Thursday, January 5, 2017

आभारप्रदर्शन?

modi on TV के लिए चित्र परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पुर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण करणार, असे दोन दिवस जाहिर झाले. लोकांच्या त्या संबोधनाविषयी खुप अपेक्षा होत्या. कारण ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीने एकूणच सर्वांची तारांबळ उडालेली होती. काळापैसा खणून काढण्याची ही तर नुसती सुरूवात आहे, असेही नंतर बोलले गेलेले होते. त्यामुळेच नववर्षात काय समोर वाढून ठेवले आहे, याबद्दल लोकांच्या मनात अनेक शंकाही होत्या. कारण नोटाबंदीने कोणाकोणाचे किती हाल झाले, त्याच्या कहाण्या माध्यमांनी समोर आणल्या होत्याच. तशाच विविध जागी नव्या नोटांची उचल करण्याच्या भानगडीही उघडकीस येत होत्या. सहाजिकच आणखी काय मोठा निर्णय होणार, ही भिती अनेकांना होती. तसेच काहीतरी दिलासा दिला जाईल, अशीही वेगळी अपेक्षा होती. पण दोन्हीपैकी काहीच झाले नाही. कुठली मोठी घोषणा पंतप्रधान करूही शकत नव्हते. आणखी एक महिन्यात देशाचा नवा अर्थसंकल्प मांडला जायचा असल्याने, आर्थिक बाबतीत धोरणात्मक अशी कुठलीही घोषणा गैरलागू ठरली असती. त्यामुळेच मध्यमवर्ग ज्या करसवलतीची अपेक्षा बाळगून होता, त्यापैकी काहीही होऊ शकत नव्हते. पण विविध सवलती व अनुदानाच्या घोषणा मात्र मोदींनी केल्या. त्यात सामान्य शेतकर्‍यापासून तळागाळातल्या गरीबाला दिलासा देणार्‍या घोषणांचाच भरणा अधिक आहे. शिवाय कोट्यवधी नागरिकांनी ज्या सहनशीलतेचे प्रदर्शन घडवत नोटाबंदीला साथ दिली, त्याचेही आभार त्यांनी मानले. तेही अगत्याचे होते. कारण ९९ टक्के सामान्य प्रामाणिक नागरिकाला १ टक्का बदमाशांसाठी हा त्रास सोसावा लागला आहे. मात्र त्यातून किती बदमाश जाळ्यात फ़सले, त्याचीही थोडी माहिती उपलब्ध व्हावी, ही अपेक्षा पुर्ण होऊ शकली नाही. अन्य सवलतींपेक्षाही तशा बदमाशांची ढोबळ मानाने पकडली गेलेली चोरी लोकांना अधिक सुखावह वाटली असती. अर्थात इतक्या लगेच ती आकडेवारी उपलब्ध होणेही अवघड आहे. कारण आदल्याच दिवशी नोटाबंदीची वा नोटाबदलीची मुदत संपलेली आहे आणि किती नोटा परत आल्या व त्यापैकी किती काळापैसा जाळ्यात फ़सला, त्याचे हिशोब मांडले जाण्याला काही आधी अजून लागायचा आहे. पण आधीच्या एका भाषणात मोदींनी त्याकडे सांकेतिक इशारा जरूर केला आहे. बॅन्केच्या खात्यात जमा झालेला पैसा किती काळा आणि किती गोरा, हे अजून ठरायचे आहे. त्यातले काळे चेहरे स्पष्ट व्हायला वेळही लागेल. पण जो पैसा नोटांच्या रुपाने जमा झालेला आहे, त्याला आता ‘पत्ता आहे’. त्या पत्त्यावर जाऊन चेहरे उघड होतील आणि त्यांचा माग काढताना, अनेक चेहरेही स्पष्ट होतील, असे मोदी म्हणाले आहेत. आजवर अंधारात चेहरे शोधावे लागत होते, आता पत्ते मिळाले आहेत. तोच एक मोठा दिलासा आहे.

एकदोन गुन्हे पकडले गेले, मग त्या व्यक्तीला पोलिसी खाक्यात दाखलेबाज म्हणतात. त्यामुळेच आता ज्यांनी मोठ्या रकमा भराभर भरल्यात वा काळ्याचे पांढरे करत इतरांच्या नावाने नोटांचा भरणा केलेला आहे, त्यांचे हंगामी पत्तेही उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळेच त्यापैकी अनेकजण आताही निसटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याला जामिनावर सुटणे म्हणता येईल. त्याचे नाव काळ्या यादीत कायमचे नोंदलेले रहाणार आहे. याचा अर्थ, अशा रितीने जे लक्षावधी नाव आणि पत्ते हाती आलेले आहेत, त्यांच्याकडे आता आयकर व महसुल खात्याची वक्रदृष्टी रहाणार आहे. कोट्यवधी सुखवस्तु नागरिकांच्या मागे धावणार्‍या आयकर खात्याला, आता मोजक्याच लक्षावधी दाखलेबाजांवर नजर ठेवून फ़डशा पाडणे सोपे होणार आहे. आता जे चौदा पंधरा लाख कोटी रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झालेले आहेत, त्यापैकी संशयास्पद लोकांना खुलासे द्यावेच लागणार आहेत. पण त्यातूनही काहीतरी लबाडी करून निसटणार्‍यांवरचा संशय कायम रहाणार आहे. त्यामुळेच जे निसटतील, त्यांना नव्याने काळापैसा जमा करताना मनात धाकधुक असेलच. थोडक्यात जनतेच्या इतक्या सोशिकतेने सरकारला बहुतांश लफ़ंग्यांना निदान संशयाच्या जाळ्यात ओढणे शक्य झाले आहे. जे काम सत्तर वर्षात महसुल व आयकर खात्याला कितीही कठोर कायदे उपलब्ध करून दिल्यानंतरही शक्य झाले नव्हते, ते सामान्य जनतेने पन्नास दिवस त्रास सोसून साध्य करून दाखवले आहे. ती मुदत संपल्यानंतर मोदींनी जनतेचे आभार त्यासाठीच मानले आहेत. कारण ह्या प्रयोगाचे यश सरकारी यंत्रणा वा विविध बॅन्कांच्या कष्टाने मिळालेले नाही. तर कोट्यवधी जनतेच्या सहभागामुळे शक्य झाले आहे. एकप्रकारे ही चळवळच झाली आणि सर्वशक्तीमान सरकार जे करू शकत नव्हते, ते जनतेच्या निर्धाराने करून दाखवले आहे. यातून जनतेला तिच्या लोकशाहीतील सामर्थ्याचाच साक्षात्कार घडवला गेलेला आहे. नुसते निवडलेले सरकार जे करू शकत नाही, ते शिवधनुष्य जनता पाठीशी असेल तरच सरकार पेलू शकते; असा तो साक्षात्कार आहे. कारण छाननी होईल, तेव्हा जमा पंधरा लाख कोटींपैकी किमान चारपाच लाख कोटी काळापैसा सरकारी तिजोरीत जमा होईल. त्याचा कल्याणकारी योजनांसाठी सढळ हस्ते वापर केला जाऊ शकणार आहे. मात्र ते सरकारचे औदार्य नसेल तर जनतेने उपसलेल्या कष्टाचे फ़ळ असेल. सरकारचा म्होरक्या म्हणून मोदींनी जनतेचे त्यासाठीच आभार मानलेले आहेत. इतकी प्रचंड मोठी रक्कम त्यांना महसुली व्यवस्थेने गोळा करून दिलेली नाही, तर सामान्य जनतेने ‘युद्धपातळीवर लढून’ मिळवून दिलेली आहे. त्यामुळेच ३१ डिसेंबरला मोदींनी केलेले भाषण, हे आभारप्रदर्शनाचे होते असे मानायला हरकत नसावी.

1 comment: