Sunday, June 24, 2018

हरवलेल्या भाषाभगिनींचा शोध



सोशल मीडिया ही मोठी गंमतीशीर बाब आहे. जगाच्या एका टोकाला बसलेला माणूस शेजार्‍याशी बोलावे, तसा यातून एकमेकांच्या संपर्कात येत असतो. सौदी अरेबियाच्या तेल उद्योगात नोकरी करणारा सिमसन त्यामुळे संपर्कात आला. त्याने आपल्या फ़ेसबुकवर एका मराठी बोलीभाषेतील कुठलीशी म्हण वापरली होती आणि तिचा उच्चारही मला गमतीशीर वाटला. म्हणून मी त्याला त्याच म्हणी व तत्सम उक्तींचा उहापोह नित्यनेमाने करायचा आग्रह धरला. त्यानेही उत्साहात प्रतिसाद दिला. त्यातून लक्षात आले, की वसई विरारच्या काही भागात ही कादोडी नावाची बोली चालते. सिमसन लिहू लागला आणि त्याच्या फ़ेसबुकवर अनेकजण त्याच बोलीत व्यक्त होऊ लागले. काहीजण त्या भाषेचा अभ्यास करणारे, ती बोली ओळखणारे, तर काहीजण त्याविषयी आस्था बाळगणारे होते. त्यापेक्षाही चकीत करणारी बाब होती, खुद्द सिमसन! मायभूमीपासून हजारो मैल दूर सौदी अरेबियाच्या वाळवंटात तेलखाणींमध्ये देखभालीत गुंतलेला हा माणूस, तिथे बसून आपल्या माय‘बोली’विषयी कमालीचा हळवा आहे. जागतिकीकरण व आर्थिक कारणास्तव वेगाने होणार्‍या स्थलांतरामुळे जगाच्या कानाकोपर्‍यातील लहानसहान संस्कृती व बोली भाषांवर गंडांतर आलेले आहे. इथे मराठी शाळा बंद होत असल्याची चिंता अनेकांना भेडसावते आहे, तर कर्नाटकात सार्वजनिक जागी हिंदी व देवनागरी लिपीतल्या फ़लक व जाहिरातीं विरुद्ध तिथल्या संस्था संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. अशा व्यापक संदर्भाने मला सिमसनच्या मायबोली जिव्हाळ्याने आकर्षित केले. भारतात काही काळासाठी परतलेल्या सिमसनने घरी बोलावले आणि तिथे एक मोठा गोतावळा भेटला. एकाहून एक कादोडी बोलीचे पुरस्कर्ते व हितचिंतक भेटले आणि त्यांचा आग्रह आपल्या बोलीला असण्यापेक्षाही, जगातून अस्तंगत होत चाललेल्या प्रत्येक बोली व संस्कृतीसाठी होता. मातीशी नाळ अशी जोडलेली असते.

नंदाखाल या वसईतील सिमसनच्या गावात व घरात पोहोचलो आणि त्याचे कुटुंबिय भेटले. गप्पा खुप झाल्या. आगतस्वागतही झाले. पण सगळी चर्चा कादोडी बोली व कुपारी संस्कृतीविषयी होती. त्या चर्चेतून एक लक्षात आले, की ही भाषा सामवेदी  समाजघटकाची आहे आणि त्यात अनेकजण धर्माने ख्रिश्चन आहेत. पण सिमसन व त्याच्या गोतावळ्यातील प्रत्येकाला आपल्या संस्कृती व बोलीची फ़िकीर कशाला पडलेली आहे? तीनचार पिढ्या मागे आसपासचा सगळा परिसरच कादोडीत बोलत होता आणि जगत होता. आता प्रत्येक पिढीमागे ती बोली मागे पडून शुद्ध मराठी वा इंग्रजी हिंदीने त्यांचेही विश्व व्यापायला सुरूवात केलेली आहे. आपल्याच घरातली मुले शिक्षण व कामानिमीत्त अन्यत्र गेल्यावर कादोडी बोलीशी तुटत गेली, तर या बोलीचे भविष्य काय? दूर सौदी आरेबियाच्या वाळवंटात घाम गाळताना सिमसनला अशी चिंता सतावते, याचे अप्रुप वाटले. त्यापेक्षाही तिथे जमलेल्या गोतावळ्याला ही बोली टिकवावी कशी व बोलती रहावी कशी, याचे उपाय शोधायचे होते. तशीच चर्चा चालली होती. मराठी भाषा संवर्धन वा तिला अभिजात बनवायच्या गप्पा अधूनमधून आपण ऐकत असतो. त्यासठी शासनाकडून होणार्‍या प्रयत्नांच्या बातम्याही आपल्या कानी येत असतात. त्यात इतके कोटी रुपये दिले वा अमूकतमूक समित्या नेमल्याचे आपल्याला ऐकून ठाऊक असते. पण ज्या भाषेला शेकडो लहानमोठ्या बोली संमृद्ध करीत असतात, त्याच कुठल्याही अभिजात भाषेची पाळेमुळे असतात. ती पाळेमुळे छाटली जाणार असतील, तर मराठीचा वटवृक्ष डौलदार डेरेदार तरी कसा व्हायचा? चारदहा लोकांनी त्याचा अभ्यास केला, प्रबंध लिहीले वा त्यावर संशोधन करून त्यांच्या इतिहास भूगोल नोंदवून ठेवला; म्हणजे त्या बोली आणि पर्यायाने मराठी संमृद्ध होईल का? वस्तुसंग्रहालयात जतन केलेल्या संस्कृती वा वस्तु त्या परंपरांचे संगोपन करीत नसतात.

सिमसनचे मामा पन्नास वर्षे डायरी लिहीत आहेत आणि त्यांनी या कुपारी संस्कृती व कादोडी भाषेवर पुस्तकही लिहीलेले आहे. इतक्या शेकड्यांनी नोंदी असलेल्या त्या पुस्तकाची पाने कमी करावीत म्हणून प्रकाशक त्यांना आग्रह धरतो आणि कारण काय असेल? इतके लांब मोठे कोण वाचणार आहे? यापेक्षा कुठल्याही भाषा संस्कृतीचे दुर्दैव असू शकत नाही. तळकोकणातल्या बोलीला मालवणी म्हणतात, पण तिच्यातही आठदहा पाठभेद आहेत. पण मच्छिंद्र कांबळीच्या विविध मालवणी नाटकांनी त्या बोलीभाषेला कोकणातून जगाच्या नकाशावर आणून ठेवलेले आहे. मुंबईत राबायला आलेला चाकरमानी म्हणून ज्या मालवणी माणसाकडे तुच्छतेने बघितले जायचे, त्याच्या खाद्यपदार्थाची आज मुंबईसह मोठ्या महानगरात हॉटेले झालेली आहेत. सिमसन मला रात्री उशिरा माघारी घरी सोडायला आला, तेव्हा अहमदाबाद हायवेवर एका ढाबा सादृष हॉटेलात चहा घ्यायला थांबलो. बाहेर पडताना लक्ष गेले, तर तिथल्या फ़लकावरही स्पेशालिटी म्हणून मालवणी फ़ुड अशी जाहिरात होती. मी मालवणी असल्याने सुखावलो, तरी वसईच्या हायवेवर कुपारी खाद्यपदार्थाचा फ़लक का दिसू नये, याचे वैषम्य वाटले. जगातला भारत हा सर्वात श्रीमंत देश एकाच बाबतीत आहे. इथे जितके प्रांत, जितक्या भाषा व बोली, तितक्याच संस्कृती आहेत. त्यात पुन्हा जातीनुसार पाठभेद आहेत. त्यांच्यातल्या वितुष्टाला आपण जबरदस्त प्रसिद्धी देतो. पण त्यांच्या जातीनुसार बदलणार्‍या खाद्य आस्वादाची श्रीमंती विसरून जातो. एका जिल्ह्यात वा एका तालुक्यात इतकी विविधता जगातल्या कुठल्या देशात शोधूनही सापडणार नाही. त्या दिवशी सिमसनच्या घरी सर्व पदार्थ फ़क्त घरच्यांनीच केलेले नव्हते तर ते खास त्यांच्या कुपारी खाद्यशैलीतले होते. त्यातली वैशिष्ट्ये सांगून आग्रह धरणारी सिमसनची माऊली साक्षात भारतीय संस्कृती आहे. कारण तिच्यासह प्रत्येकाला आपल्या सस्कृती व बोलीची फ़िकीर सतावते आहे.

इंग्रजीत शिकणार्‍या मुलांना घरात आपल्या बोलीत व्यवहार नकोसे होत आहेत आणि ते करणारे आपलेच वडीलधारे मागास वाटू लागलेत, ही भयंकर मोठी वेदना आहे. तिथे याच संस्कृती व बोलीवर संशोधन करणार्‍या अभ्यासक नेहा सावंत आलेल्या होत्या. आपल्या अनुभवातून या संस्कृतीत वाढलेल्या घरे कुटुंबे यांच्यातला गोडवा सांगताना त्यांना वेळ पुरत नव्हता. माघारी येताना सिमसनने एका पिशवीत भेट म्हणून काही वस्तु दिलेल्या होत्या आणि घरी ती पिशवी उघडली, तेव्हा मी तब्बल पन्नाससाठ वर्षे मागे बालपणात गेलो. मुंबईत तेव्हा वसईची ओळख केळ्यांचा प्रदेश अशी होती. तिथली वेलची केळी व भाजी अनेक शेतकरी मुंबईत आणून विकायचे. मागल्या दोनतीन दशकात ती केळी बघायला मिळालेली नव्हती आणि सिमसनने नेमकी तीच केळी व घरी बनवलेली पक्वान्ने सोबत दिलेली होती. एकमेकांना भेटी देण्यात आपुलकी जिव्हाळा कितीही असला, तरी आपल्या घरातल्या व आपणच हाताने बनवलेल्या वस्तू देण्यातली श्रीमंती कुठल्याही मॉलमध्ये बघायला मिळणार नाही. हे संस्कार व विचार ज्यातून येतात तिला भाषा व संस्कृती म्हणतात. भाषा वा बोली लयाला गेली, मग ते संस्कारही अस्तंगत होऊ लागतात आणि त्याबरोबर जिव्हाळा व आपुलकीही संपुष्टात येत असते. मच्छिंद्र कांबळीने मालवणी बोली नाटकातून संपुर्ण महाराष्ट्रात पोहोचवली आणि पर्यायाने त्या संस्कृतीत वाढलेल्यांना आपली बोली कुठेही बेधडक बोलायला प्रवृत्त केले. ज्यांची ती मायबोली नाही, त्यांच्या मनात तिच्याविषयी कुतूहल व उत्सुकता निर्माण केली आणि मालवणीचे कौतुक होऊ लागल्यावर तिच्या विविध पैलूंना मानाचे स्थान मिळत गेले. तीही एक बोली आहे आणि अशा शेकडो बोली व संस्कृती मराठीला लाभलेल्या आहेत. पण किती मराठी भाषिकांना आपल्याच गोतावळ्यातल्या भाषाभगिनी ठाऊक आहेत? जागतिकीकरणाच्या जत्रेत हरवलेल्या या बोलीभाषा भगिनींना कसे पुन्हा भेटवता येईल?

सिमसनला हा प्रश्न पडतो आणि त्याला त्यात पुढाकार घ्यावासा वाटतो, याचेच अप्रुप आहे. सरकार व शासन यंत्रणा त्यांना जमेल तसे काही करतील. पण कांबळी वा त्याच्या मालवणी गोतावळ्याने जे काम केले, तसे आपण इतर मराठी बोलींसाठी काही करू शकतो काय? आज निदान डझनभर तरी मराठी उपग्रहवाहिन्या आहेत. तिथे शंभरावर तरी मालिका दाखवल्या व बघितल्या जात असतात. चित्रपट हेही माध्यम आहे. अशा माध्यमातून सुरूवात केली तर? मला तिथे साडेतीन तास झालेल्या चर्चेत एक सोपी कल्पना सुचली. प्रत्येक मराठी मालिकेत कुठल्या तरी एका बोलीभाषेतच बोलणारे पात्र घुसवले तर? एका मालिकेत कादोडीत बोलणारे पात्र असेल, तर दुसर्‍या मालिकेत अहिराणी वा वर्‍हाडीतल्या कुठल्या खास बोलीतले पात्र असावे. बाकी कथानक मराठीच चालावे. पण त्या एका पात्रामुळे ती ती बोलीभाषा महाराष्ट्रात व अन्यत्र मराठी माणुस आहे तिथपर्यंत पोहोचू शकेल ना? निदान आपल्या मराठी भाषेची बोलीभाषेत रुजलेली हजारो पाळेमुळे त्यानिमीत्ताने नव्या पिढीला ओळखता येऊ लागतील ना? त्या संस्कृती व बोलींची नावे तरी कळतील ना? गडचिरोली वा धुळ्यातल्या कुठल्या टोकाला कित्येक पिढ्या जगलेल्या मराठी लोकसंख्येला, अशा आपल्याच भाषाभगिनींची ओळख होऊ शकेल. कित्येक पिढ्यांनी दोन भगिनी भेटल्याचा आनंद किती अवर्णानीय असेल? मालवणीत कादोडीचे काही शब्द असतील तर कादोडीत अहिराणीचाही काही भाग आढळू शकेल. अशा सगळ्या बोली मराठीचे सौंदर्य अधिकच वाढवतील. मला तर ह्या सगळ्या बोलीभाषा म्हणजे हरवलेला माझा गोतावळा वाटतो. त्या दिवशी सिमसनच्या घरी त्याने बोलावून हा गोतावळा भेटवला नसता, तर माझे आप्तस्वकीय किती दुरावलेत, तेही समजले नसते. वाळवंटात घर संस्कृती व आप्रस्वकीयांना दुरावलेल्या सिमसनला हा योग जुळवून आणावा वाटला, यापेक्षा माझे भाग्य कुठले असू शकेल?

10 comments:

  1. I would like to contact Simpson. Can someone post his e-mail address or Facebook page here for the benefit of others who might be interested in them as well ?
    Thanks.

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.facebook.com/simson.rodrigues.9

      Delete
  2. "जगातला भारत हा सर्वात श्रीमंत देश एकाच बाबतीत आहे. इथे जितके प्रांत, जितक्या भाषा व बोली, तितक्याच संस्कृती आहेत. त्यात पुन्हा जातीनुसार पाठभेद आहेत. त्यांच्यातल्या वितुष्टाला आपण जबरदस्त प्रसिद्धी देतो. पण त्यांच्या जातीनुसार बदलणार्‍या खाद्य आस्वादाची श्रीमंती विसरून जातो."

    माझ्या मनात हा विचार बरेच वर्षं येतो आहे. आणि यामुळे मी जातिभेदा विरुद्धं असलो तरी या एका कारणासाठी जाती राहाव्यात (भेद सोडून) असं मला वाटतं.

    आजही माझ्या आईनी केलेले आणि माझ्या मित्रांच्या आयांनी केलेले पदार्थं मला खूप आवडतात.

    ReplyDelete
  3. Similarly, a different language is being spoken by portuges residing near korlai village, tal-Murud,Raigad.

    ReplyDelete
  4. अप्रतिम भाऊ

    ReplyDelete
  5. सर सीमसन चा संपर्क होऊ शकेल का?त्यांच्या बोलीभाषेतील वेबसाईट मी मोफत बनवून देईन.माझा ईमेल पत्ता aadvaith46@gmail.com आणि संपर्क क्रमांक 9822668786 आहे.

    ReplyDelete
  6. भाऊ, खूप जुन्या आठवणी जागवल्या आज तुम्ही.मी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणच्या मित्रांबरोबत एकत्र राहिलो आहे.त्यांनी त्यांच्या घरून आणलेल्या चटण्या, लोणचे आणि पापड यांची चव वेगवेगळी असायची.मित्रांनी घरून आणलेल्या पदार्थांची चव आठवली.

    ReplyDelete
  7. "जाती गेल्या तर वेगवेगळ्या जातींतले पाकसंस्कार लुप्त होतील या एकमेव कारणासाठी मला भारतातील जाती नष्ट होऊ नयेत असं वाटतं" असे पु ल देशपांडे गंमतीत म्हणत!

    ReplyDelete
  8. खराच आमश्या भाषेवर लिवला बरा वाटला भाऊ

    ReplyDelete