Friday, May 26, 2017

नाकेबंदीची तयारी

Image result for amit shah in maharashtra

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा येत्या महिन्यात दोनतीन दिवसाच्या महाराष्ट्र दौर्‍यावर येत आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपल्या संघटना व लोकप्रतिनिधींना आधीच कामे नेमून दिलेली आहेत. अमित शहांची राज्याला भेट देण्यामागची योजना, अर्थातच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजलेली आहे. मागल्या विधानसभेत शिवसेनेशी असलेली युती मोडून शहांनी आपणच राज्यातील मोठा पक्ष असल्याची चुणूक दाखवली होती. त्यासाठी त्यांनी शिवसेनेला दुखावलेले होते. मात्र तसा धोका त्यांनी अत्यंत सावधगिरीने पत्करला होता. युती तोडण्याच्या बदल्यात त्यांनी कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही मोडण्याचा सौदा आधीच उरकलेला होता. सहाजिकच भाजपाला सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळू शकला. पण यापुढे तोच सौदा कायम असू शकेल, अशी स्थिती राहिलेली नाही. दुसरीकडे शिवसेना यापुढे युतीमध्ये येण्याची कुठलीही खात्री उरलेली नाही. अशा स्थितीत स्वबळावर महाराष्ट्रात लढण्याची जमवाजमव शहांनी आतापासून सुरू केलेली आहे. त्यामागची त्यांची रणनिती तशी नवी नाही. त्यांनी भाजपाचे अखिल भारतीय स्वरूपच शिवसेनेच्या रणनितीवर उभारलेले आहे. आरंभापासून शिवसेनेत कधी जागा वा तिकीटावरून वाद व्हायचे नाहीत. कारण सेनेत तिकीट वा उमेदवारी हा वादाचा विषय नव्हता. सहाजिकच बंडखोरीचा मुद्दा नव्हता. जो कोणी उमेदवार पक्षाकडून येईल, त्याला निवडून देण्याला शिवसैनिक बांधील असायचे. म्हणून तर भुजबळांसारखा खंदा नेताही पक्षांतरानंतर आपल्या बालेकिल्ल्यातही पराभूत झाला होता. आजची शिवसेना तशी राहिलेली नाही. पण शहा यांनी भाजपाचे अखील भारतीय संघटन, शिवसेनेच्या शाखाप्रणालीत गुंफ़ले आहे. त्यात कुणाही नेत्याला आपला बालेकिल्ला म्हणायची सोय शिल्लक ठेवलेली नाही. उलट शिवसेना मात्र अन्य पक्षाप्रमाणे नेत्यांच्या मुठीत गेली आहे.

उत्तरप्रदेश आणि नंतर दिल्लीच्या तीन महापालिकांच्या निवडणूका, या नव्या शहा प्रणालीचा नमूना आहे. उत्तरप्रदेशात त्यांनी अनेक जुन्याजाणत्या नेत्यांना खड्यासारखे बाजूला करूनही प्रचंड बहूमत मिळवले आणि दिल्लीत तर सगळ्याच जुन्या नगरसेवकांना घरी बसवूनही अपुर्व यश मिळवले. ही कुठली रणनिती आहे, त्याचा उहापोह कोणी आजवर केलेला नाही. पक्षाची गल्लीबोळातील व गावखेड्यातील संघटना व पक्षाचे स्थानिक नेते व लोकप्रतिनिधीपासून विभक्त करण्याची नवीच रणनिती शहा यांनी यशस्वी करून दाखवली आहे. त्यांनी संपुर्ण भाजपाला जिल्हा, तालुका वा मतदारसंघ असे विभागलेले नाही. ती जुनी संघटना आपल्या जागी कायम आहे. परंतु त्यालाही समांतर अशी एक बुथ संघटकांची पर्यायी संघटना शहांनी विकसित केली आहे. ही नवी संघटना पक्षासाठी कुठल्याही निवडणूकीत यश मिळवून देणारी यंत्रणा झाली आहे. तिचा बाकीच्या पक्षकार्याशी कसलाही संबंध राखलेला नाही. नेमके असेच काम आरंभापासून शिवसेनेने उभे केलेले होते. नेते वा लोकप्रतिनिधी यापेक्षाही प्रत्येक भागात शिवसेनेची शाखा अधिक प्रभावशाली होती. तिची नाळ थेट शिवसेनाप्रमुखाशी जोडलेली असायची. सहाजिकच मातोश्रीवरून म्हणजे बाळासाहेबांकडून येणारा आदेश, मतदारापर्यंत थेट पोहोचू शकत होता. या शाखांची मतदार घराबाहेर काढून मतदान करून घेण्याची क्षमता, हे शिवसेनेचे आरंभापासूनच बलस्थान राहिले होते. पण अलिकडल्या काळात शिवसेनेच्या शाखा मरगळल्या आणि सेनाभवन वा मातोश्रीत बसलेल्यांना प्राधान्य मिळत गेले. म्हणजेच शिवसेनेतली शिवसेना संपताना अमित शहांनी तोच फ़ॉर्म अखिल भारतीय पातळीवर भाजपामध्ये प्रस्थापित केला आहे. त्याचा मोठा लाभ गेल्या दोन वर्षात भाजपाला कुठल्याही निवडणूकीत किंवा राज्यात मिळताना दिसला आहे. मुंबई असो की दिल्ली पालिका असो, शहांनी तीच जादू चालवून दाखवली आहे.

आताही अमित शहा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असताना, त्यांनी राज्यातील ९० हजार मतदानकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला प्राधान्य दिलेले आहे. ही मतदान केंद्रप्रमुखांची संघटना आतापासून भक्कम करण्याला प्राधान्य म्हणजेच आगामी निवडणूकांची तयारी आहे. एका मतदान केंद्रात हजार ते दोन हजार मतदार असतात. त्यापैकी प्रत्येक मतदाराला सातत्याने भेटणे वा किमान मतदानाच्या आधी दोनतीन महिने त्याच्याशी कायम संपर्कात रहाणे, ही शहांची रणनिती आहे. दहाबारा कार्यकर्त्यांचा गट केंद्रप्रमुखाच्या नेतृत्वाखाली तितकेच काम करत असतो. आपल्या विभागात वा मतदारसंघात कोणाला पक्ष उमेदवारी देणार, याच्याशी त्या गटाला कर्तव्य नसते. सहाजिकच मतदानाचा दिवस कधीही येवो आणि उमेदवार कोणीही असो, आपल्या संपर्कातील अधिकाधिक लोकांनी मतदान करणे व त्यांचे मत आपल्याच पक्षाला मिळणे, यासाठी ह्या गटाने राबायचे असते. कुठल्याही पदाची वा तिकीटाची अपेक्षा नसलेल्या कार्यकर्त्यांची तिथे वर्णी लागत असते. सहाजिकच त्यात मतभेद किंवा सत्तास्पर्धेचा विषयच येत नाही. पण दुसरीकडे तिकीटासाठी वा पदासाठी भांडणार्‍या नेते वा लोकाप्रतिनिधींना, अशा केंद्रप्रमुख गटांचा धाक रहातो. त्यांच्याखेरीज जिंकणे अशक्य असल्याने, बंड वा पक्षाला रामराम ठोकण्याचे प्रकार कमी होऊन जातात. दिल्लीत सर्वच माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारून शहांनी तो प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. मुंबईत म्हणूनच बारा टक्के मतदान वाढवून शिवसेनेला तिच्या बालेकिल्ल्यात शह देण्याचा डाव भाजपाला यशस्वी करता आला. आताही त्याचीच तयारी करण्यासाठी शहा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो, की महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्याचाही तो संकेत असू शकतो. त्या निवडणूका विधानसभेच्या असतील की लोकसभेच्या असतील?

येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यातील सत्तांतरालाही तीन वर्षे पुर्ण होत आहेत आणि हे सरकार चालवण्यासाठी भाजपाला शिवसेनेची मदत घ्यावी लागलेली आहे. तरीही शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊन सातत्याने भाजपा व पंतप्रधानांना लक्ष्य बनवलेले आहे. सहाजिकच बहूमतासाठी शिवसेनेची कटकट कितीकाळ सोसायची अशी समस्या सेनेनेच भाजपासमोर उभी करून ठेवलेली आहे. ती कटकट संपवण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे अन्य पक्षातले काही आमदार फ़ोडून बहूमताचे समिकरण निकालात काढणे. पण त्यासाठी पक्षांतर कायद्याच्या कटकटीतून जावे लागेल. दुसरा मार्ग आहे मध्यावधी निवडणूका घेऊन स्वबळावर बहूमत संपादन करणे. त्यामध्ये दोन्ही कॉग्रेस एकत्र आल्यास कमी यशाची धाकधुक आहे. अकस्मात दोन्ही कॉग्रेसनी एकत्र येण्याचा पवित्रा घेतला, तर भाजपाला स्वबळावर बहूमताचा पल्ला ओलांडता येईल काय? त्याची आज कोणी हमी देऊ शकत नाही. पण मध्यावधी निवडणुका आल्यास अन्य पक्षातले अनेक आमदार भाजपात उमेदवारीसाठी येऊ शकतात. तसे झाल्यास भाजपाला बहूमताचा पल्ला गाठण्याची खात्री बाळगता येईल. एका बाजूला आपापल्या भागातले यशस्वी उमेदवार आणि जोडीला अमित शहांनी उभारलेली नवी मतदान केंद्रप्रमुखांची फ़ौज, अशा दोन पायावर भाजपा मध्यावधीचा पल्ला बहूमताने गाठण्याची खात्री बाळगता येते. किंबहूना त्याचीच चाचपणी करण्यासाठी शहा इथे महाराष्ट्रात येत आहेत. तितका आत्मविश्वास त्यांना वाटला तर दिवाळीच्या नंतर म्हणजे गुजरातसोबत महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका होतील. तीच तयारी व चाचपणी हा शहांचा हेतू आहे. मात्र त्याविषयी शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेस पक्ष पुरते गाफ़ील दिसतात. या खेपेस भाजपाकडे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फ़डणावीसांचा चेहराही आहे. थोडक्यात तोंडपाटिलकी करण्यात रमलेल्या शिवसेनेच्या नाकेबंदीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

2 comments:

  1. Apratim vishleshan bhau...

    ReplyDelete
  2. खुपच हसलो भाऊ . फारच मजेशीर .

    ReplyDelete