Wednesday, May 31, 2017

नागरी वस्त्रातले संपादूक

 major gogoi के लिए चित्र परिणाम

The battlefield is a scene of constant chaos. The winner will be the one who controls that chaos, both his own and the enemies. - Napoleon Bonaparte

निर्बुद्ध लोकांना आपण शहाणे असल्याचे दाखवण्याची भारी हौस असते. अडाणी माणसे अनुभवातून शिकत असतात. तर शहाणे म्हणून मिरवणार्‍यांना इतर कोणाच्या तरी पंगतीतले उष्टे खरकटे उचलून पक्वान्नाचे नाटक करावे लागत असते. त्या शिळ्यापाक्यातली श्रीमंती खर्‍याखुर्‍या कुबेरालाही लाजवू शकते. आजकाल अशा कुबेरांची रेलचेल झालेली आहे. तसे नसते तर त्यांनी कधी आईनस्टाईन वा अन्य कुणा विचारवंतांचे दाखले देत आपल्या पोरकाटपणाचे धिंगाणे कशाला घातले असते? भारतीय लष्करप्रमुखाला वावदूक संबोधण्याइतकी अक्कल पाजळायची, तर निदान लष्कर आणि मुत्सद्देगिरी यातला फ़रक तरी समजून घ्यायची बुद्धी असायला हवी ना? पण हाती लेखणी आली व प्रसिद्धीची सुविधा फ़ुकटात मिळाली, मग कुणाला भान रहायचे? लोकसत्ता दैनिकाच्या संपादकीयात मंगळवारी तीच वावदुकगिरी करण्यात आली आहे. सुरूवातच मोठी मजेशीर आहे. ‘चुरचुरीत वक्तव्यासाठी फक्त शहाणपणा आवश्यक असतो. परंतु योग्य वेळी मौन पाळण्यासाठी शहाणपण, विवेक आणि मुत्सद्देगिरीची गरज असते, असे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे मत होते.’ असे काही आपल्या वाचकांना सांगण्यापुर्वी निदान गंभीरपणे त्याचे अध्ययन करावे आणि आईनस्टाईन काय म्हणतो, त्याचे आकलन तरी करून घ्यायला नको काय? पण आईनस्टाईन गेला चुलीत! त्याच्या विचार वा सांगण्याला काय किंमत? यांना आपले मुद्दे पुढे रेटण्यासाठी अशी प्रतिष्ठीत माणसे किंवा त्यांचे बोल हवे असतात. त्यातला आशय वगैरशी त्यांना काडीमात्र कर्तव्य नसते. म्हणून त्यांनी इथे आईनस्टाईन कथन केला. पण त्या थोर शास्त्रज्ञाने अशा संपादकांविषयी काय म्हणून ठेवले आहे? ‘एकवेळ विश्वाच्या पसार्‍याला कुठेतरी सीमा असेल, पण मुर्खपणाला सीमा असण्याची कोणी खात्री देऊ शकत नाही.’ लोकसत्ताचे संपादूक इतके बुद्धीमान असतील, हे आईनस्टाईनला कसे उमजले असेल?

या एका वाक्याचेच पोस्टमार्टेम लोकसत्तेच्य निर्बुद्धतेला सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. लष्करप्रमुख हा कोणी चुरचुरीत विधाने वक्तव्ये करणारा संपादक, वक्ता प्रवक्ता नसतो. तो कृतीवीर असतो. शब्दांचे बुडबुडे उडवण्य़ाचा त्याचा धंदा नसतो, की व्यवसाय नसतो. म्हणूनच त्याला चुरचुरीत वक्तव्ये करण्याची गरज नसते किंवा त्याचे ते कामही नसते. काही बेअक्कल लोकांना कृतीही उमजत नाही, तेव्हा लष्करप्रमुखाला शस्त्र बाजूला ठेवून शब्दांच्या कुबड्या घ्याव्या लागत असतात. ती त्याची गरज नसते तर निर्बुद्ध शब्दवीरांची गरज असते. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी कुठे वसंत व्याख्यानमालेत भाषण ठोकलेले नाही, किंवा सेमिनारमध्ये आपले पांडित्य सांगायला हजेरी लावलेली नाही. वृत्तसंस्थेचा कुणी वार्ताहर त्यांची मुलाखत घ्यायला गेला असताना, त्यांनी केलेली ती विधाने आहेत. तिथे कुठल्या मुत्सद्देगिरी वा शहाणपणाचा विषय येत नाही. आपल्या एका जवान अधिकार्‍याने काय केले व कशा परिस्थितीत केले, त्याविषयी खुलासा देण्याचा प्रयास रावत यांनी केलेला आहे. त्यात त्यांनी काश्मिरात युद्धजन्य परिस्थिती असल्याचा निर्वाळा देतानाच समोरचा शत्रू हा सामान्य नागरी वेशातून अकस्मात सामोरा येत असल्याने युद्धासारखे लढता येत नाही, ही व्यथा सांगितली आहे. पण त्या कृतीवीराचे शब्दही शब्दवीरांना समजून घेता आलेले नाहीत. सहाजिकच गाढवापुढे गायली गीता, तशी स्थिती लोकसत्ता संपादकांची झाल्यास नवल नाही. रावत असो किंवा आणखी कोणीही असो, त्याने काहीही बोलावे किंवा करावे. हे संपादक आपल्याला हवे तेच ऐकणा्र किंवा हवे तेच बघणार असतील, तर त्यांना सूर्य दाखवून उपयोग काय? राज्यशास्त्र वा आणखी कुठले शास्त्र त्यांना ठाऊक तरी असायला हवे ना? मुत्सद्देगिरी कशाशी खातात वा लष्कराचा वापर केव्हा सुरू होतो, इतके तरी ठाऊक आहे काय?

जिथे मुत्सद्देगिरीच्या मर्यादा संपतात, तिथून लष्कराचा वापर सुरू होतो. जगात प्रत्येक देशात मोठमोठ्या फ़ौजा तैनात आहेत आणि त्यांच्यावर खर्चही केला जात असतो. त्या फ़ौजा कोणी मुत्सद्देगिरी करायला धाडत असते काय? राजीव गांधी यांनी १९८० च्या उत्तरार्धात श्रीलंकेमध्ये शांतीसेना म्हणून भारतीय तुकड्या पाठवल्या होत्या. त्यांनी तिथे जाऊन कुठली मुत्सद्देगिरी केली होती? सहा महिन्यापुर्वी भारतीय सैनिकी पथकाने पाक प्रदेशात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. त्याला मुत्सद्देगिरी म्हणतात काय? काश्मिरमध्ये आज लाखोच्या संख्येने सेना तैनात केलेली आहे, ती मुत्सद्देगिरी अपेशी ठरल्यामुळे, इतके तरी लोकसत्ताकारांना माहिती आहे काय? की भारतात अन्यत्र काही काम नसल्याने या सेनेला काश्मिरात घिरट्या घालायला पाठवले आहे, अशी या निर्बुद्धांची समजूत आहे? विवेक आणि मुत्सद्देगिरी यांचा लष्कराशी संबंध काय? या आठवड्याच्या आरंभी श्रीलंकेत मान्सुनच्या आरंभालाच मोठे चक्रीवादळ आले आणि प्रचंड प्रदेशात महापूर व नासधुस झाली. तिथे विनाविलंब भारतीय नौदलाच्या सैनिकांना धाडण्यात आले. हे सैनिक व त्यांचे अधिकारी तिथे कोणती मुत्सद्देगिरी करायला गेलेले होते? मुत्सद्देगिरीचा लष्कराशी काहीही संबंध नसतो, तर मुत्सद्देगिरीने जे विषय निकालात निघत नाहीत, त्याचा निचरा कठोर होऊन करायची वेळ आल्यावरच लष्कराला तो विषय सोपवावा लागतो. मग अशा सैन्याचा प्रमुख असेल त्याला मुत्सद्देगिरी संभाळायची नसते, तर आक्रमक होऊन विषय निकालात काढण्याचे पाऊल उचलावे लागत असते. त्याला चुरचुरीत वक्तव्ये करायची नसतात, तर नेमक्या समजणार्‍या भाषेत व्यवहार करायचे असतात. ती कुठलीही प्रचलीत भाषा नसते, तर प्रसंगोपात त्या भाषेचा उदभव होत असतो. मुत्सद्देगिरीची भाषा समजत नाही त्यांच्यासाठी अशी नवी भाषा शोधावी वा जन्माला घालावी लागत असते.

सैनिक वा सेनापती हा मुत्सद्दी नसतो, तर अराजकाला लगाम लावू शकणारा कृतीवीर असतो. जगातला नामवंत सेनापती म्हणून ओळखला जाणाता नेपोलियन त्याची नेमकी व्याख्या सांगतो. ‘युद्धभूमी हे साक्षात अराजक असते. तिथे जो कोणी आपल्या व शत्रूच्या परिसरातील अराजकाला लगाम लावू शकतो, तोच विजयाचा धनी असतो.’ पण असले काही लोकसत्ता संपादकांनी वाचलेले नसते. किंवा वाचलेच असेल तर योग्यजागी वापरायची बुद्धी बेपत्ता असते. काश्मिर आज युद्धभूमी झालेली आहे आणि तिथे सर्व पातळीवरचे अराजक माजलेले आहे. तसे नसते तर तिथे मुळातच सेनेला तैनात करण्याची गरज भासली नसती. अशा अराजकाला कोण रोखू शकतो, याला महत्व आहे. तिथे मुत्सद्देगिरी कामाची नसली तरी कल्पकता निर्णायक महत्वाची आहे. मेजर लिथूल गोगोई नावाच्या अधिकार्‍याने ती जबाबदारी पार पाडताना लष्करी खाक्या वापरला. पण दाखवली ती खरी मुरत्सद्देगिरी होती. त्या अराजकाच्या स्थितीत त्याने गोळीबार केला नाही. पण अशी कृती केली, की त्यात त्याच्याही जवानांना बंदुक चालवावी लागली नाही आणि दगडफ़ेक्यांनाही परस्पर लगाम लावला गेला होता. याला लष्करी डावपेच नव्हेतर मुत्सद्देगिरीच म्हणतात. पण शहाणपण वा मुत्सद्देगिरी यांचाच दुष्काळ अनुभवणार्‍यांना यातले काही उमजले तरची गोष्ट ना? सहाजिक़च या संपादकांना जनरल रावत यांच्यात वावदुकगिरी आढळली. आपली नसलेली अक्कल पाजळल्याशिवाय त्यांना शांत बसवले नाही. नेमक्या अशा वागण्यालाच वावदुकगिरी म्हणतात. काश्मिरच्या जोडीला देशातील बौद्धिक प्रांतात आजकाल इतके अराजक माजले आहे, की जिथे बघावे तिथे वावदुक सोकावले आहेत. तसे नसते तर इतक्यात काश्मिरचा विषय निकालात निघाला असता. श्रीलंकेत अशा वावदुकांनाच बंदिस्त वा प्रतिबंध केल्याने तिथल्या दहशतवादी वाघांचा कायमचा बंदोबस्त होऊ शकला.

4 comments:

 1. काल लेख वाचत असताना माझ्या अंगाचा अक्षरशः तिळपापड होत होता.
  त्यावेळी जर लेखक समोर असला असता तर त्याचे वाभाडेच काढले असते.
  भाऊंनी ती इच्छा पूर्ण केली.
  धन्यवाद.

  ReplyDelete
 2. अशा वावदूक संपादूका मोजून माराव्या त्याचाच पादुका

  ReplyDelete
 3. अतिशय उत्तम भाऊ ! याला ठोकले हे फार उत्तम केले. असेच वेळोवेळी लिखाण करा व या तथाकथित पुरोगाम्यांना त्यांची जागा दाखवून द्या.

  ReplyDelete
 4. नेमके हाणलात .

  ReplyDelete