Wednesday, May 24, 2017

काश्मिरवरचा अक्सीर इलाज

major general gogoi के लिए चित्र परिणाम

नितीन गोगोई नावाच्या एका कनिष्ठ सेनाधिकार्‍याने आता भारतीय सेनेला मोठे प्रभावी हत्यार मिळवून दिले आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताला रॉकेट विज्ञान प्रदान केले, म्हणून आपण त्यांचा गौरव करतो. त्यापेक्षा छोटी गोष्ट असेल. पण काश्मिरी हिंसेला काबूत करण्याचा अतिशय प्रभावी मार्ग, मेजर गोगोईने शोधून काढला आहे. म्हणूनच देशातील मानवाधिकार वा उदारमतवादी विचारांच्या लोकांनी त्याच्या नावाने कितीही लाखोली वाहिलेली असली, तरी लष्करप्रमुखांनी त्याचा यथोचित सन्मान केला आहे. काश्मिरात जमाव सेनेच्या जवानांवर कुठेही दगडफ़ेक करतो, हे आपण नित्यनेमाने बघत असतो. त्यांची सजजूत घालून त्यांना असल्या हिंसेपासून परावृत्त करण्याचे कुठलेही प्रयास तथाकथित शांततावादी लोकांनी केलेले नाहीत. ही मंडळी आपापल्या वातानुकूलीत दालनात बसून पांडित्य झाडत असतात. अनेक विषयात युद्धपातळीवर काम व्हायला हवे, अशीही भाषा बोलत असतात. पण त्यांना युद्धपातळी म्हणजे काय, त्याचाही थांगपत्ता नसतो. युद्धपातळी म्हणजे जिथे नेहमीची परिस्थिती नाही, तिथे सर्व नियम व प्रथा बाजूला ठेवून काम उरकायचे असते. परिस्थिती अपवादात्मक असते, म्हणूनच तिथे उपायही अपवादात्मक असू शकतात. कुठल्याही नियम वा चाकोरीत अडकून पडायचे नसते. परिणाम फ़ार महत्वाचे असतात. जेव्हा कुठे युद्धासारखी हिंसा चालू असते वा वादळ महापुराची स्थिती असते; तिथे नेहमीची यंत्रणा निकामी ठरली म्हणून युद्धपातळीवर काम करणार्‍या सेनेला पाचारण केले जाते. सहाजिकच तिच्याकडून  चाकोरीतले काम करण्याची अपेक्षा बाळगणेच मुर्खपणा असतो. ज्यांना कामे चाकोरीत व नियमानुसार व्हायला हवीत असे वाटते, त्यांनीच ती करून दाखवावीत. जिथे त्यांना त्यातले काही जमत नाही, म्हणून मग नितीन गोगोई सारख्या सेनाधिकार्‍यांना पुढाकार घेऊन मार्ग काढावा लागत असतो.

काश्मिरचा प्रश्न दिर्घकाळ चिघळत पडला आहे. त्यातून मार्ग काढणे खरेच देशातील बुद्धीमंतांना वा तथाकथित पुरोगाम्यांना शक्य झाले असते, तर त्या सीमावर्ती प्रांतामध्ये लष्कराला तैनात करावे लागले नसते. आज काही लाखाची सेना तिथे तैनात करण्यात आली असून, तरीही जिहादी अतिरेक्यांना पायबंद घालण्यात यश मिळू शकलेले नाही. त्याचेही कारण स्पष्ट आहे. आजवर तिथल्या नागरी सरकारला आपले कर्तव्य बजावण्यात अतिरेक्यांपेक्षा या पुरोगामी उदारमतवादी लोकांनीच अडथळे आणलेले आहे. पुढे नागरी प्रशासन नाकर्ते ठरवून तिथे लष्कराला तैनात करण्यात आले. त्यांच्याही कामात या मानवाधिकारवादी लोकांनी सातत्याने ढवळाढवळ केलेली आहे. त्यामुळे परिस्थितीत किंचीतही सुधारणा होण्यापेक्षा स्थिती अधिकाधिक चिघळत गेली आहे. जिहादी अतिरेकी व घुसखोर बाजूला राहिले, आता तिथल्या गल्लीबोळात स्थानिक पोरेटोरेही सैनिकांवर दगड मारण्यापर्यंत शिरजोर होऊन गेली आहेत. जिहादींना हुडकण्याची चकमक चालू असेल, तर त्यात गुंतलेल्या सैनिकांना दगड मारून व्यत्यय आणला जात असतो. कुठेही तैनात केलेल्या जवानांवर बेधडक दगड मारले जातात. त्यासाठी हुर्रीयतच्या नेत्यांचे माध्यम वापरून पाकिस्तानच पैसे पुरवत असल्याचे उघड झालेले आहे. इतके होऊनही ही स्थिती सुधारत नसेल, तर काही नवे करणे भाग आहे. हातात शस्त्र असून सैनिक निकामी ठरत असेल, तर शस्त्र बदलणे भाग आहे. किंवा शत्रूच्या हातातले शस्त्र निकामी करण्याची काही सुविधा असली पाहिजे. नितीन गोगोई नावाच्या अधिकार्‍याने तशी सुविधा शोधून काढली आहे. म्हणूनच लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी त्याला सन्मानित केले आहे. काश्मिरात दगड फ़ेकणार्‍यांपासून कुठलीही हुल्लड माजवणार्‍यांना नामोहरम करण्याचे इतके प्रभावी शस्त्र वा सुविधा आजवर कुठलीच उपलब्ध नव्हती.

एका कारवाईच्या निमीत्ताने गोगोई व त्याच्या सैनिकांची तुकडी चालली असताना, जागोजागी त्यांच्यावर जमावाकडून हल्ले चालले होते. मात्र एका जागी प्रचंड जमाव जमलेला होता आणि त्याच्याकडून या सैनिकी तुकडीवर पेट्रोल बॉम्बही फ़ेकला गेला होता. त्या जमावाला आवरणे शक्य नव्हते. कारण वारंवार कारवाईचा इशारा देऊन सुद्धा जमाव हटत नव्हता. अशावेळी आपला व सहकार्‍यांचा जीव वाचवण्यासाठी हत्याराचा वापर करण्याचे प्रशिक्षणच सैनिकांना मिळालेले असते. गोगोई त्याला अपवाद नव्हता. पण त्या दगडफ़ेक्या जमावावर गोळ्या झाडल्या तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. काही दंगलखोरांचे प्राण गेले असते आणि काही सैनिक जखमी झाले असते. मग काय करावे? या विवंचनेत असताना गोगोईला एक अफ़लातून कल्पना सुचली. त्या जमावाला चिथावण्या देणारा व दगड फ़ेकण्यास प्रवृत्त करणारा एक म्होरक्या गोगोईच्या जीपपासून अगदी जवळच होता. आपल्या सहकारी सैनिकांना घेऊन गोगोईने त्या म्होरक्यावर झडप घातली आणि त्याला आपल्या जीपच्या बॉनेटवर बांधले. गाडीच्या बॉनेटवर शोभेची बाहूली बसवावी, तसा हा दगडफ़ेक्यांचा म्होरक्या जीपवर बांधून, मग गोगोईची सैनिकी तुकडी आरामात ठरल्या रस्त्यावरून पुढे निघाली. त्या प्रचंड जमावाला काय करावे तेच सुचेना. सैनिकी गाड्य़ांवर दगड फ़ेकले तर त्यांच्याच म्होरक्याचा जीव धोक्यात होता. सहाजिकच हाती दगड असूनही जमाव थंडावला आणि लष्करी तुकडी सुखरूप आपल्या अपेक्षित मार्गाने निघून जाऊ शकली. थोडक्यात गोगोईने आपल्या सहकार्‍यांचा धोक्यात असलेला जीव वाचवलाच. पण त्या जमावाला निष्प्रभ करून हिंसा रोखून दाखवली. बंदोबस्ताला गेलेल्या गोगोईने एक अजब सुविधा वा अस्त्र शोधून काढले आणि दगडफ़ेक्या जमावाला आपोआप संयमित व्हावे लागले. ही आज काश्मिरातही सर्वात प्रभावी लष्करी सुविधाच नाही काय?

शेवटी सवाल शांतता प्रस्थापित करण्या़चा आहे आणि हिंसक जमावाला रोखण्याचा आहे. तो जमाव ज्या अस्त्राने वा सुविधेने रोखला जाईल व हिंसा काबुत येईल, तीच योग्य कृती असते. युद्धपातळीवर काम करताना चाकोरी दुय्यम आणि परिणाम महत्वाचा असतो. मेजर गोगोईने आपल्या कल्पकतेने काश्मिरी समस्येवर जालीम अस्त्र शोधून भारतीय सेनेला बहाल केलेले आहे. तर त्याला सन्मानपत्र देऊन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी, त्याच अस्त्रा़चा भारतीय सेनेला स्विकार करण्याची मुभा दिलेली आहे. या़चा अर्थच यापुढे काश्मिरात मानवाधिकाराचे थोतांड बाजूला सारून, हिंसा माजवणार्‍यांचा कठोर बंदोबस्त करण्याचे अधिकार सैनिकांना मिळालेले आहेत. त्यात जिथे दगडफ़ेक चालू असेल तिथे त्यापैकी एकाला पुढे करून दगड फ़ेकणार्‍यांना खेळण्याची मुभा असणार आहे. आझादीसाठी त्यांनी आपल्याच कुणा सग्या सोयर्‍याला दगडांनी ठेचून मारायला हरकत नसेल. आपलाच कोणी म्होरक्या मारला जाणार असेल, तर त्यांना शांत व्हावे लागेल. किंवा मारला जाणारा काश्मिरी त्याच दंगेखोरांनी घेतलेला बळी असेल. त्याचे खापर भारतीय सेनेवर फ़ोडता येणार नाही. काश्मिरी आझादीसाठी जीवाशी़च खेळायचे असेल, तर त्याचेही स्वातंत्र्य देणारी अजब सुविधा या गोगोईने शोधून काढली आहे. त्याचा सर्रास वापर करताना हुर्रीयत वा अन्य काश्मिरी नेत्यांना हुतात्मा व्हायलाही पुढे करायला हरकत नसावी. सरसकट ही सुविधा वापरली गेल्यास अल्पावधीतच दगडफ़ेकीचे प्रकार कमी होतील आणि आपल्यालाच गाडीवर बांधू नये, म्हणून यातले अनेक आझादीप्रेमी घराबाहेरही पडायला धजणार नाहीत. म्हणूनच गोगोईचे कौतुक करणे भाग आहे. त्याने काश्मिरी समस्येवर जालीम उपाय शोधून काढला आहे आणि त्यासाठी भारत सरकारला एकही दमडा मोजावा लागणार नाही. युद्धपातळीवर मग काश्मिरात शांतता नांदू लागेल.

6 comments:

  1. अधिकारी नितीन गोगोई यांचा अभिमान वाटतो.जे वातानुकूलीत दालनात बसून पांडित्य झाडत असतात. अनेक विषयात युद्धपातळीवर काम व्हायला हवे, अशीही भाषा बोलत असतात.त्याना जवानाच्या भुमिकेत किमान एकदा तरी पाठवायला हवे कशी फॅ फॅ उडेल.मग वाटेल ते बरळणार नाहीत ते. युसलेस

    ReplyDelete
  2. प्यालेटगन्स वापरण्यावर मानवतावादींच्या हाकाटीनंतर बंदी घातल्यापासून पथ्थरबाजी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.प्यालेटगन्स वापराला परवानगी देऊन टाकावी,पथ्थरबाजी पूर्ण काबूत येईल.

    ReplyDelete
  3. पण भाऊ याचा अर्थ काश्मीर आता भारताच्या हातातून निसटला आहे असं समजावं का? म्हणजे या पुढेही अनेक वर्षे अशीच परिस्थिती राहणार आहे का?

    ReplyDelete
  4. मला एक जुना चित्रपट आठवला.
    36th Chamber of Shaolin Temple.
    चित्रपटातील नायक नवीन हत्यार विकसित करतो व त्याचा नवा वर्ग शाओलीन टेंपल मधे सुरू होतो.

    ReplyDelete
  5. It's Leetul Gogoi and not Nitin Gogoi.

    ReplyDelete
  6. भाऊ .......आपण केलेलं विश्लेषण अगदी बरोबर ....मी हा लेख आपल्या पूर्व परवानगी पण आपल्याच नावाने शिवाय माझ्या फेसबुक वॉल वर पोस्ट करतोय माफी असावी

    ReplyDelete