Thursday, June 7, 2018

युवराजसिंग आणि धोनी

दहाअकरा वर्षापुर्वी २०-२० षटकांच्या नव्या क्रिकेटची सुरूवात झाली. तेव्हा वेस्ट ईंडिजमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या स्पर्धेत प्राथमिक फ़ेरीतच द्रविडच्या नेतृत्वाखाली पराभूत होऊन भारतीय संघ मायदेशी परतला होता. लगेच दक्षिण आफ़्रिकेत २०-२० या नव्या प्रकारची स्पर्धा व्हायची होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यात ज्येष्ठ खेळाडू बाजूला ठेवून नवख्या पोरांचा संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तिकडे धाडला होता. आता हा प्रकार कमालीचा यशस्वी झाला असून त्याचे व्यापारीकरण जबरदस्त झालेले आहे. ती पहिलीवहिली २०-२० स्पर्धा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली. पण त्या स्पर्धेच्या दरम्यान व नंतर गाजत राहिला तो धोनी नव्हेतर युवराजसिंग. मधल्या फ़ळीत फ़लंदाजीला येऊन विजयी फ़टका मारण्यासाठीच त्याची तेव्हा ख्याती होती आणि इंग्लंडच्या नामवंत गोलंदाजाच्या एकाच षटकात सहाही चेंडूवर षटकार ठोकल्याने युवराज भारतीय क्रिकेटशौकिनांच्या गळ्यातला ताईत बनुन गेला होता. त्याच्यासमोर भारताला कुशल नेतृत्व देवून अजिंक्यपद मिळवून देणारा धोनीही पुरता झाकोळून गेला होता. पुढल्या काळात युवराजने किती षटकार ठोकले वा आपल्या संघाला किती विजय संपादन करून दिले, हा इतिहास आहे. मात्र कालपरवा त्याच २०-२० आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा चेन्नईला विजेतेपद मिळवून दिल्याबद्दल धोनीचे दहा वर्षानंतरही कोडकौतुक चालले होते. पण आज कोणाला तो सहा षटकार ठोकणारा युवराज आठवतही नाही. याला काळाचा महिमा म्हणायचे, की गुणवत्तेची कदर म्हणायची? खेळातले सातत्य म्हणायचे, की एखाद्या वेळी लागणार्‍या लॉटरीचे गुणगान म्हणायचे? कौतुकाचे निकष तरी काय असतात. गुणवत्ता कशावर ठरत असते? पोटनिवडणूकीतले यश आणि सार्वत्रिक निवडणूकीतली बाजी, यात नेमका तितकाच फ़रक असतो.

क्रिकेटचा खेळ नेहमीचा असतो आणि सातत्याने खेळावा लागतो. एखादा सामना किंवा गंमतीचा तात्पुरता खेळ विरंगुळ्याचा असतो. हौसेचा भाग असतो. नेहमीचे क्रिकेट हे अगत्याचे असते. धोनी आरंभीच्या काळात हाणामारी करून जबरद्स्त वेगाने धावा ठोकणारा म्हणूनच भारतीय संघात प्रस्थापित झाला. यष्टीरक्षक फ़लंदाज म्हणूनच त्याला संघात स्थान मिळालेले होते. पण त्याला जोडून त्याने आपल्या फ़लंदाजीने धमाल उडवून देण्याच्या क्षमतेला सातत्याची जोड देण्याचा प्रयत्न केला. उत्साहाला लगाम घालून संयम व आक्रमकता यांची उत्तम सांगड घातली. त्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच ठोकाठोकी व षटकार -चौकार आणि गरज असेल, तेव्हा संयत फ़लंदाजी करून आपले स्थान पक्के केले. दहाबारा वर्षानंतर धोनी खेळातला ज्येष्ठ झाला आहे आणि यशस्वी कर्णधार वा नव्या संघाचा शिल्पकार म्हणून बाजूला झाला आहे. पण आरंभीच्या काळातला त्याचा स्पर्धेत सहकारी युवराज कुठल्या कुठे गायब होऊन गेला आहे. एखाद्या षटकात वा एका डावात धुवांधार फ़टके मारण्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते. जेव्हा तुमचा संघ चांगला खेळत असतो आणि दिवस चांगले असतात, तेव्हा अशा चैनीला स्थान असते. पण जेव्हा दिवस फ़िरलेले असतात व प्रतिकुल परिस्थिती असते, तेव्हा टिकून रहाण्याला प्राधान्य असते. तिथे जो टिकून रहाण्याचा संयम दाखवू शकतो, त्यालाच सातत्याने क्रिकेटच्या खेळात ख्यातकिर्त होता येत असते. हा धडा धोनीने गिरवला आणि आजही दहाबारा वर्षे पुर्वीइतकाच तो क्रिकेटमध्ये टिकून आहे. त्याचे कौतुक टिकून आहे. युवराजला लोक विसरूनही गेले आहेत. कालपरवा किंवा मधल्या चार वर्षातल्या पोटनिवडणूका मोदी विरोधकांनी जिंकल्याचे कौतुक नेमके तसेच आहे. पण त्याच कालावधीत मोदींनी एकट्या खांद्यावर पक्षाचा डोलारा घेऊन, जिंकलेल्या अनेक विधानसभा व राज्याची किंमत काहीच नाही.

मागल्या आठवडाभरात पोटनिवडणूकांतील भाजपाच्या पराभवाचे ढोल पिटून २०१९ मध्ये मोदी कसे पराभूत होतील, त्याच्या रसभरीत कहाण्या ऐकायला मिळाल्या. मग हा काळ व त्यातल्या घटना आठवल्या. हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश, त्रिपुरा अशी नवी राज्ये मोदींनी याच कालावधीत भाजपाच्या छत्राखाली आणली त्याचे कोणालाच कौतुक नाही. पण मधल्या किती पोटनिवडणूका भाजपा हरला यावर निष्कर्ष काढायचे असतील, तर युवराजच्या एका षटकातील सहा षटकारांनीच भारताला त्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळाले, असे म्हणावे लागेल ना? ज्यांना असे निष्कर्ष काढायचे असतील, त्यांनी जरूर काढावेत आणि ‘युवराजा’चे आजही कौतुक जरूर करावे. त्यामुळे तेव्हाही धोनी विचलीत झाला नव्हता आणि आजच्या टवाळी टिकेने मोदीही विचलीत होत नाहीत. दोघांचे कारण स्पष्ट आहे. युवराजला तेव्हा केवळ प्रेक्षकांची वहावा हवी होती आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा विसर पडला होता. धोनीला दिर्घकालीन क्रिकेट खेळायचे होते आणि तो आजही खेळतो आहे. प्रेक्षकांना खुश करणारी व वहावा मिळवणारी फ़लंदाजी धोनीही करतो. पण तिच्याच आहारी जाऊन त्याने आपल्या कारकिर्दीचा सत्यानाश करून घेतलेला नाही. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याची अपेक्षाच गैरलागू असते आणि त्यात वहावत गेलेला फ़लंदाज दिर्घकाळ खेळपट्टीवर टिकत नसतो. पण प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या आहारी गेलेला फ़लंदाज ‘युवराज’ होऊन जातो. मोदींनी प्रत्येक निवडणूक व पोटनिवडणूक जिंकण्याची अपेक्षा तशीच गैरलागू आहे आणि आपली प्रतिष्ठा त्यांनी अशी लहानसहान गोष्टीत पणाला लावण्याची अपेक्षा असेल, तर ती अपेक्षा करणारे धोनीचा युवराज करायला निघालेले असतात. धोनीने धोनी रहाण्यातच मोठेपण असते आणि मोदींनी कायम मोदी रहाण्यातूनच इतका पल्ला गाठलेला आहे.

पोटनिवडणूकातले यश फ़ालतू वा नगण्य नक्कीच नाही. पण त्यातले यश सत्तांतर घडवणारे राजकारण नसते. निकालानंतर बहूमत हुकलेल्या पक्षाला बेरजेतून पराभूत करण्याचा प्रकार डकवर्थ लुईस या नियमासारखा असतो. त्यातला विजेता हा परिस्थितीने विजेता ठरत असतो. तो खेळातल्या गुणवत्तेमुळे विजेता झालेला नसतो. या़चे भान निदन विजेत्याने तरी ठेवले पाहिजे. जेव्हा डकवर्थ लूईस नियमानुसारच्या विजेत्याला अजिंक्यपद मिळते व तीच गुणवत्ता वाटू लागते, तेव्हा क्रमाक्रमाने त्याच नियमावर विसंबून विजेतेपद मिळवण्याची प्रवृत्ती जोपासली जात असते. त्या दोन षटके वा दोनतीन चेंडूतला खेळ त्या सामन्यापुरता असतो आणि त्यावर सगळे सामने जिंकता येणार नसतात. म्हणूनच त्यातला फ़सवा विजय ओळखून सावध होण्याला प्राधान्य असायला हवे. पोटनिवडणूकातील विरोधकांचे यश नेमके तसेच आहे. कारण ज्या काळात मोदी व भाजपाने पोटनिवडणूका गमावल्या आहेत. त्याच काळात त्यांनी सहासात राज्यातील सत्ता विरोधकांच्या हातून हिसकावून घेतलेली आहे. पण विरोधकांचा उत्साह किंवा माध्यमातील उतावळेपणा बघितला, तर त्याना डकवर्थ लूईसच क्रिकेटचा वास्तविक नित्यनियम वाटत असल्याची खुणगाठ पटते. पोटनिवडणूका ह्या एखाद्या षटकातल्या खेळासारख्या असतात आणि सार्वत्रिक निवडणूक निर्णायक क्रिकेट असते. एका षटकात दोनचार चेंडूवर धावा निघाल्या नाहीत म्हणून बिघडत नाही. सामन्याची जितकी षटके असतात, त्यांत मिळून एकत्रित धावसंख्या गाठायची असते. एखाददुसर्‍या षटकात सामना जिंकण्याची कल्पना सामना गमावण्यालाच आमंत्रण असते. विरोधकांची नेमकी तीच अवस्था आहे. त्यांचा खेळ षटकात बाजी मारण्याचा असून सामने जिंकण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. माध्यमे व पत्रकारांच्या टाळ्या पिटण्यावर विरोधकांची गोलंदाजी व फ़लंदाजी चाललेली असते.

गेल्या लोकसभेनंतर कर्नाटकात दोन विधानसभा पोटनिवडणूका झाल्या होत्या आणि त्यात कॉग्रेसच जिंकली होती. आताही परवा राजराजेश्वरीनगर ही पोटनिवड्णूक कॉग्रेसनेच जिंकली. पण एकूण विधानसभा मतदानात भाजपाने मोठी झेप घेतली. ४० वरून १०४ इतकी झेप घेतली आणि कॉग्रेस मात्र १२२ वरून ७८ पर्यंत घसरली. त्रिपुरात शून्यावरून भाजपा सत्तेपर्यंत पोहोचला आणि गुजरातची सहावी विधानसभा भाजपाने सलग जिंकली. बारा बारातेरा वर्षे वनवासात गेलेल्या भाजपाला उत्तरप्रदेश राज्यात प्रचंड बहूमताने विधानसभा कोणी जिंकून दिली? त्याच्याआधी उत्तरप्रदेशात भाजपाला पोटनिवडणूक जिंकता आलेली नव्हतीच. पण सार्वत्रिक निवडणूकीत बाजी भाजपाने मारली. यातला फ़रक ज्यांना समजून घ्यायचा नसेल, त्यांनी ‘युवराज’ व्हायला भाजपाचा विरोध कशाला असेल? चांगला सातत्याने सराव करून सामना जिंकायची इच्छा महत्वाची आहे. ज्यांना एखाद्या षटकात सहाही छक्के मारण्याचा पराक्रम गाजवण्यात धन्यता वाटते, किंवा डकवर्थ लूईसनुसार सामने जिंकण्याची आकांक्षा आहे, त्यांना कोण समजावू शकणार आहे? डकवर्थ लूईसचा प्रसंग आकस्मिक परिस्थितीने उदभवत असतो. तो उदभवणार नाही, हेच सामना आयोजकांचे आणि सामना खेळणार्‍यांचे भान असले पाहिजे. पण तशीच परिस्थिती येईल आणि आपल्याला डकवर्थ लुईस नियम़च सामना जिंकून देईल; अशा समजूतीवर ज्यांची रणनिती उभारलेली आहे, त्यांना ‘युवराज’ होण्याच्या शुभेच्छा देण्यापलिकडे काय करता येईल? अशा अजिंक्यवीरांचे नेतृत्व कॉग्रेसचे युवराजच करीत असावेत हा निव्वळ योगायोग मानता येईल काय? मागल्या दोनचार महिन्यातले राजकीय वातावरण तसे आहे, म्हणून त्यातले धोके सांगणे अगत्याचे वाटले. बाकी ज्याची त्याची मर्जी आहे. धोनी होण्याची सक्ती ‘युवराज’वर कोणी करू शकत नाही ना?

4 comments:

  1. avadhut d aradhyeJune 7, 2018 at 6:42 AM

    jhakaas!!!!1111

    ReplyDelete
  2. As always a very nice article Bhau. Comparing by-elections with 20-20 cricket is a concept which only seasoned reporters like Bhau can think of. However, the characters considered for comparison are a bit absurd. Yuvraj was a very consistent player & he won many matches single-handedly for India. Comparing ModiJi's performance with Dhoni's performance is understandable. But comparing Yuvraj's performance with Congress' Yuvraj is insulting to Yuvraj Singh.

    ReplyDelete
    Replies
    1. correct, yuvraj was one of the major factors in many of india's victories in one day international matches and comparing him with opposition members like pappu is unfair.

      Delete