलितांची विहीर आणि भटक्यांची विहीर वेगवेगळी असते. यापुढे हीच पगडी दिसावी आणि यापुढे तुम्ही आमच्या विहीरीपाशी दिसू नका, यातली आशयभिन्नता कोणी समजवून सांगू शकेल काय? पवारांच्या विधानानंतर तशी चर्चा होऊ शकली नाही आणि जळगावच्या घटनेनंतरही त्यातल्या आशय गांभीर्याचा उहापोह कोणी केला नाही. कारण आशय दोन्हीकडला सगळेच विसरून गेले आहेत. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवायचे आणि उथळ पाण्याचा खळखळाट करून नदीचे सोंग आणायचे; हा बुद्धीवाद झाला आहे. मग अशा घटना घडत रहातात आणि त्यातल्या गुन्हेगारांना पकडून काही उपयोग नसतो. कारण त्यांना शिक्षा झाली तरी त्यांना मुळात आपण गुन्हा केला, असे वाटलेलेच नसते. त्यांच्यासाठी ती जातीय अस्मिता असते आणि ती वरपासून खालपर्यंत मानल्या गेलेल्या प्रत्येक जातीजमातीच्या हाडीमाशी खिळलेली आहे. मनुवादाच्या नावाने नित्यनेमाने शिव्याशाप देणार्यांनाही आपल्याच जातीच्या अस्मितेची दावण सोडता आलेली नसेल, तर पुरोगामी महाराष्ट्र हीच एक अंधश्रद्धा नाही काय?
"आम्ही पाणी पितोय आणि तुम्ही नागड्याने यात आंघोळ करताय व्हय रे भाड्यानो, बाहेर या, तुम्हाला दाखवतो हिसका," असे म्हणून राहुल आणि सचिन या नागव्याने आंघोळ करत असलेल्या पोरांना जसे आहेत तसे विहिरीतून बाहेर काढले. त्यांना तसेच रागाने शेजारच्या शेडमध्ये नेण्यात आले. तेव्हा जाताना त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून लज्जारक्षण केले. "नालायकांनो, तुम्हाला हजारदा सांगून तुम्ही ऐकायला तयार नाही, माजलाय रे !!" असे म्हणून सुती पट्ट्याने त्यांना चार फटके देण्यात आले व सोडण्यात आले. नंतर त्यांनी आंघोळीस उतरण्यापूर्वी विहिरीच्या काठावर दगड ठेवून ठेवलेले कपडे घालून पळ काढला.
ReplyDeleteजामनेर मधील वाकडी गावातील ही तसे पाहायला गेले तर तशी अत्यंत सामान्य घटना आहे पण सध्या या घटनेला देशावर काहीतरी फार मोठे संकट आले आहे ..महाराष्ट्र खूप वर्षे पाठीमागे गेला ...अशा पद्धतीने घेतले जातेय आणि पराचा कावळा केला जातोय !!
विहिरीचा मालक ईश्वर जोशी हा मुळात कोणी ब्राम्हण नव्हे. 'जोशी हा जातीने ब्राह्मण असता तर मजा आली असती' असे वाटणाऱ्यांचा हिरमोड झाला, हे खरे. त्यांचे जातीय दंगल घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले पण त्याला इलाज नाही!
भिक्षा मागत फिरणाऱ्या कुडमुडे जोशी समाजाच्या भटक्या विमुक्तातील ईश्वर जोशी याची ही विहीर आहे आणि राहुल व सचिन ही मातंग समाजाची पोरे आहेत.
ईश्वर जोशीने अनेक वेळा सांगितले की "बाबांनो, आम्ही हे पाणी पितो. आमच्या बरोबर अनेक लोक हे पाणी पितात. त्यामुळे तुम्हाला अंघोळ करायची असली तर पाणी बाहेर काढून आंघोळ करत चला. आत उतरून करू नका. पुन्हा सांगितले नाही म्हणू नका." असे अनेकदा समजावून सांगितलं. त्याचबरोबर अती झाल्यावर "तंगडे तोडीन" असे धमकावून सांगून सुद्धा पाहिले पण ऐकतील ती पोरे कसली..!!
गुरं - शेळ्या घेऊन जायचं आणि कोणी नाही असे बघून धडाधड विहिरीत उड्या टाकायच्या. कुणी आलं, असे दिसले की, पळून जायचं.. या सर्वाला ईश्वर वैतागला होता. त्याने या दोघांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या पालकांना समजावले होते... पालकांची अगदी रडक्या स्वरात अजीजी केली होती. "जरा तुमच्या पोरांस्नी समजावून सांगा. नागड्यानं अंगुळ करत्यात. त्यात मुतत्यात. तेच पानी आमी पितावय !"
तेव्हा
"हिकडं यारं" म्हणून पालकांनी पोरांना समजावले होते. "जाऊ नका रं, तिकडं आन गेल्यासात तर हीरीत उतरू नगासा बगा. आज्याबाद पवायचं न्हाई. कळत नाही काय रे, तुम्हासनी !!"
पण पोरांनी ऐकलं नाही !!
एका मातंग व्यक्तीने पोरांच्या आईला उभा करून केस केली. मग पोलिसांनीही व्हिडिओ पाहिला व प्रथमदर्शी 323, 405, 506 व अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल केला.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत राहुल व सचिनने आपली चूक झाल्याचे पटकन मान्य केले !! तसेच त्यांच्या पालकांनीही 'आमची कोणतीही तक्रार नाही. पोरच harami हाईती. आमचं दिकाल ऐकत न्हाईती' असं पोलीस स्टेशनला स्पष्टपणे सांगितले आहे.
आपण सत्य परीस्थिती मांडलीत.
Deleteअतिशय मार्मिक भाऊ.. या घटनेची बातमी पाहतचक्षणी तिचं 'पगडी' सोबत असलेलं साम्य डोक्यात आलं होतं..!
ReplyDeleteया घटनेचे इतके उत्तम विश्लेषण तुम्हीच केलेत . बाकीचे म्हणजे, तुमच्याच शब्दात, उथळ पाण्याचा खळखळाट .
ReplyDeleteभाऊ प्रसन्न जोशी सारख्या चॅनल वाल्याला संघाला शिव्या घालायला तेवढेच एक निमित्त मिळाले
ReplyDeleteमला वाटते जवळपास 1990 ची घटना असावी , आमच्या परभणी शहरात आंबेडकर जयंती निमीत्य निघालेल्या मिरवणुकितील एक ट्रकला आग लागली व दुर्दैवाने दहा ते पंधरा लोक जळुन मृत्यू पावले , ब्राम्हण आळीतुन मिरवणूक जाताना ही घटना घडली (नानल पेठ ) . सर्व मिरवणुकितील कार्यकर्ते आजुबाजुच्या ब्राम्हण च्या घरात शिरले व मिळेल ते पाणी घेऊन ,त्यात मी पण सहभागी होतो , आग विझविण्याचा प्रयत्न केला...सर्व ब्राह्मण गल्ली मदतीला धाऊन आली..कुणीही कुणावर आरोप केले नाहीत की tv वर चर्चा घडवून आणल्या नाहीत.tv वर एकछोटीच बातमी होती.दुसऱ्या दिवशी पेपरात सुध्दा एक अपघात एवढयाच स्वरुपात बातमी देण्यात आली होती. हे एवढ्यासाठी लिहीतोय की जर हि घटना आजच्या काळात घडली असती तर ...राहुल...जिग्नेश..शरद....माया...लालु..कैन्हैय्या....टिव्ही...वर्तमानपत्र ...अबब...विचार करवत नाही !!!
ReplyDeleteखरे आहे
Deleteहल्ली भीती वाटते की , गाडी चालवताना चुकून कोणी धडकले तर ७०% वेळा भांडण होतेच होते. पण माझ्या दुर्दैवाने ती व्यक्ती ललित निघाली तर ..
ReplyDelete.
Bhau
ReplyDeleteReally nice artical.