Wednesday, May 10, 2017

जा गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी

kapil mishra के लिए चित्र परिणाम

दिल्लीसारख्या एका महानगराचे राज्य असलेल्या सरकारचे मुख्यमंत्री असताना, अरविंद केजरीवाल यांनी सहा महिन्यापुर्वी नोटाबंदीच्या विरोधत उठवलेला आवाज धक्कादायक होता. अनेक मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीही त्याविषयी बोलत नव्हते. पण मोजक्याच राजकारण्यांनी नोटाबंदीला इतका कडा्डून विरोध केला होता. जणू यांच्याच घरातली तिजोरी फ़ोडून मोदी सरकारने पैसे चोरून नेले असावेत, अशा थाटात ममता बानर्जी वा केजरीवाल गदारोळ करीत होते. एकमेकांच्या राज्यात जाऊन नोटाबंदीच्या विरोधात काहूर माजवत होते. सामान्य लोकांना नोटा बदलून मिळताना वा बॅन्केतील आपलेच पैसे काढताना त्रास होत असल्याचा, किती म्हणून कळवळा या लोकांना आलेला होता. त्याचे रहस्य आता हळुहळू उलगडू लागले आहे. त्यापैकी ममतांचे अनेक निकटर्तिय खासदार व सहकारी विविध आर्थिक घोटाळ्यात गजाआड जाऊन पडलेले आहेत. नारदा व शारदा अशा चिटफ़ंड घोटाळ्यात गुंतलेल्या गुन्हेगारांकडून रोख मोठ्या रकमा घेताना असे नेते कॅमेराने टिपले आणि त्याची बारकाईने चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचा आदेश सुप्रिम कोर्टाने दिलेला आहे. त्याच करोडो रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेताना ममतांच्या सहकार्‍यांची तारांबळ उडाली, म्हणून त्यांना नोटाबंदीचा त्रास झाला होता काय? केजरीवालही त्यात आघाडीवर होते. त्याचा खुलासा आता त्यांच्याच एका मंत्र्याने केला आहे. कपील मिश्रा नावाच्या या मंत्र्याने, केजरीवालनी आपल्याच मंत्र्याकडून रोख दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. म्हणजे असे रोखीतले पैसे मो्ठ्य़ा संख्येने हाताशी असल्यावर केजरीवाल यांचे नोटाबंदीने हाल झालेच असणार. त्यांनी मोदींच्या त्या निर्णयाला विरोध करायचा नाही, तर नितीशकुमार विरोधात बोलणार काय? चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय, त्याचेच दाखले जगाला दाखवण्यासाठी बहुधा केजरीवाल राजकारणात आले असावेत.

आताही त्यांच्याच एका सहकार्‍याने त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. कपील मिश्रा हा माणूस पंधरा वर्षे केजरीवाल यांचा सहकारी होता. जेव्हा पक्षाची स्थापना झाली नव्हती किंवा तशी शक्यताही नव्हती, अशा काळापासूनची त्यांची मैत्री होती. नंतर सत्ता मिळाल्यावर केजरीवालनी त्याच्याकडे जलबोर्ड म्हणजे दिल्लीतील पाणी पुरवठ्याचे मंत्रालय सोपवले. दिल्लीत सतत पाण्यावरून गदारोळ होत राहिला आहे, त्यातले गोंधळ संपवण्यासाठीच कपीलची नेमणूक तिथे झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुढे त्या खात्याचे काम अप्रतिम चालू असल्याचा दावा केजरीवाल स्वत:च सातत्याने करीत राहिले होते. अगदी कालपरवा दिल्ली महापालिका निवडणूकीतही त्याच उत्तम पाणी पुरवठ्याचा हवाला देऊन, केजरीवाल दिल्लीकरांकडे मते मागत होते. मग आता अकस्मात त्याच कपील मिश्राची सरकारमधुन उचलबांगडी करण्याचे कारण काय असू शकते? याचा अर्थ एकच निघू शकतो. कपील मिश्रा यांनी केजरीवाल यांचा मुखवटा फ़ाडण्याचा चंग बांधला होता आणि त्याचा सुगावा लागला, तेव्हा त्याची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करण्यात आलेली आहे. यात नवे असे काहीच नाही. सुदेशकुमार नावाच्या मंत्र्याचेही प्रकरण असेच होते. महिला व बालकल्याण खात्याचा हा मंत्री अनेक महिला व मुलींशी लैंगिक चाळे करीत असल्याची वदंता दिल्लीत होती. पण केजरीवालनी त्याला कधी हात लावला नाही. त्याच्याच अशा पापाची एक चित्रित सीडी अखेर पाठवण्यात आली, तरी मुख्यमंत्री गप्प होते. सुदेशकुमार पापकर्मे करीतच होता. पुढे ती सीडी हाती लागली असून त्याचे प्रक्षेपण करणार असल्याची घोषणा एका वाहिनीने केली. त्यासंबंधी केजरीवाल यांचे मत मागवले, त्या्वेळी तडकाफ़डकी सुदेशकुमार याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली होती. म्हणजेच सर्व काही ठाऊक असून केजरीवाल त्याला पाठीशी घालत होते.

सुदेशकुमार व कपील मिश्रा यांच्या हाकालपट्टीमध्ये एक साम्य आहे, तसेच अनेक विरोधाभासही आहेत. सुदेशकुमार गुन्हेगारच होता. पण कपील मिश्रावर असा कुठला आरोप केजरीवाल वा त्यांचा कोणी साथीदार करू शकलेला नाही. कपीलचे काम चुकीचे होते वा त्याने कामाचा घोटाळा केला, असे कोणी अजून तरी म्हटलेले नाही. फ़क्त मंत्रीपद गेल्यामुळेच सूडबुद्धीने कपील आरोप करतो आहे, इतकाच खुलासा दिला जातो आहे. अर्थात त्याच्या जोडीला नेहमीचाच आणखी एक आरोप आहे, भाजपा व मोदी सरकारचे हे कारस्थान आहे. त्याला अन्य राजकीय पक्षांना संपवायचे आहे आणि विरोधकांची सरकारे संपवायची आहेत, हा नेहमीचा आरोप आहे. कुठल्याही पक्षाचे आमदार फ़ुटले वा त्यांनी पक्षात बंड पुकारले, मग त्यामागे भाजपाचा हात असतो. ही आता गृहीत गोष्ट झालेली आहे. त्याचाच आधार घेऊन कपील मिश्रावरही भाजपाचा हस्तक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याबद्दलही तक्रार असायचे कारण नाही. एका पक्षाच्या सदस्याला त्याच्याच विरोधात वापरण्याचे राजकारण अनेकांनी अनेकदा केलेले आहे, भाजपाही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. पण मुद्दा वेगळा आहे. भाजपाशी कपीलने हातमिळवणी केली असेल म्हणून केजरीवाल यांच्यावरील आरोप खोटे पडत नाहीत. त्याच्या आरोपांचा खुलासा व उत्तरे देण्यातून सुटका मिळू शकत नाही. त्यात किती तथ्य आहे आणि केजरीवाल यात कसे गुंतलेले नाहीत, त्याचे स्पष्टीकरण द्यावेच लागेल. आरोप भाजपाने केल्यामुळे केजरीवाल यांचे पाप माफ़ होऊ शकत नाही, की पुण्य ठरू शकत नाही. आपण तसे कोणतेही पाप केलेलेच नाही, असे ठामपणे सांगण्याची हिंमत केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांना दाखवावीच लागेल. पण अजून तरी तशी हिंमत केजरीवाल दाखवू शकलेले नाहीत. कारणही स्पष्ट आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात ना?

केजरीवाल व त्यांच्या लोकपाल आंदोलनातील टोळीने पहिल्यापासून आपले आंदोलन हे ब्लॅकमेलच्या आधारावर चालविले होते. जे कोणी आपल्या आवाक्यात रहाणार नाहीत, त्यांना छूपे चित्रण वा संवाद रेकॉर्डिंग करून संपवण्याचा खेळ, केजरीवाल यांनी प्रथमपासून केलेला होता. पुढे त्यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांच्यात खरेखुरे ब्लॅकमेलर्सच सहभागी झाले. आशिष खेतान व आशुतोष नावाचे जे दोन पत्राकार लोकसभेचे उमेदवार व्हायला आम आदमी पक्षात दाखल झाले, त्यांची ख्याती अशा स्वरूपाच्या बदनामीकारक मोहिमा चालवण्यासाठीच होती. थोडक्यात आम आदमी पक्ष व केजरीवाल यांचा पायाच ब्लॅकमेलच्या मदतीने घातला गेलेला आहे. त्यांनी आपल्या काही सहकार्‍यांच्या विरोधात पुरावे जमवायचे वा निर्माण करायचे; असेच राजकारण कायम केलेले आहे. पुढे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सामान्य लोकांनीही आपापल्या फ़ोनद्वारे अशी चित्रणे व रेकॉर्डिंग करून आणावीत, असे आवाहन केजरीवालनी नित्यनेमाने केलेले होतेच. आताही कपील मिश्रा नावाच्या या सहकार्‍याने तोच हातखंडा वापरलेला आहे काय? म्हणजे दोन कोटीची कॅश सत्येंद्र जैन मुख्यमंत्र्याला देतानाचे चित्रणही कपीलने करून ठेवलेले आहे काय? कशावरून केले नसेल? बहूधा त्यामुळेच केजरीवाल यांची बोलती बंद झालेली आहे. म्हणून आपल्यावरील आरोप फ़ेटाळून लावण्याचे धाडस त्यांना झालेले नाही. तर कपील मात्र आपल्यापाशी भक्कम पुरावे असल्याची ग्वाही देत आहे. ते पुरावे आपल्या गुरूनेच शिकवल्याप्रमाणे कपीलने तयार ठेवलेले असतील, तर तो केजरीवालचा अस्त असेल. कारण अशा चित्रण वा ध्वनीमुद्रणातून सहीसलामत निसटणे शक्य नाही. आपण सहा महिन्यापुर्वी कुठल्या नोटा रद्द झाल्यामुळे आकाशपाताळ एक केले, त्याचा गवगवा जगभरात होईल, म्हणून बहुधा केजरीवाल यांची पाचावर धारण बसलेली असावी. अन्यथा त्यांनी रविवारीच कपीलच्या आरोपांचा साफ़ इन्कार केला असता.

2 comments:

  1. बिनतोड युक्तिवाद ! अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  2. छान युक्तिवाद !

    ReplyDelete