Wednesday, May 10, 2017

शिवसेनेचा केजरीवाल होतोय

नुकतेच दिल्लीतील महापालिकांचे निकाल लागले आणि त्यापुर्वीच तिथल्या पराभवा़ची खात्री केजरीवाल यांना झालेली होती. म्हणूनच त्यांनी पराभवाची गंभीर मिमांसा करण्यापेक्षा नेहमीप्रमाणे आधीच कांगावा सुरू केला होता. त्यातही काही नवे नव्हते. दोन वर्षापुर्वी विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकांचे मतदान जवळ आले असतानाही, केजरीवाल यांनी असाच कांगावा केलेला होता. भाजपाने मतदान यंत्रात गफ़लत करून दिल्ली काबीज करण्याचे कारस्थान शिजवले असल्याचा आरोप, त्यांनी तेव्हाही केला होता. पण निकालांनी त्यांचा अपेक्षाभंग केला आणि जणू केजरीवालनीच यंत्रात गफ़लत करून इतके मोठे यश मिळवले, असा आरोप करण्याला पोषक असे निकाल आलेले होते. ५४ टक्के मते व ७० पैकी ६७ आमदार त्यांचे निवडून आले होते. केजरीवाल यांची भिती खरी असती, तर त्यांनी तेव्हाही यंत्रावर तोच आरोप केला असता. पण निकालानंतर त्यांना आपला आरोपही आठवला नाही आणि तात्कालीन निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी केजरीवालांना त्यांच्या आरोपासाठी माफ़ी मागण्याची तरी सभ्यता दाखवा, अशी विनंती केली होती. पण कांगावखोर माणसाकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा कोणी करू शकत नसतो. केजरीवाल तर अस्सल कांगावखोर आहेत. म्हणूनच त्यांना आज महापालिका मतदानात मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यापासून खरेतर शिवसेनेने काही धडा घेण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रात दिवसेदिवस शिवसेना केजरीवालांचे अनुकरण करताना दिसत आहे. दिल्ली काबीज केल्यावर केजरीवाल सातत्याने मोदींना लक्ष्य बनवत राहिले व रोजच्या रोज काही खुसपट काढून भाजपावर आरोप करीत राहिले. दरम्यान आपली लोकप्रियता व मते टिकवण्यासाठीही काही करायला हवे, याचे त्यांनी अजिबात भान ठेवले नाही. आता त्याची किंमत मोजली आहे आणि शिवसेनाही तेच करते आहे.

पाच वर्षापुर्वी महाराष्ट्रात अशाच महापालिका निवडणूका झाल्या होत्या आणि त्यात मनसे हा मोठा घटक होता. त्यात मनसेने मुंबई ठाणे पुण्यात लक्षणिय यश मिळवले होते. तर नाशिकमध्ये मनसे सर्वात मोठा पक्ष झालेला होता. ठाण्यात मात्र सेना-भाजपा युती असूनही बहूमत हुकलेले होते. अशावेळी सत्तेचे समिकरण जुळवताना एकदोन नगरसेवक शिवसेनेला हवे होते. त्यावरून रणकंदन माजलेले असताना, सेनेचे आमदार राज ठाकरेंना जाऊन भेटले व त्यांनी एकतर्फ़ी शिवसेनेला पाठींबा देऊन टाकला होता. कुठल्याही पदासाठी सौदा केलेला नव्हता. अशा सदिच्छा गोळा करण्यातून पक्षाची शक्ती वाढत असते आणि त्याचाच जनमानसावर मोठा प्रभाव पडत असतो. ठाण्यात सेनेला मनसेने मदत केली असेल, तर त्याची परतफ़ेड नाशिकमध्ये शिवसेनेने करावी, अशी अपेक्षा कोणी बाळगली तर चुकीचे म्हणता येत नाही. पण शिवसेनेने तितकी उदारता दाखवली नाही आणि राज ठाकरे यांच्यासमोर नाशिकचा महापौर निवडून आणताना समस्या उभी राहिली. त्यांनी मग भाजपाशी समझोता केला आणि समिकरण जमवले. पण यातून सेनेचे ठाण्यात सोपे असलेले गणित बिघडून गेले. महापौर निवडून आणताना मनसेची मिळालेली मदत पुढल्या राजकारणात सोपी राहिली नाही. विविध विषय समित्या वैधानिक समित्या निवडताना मनसेने ठाण्यात शिवसेनेची साथ सोडून सेना विरोधकांना मदत देऊ केली. ज्या पक्षाच्या विनाअट साथीने महापौर निवडून आला होता, त्याला शत्रू बनवण्याचे मुरब्बीपण शिवसेनेलाच महागात पडले होते. अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे तर शिवसेनेच्या चाणक्याने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. नाशिकमध्ये राज ठाकरेंना अपशकून करण्याच्या हव्यासातून ठाण्यात स्वत:लाच अपशकून करून घेतला होता. राजकारणात व्यक्तीगत वैमनस्याला स्थान नसते, ह्याचे सेनेला अलिकडे भान उरलेले नसल्याचा तो परिणाम होता.

आताही मुंबईत वेगवेगळे लढणार्‍या सेना भाजपा यांनी जवळपास सारख्याच जागा जिंकल्या. भाजपाला अवघ्या दोन जागा कमी मिळाल्या. सेनेने आपल्या जागा कायम राखल्या, तर भाजपाने आपल्या तिपटीने वाढवल्या. म्हणजेच भाजपा सेनेला आता मुंबईत तुल्यबळ झालेला आहे. तेच विधानसभेत झाले होते. सेनेच्या दुप्पट जागा जिंकून भाजपाने राज्यातही आपणच सेनेपेक्षा मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले होते. त्यानंतर पक्षाची व संघटनेची नव्याने बांधणी व जमवाजमव इतकाच पर्याय होता. पण त्यासाठी काहीही न करता शिवसेनेने नुसत्या तक्रारी करीत रहाण्याचे केजरीवाल धोरण पत्करले आहे. रोज कुठले तरी निमीत्त शोधून मोदी वा भाजपावर दुगाण्या झाडणे, हे आता शिवसेनेचे प्रमुख कार्य होऊन बसलेले आहे. किंबहूना आम आदमी पक्ष जसा केजरीवालांच्या मर्कटलिला इतकाच मर्यादित होऊन गेला, तशीच काहीशी आजच्या शिवसेनेची स्थिती झालेली आहे. हल्ली शिवसेना म्हणून वर्तमानपत्रात बातम्या येतात त्या संघटनात्मक नसतात. ‘सामना’ अग्रलेखात भाजपाला नव्या काय शिव्या घातल्या वा टिका केली, तेवढीच बातमी असते. अन्यथा शिवसेनेने संघटनात्मक कोणते आंदोलन केले, कुठे राडा केला वा अन्य काही मेळावे घेतले, त्याचा मागमूस माध्यमात आढळून येत नाही. आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवाल यांचे काही आरोप, शंका वा विक्षिप्तपणा; असे जे स्वरूप झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात शिवसेना करीत आहे. फ़रक इतकाच, की केजरीवाल यांच्या हाती कुठले वृत्तपत्र वा मुखपत्र नाही. ते ट्वीट वा सोशल माध्यमातून डरकाळ्या फ़ोडत असतात आणि शिवसेनेकडे मुखपत्र आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे अस्तीत्व ढासळत गेले होते आणि मुंबई महाराष्ट्रात शिवसेनेचेही काहीसे तसेच झाले आहे. आता शिवसेना ही संघटना राहिली नसून ‘सामना’ हीच शिवसेना झालेली आहे.

दिल्लीत अपुर्व यश मिळवल्यानंतर तरी केजरीवाल भरकटले होते. महाराष्ट्रात शिवसेनेची मागल्या तीन वर्षात प्रत्येक लढाईत पिछाडी झालेली आहे. लोकसभेत भाजपाशी युती होती. त्यानंतर विधानसभेला युती तुटली तरी सेनेने स्वबळावर चांगली टक्कर दिलेली होती. त्यानंतर युती हा विषय निकालात निघाला होता. यापुढे आपल्याच बळावर प्रत्येक लढत द्यायची व पक्षाचे बळ वाढवायचे, इतकाच पर्याय सेनेपुढे होते. सहाजिकच भाजपा काय करतो आहे किंवा त्याने काय करावे; असल्या गोष्टी बाजूला ठेवून आपले बळ वाढवण्याला प्राधान्य होते. ते काम उत्तमरित्या पार पाडले असते, तर पंचायत वा पालिका निवडणुकीत भाजपाला दणका देता आलाच असता. त्या निकालातूनच भाजपावर युती तोडल्याचा पश्चात्ताप करायची वेळ आली असती. दोन अडीच वर्षे शिवसेनेला मिळालेली होती. त्याचा उपयोग संघटना भक्कम करणे व मतदारात आपले स्थान विस्तारणे, यासाठी केला असता तर भाजपाला शब्दांनी बेजार करण्याची लाचारी उरली नसती. पण आपण संघटना आहोत आणि जनतेमध्ये जाऊन मते गोळा करावी लागतात, याचे भानच सेनेला उरलेले नाही. आता बाळासाहेबांची सेना मागे पडलेली असून केजरीवाल यांचे अनुकरण करणारी शिवसेना तयार झाली आहे. किंबहूना सेनला बाजूला सारून तिची जागा ‘सामना’ या मुखपत्राने व्यापलेली आहे. केजरीवाल निदान दिल्लीच्या निकालांनी सावध झाले आहेत. त्यांनी आरोपबाजी सोडून पक्षाची नव्याने डागडूजी करायला घेतली आहे. कारण दिल्ली हातून निसटली तर बाकी कुठेही आपल्या उभेही रहाता येणार नाही, याची जाणिव झाली आहे. उलट दोन महिन्यांपुर्वी मुंबईतही आपल्याला भाजपाने तुल्यबळ लढत देऊन बरोबरी साधल्याचा धोका, सेनेच्या अजून लक्षातही आलेला नाही. किंबहूना आता शिवसेना हा मुंबई महाराष्ट्रातला आम आदमी पक्ष होत चालला म्हटल्यास वावगे ठरू नये.

2 comments:

  1. भयंकर विनोदी

    ReplyDelete
  2. शिवसेना नेतृत्वाने वेळीच धोकयाची पाटी (जी की तुम्ही दिली आहे) वाचली पाहिजे .नि नीतिमधे बदल केला पाहिजे

    ReplyDelete