उजमा अहमद नावाच्या एका भारतीय तरूणीला अलिकडेच पाकिस्तान हा ‘मौतका कुआ’ असल्याचा स्वानुभवातून साक्षात्कार घडला आहे. मलेशिया व सिंगापूर अशा परदेशी पर्यटनाला गेलेली असताना या उजमाला एक पाकिस्तानी तरूण भेटला होता. त्यांचा तिथे जो परिचय झाला त्यातून पुढे दोस्तीही झाली. पर्यटन संपवून ही मुलगी मायदेशी परतल्यावरही त्या तरूणाच्या संपर्कात होती. पुढे त्याच्याच आमंत्रणामुळे ती पाकिस्तानात त्याला भेटायला गेली आणि तिला उपरोक्त साक्षात्कार घडला. त्याला साक्षात्कार एवढ्यासाठीच म्हणायचे, की मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेते नासिरुद्दीन शहा यांना पाकिस्तानात जातील तिथे लोक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत असल्याचा अनुभव आलेला होता. धार्मिक भेदभाव फ़क्त भारतातच चालतो आणि पाकिस्तानात कमालीचा प्रेमभाव अनुभवायला मिळतो, असे त्यांनी जाहिरपणे सांगितले होते. त्यावरून अनेक उलटसुलट प्रतिक्रीयाही आलेल्या होत्या. पुढे म्हणजे काही महिन्यांपुर्वी असाच एक साक्षात्कार कुणा कॉग्रेसी कन्नड अभिनेत्रीला झाला होता. तात्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तान हा नरक असल्याचे म्हणताच, या कन्नड अभिनेत्रीला कमालीच्या यातना झाल्या आणि तिने पाकिस्तान साक्षात स्वर्ग असल्याचे जाहिर करून टाकले होते. आता तिलाच कॉग्रेसच्या सोशल सेलचे मुखीयाही करण्यात आल्याचे कळते. याखेरीज भारतात मणिशंकर अय्यर वा तत्सम अनेकांना पाकिस्तान स्वर्ग असल्याचे भासत असते. पण लोकांना स्वर्ग असल्याचे सांगुन स्वप्ने दाखवणारे असे लोक भारत नावाच्या नरकात जगत असतात. इथे तथाकथित स्वर्गाचे गुणगान करीत असतात. त्यांच्या अशा थापांना उजमासारखी मुलगी बळी पडत असते. आज तिलाही वाटत असेल, नासिरुद्दीन, मणिशंकर असे लोक ‘स्वर्गवासी’ कशाला होत नाहीत?
आपल्या मित्राच्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन उजमा पाकिस्तानात त्याला भेटायला गेलेली होती. तर तिच्या डोक्याला बंदूक लावून जबरदस्तीने तिच्याशी या मित्राने निकाह उरकून घेतला. नंतर तिच्या वाट्याला नरकयातना आल्या. हा अर्थातच तिचा दावा आहे. एकेदिवशी ती त्या स्वर्गातून जीव मुठीत धरून पळाली आणि पुरोगामी नरक मानल्या जाणार्या भारताच्या पाकिस्तानातील दुतावासामध्ये येऊन आश्रय मागू लागली. अशा स्थितीत भारत सरकारने काय करावे? तिच्या अपेक्षांची दखल घेऊन देशातल्या प्रतिगामी सरकारने तात्काळ धावपळ सुरू केली आणि तिथल्या कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला. अधिकार्यांनी तिला दुतावासात आश्रय दिला आणि प्रसंगी कित्येक महिने तिला तिथेच सुरक्षित ठेवावे लागेल, असे गृहीत धरले. त्यातून सुषमा स्वराज या हिंदूत्ववादी मंत्र्याने पुढाकार घेऊन उजमाला मायदेशी आणण्याची घाई केली. इथे परत आल्यावर उजमाने पाकिस्तान चक्क ‘मौतका कुआ’ म्हणजे मृत्यूचा सापळा असल्याचे भाष्य माध्यमांपुढे केले. कारण अर्थात तिचा तसा अनुभव होता. मग कोणावर विश्वास ठेवायचा? नासिरुद्दीन शहा, मणिशंकर अय्यर यांच्यावर विश्वास ठेवायचा, की उजमावर विश्वास ठेवायचा? पाकिस्तानात जाता येते, पण माघारी परत येण्याची सोय नाही, तो साक्षात मृत्यूचा सापळा आहे, असे उजमाला वाटते. म्हणूनच भारतीय माध्यमांच्या समोर तिने पाकिस्तानची यथेच्छ निंदानालस्ती केली. खरे तर सुषमा स्वराज या भाजपाच्या नेत्या व मोदी सरकारच्या मंत्री असल्याने, त्यांनी उजमाच्या शब्दांचा आधार घेऊन आपला पाकद्वेष पाजळून घ्यायला हवा होता. नाहीतरी सध्या कुलभूषण जाधवच्या निमीत्ताने भारत पाक यांच्या परराष्ट्र खात्यामध्ये जुंपलेली आहे. पण सुषमा पुरोगामी नसल्यामुळे त्यांच्यापाशी हिंदूत्वाचे तारतम्य असावे. म्हणून उजमा पाकला शिव्या मोजत असतानाच स्वराज यांनी पाकचे कौतुक केले.
राजकारण आपल्या जागी, पण उजमासाठी पाक परराष्ट्र खात्याने व तिथल्या हायकोर्टाने केलेल्या सहकार्याचे चक्क आभार सुषमा स्वराज यांनी तिथल्या तिथे मानले. त्याचेही कारण होते. पाकिस्तानातील कुणा वकीलानेच हायकोर्टात भारतीय दुतावासाच्या मागणीखातर उजमाची भारतीय नागरिक म्हणून कैफ़ियत तिथे मांडलेली होती. तेवढेच नाही. पाक परराष्ट्र खात्याच्या कुणा अधिकार्यानेही पाकच्या इभ्रतीचा विषय आहे, असा दावा कोर्टात करून उजमाला सुरक्षित मायदेशी पाठवण्याचा आग्रह तिथे धरला होता. म्हणून उजमाला मायदेशी आणणे सोपे झाले होते. काम लौकर होऊ शकलेले होते. तर त्यातल्या चांगुलपणाला दाद देण्याला तारतम्य म्हणतात. सुषमा स्वराज यांनी त्याचीच प्रचिती आणून दिली. त्यांच्या बाजूला बसून उजमा नावाची मुस्लिम तरूणी पाकिस्तानला मृत्यूचा सापळा म्हणत असतानाही, त्या देशातल्या चांगल्या वृत्तीच्या लोकांची पाठराखण करण्याचे औचित्य भारतीय परराष्ट्रमंत्र्याने दाखवले. हेच औचित्य किती पुरोगामी दाखवू शकतात? मणिशंकर वा नासिरुद्दीन कधी त्या उजमाच्या वेदना यातना समजू शकले आहेत काय? त्यांना त्याची गरजही वाटलेली नाही. जे काही त्यांना बघायचे असते तेच ते कायम बघत असतात व त्याच भ्रमात मशगुल असतात. उजमाचा अनुभव वेगळा अशासाठी आहे, की तिला कोणा पाकिस्तानी प्रचारक संस्थेने आमंत्रित केलेले नव्हते वा गुप्तचर खात्याने मेजवानी झोडायला बोलावलेले नव्हते. ती पाकिस्तानातही मित्र असू शकतात व तेही सभ्यतेने वागणारे असू शकतात, या भ्रनात तिथपर्यंत गेलेली होती. याचेही काही कारण आहे, इथे भारतात जो अनुभव येतो त्यानुसारच पाकिस्तानची स्थिती असण्याचे मुर्ख गृ्हीत त्याला कारणीभूत आहे. ते गृहीत चुकीचे असल्याचे उजमाला प्रत्यक्ष नरकयातना सोसून समजावे लागले. मग तथाकथित पाकप्रेमी लोकांना कसे कळू शकेल?
त्यांनी एक काम करावे. आपल्या कुणा मुली बहिणीला पाक मित्र शोधायला सांगावा आणि त्याच्या आमंत्रणावरून पाकिस्तानला सामान्य भारतीय म्हणून भेट देण्यास पाठवून द्यावे. तिथे ज्या अनुभवातून त्यांची आप्तस्वकीय मुलगी जाईल, त्यावरून आपल्या व्याख्या तपासून घ्याव्यात. पण तसे कोणी करणार नाही. कारण आपण ढळढळीत खोटे बोलत असतो, याची त्यांनाही पक्की खात्री आहे. म्हणून असे लोक दिखावू बोलत असतात. वागण्यात मात्र त्यांच्या कमाली़ची भिन्नता आढळून येते. त्यांच्या भूमिका कधीच वास्तवाशी निगडीत नसतात, किंवा अनुभवातून आलेल्या नसतात. वाचलेली पुस्तके वा आत्मसात केलेले विचार, यांच्या आहारी जाऊन त्यांच्या भूमिका पक्क्या झालेल्या असतात. जेव्हा त्यांच्या वाट्याला उजमा सारखे अनुभव येतात, तेव्हाच त्यांना शहाणपण सुचू शकते. अशा लोकांचे तत्वज्ञान वा शहाणपण हे पुराणातील वांगी असतात. त्यांना अनुभवाशी कर्तव्य नसते किंवा लोकांची दिशाभूल होण्याशी काही देणेघेणे नसते. जेव्हा तसेच अनुभव त्यांच्या वाट्याला येतात, तेव्हा त्यांना अक्कल येत असते. अशा शहाण्यांचे सोडून द्या. पाकिस्तानला भेट देण्यापुर्वी कोणी उजमाला पाकिस्तान विरोधात चार शब्द ऐकवले असते, तर तिने तरी कुठे त्यावर विश्वास ठेवला असता? म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. उजमाला त्यामुळे़च खरा स्वर्ग बघता आला आहे आणि भारतासारखा जगात अन्य कुठला सुरक्षित देश नसल्याचे तिने जगजाहिर सांगितले आहे. पण तिच्याइतकीही हिंमत नासिरुद्दीन वा मणिशंकर अय्यर कधी दाखवणार नाहीत. सामान्य भारतीय नागरिक म्हणून ते पाकिस्तानला गेले असते, तर त्यांना खरा स्वर्ग दिसला असता. मग नरकाचे महात्म्य उमजले असते. पण पोपटपंची करणार्यांना कोण शहाणपण शिकवणार? त्यांची उजमा होवो इतकीच अपेक्षा आपण बाळगू शकतो.
'पण सुषमा पुरोगामी नसल्यमुळे,त्यांच्यापाशी हिंदुत्वाचे तारतम्य असल्यामुळे'या वाक्यातील तारतम्य शब्द काढून टाकावा व केवळ 'त्या हिंदुत्ववादी असल्यामुळे'अशी रचना करावी. त्यामुळे पुरोगामित्वातील विसंगती स्पष्ट होते़
ReplyDeleteप्रिय भाऊसाहेब , पहिल्यांदाच आपला लेख अपुऱ्या माहितीवर आधारित आहे असे म्हणावे लागते आहे,आणि त्याचा खेद वाटत आहे.
ReplyDeleteभाऊ - ह्या उझमाची पाच लग्ने आधी झाली होती , सहावा हा पाकिस्तानी . तो मलेशियात भेटला होता, लग्नच करायचे होते तर ते मलेशियात न करता, ती पाकिस्तानात का गेली होती ? लग्नाचा व्हिडियो बघा , कुठेही तणावात दिसते का ? म्हणे बंदुकीच्या धाकाने लग्न केले , डॉक्टर बाई - पाकिस्तानी TAXI driver च्या प्रेमात पडून सहावे लग्न करायला मलेशियात जाते, तेही स्वत:च्या थाल्सेमिया ग्रस्त मुलीला सोडून ??
खाली काही लिंक्स देत आहे संदर्भासाठी
https://99wiki.com/uzma-ahmed-isi-agent/
https://ipious.blogspot.in/2017/05/is-uzma-ahmad-isi-agent.html