Friday, June 29, 2018

उपर्‍या वरपित्यांचा गदारोळ

 (शरद पवार आणि सोनियांचे डावे-उजवे हात बघा)

bangalore oath pawar sonia के लिए इमेज परिणाम

आजही खेड्यापाड्यात कोवळ्या वयातच मुलांची लग्ने निश्चीत केली जातात. त्या मुलांच्या इच्छा भावनांना कोणी विचारत नाही. काहींचे बालविवाह उरकले जातात, तर काही विवाह निश्चीत करून मुले वयात आल्यावर विधीवत पुर्ण होतात. पण आतस्वकीयात गोतावळ्यात असे विवाहसंबंध निश्चीत करण्याची ही प्रथा कालबाह्य असून, पुढारलेल्या पुरोगामी जगात मुलांच्या इच्छेला प्राधान्य असले पाहिजे. कारण त्यांना पुढल्या आयुष्यात एकमेकांशी जुळवून एकत्र जगायचे असते. पण इतके शहाणपण आपल्या समाजात अजून आलेले नाही आणि अशी लग्ने होत असतात. त्यातील अनेकांचा विचकाही होऊन जात असतो. त्याच्या विरोधात कायदे झालेले आहेत अणि न्यायालयेही त्याची दखल घेऊन हस्तक्षेप करीत असतात. अशा विवाह किंवा प्रथापरंपरांना व रुढीप्रियतेला कडाडून विरोध करणारा एक पुरोगामी वर्ग आपल्या देशात आहे. ते अशा रुढींच्या विरोधात मोहिमाही चालवित असतात. पण त्या कालबाह्य परंपरेतही एक जी काळजी घेतली जाते, तितका शहाणपणा राजकारणात दिसत नाही. तो शहाणापणा म्हणजे अशी लग्ने व विवाह निदान मुलगा मुलगी अस्तित्वात असल्याचे बघूनच ठरवली जात असतात. तुमच्या मुलीला आमच्या घरात देऊन टाका, असा सौदा किंवा व्यवहार त्या मागासलेल्या समाजघटकातही होत नाही. कुणाच्या मुलीला मागणी घालण्यापुर्वी आपल्या घरात विवाहयोग्य मुलगा आहे, याचीही आधी खातरजमा करून घेतली जात असते. नुसतीच तुमची मुलगी द्या आणि नवरामुलगा कोण, ते नंतर सवडीने बघता येईल; असा व्यवहार त्या मागासलेल्या वर्गात कधी होत नाही. पण राजकीय विश्लेषणात तेवढ्याही शहाणपणाचा मागमूस दिसत नाही. इथे अनेक अभ्यासक व विश्लेषकांनी मतदाराकडे मुलगीची मागणी करून टाकलेली आहे आणि मुलगा कोण त्याचे उत्तरही त्यांना अजून माहित नाही.

मध्यंतरी कर्नाटक विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि भाजपाचे बहूमत सहासात जागांनी हुकले. तर भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कॉग्रेसने विनाविलंब तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जनता दल सेक्युलरचे नेता कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठींबा जाहिर केला. मग काय, तमाम राजकीय पुरोगामी विश्लेषक बुजूर्गांना महागठबंधन वा महाआघाडीचे वेध लागले. अजून लोकसभेच्या निवडणूकीला वर्ष शिल्लक असताना त्यांनी मतदाराकडे मुलीला मागणी घालावी, तशी मोदींच्या विरोधात असलेल्या काल्पनिक नवरामुलासाठी मतदाराच्या सत्तेची मागणी घालून टाकलेली आहे. अर्थात मतदाराने त्याविषयी काही मत बनवलेले नसतानाच विवाह निश्चीत झाल्याचा डंकाही पिटणे सुरू केले. विरोधकांची एकजुट होऊन देशातील सत्ता त्यांच्यापाशी येण्यासाठी त्या सत्तेचा बोजा उचलणारा कोणी नेता आवश्यक असतो. तर त्या नेत्याचे म्हणजे नवर्‍यामुलाचे नाव किंवा चेहरा कोणाला ठाऊक नाही. पण सत्तेची व बहूमताची मुलगी त्यांनी आपल्या घरी नांदायला येणार, असे आधीच जाहिर करून टाकलेले आहे. मग नवरामुलगा कोण असा प्रश्न विचारला की उत्तर येते, तो मुलगा नंतर सवडीने शोधता येईल. आधी आपण लग्न उरकून घेऊ. आधीच मंडप बांधायला घेऊ, आताच ढोलताशे वाजवायला काय हरकत आहे? अजून लग्न लागलेले नाही, इतक्यात मुलाचे नाव विचारून त्या लग्नात विघ्न कशाला आणता? असा उलटा प्रश्न केला जातो. मात्र गंमतीची गोष्ट अशी, की या पद्धतीने मागास खेड्यातला मुलीचा बापही आपली मुलगी अशा कुठल्या घरी देत नाही, हे सत्य असल्या शहाण्यांच्या गळी उतरत नाही. पण सगळेच तितके मुर्ख नसतात. शरद पवार यांच्यासारख्या जाणत्याने त्याची ग्वाही आताच देऊन टाकलेली आहे. महागठबंधन वगैरे काही शक्य नाही. फ़ार तर राज्यनिहाय जागावाटप होऊ शकते. निवडणूकपुर्व आघाडी नाही.

पवारांच्या विधानाचा अर्थ सोपा नाही. असे कुठलेही देशव्यापी गठबंधन वा सर्वपक्षीय आघाडी होऊ शकणार नाही, असे त्यांचा अनुभव सांगतो आहे. पवारांनी त्याचाच उच्चार केलेला आहे. ते या देशातील राजकारणाचे दिर्घकालीन वास्तव आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षात मतभेद व वैरभावना आहे आणि प्रत्येक पक्षांतर्गत नेत्यांचे मतभेद कायम विकोपास गेलेले आहेत. त्यात आपला प्रतिस्पर्धी वा शत्रू पुढे जाणार असेल, तर पक्षाला अपयश आले तरी बेहत्तर; अशी धारणा वसलेली आहे. आपला शत्रूपक्ष मोठा होण्यापेक्षा मोदी वा भाजपा जिंकला तरी चालेल, अशीही धारणा आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येण्याचा मुद्दा गैरलागू आहे. फ़ारतर ज्या राज्यात एक मोठा पक्ष आहे आणि त्याचा प्रभाव आहे, तो पक्ष व नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधातली तिथली आघाडी उभी राहू शकते. कारण अशा प्रत्येक स्थानिक पक्ष व नेत्याला आपला प्रभाव भाजपाने संपवू नये, इतकीच अपेक्षा आहे. कॉग्रेसला देशभर भाजपा नको असला, तरी इतर प्रादेशिक पक्षांना आपले राज्यातले साम्राज्य तितके टिकवण्याची इच्छा आहे. पण त्यातला स्पर्धक एकटा भाजपाच नसून कॉग्रेसही अनेक राज्यातला अशा प्रादेशिक पक्षांचा स्पर्धक आहे. म्हणूनच अशा पक्षांना भाजपाच्या विरोधात स्थानिक पातळीवर लढायचे असताना, कॉग्रेसचा प्रतिस्पर्धी शिरजोर व्हायला नको आहे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते आहे. ते शरद पवारांनी महाराष्ट्रापुरते सांगितले आणि तेच अखिलेशने उत्तरप्रदेशसाठी सांगितले आहे. त्याला मायावतींशी तडजोड हवी असली, तरी कॉग्रेसशी हातमिळवंणी नको आहे. ममताचे बंगालमध्ये डाव्यांशी जुळवून घेणे अशक्य आहे. म्हणजेच देशव्यापी सत्तेची मुलगी असेल, तर नवरा कोण ह्या प्रश्नाचे उत्तर नाही. राज्यातली नवरीमुलगी ज्याला हवी अशा मुलांची कतार उभी आहे. दिल्लीच्या स्वयंवरात जाणारा कोणी चेहरा वा नाव नाही.

आता पवार यांनी हे सत्य बोलून दाखवले, तर त्यांच्यावर टिकाही होईल, पण चुकून का होईना पवार अधूनमधून चव बदलण्यासाठी सत्य बोलत असतात. हे त्यापैकीच एक सत्य आहे. आघाडीच्या वा महाआघाडीच्या मनोरंजनात रमून जाण्यापेक्षा, राज्य पातळीवर विगर भाजपा पक्षांनी जागावाटपाचा विचार सुरू करावा. त्यात जितके यश मिळेल. त्यातून आपोआप जागांची शक्यता वाढेल. त्यातून भाजपाच्या जिंकायच्या जागा कमी होतात आणि पर्यायाने भाजपाच्या लोकसभेतील जागा घटल्यावर सत्ता मिळणेच अशक्य होऊन जाते. अशा वेळी लग्नमंडपात मुहूर्त वाया जाऊ देण्यापेक्षा मुलीचा बाप कोणाही होतकरू मुलाला आपली मुलगी देण्यास राजी असतो. तेच इथेही आहे. आधीच मुलगा कोण वा वराड घेऊन लग्नाला निघण्य़ाची गरज नाही. प्रत्येक पक्षाने व नेत्याने आपापल्या राज्यात आपल्या प्रभावानुसार इतरांशी जुळवून घ्यावे आणि भाजपा शिरजोर ठरणार नाही याची काळजी घ्यावी. तोपर्यंत लग्नातले आमंत्रित म्हणून मंडपात पोहोचण्याचे प्रयास करावेत. मात्र त्या मंडपात भाजपाचा नवरामुलगा पोहोचू शकणार नाही, यासाठी आपापल्या राज्यातून मंडपाकडे जाणारा मार्ग रोखून धरावा. तसे केल्यास भाजपाच्या नवरदेवाचा घोडाच पुढे सरकू शकणार नाही. मुहूर्तापर्यंत नवराच पोहोचला नाही, तर तिथे उपलब्ध असलेल्या योग्य मुलाला बोहल्यावर चढवून सत्तेचा विवाह उरकून घेता येऊ शकतो. आतापासून स्वयंवराला निघालेल्या राजेरजवाडे वा राजकुमारासारखे एकमेकांच्या उरावर बसण्यात अर्थ नाही. असा पवारांच्या बोलण्यातला आशय आहे. अर्थात तो उतावळ्या व उसन्या उपर्‍या मोदी विरोधक विश्लेषक बापाच्या मेंदूत शिरणार नाही. जे अशा कुठल्याही मोदी विरोधी पक्षाचे बापही नाहीत, तेच वरपिता म्हणून मिरवत असल्याने महाआघाडीच्या नवर्‍याला घोड्यावर बसवण्याची घाई चाललेली आहे. त्यापेक्षा पवारांचा सल्ला योग्य आहे.

7 comments:

 1. मुळात जे महागठबंधंन आहे ते UP च आहे ,तिथे काँग्रेस घेणे व ना घेणे दोन्ही अवघड काम आहेत ,मायावती जस अखिलेश बरोबर जाण्याचा वेगळा निर्णयघेतला तसा पोटनिवडणूक लढण्याचा पण घेतला असता तर कळलं तरी असत कि SP ची मते त्याना trnsfer होतायत ,कारण राज्यसभा वेळी SP चे निवडून आलेले आमदार पण आले नाहीत ,इथे मतदार कसे येतील? कैराना मध्ये दिसलं कि नाव RLD च होता पण उमेदवार sp होता म्हणून मते पडली .लोकसभेत असा प्रत्येक ठिकाणी होऊ शकत नाही

  ReplyDelete
 2. भाऊ जरा वेगळा विषय आहे ,टर्की मध्ये एर्दोगन निवडून आल्यापासून जगभरातले पुरोगामी लोक लोकशाहीतून कशी हुकूमशाही तयार होतेय त्यावर चिंतीत होतायत ,पण हे विसरतायत कि लोकशाहीतून म्हणजे लोकच हुकूमशहा निवडतायत ,लोकांना नावे ठेवण्यापेक्षा ते हुकूमशहा का निवडतात ,लोकशाही अति झाली कि त्यांना त्रास झाला हा विचार करत नाहीत,जिथे अमेरिकेने पण एक हुकूमशाहचं निवडलाय तिथे इतरांची काय कथा

  ReplyDelete
 3. लेख उत्तमच । पण हसून हसून वाट लागली । 😂😂

  ReplyDelete
 4. सर्व प्रादेशिक पक्षांची अपेक्षा आहे की भाजपा आणि कॉंग्रेस यांनी आमच्या राज्यात आम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी अधिक जागा सोडाव्यात. तसेच लोकसभेत ही प्रतिनिधित्व द्यावे. हे काँग्रेस ही मान्य करणार नाही भाजपाचा तर प्रश्नच नाही. असेही पुढील लोकसभेत काँग्रेस ला सत्ता मिळायची शक्यता नाहीच मग प्रादेशिक पक्षांचा साप भाजपाकडून मारला जात असेल तर त्यांना चांगलंच आहे की. चंद्राबाबू ला बाजूला करून त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे, आता नितीश आणि सेनेचा प्रश्न कसा सोडवितात ते पाहू. मुळात आता द्विपक्षीय पध्द्त असावी असे वाटू लागले आहे.

  ReplyDelete
 5. भाऊ एकदम मस्त सत्तेसाठी हापापलेले आहेत पण स्वार्थी पणा व आपले गड किल्ले सोडेयला तयार नाहीत.
  यासाठी घटनात्मक बदल आवश्यक आहे.
  1:जर निवडणूक पुर्वी युती/आघाडी करुन काही पक्षांनी मिळुन युती केली तर आणि अशा युतीतुन ऊभा केलेला उमेदवार निवडणूक जिंकला तर या गठबंधना बरोबरच त्याला सरकार मध्ये अथवा विरोधी पक्षा मध्ये रहावे लागेल. जर अशा पक्षाच्या बरोबर युती मोडली तर आमदार खासदारकी चा राजीनामा देऊन परत निवडणूक लढावी लागेल.
  2: प्रादेशिक पक्षाला केवळ राज्य सरकार निवडणूक लढता येतील आणि नॅशनल पार्टी ला लोकसभा निवडणूक लढावता येतील असा घटनात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे.
  अननुभवा मुळे 2014 मध्ये मोदी नी अनेक आश्वासन दिली पण राज्यसभा बहुमत हा एक अडसर आहे हे विसरले.
  परंतु आता राज्य सभेच्या निवडणूक होतील त्यावेळी पुर्णपणे बहुमत भाजपला मिळेल तेव्हा मोदी काय करतात हे बघणे रोमांचकारक असेल.
  पण राज्यसभा बहुमत नाही मिळेल तर अत्यंत केविलवाणी अवस्था या कधी मधी लोकसभा निवडणूक जिंकण्यार्या पक्षाची होईल.
  पण हे पत्ते राखुन ठेवलेत का हे त्यावेळी च समजेल. का राज्य निवडणूक जिंकण्याच्या नादात मोदी शहांना याचा विसर नक्कीच पडला नसेल. कारण आयत्या वेळी आॅर्डिनन्स पास करुन असा प्रयत्न केला तरी हे आधी पण करता आले असते अशी टिका होईल.

  ReplyDelete
 6. भाऊ सही

  ReplyDelete
 7. पण चुकून का होईना पवार अधूनमधून चव बदलण्यासाठी सत्य बोलत असतात. हे त्यापैकीच एक सत्य आहे.
  hahaha.......

  ReplyDelete