Saturday, June 23, 2018

बुडत्याला पगडीचा आधार



पुण्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विसाव्या स्थापनादिनाचा सोहळा पार पडला. योगायोग असा होता, की या पक्षाच्या स्थापनेचा सोहळा एकोणिस वर्षापुर्वी मुंबईत पार पडला त्याचे संयोजक वा यजमान छगन भुजबळ होते. त्या पक्षाची स्थापना कशासाठी झाली, ते आज भुजबळांना आठवत नाही की त्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या शरद पवारांनाही आपल्या पक्षाचे प्रयोजन लक्षात राहिलेले नाही. ज्यांना आपण एक संस्था संघटना कशासाठी आरंभली व तिने किती वाटचाल केली, याचे तरी आकलन कशाला असू शकेल? अर्थात मलाही त्या पक्षाच्या स्थापनेचा सोहळा होत असल्याचे ठाऊक नव्हते. पण एबीपी माझा वाहिनीने त्याविषयी कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रण दिलेले होते. मी तेव्हा एका दुर्गम खेड्यात सातारा येथे होतो म्हणूनच त्त्यात सहभागी होऊ शकलो नाही. मात्र प्रत्यक्षात तो सोहळा इतका गाजेल, अशी माझीही अपेक्षा नव्हती. पण आपला प्रत्येक सोहळा व समारंभ माध्यमातून गाजला पाहिजे, याचे कौशल्य शरद पवारांनी आत्मसात केले असल्याने, त्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात कोणती वैचारिक देवाणघेवाण झाली, ते अंधारातच राहिले. त्यापेक्षा नसत्या गोष्टीच चर्चेत राहिल्या. त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुणेरी पगडी! समारंभाच्या निमीत्ताने कुणा राष्ट्रवादी नगरसेविकेने मान्यवरांना पुणेरी पगडी देऊन सन्मान केला. असे अनेकदा होत असते आणि पवार अनेकदा ती पगडी घालून मिरवलेलेही आहेत. पण एकोणिसाव्या स्थापनादिनी त्यांना पक्षाचा गाडा ओढण्य़ासाठी त्याच पगडीचे निमीत्त मिळाले. त्यांनी घाईगर्दीत एका सहकार्‍याला सांगून प्रसिद्ध ‘टोपीकर’ दुकानात धाडून वेगळी पगडी आणवली. मग आतापासून राष्ट्रवादी पक्षाच्या समारंभातून पुणेरी पगडी हद्दपार केली असल्याचे जाहिर करून टाकले. यापुढे आपण महात्मा फ़ुल्यांची पगडी एकमेकांना देऊ, असेही सांगून टाकले. हा पक्ष एकोणिस वर्षापुर्वी अशा पगड्यांच्या वादातून निर्माण झाला होता काय?

पुणेरी पगडी सन्मान्य असावी किंवा नसावी, हा वेगळा विषय आहे. पण ती आणली गेली असेल तर तिला सन्मान समजण्यापेक्षा अपमान ठरवणे गैरलागू नाही काय? पवारांना विसर पडला असेल, तर पाच वर्षापुर्वी गुजरात निवडणूकीपुर्वी असाच एक प्रसंग घडलेला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सद्भावना यात्रेमध्ये मंचापर्यंत पोहोचलेल्या एका मौलवीने मोदींना विणलेली मुस्लिम टोपी देऊ केली होती. ती तिथेच नाकारून मोदींनी त्या मौलवीला त्याची शाल देण्याची विनंती केली आणि नंतर ते चित्रण राजकीय वादाचा विषय झाले होते. एका मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारून मोदींनी अवघ्या मुस्लिम जगताचा अपमान केल्याचा कांगावा मग लोकसभा निवडणूकीचे निकाल लागेपर्यंत चालू होता. त्यातून मोदी व भाजपाच्या विरोधात मुस्लिमांच्या मनात किल्मिष पसरवण्याचे काम माध्यमांनी व पुरोगाम्यांनी अगत्याने केलेले होते. अर्थात त्याचा विपरीत परिणाम होऊन हिंदूंची एक मतपेढी निर्माण झाली आणि अशा टोपीबाजीला मतदारानेच शह दिला होता. पण यातून एक महत्वाची बाब लक्षात येऊ शकते. अशा रितीने टोपीसारख्या गोष्टी प्रतिकात्मक राजकारणात मोठा परिणाम देत असतात. त्यामुळेच इतक्या घाईगर्दीने पवारांनी ऐनवेळी फ़ुल्यांची पगडी मागवून घेण्याचे कारण, हे राजकारण होते. त्यांना आपल्या कृतीतून एक राजकीय संदेश पाठवायचा होता. त्याची कबुली नंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी एका वाहिनीच्या चर्चेतही दिलेली आहे. पुणेरी पगडी सन्मानार्थ मिळाल्यावर पवारांनी काकडे यांना बोलावून आपल्या भाषणापुर्वी फ़ुल्यांची पगडी आणायचे आदेश जारी केले आणि ती घाईगर्दीने आणवली गेली. मग आपल्या भाषणाचा आरंभ करताना पवारांनी हे टोपी-पगडी नाट्य रंगवले. त्यांनी केलेल्या कृतीचा घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. तरच त्यातला राजकीय हेतू लक्षात येऊ शकेल.

आपल्याला पुणेरी पगडी दिली गेली आणि यापुढे अशी पुणेरी पगडी देण्यापेक्षा फ़ुल्यांची पगडी दिली जावी, असे आदेशच पवारांनी दिलेले आहेत. म्हणजे यापुढे राष्ट्रवादी पक्षात पुणेरी पगडीला बंदीच जारी केल्याचा फ़तवा काढला गेला आहे. फ़ुल्यांची पगडी हा शब्दच मुळात चुकीचा आहे. कारण फ़ुले जे शिरस्त्राण वापरायचे, त्याला कोणी पगडी असे पुर्वी तरी संबोधलेले नाही. त्याला पागोटे वा फ़ेटा म्हणून ओळखले जाते. फ़ुले विचारांनी प्रवृत्त झालो असल्याच नाट्य रंगवतानाही पवारांना पागोटे वा पगडी यातला फ़रक ठाऊक नव्हता. पुणेरी पगडी म्हणजे विद्वानांची व प्रामुख्याने पुणेरी ब्राह्मणांची असे एक गृहीत आहे. तसा कुणाही बुद्धीमंत नामवंताचा सत्कार करताना ही पगडी आजवर दिली गेलेली आहे. पण पवारांना मात्र त्यातला ब्राह्मणी संदर्भ लक्षात राहिलेला दिसतो आहे. आजवर त्यांची देशातील ओळखही कधी महाराष्ट्राचे नेते अशी नव्हतीच. बलवान मराठा ही त्यांची जातिवाचक ओळख दिल्लीतले पत्रकार अगत्याने करून देत राहिले. पण महाराष्ट्राने मात्र पवारांना कधी एका जातीचे पुढारी मानलेले नव्हते. मात्र स्थापनादिन सोहळ्यात त्यांनी दिल्लीकर पत्रकारांना खरे ठरवले आणि पुणेरी पगडीला ब्राह्मण ठरवून तिच्यावर पक्षात प्रतिबंध जाहिर केला. तसे करायला अजिबात हरकत नाही. पण त्यात लपवाछपवीही असायचे काही कारण नाही. जितक्या उघडपणे संभाजी ब्रिगेडवाले मराठा अभिमान सांगण्यापेक्षा आपला ब्राह्मणद्वेष आवेशात मांडतात, त्याचे समर्थन तितक्याच आवेशात पवारांनी करायला काय हरकत आहे? ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे काय कारण? महाराष्ट्रात मराठा हा सर्वात मोठा समाजघटक आहे, तर त्याचे नेतृत्व पवारांनी हाती घेण्यात काय गैर असू शकते? मात्र ते असे तोंड लपवून वा मुखवटे घेऊन द्वेष करण्याची गरज नाही. आपला जातीय चेहरा पवारांनाच भयभीत करतो. म्हणून मग अशा टोपी-पगडीच्या आडोशाला जाऊन लपंडाव खेळावा लागत असतो.

नाहीतरी पवारांनी अलिकडल्या काळात आपले ‘मराठे’पण ठळकपने दिसावे यासाठी सतत संधी शोधलेल्या आहेत. पण त्यांचे दुर्दैव असे आहे, की मराठा समाज कधीच जातीय नव्हता आणि त्याने कधीही जातिय राजकारण वा संघटना यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्याची कालपरवाची साक्ष म्हणजे मराठा मूकमोर्चा होय. कोपर्डीची घटना घडल्यावर जितक्या तटस्थतेने महाराष्ट्र एका मराठा मुलीवर झालेला बलात्कार व हत्या याकडे काणाडोळा करीत राहिला, त्यावर उमटलेली ती संतप्त प्रतिक्रीया होती. राज्याच्या कानाकोपर्‍यातून असे लाक्षणिक भव्य मूकमोर्चे निघाले आणि त्यात कुठलीही हिंसा झाली नाही, की कोणाच्याही विरोधात गर्जना घोषणा झालेल्या नव्हत्या. त्याचे कौतुक एका शब्दानेही पवार करू शकले नाहीत. कारण मराठा मूकमोर्चा कटाक्षाने जातीय अभिमान व अभिनिवेशापासून मैलोगणती दुर राहिलेला होता. त्यात कुठल्याही जातीवाचक आवेश व भूमिकांना काटेकोरपणे दुर राखले गेले होते. किंबहूना ज्यांची ओळख जातीवाचक नेते अशी होती, त्यांना त्या व्यासपीठावर वा नेतृत्वाच्या स्थानीही येऊ दिले गेले नाही. मराठा समाज जातीवादी नसल्याची यापेक्षा मोठी ग्वाही देण्याची काही गरज आहे काय? ‘स्ट्रॉग मराठा’ अशीच देशभर ओळख असून सुद्धा पवारांना कोणी त्या मूकमोर्चाचे नेतृत्व करायला बोलावले नाही, की त्यात येऊही दिले नाही. अशा बहुसंख्य समाजघटक असलेल्या मराठा लोकसंख्येचे जातीय नेतृत्व करायला म्हणूनच पवार घाबरतात. कारण तो समाजच जातीनिरपेक्ष राहिला आहे. आपला अभिमान अस्मिता बाळगताना अन्य कुणाचा द्वेष मराठा करत नाही, ही पवारांची वा तत्सम नेत्यांची खरी अडचण आहे. त्यामुळे मग असे ‘बहूजन’ वगैरे आडोसे त्यांना शोधावे लागतात. त्यातून मग फ़ुल्यांची पगडी ही कल्पना पुढे आली आहे. पण वास्तवात फ़ुल्यांची पगडी नसते, तर पागोटे असते, हे पवारांना ठाऊक नसेल काय?

किती चमत्कारीक गोष्ट आहे बघा. पवार म्हणतात, किंवा त्यांच्या समर्थकांनी नंतर या घोषणेचा खुलासा केला, की फ़ुल्यांची पगडी पुरोगामी विचारांचा संदेश देणारी आहे. तसे असेल तर पुणेरी पगडी पुरोगामी विचारांचा अव्हेर करणारी आहे काय? पुणेरी पगडीचा इतका विरोध कशाला? खाजगीत तसे आदेश देता आले असते, किवा ठराविक लोकांना मूळ संदेश देऊन तसा बदल घडवता आला असता. ते कसे करावे हे मुरब्बी पवारांना नेमके कळते. बोलायचे एक आणि घडवायचे वेगळेच, ही पवारांची ख्यातीच आहे. सहाजिकच त्यांना असे जाहिरपणे पगडीच्या विरोधात फ़तवे काढण्याचे काही कारण नव्हते. पण त्यांना यावरून गदारोळ माजवायचा होता व पर्यायाने ही पगडी म्हणजे ब्राह्मणांचे प्रतिक असल्याची जाहिर चर्चा घडवून आणायची होती. तशी ती चर्चा झाली व होत रहाणार आहे. तोच तर त्यामागचा हेतू आहे. मात्र तसा थेट आरोप आपल्यावर होऊ नये, किंवा जातीय नेता ठरवला जाऊ नये, ही देखील चिंता आहे. बाकी फ़ुले आंबेडकर ही नावे केवळ देखावा म्हणून पवार घेत असतात. त्यांचे विचार वा भूमिका यांच्याशी पवारांना कधीच कर्तव्य नव्हते आणि त्यांचा अवलंब त्यांनी आपल्या दिर्घकालीन सत्ताकारणात कधी केला नाही. दहा वर्षे शरद पवार कृषीमंत्री होते आणि त्याच काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. पण त्या आत्महत्या रोखल्या जाव्यात आणि शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ व्हावी, म्हणून पवार काय करू शकले? तेव्हा त्यांना कधी फ़ुल्यांचे शेतीविषयक विचार कशाला आठवले नाहीत? तेव्हा कधी पगडी फ़ेट्याच्या माध्यमातून संदेश धाडायची बुद्धी कशाला झाली नाही? किंबहूना फ़ुले केवळ पगडी वा पागोट्यापुरते असल्याचा शोध पवारांनी कधी लावला? पागोटे सुद्धा एका संदेशाचे उत्तम माध्यम असते हे कधी कळले? खुद्द महात्मा फ़ुल्यांनी त्याचा संदेश देण्यासाठी कसा वापर केला, ते तरी पवारांनी समजून घेण्याचा प्रयास केला आहे काय?

त्या काळात म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची गर्जनाही झालेली नव्हती, त्या काळात महात्मा फ़ुले एक सर्वमान्य व्यक्तीमत्व होते आणि मुंबईच्या गव्हर्नराने त्यांनाही एका समारंभाला आमंत्रित केलेले होते. अशा राजेशाही समारंभाला आमंत्रित पाहुणे नटुनथटून जात असतात. आपल्याला आमंत्रण देणार्‍या सत्ताधीश यजमानाला प्रभावित करण्याचा त्यातला हेतू असतो. अशा समारंभाला फ़ुले कोणता वेश परिधान करून गेलेले होते? पवारांना त्या़चे स्मरण तरी आहे काय? जे छगन भुजबळ फ़ुल्यांचाच वारसा आपण चालविल असल्याचा दावा अखंड करीत असतात, त्यांना तरी फ़ुल्यांच्या घोंगडी पागोट्याचा संदर्भ कधी कळला आहे काय? तो संदर्भ गव्हर्नराच्या त्याच समारंभात सापडू शकतो. पण त्यासाठी फ़ुल्यांच्या विचार व भूमिकेविषयी खरीखुरी आस्था असायला हवी. नुसता त्यांच्या प्रतिकांचा राजकीय लाभ उठवण्याचा हव्यास विचारांना पुढे घेऊन जात नसतो. त्याविषयी दिशाभूल मात्र नक्कीच करीत असतो. पवारांना तरी तेच करायचे असते ना? तसेच पागोटे घालून, कंबरेला लंगोटी व खांद्यावर घोंगडी घेऊन फ़ुले गव्हर्नराच्या समारंभाला गेलेले होते. त्यातून मिरवण्यापेक्षा आपल्या रयतेची अवस्था राजसत्तेच्या नजरेत आणुन देण्यासाठी महात्म्याने आयती संधी शोधली होती. उंची श्रीमंती वस्त्रेप्रावरणे परिधान करून मिरवणार्‍या गोतावळ्यात पागोटे काय सांगत होते? त्याला संदेश म्हणतात. तसा कुठला संदेश स्थापनादिन सोहळ्यात पवारांनी दिला आहे? संदेश व विचारांची सांगड तेव्हाच घालता येते, जेव्हा त्या विचारांना आत्मसात केलेले असते. पवारांना खरोखरच फ़ुल्यांच्या विचारांची आस्था असती, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विविध बैठकांमध्ये वा क्रिकेटपटूंच्या सोहळ्यात लंगोटी व घोंगडीसह पागोटे घालून प्रवेश केला असता. तर देशातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येविषयी जगभर चर्चा झाली असती. पण तिथे सुटाबुटातले पवार मिरवत राहिले ना?

फ़ुल्यांचे पागोटे हा विचार असतो, दाखवायची बाब नसते. पुणेरी पगडी सन्मानाचे प्रतिक असेल तर फ़ुल्यांचे पागोटे गांजलेल्या कुणबी शेतकर्‍याच्या विवंचनेचे प्रतिक असते. ती विवंचना हल्लाबोल किंवा अन्य आंदोलनातून वा पक्षीय भूमिकेतून प्रकट झाली असती, तर कुणा नगरसेविकेला पुष्पगुच्छ वा पुणेरी पगडी सन्मानार्थ पेश करायची हिंमत झाली नसती. राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल खरे़च फ़ुले शाहू आंबेडकरांच्या विचारानुसार झाली असती व पवारांची जडणघडण त्या विचारांनी झाली असती, तर असे आदेश देण्याची वेळ कशाला आली असती? नेत्याच्या विचारांनी प्रभावित झालेली अनुयायी मंडळी मग त्यातून प्रतिके निर्माण करतात. अमूक एक टोपी वा प्रतिकांचा वापर करा, असला आदेश नेत्याला द्यावा लागत नसतो. मराठा मूकमोर्चात भगवे ध्वज घेऊन यावे, असे आदेश कोणी दिलेले नव्हते, की फ़तवे काढायची वेळ आलेली नव्हती. आपोआप तिथे भगवे झेंडे फ़डकले. कारण तो विचार मराठी माणसाच्या हाडीमाशी खिळलेला आहे. शिवराय ही मनात रुजलेली व उपजत मिळालेली भेट असते. त्याचे प्रतिबिंब मग कृतीत आपोआप पडत असते. पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करून दोन दशकाचा कालावधी उलटला आणि अजून त्यांना आपल्या पक्ष सहकार्‍यांना महात्मा फ़ुल्यांचा विचार शिकवता आला नाही, की त्यांच्या मनात रुजवता आलेला नाही. कारण तो पवारांच्या आस्थेचा विषय नाही की पक्षाची ती भूमिका नाही. आज पक्षाची सगळीकडून होरपळ चालू असताना, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून मग बुडत्याला पगडीचा आधार तसे पवार फ़ुले पगडीला हाताशी धरून आपले हेतू साध्य करायला पुढे सरसावले आहेत. कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासला मग त्याचा देव बनवला जातो, तसाच हा प्रकार आहे. अकस्मात पवारांना व त्यांच्या पक्षाला असली प्रतिके शोधावी व वापरावी लागत आहेत. बाकी त्यातला विचार वगैरे भाग दुय्यम वा दिखावू आहे.

दहा वर्षे पवार खुद्द कृषीमंत्री होते. म्हणजे फ़ुल्यांच्या विचारधारेनुसार ते पवारच कुणबी रयतेचे सतेतील प्रतिनिधी होते. त्याही काळात शेतकरी अन्यायाशी झुंजायला चवताळून रस्त्यावर उतरला होता. त्याच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेण्याच्या आदेशाला त्या रयतेने आव्हान दिले होते. तेव्हा पवारांना कधी फ़ुले व शेतकरी आठवला होता काय? मुंबई पुणे महामार्गावर त्या रयतेने शेतकर्‍याने रास्ता रोको केला. त्याच्यावर गोळ्या झाडणारा कोणी पुणेरी पगडी परिधान करून पुढे सरसावलेला नव्हता. त्या गोळ्या झाडणार्‍यांच्या अंगावर पोलिसी गणवेश होता आणि त्याचे बोलविता धनी पवारांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे गृहमंत्री होते. तेव्हा त्यांचा कान पकडून महात्मा फ़ुले व त्यांचे शेतकरी विषयक विचार कधी पवारांनी सुनावले होते काय? अशा गृहमंत्र्याच्या डोक्यावरची पांढरी गांधी टोपी काढून त्याच्या माथ्यावर फ़ुल्यांची पगडी पागोटे चढवण्याची बुद्धी पवारांना झाली होती काय? उलट अशावेळी शेती परवडत नसेल तर शेती सोडून देण्याचा आगंतुक सल्ला देणारे खुद्द पवारच होते ना? त्यात कुठला फ़ुले विचार सामावलेला होता? आज बाजारभाव मिळत नाही वा कर्जमुक्ती होत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला, तर त्याला टोकाची भूमिका घेण्याचे आवाहन पवार करतात. पण हिंजवडी भागातील शेतकरी टोकाची भूमिका घेऊनच रस्ता रोकोला उतरला होता ना? मग तेव्हा फ़ुले विचार कुठे झोपा काढत होते? ज्वलंत विचार असे कधी झोपा काढत नाहीत. म्हणूनच तेव्हाही ते विचार झोपलेले नव्हते. तर पवार त्यापासून मैलोगणती दुर होते. पवारांचा त्या विचारांशी काडीमात्र संबंध तेव्हाही नव्हता व आजही नाही. त्यांना सोयीसाठी फ़ुले हवेत आणि त्यांची पगडी पागोटे हवे आहे. फ़ुले शाहू आंबेडकर हे पुरोगामी राजकारणातले फ़ोडणीचे शब्द होऊन बसले आहेत. त्यांचा सोयीनुसार वापर होतो आणि गरज संपली, मग ते विचार अडगळीत जाऊन पडत असतात.

पण सत्य त्यापेक्षा खुप वेगळे व भयानक आहे. पवारांना आता खोटेपणाची सवय इतकी अंगवळणी पडलेली आहे, की रोज कुठले तरी खोटे बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. याच स्थापनादिन सोहळ्यात त्यांनी भीमा कोरेगावचाही उल्लेख केला आणि त्यात खरे आरोपी सोडून निरपराधांना गुंतवण्याचा उद्योग चालू असल्याचाही गंभीर आरोप केलेला आहे. दिर्घकाळ प्रशासकीय अनुभव गाठीशी असलेल्या पवारांना हल्ली धड खोटेही बोलणे अशक्य झाले की काय, अशी शंका येते. कारण तिथेच त्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या प्रकरणावरही भाष्य केले. कोणी निवृत्त पोलिस अधिकारी त्यांना भेटला होता आणि त्याच्याकडे अशा विषयात काय कारवाई होते, अशी विचारणा केल्याचेही पवारांनी श्रोत्यांना रंगवून सांगितले. तर तो अधिकारी पवारांना म्हणाला, असे काही झाल्यास त्याची जाहिर वाच्यता करत नाहीत आणि संबंधित तपास यंत्रणांना शोध घ्यायला सांगितले जात असते. हे सांगायला तो अधिकारी आपल्या कारकिर्दीत मुख्यमंत्री वा गृहमंत्री होता आणि पवार पोलिस निरिक्षक वगैरे होते काय? कारण त्याच्या कालखंडात असे प्रशासकीय काम होत असेल, तर खुद्द पवारांनीच तसे काही केलेले असणार. त्याविषयी अधिकार्‍याला प्रश्न विचारत बसायची गरज नव्हती. पण पवार तसे विचारतात, म्हणजेच त्यांच्याही काळात असे काही झालेले नव्हते आणि पवारांनीही असे काही केलेले नव्हते. उलट तपासाऐवजी गवगवा करण्यातच खुद्द पवारांनी धन्यता मानलेली होती. अलिबागला झालेले पक्षाचे चिंतनशिबीर साहेब विसरून गेले की काय? मालेगाव स्फ़ोट प्रकरणात एकाच धर्माचे लोक कशाला पकडले जातात, अशी भाषा करून पवारांनी कसला गवगवा केलेला होता? आपल्यापाशी असलेली वा आलेली माहिती संबंधित अधिकारी वा सरकार यांच्याकडे सोपवण्यापेक्षा, पवार त्याचा उहापोह चिंतन शिबीरात कशाला करत बसले होते?

याचा अर्थ इतकाच, की अधिकारी भेटला वा त्याने काय सांगितले, ही पवारांनी स्थापनादिनी ठोकलेली लोणकढी थाप होती. ज्या कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांची आठनऊ वर्षांनी जामिनावर सुटका झालेली आहे, त्यांना कुठल्याही पुराव्याशिवाय इतकी वर्षे तुरूंगात डांबून छळण्याला कोण जबाबदार होता? पवारांची लोणकढी थाप नाही, तर दुसरे काय कारण होते? आज नऊ वर्षांनीही त्यांच्या विरोधात कसलाच पुरावा नसल्याची ग्वाही तपास यंत्रणांना द्यावी लागत असेल, तर पवार किती धडधडीत खोटेपणा करू शकतात, त्याचा दुसरा पुरावा शोधण्याची गरज नाही. किंबहूना छातीठोकपणे खोटे दामटून बोलणे, हीच पवारांची प्रशासकीय ख्यती राहिलेली आहे. १९९३ सालत मुंबईत बॉम्बस्फ़ोट मालीका झाली, त्यात अकरा स्फ़ोट झालेले होते. पण कुठलाही स्फ़ोट मुस्लिमबहुल विभागात झालेला नव्हता. तर हिंदू मुस्लिम बेबनावाची शक्यता गृहीत धरून पवारांनी थेट दुरदर्शनवर बारा स्फ़ोट झाल्याची थाप ठोकली होती. मुस्लिमबहुल मशिदबंदर भागात बारावा स्फ़ोट झाल्याची ही थाप, खपून गेली होती. नंतर आपल्या खोटेपणाची कबुली पवारांनीच एका जाहिर मुलाखतीतून दिलेली आहे. लोकहितास्तव आपण खोटे बोललो असा दावा त्यांनी केला होता. मग आज नक्षली आरोपींना पकडल्यावर पवार खरे बोलत असतील, याची कोण हमी देऊ शकतो? उद्या त्याचे पुरावे साक्षीदार समोर आल्यावर पवार पुन्हा हात झटकून म्हणू शकतील, तेव्हा लोकहितासाठी खोटे बोललो होतो. एकूण पवारांची कारकिर्द बघितल्यास त्यात ते कधी खोटे बोलतात व कधी खरे बोलतात, त्याची त्यांनाही जाणिव नसल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. म्हणूनच त्यांचे सहकारी असोत किंवा विरोधक असोत, पवारांचे कुठलेही विधान वा भाष्य गंभीरपणे घ्यायचे बंद झालेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या फ़ुले पगडीचे आदेश वा भूमिका अनुयायीही गंभीरपणे घेत नाहीत.

आपल्या प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीत पवारांनी अशीच धरसोडवृत्ती आरंभली आणि कुठल्याही बाबतीत गंभीरपणे धोरणात्मक वा वैचारिक बांधिलकी राखली नाही. म्हणून त्यांची अशी दुर्दशा झालेली आहे. वेगळा पक्ष काढताना त्यांनी सोनियांवर परदेशी नागरिक असल्याचा आरोप ठेवून वेगळी चुल मांडली होती. पण अवघ्या ४ महिन्यात सत्तेची हाव त्यांना त्याच कॉग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसातला भाग पाडून गेली. तेव्हा एका क्षणात परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा त्यांनी सोडून दिलेला होता. दहापंधरा वर्षे राज्याची व केंद्राची सत्ता उपभोगताना त्यांना त्यात कुठे अडचण आली नाही. मग अकस्मात त्यांनी चार वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितीत कॉग्रेसशी असलेली आघाडी मोडून टाकलेली होती. त्यामागे कुठली वैचारिक भूमिका होती? कुठली पगडी तेव्हा त्यांनी परिधान केलेली होती? लोकसभेपासून विधानसभेपर्यंत अर्ध्या चड्डीची निंदानालस्ती केली आणि अखेरच्या क्षणी त्याच भाजपाला बाहेरून पाठींबा देताना कुठली टोपी डोक्यावर घातलेली होती? वैचारिक भूमिकांचे आव आणताता असल्या कुठल्याही प्रश्नाचा समाधानकारक खुलासा पवारांना आयुष्यभर करता आलेला नाही. मग आता पगडीमागे दडी मारावी लागत असते. संधीसाधू राजकारण करताना पवार मराठ्यांचे नव्हते की पुरोगामीही नव्हते. दिर्घकाळ संधी शोधत बसताना पवारांना आपल्या राज्यातला प्रभावी प्रादेशिक पक्ष होण्याइतकीही कधी मजल मारता आली नाही. त्यांच्या तुलनेत कालचे म्हणावे असे अखिलेश वा ममता-मायावती यांनी आपला पाया विस्तारून राष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण केला. त्याच्या खुप आधीपासून पवार राजकीय महत्वाकांक्षा बाळगून आहेत. पण त्यांना कधी संपुर्ण महाराष्ट्रातही आपला प्रभाव पाडता आला नाही. त्यापासून काही शिकण्याची तयारी नाही की विचार करण्याची गरज त्यांना वाटलेली नाही.

शाळेतला कोणी हुशार विद्यार्थी नुसता टिवल्याबावल्या करीत मागे पडावा, त्यापेक्षा पवारांची स्थिती किंचीतही वेगळी नाही. ते आपणच निर्माण केलेल्या जंजाळामध्ये सतत फ़सत राहिलेले आहेत. त्यामुळे मग बाजूला पडल्याची भावना त्यांना असुरक्षित करीत असते आणि त्यातून नवनव्या गमतीजमती करून ते प्रसिद्दी झोतात रहाण्याची केविलवाणी धडपड करत असतात. आताही फ़ुले पागोट्याचे कथानकही म्हणूनच समजून घेतले पाहिजे. मध्यंतरी भुजबळांना अटक झाल्यानंतर आपल्याला कधी अटक होते त्याची प्रतिक्षा करतोय, असे छचोर विधान पवारांनी केलेले होते. पुढे भुजबळ दिड वर्ष तुरूंगात खितपत पडले आणि राष्ट्रवादीने त्यांच्याकडे साफ़ पाठ फ़िरवली होती. त्यातून भुजबळ नाराज नक्कीच होते. त्यांना अनुयायी वर्ग मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुखांनाही जाऊन भेटला होता. त्यावर मलमपट्टी करण्याची गरज होती. त्यातच भुजबळ सुटकेनंतर प्रथमच व्यासपीठावर झळकणार होते, तर त्यांच्यासह प्रामुख्याने माळी समाजाला खुश करण्यासाठी हे फ़ुले पगडीचे नाटक रंगवण्यात आले. बहुधा त्या नगरसेविकेला मुद्दाम़च पुणेरी पगडी आणायला सांगितलेले असावे. मग ती पगडी समोर आल्यावर घाईगर्दीने फ़ुले पागोटे मागवण्यात आले. त्यासाठी प्रवक्त्याला खुलासे देता येतील अशीही योजना आधीच आखलेली असावी. राष्ट्रवादी पक्ष आपल्याइतकाच भुजबळांचा आहे आणि आपणही भुजबळांच्या इतकेच फ़ुल्यांचे वारस असल्याचे सिद्ध करण्याचा हा केविलवाणा प्रयोग होता. पण आजच्या जमान्यात सामान्य मतदार वा कुठल्याही जातीचा नागरिक तितका दुधखुळा राहिलेला नाही. तो पगडी पागोट्याला बळी पडणारा राहिलेला नाही. सततच्या धरसोडवृत्तीने पवारांची राज्यात उरलेली पगडीही मतदाराने उतरवलेली आहे. सत्तेपेक्षाही भारतात पगडी प्रतिष्ठेची असते. भगतसिंग सारखा जीवावर उदार झालेला शहीदही म्हणून गेलाय, पगडी संभाळ जट्टा! पवारसाहेब तुम्ही पगडी सोडून कायम सत्तापदांना जपत संभाळत राहिलात. आता सगळे गमावल्यानंतर तुम्हाला पगडी आठवली काय?

साप्ताहिक विवेक 

10 comments:

  1. He is right bhau. He doesn't deserve the headgear (pagadi).It's a wisdom prop.

    ReplyDelete
  2. महाराष्ट्राचं CM पद , कृषिमंत्री ,संरक्षण अशी महत्वाची खाती सांभाळलेला नेता या वयात इतक्या कोत्या मनोवृत्तीचा कसा काय झाला ? कि ते तसेच आहेत त्यांना नशिबाने हि पदे मिळाली ? असा प्रश्न पडलाय ,यावरून ते PM किंवा राष्ट्रपती का झाले नाहीत ते कळते ,प्रणव मुखर्जी यात उठून दिसतात विरोधी विचारसरणीच्या कार्यक्रमात पण ते जाऊन बोलू शकले ते हि योग्य संतुलन ठेवून ,त्यांनी वेगळीच उंची गाठली व पवारांनी वेगळीच पायरी उतरली .

    ReplyDelete
  3. साहेबांनी काहीच चुकीचे केले नाही. मी व माझे १०० + नातेवाईक व अनेक ब्राह्मण मीत्र हे सगळे भाजपा ला मतदान करतो. अपवाद फक्त वैयक्तिक संबंध असतील तरच. मग साहेब आमचा ज्यु करतायेत. असुदे, थौडे दिवस राहीलेले.

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    माझ्या मते फुल्यांची पगडी म्हणजे दुखावलेल्या भुजबळांना चुचकारण्यासाठी घेतलेला मुखवटा आहे. २०१९ च्या निवडणुकांत भुजबळांनी मदत करावी हा हेतू. त्यासाठी माळी जात ही भुजबळांची ओळख पवारांनी निश्चित करून ठेवली आहे, हा त्यामागचा मथितार्थ. भुजबळांनी इतर कोणतीही ओळख (उदा. : ओबीसी) सांगण्यापूर्वी पवारांचा सल्ला घ्यायला हवा, ही गर्भित धमकी आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  5. शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते असे विधान असो की नुकतेच पगडी संदर्भात असलेली त्यांची भूमिका यातून त्यांचा ब्राह्मण समाजाविषयी असणारा द्वेष ठळकपणे दिसून येतो। पवारांचा ब्राह्मण द्वेष हा काही नवीन नाही पण एक ब्राह्मण या राज्याचा मुख्यमंत्री होतो व यांच्या पक्षाला व यांना आव्हान देतो हेच मुळात पवारांना सहन होत नाही आहे। स्वतःला जाणता राजा म्हणवून घेणारे पवार हे कधीही शिवरायांचे पाईक होऊ शकत नाही कारण त्यांच्यात सर्वसमावेशकता नाही व येणारही नाही। या अश्या जातीच्या गलिच्छ राजकारणामुळेच पवार देशाच्या राजकारणात पाय जमवू शकले नाही व 'statesman' बनू शकले नाही।

    ReplyDelete
  6. भाऊ, कसला भयानक आरसा दाखवला हो तुम्ही. एव्हडे कटू सत्य कसे पचवायचे ?

    ReplyDelete
  7. आपले सर्व विचार पटले भाऊ परंतु आपण ज्योतिबा फुले यांच्या बाबत जे काही लिहिले आहे ते पटण्यासारखे नाही याला पुरावा म्हणजे त्यांचेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले समग्र फुले वांग्मय पुस्तक होय. ते पुस्तक वाचल्यावर असे लक्षात येते की महात्मा ज्योतिबा फुले त्यांना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचा कळवळा भीलवाडा काही नव्हता परंतु ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि इस्लाम धर्माचे गुणगाण करणे आणि ब्राह्मणांना झोडपून काढणे व त्यानिमित्ताने हिंदू धर्माची निंदानालस्ती करणे हाच त्यांच्या जीवनाचा पगारी हेतू होता. जिज्ञासूंनी समग्र फुले हे पुस्तक इंटरनेटवरून शोधून अवश्य वाचावे डोळे उघडतील

    ReplyDelete
  8. Shri Bhau kindly read rightangles.in Mr. Pratap Asbe on the same subject

    ReplyDelete
  9. पवारांनी आता दुसऱ्याच्या पगड्या पळवण्यापेक्षा स्वतःची लंगोटी सांभाळावी! नाही तर, सोवळे हातचे गेले आणि ओवळेही हाती लागत नाही असे व्हायचे!

    ReplyDelete