भारतातले अनेक पाकप्रेमी सतत पाकिस्तानशी संवाद करण्याचा आग्रह धरत असतात. पण भारत सरकारने हिंसा व संवाद एकाचवेळी होऊ शकत नसल्याचे सांगून, नेहमी पाकिस्तानशी बोलणी फ़ेटाळून लावलेली आहेत. पण अशा रितीने दोन देशातले संबंध कसे प्रस्थापित व्हायचे? दोन देशातले संबंध कसे पुढे सरकणार? त्यावर आता मोदी सरकारने योग्य उपाय शोधला आहे. आधी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्याशी संवाद करून बघितला होता. पण सत्ता शरीफ़ यांच्यापाशी नसल्याने कुठलाही उपयोग होत नव्हता. राजनैतिक संवादातून काहीही निष्पन्न होत नव्हते. सहाजिकच पाकिस्तानशी संवाद करायचा तर त्यांना समजणार्या भाषेत आणि पाकिस्तानचे योग्य प्रतिनिधीत्व करू शकणार्याशीच बोलणे आवश्यक होते. तोच मार्ग आता मोदी सरकारने अवलंबिला आहे. सोमवारी मंगळवारी त्याचा पुरावाच समोर आला आहे. काश्मिरमध्ये दगडफ़ेक करणार्यांना अतिशय चतुराईने निष्प्रभ करणार्या मेजर नितीन गोगोई नावाच्या सेनाधिकार्याला लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी सन्मानपत्र देऊन गौरवान्वित केले आणि मंगळवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक ठाण्यांना उध्वस्त करणार्या धडक कारवाईची चित्रफ़ीतच सादर केली. त्यामुळे आता दोन देशातील संबंधात प्रगती होऊ शकेल, अशी आशा बाळगायला हरकत नसावी. पाकिस्तानला शस्त्राची भाषा कळते आणि पाकिस्तानचे नेतृत्व पाकसेना करीत असेल, तर यापेक्षा उत्तम संवाद कुठला असू शकतो? एक जागी पाकच्या काश्मिरातील हस्तकांना त्यांची जागा दाखवून दिली गेली आणि दुसरीकडे पाकसेनेला त्यांचीच ठाणी उध्वस्त करून भारतालाही युद्ध भाषेत बोलता येते असे दाखवण्यात आलेले आहे. ह्या सर्व गोष्टी आकस्मिक घडत नसतात. बुद्धीबळाच्या खेळात कोणी राजाला मारत नसतो, तर त्याची चहुकडून कोंडी करून त्याच्या बोलवित्या धन्याला शरण आणला जात असतो.
मुत्सद्देगिरी बुद्धीबळाच्या डावासारखी चालते. त्यात प्यादी व मोहरे खुप मारले वा फ़िरवले जातात. पण राजाला कोणी मारत नाही. तसेच भारत पाक संबंधाचे झाले आहे. त्यात दोन्हीकडले अनेक मोहरे व प्यादी सतत मारली जात असतात. पण राजाला कधी धक्का बसत नाही. प्रामुख्याने भारताला तर अनेक प्यादी व मोहरे गमवावे लागले आहेत. पण आता खेळाचे नियम बदलले आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानला मोहरे व प्यादी मारू देण्यापेक्षा, पलिकडली प्यादी मोहरे मारण्याची निती सुरू झाली आहे. त्याचे सर्व तपशील समोर येतातच असे नाही. मंगळवारी जे चित्रण भारतीय सेनेने माध्यमांच्या हवाली केले, ती घटना पंधरा दिवस जुनी आहे. तो हल्ला ९ मे २०१७ रोजीचा आहे. त्यात एक संपुर्ण पाकिस्तानी ठाणे, क्षेपणास्त्रे सोडून उध्वस्त करण्यात आलेले आहे. पण पाकने तेव्हाही त्याविषयी तक्रार केली नाही किंवा आजही असे काही झाल्याची कबुली दिलेली नाही. आपली सेना हरते वा मार खाते, असे पाकिस्तान आपल्या नागरिकांना सांगू शकत नाही. ती त्यांची अगतिकता आहे. पाक नागरिकांना प्रत्येक युद्धातल्या दारूण पराभवाचाही तपशील ठाऊक नाही. भारताला पाकसेनेने पराभूत केल्याचाच खोटा इतिहास तिथल्या अनेक पिढ्यांना शिकवला गेला आहे. सहाजिकच त्यातून जी मानसिकता तयार झाली आहे, तिला भारताकडून पराभूत झाल्याचे ऐकायला जमणार नाही. मग तसा हल्ला एका ठाण्यावर झालेला असो किंवा युद्धात झालेला असो. म्हणूनच अशा ठाणे उध्वस्त होण्याचा किंवा सर्जिकल स्ट्राईकचा पाकने इन्कार करण्यात नवे काहीच नाही. तशी पाक जनते़ची दिशाभूल करीत रहाणे, तिथल्या राजकीय नेत्यांना वा लष्करी नेत्यांना अपरिहार्य आहे. त्याचाच लाभ उठवित भारताने सातत्याने पाकसीमेवर हल्ले करीत त्यांची ठाणी उध्वस्त करणे, ही योग्य रणनिती होत नाही काय?
मंगळवारी ह्या चित्रणाचे प्रक्षेपण झाल्यानंतर अनेक निवृत्त सेनाधिकारी एक गोष्ट साफ़ सांगत होते. यापुर्वी कधीच राजकीय नेते सेनेच्या मागे असे ठामपणे उभे राहिले नव्हते. आजच्या सरकारने भारतीय सेनेला आपल्या रितीने सीमासुरक्षा करण्याची मोकळीक दिली आहे. म्हणूनच यश सरकार व सेनेचे समसमान आहे. इतकी स्पष्ट भाषा एकाच गोष्टीची ग्वाही देते, की आजवरची परराष्ट्रनिती वा पाकसंबंध यात फ़रक होता. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून चित्र बदलले आहे. लष्कराला खुप मुभा मिळाली आहे आणि सीमेवर जी स्थिती निर्माण होईल, त्यानुसार प्रत्युत्तर देण्याचे आधिकार आज भारतीय सेनेला मिळाले आहेत. सहाजिकच त्याचेही परिणाम समोर आलेले आहेत. पण सोमवार मंगळवारच्या या दोन बातम्या आणखी एक संकेत स्वच्छपणे देत आहेत. तो संकेत भारतातील पाकिस्तानी दलालांना व हस्तकांना दिला जातो आहे. यापुर्वी ज्या पद्धतीने भारत सरकार व लष्कराच्या कामात ढवळाढवळ झाली, ती यापुढे जुमानली जाणार नाही. मानवाधिकार वा शांतता व सभ्यता असल्या थोतांडाला भारतीय सेना दाद देणार नाही, असा तो संकेत आहे. एका दगडफ़ेक्या काश्मिरी उचापतखोराला लष्करी जीपाच्या समोर बांधून दगडफ़ेक्यांना शह देणार्या मेजर गोगोईला भारतीय लष्करप्रमुखांनी सन्मानित करण्याला फ़ार मोठा अर्थ आहे. आपापल्या भागात व अधिकारात समस्येला सामोरे जाताना योग्य निर्णय घेण्याचे अधिकार, त्या एका कृतीने कनिष्ठ व दुय्यम सेनाधिकार्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. यापुढे सरकार व सेना नेतृत्व कुणा मानवाधिकार नाटक्यांचे काही दडपण जुमानणार नसल्याचा तो संकेत आहे. आम्ही आमच्या जीवाची बाजी लावत असताना कोणी पोरकट माणूसकीच्या शपथा घालू लागला, तर त्याला यापुढे काडीची किंमत असणार नाही, असा तो संकेत आहे. थोडक्यात हुर्रीयत व पाकिस्तान अशा दोघांशीही एकाचवेळी संवाद सुरू झाला आहे.
नईम खान या हुर्रीयत नेत्यानेही त्याची कबुली दिली आहे. एका बाजूला भारतीय सेनेने पाकला चोख उत्तर दिले असताना, मणिशंकर अय्यर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांनी काश्मिरला जाऊन शांततेची बोलणी करण्याचे नाटक रंगवले, त्यांना या नईम खानने चपराक हाणली आहे. या शांतता व संवाद समारंभात हजर असलेल्या पुरोगामी नेत्यांना नईम म्हणाला, ‘आलात तिथे चालते व्हा. काश्मिरींना तुमची गरज नाही. तुमचे नाटक पुरे झाले’. असे नईम का म्हणाला असेल? भारत सरकार आता अशा पाकप्रेमी शांततावादी लोकांना जुमानत नाही. त्यांच्या राजकीय दडपणाला भारतीय सेना जुमानत नसेल, तर अशा पाकप्रेमींचा जिहादींना उपयोग तरी काय राहिला? नईम खान चालते व्हा म्हणतो, याचा अर्थच आता या पुरोगामी लोकांना काश्मिरी व पाकिस्तानी बाजारात किंमत उरलेली नाही. धोबीका कुत्ता, न घरका न घाटका, तशी पुरोगाम्यांची अवस्था झालेली आहे. कारण आता भारत-पाक यांच्यात खरोखरचा संवाद सुरू झाला आहे. त्या संवादात वापरली जाणारी भाषाच ज्यांना उमजत नाही, त्यांना त्या बाजारात कोण किंमत देणार? थोडक्यात आता थेट संवाद सुरू झाला असून, एकामागून एक पाकप्रेमी व पाक हस्तक दिवाळखोर ठरू लागले आहेत. त्यांना लौकर शहाणपण आले नाही, तर पुढल्या पिढीतला मेजर गोगोई त्यांनाच जीपला बांधून दगडफ़ेक्यांना खेळायची संधी देऊ शकेल. काश्मिरात आपल्या जीवाची बाजी लावणार्या सैनिकांच्या वेदना यातना ज्यांना उमजत नाहीत, त्यांना वेदनेची भाषा समजावण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग कुठला असू शकतो? परेश रावल या अभिनेता संसद सदस्याने अरुंधती रॉय या पाकप्रेमी लेखिकेला तशीच जीपवर बांधून फ़िरवण्याची केलेली सुचना म्हणूनच गंमत नाही, ती उद्या उदभवणार्या स्थितीचे भाकित आहे. कारण काळ बदलला आणि भाषाही बदलते आहे.
काही लोकांचा काश्मीर business बंद होणार असे वाटते
ReplyDeleteपाक प्रेमी जनतेत बंगाली लोकांचाच भरणा कसा ? जसे बरखा दत्त सागरिका घोष अंरुधती राय अमर्त्य सेन , हा डाव्या चळवळीचा तर परिणाम नसावा ? याच भुमीत विवेकानंद , रामकृष्ण परमहंस, शामाप्रसाद मुखर्जी जन्मले हे आजच्या बंगाल कडे पाहुन पटत नाहि .
ReplyDeleteराजवटींचा परिणाम असावा. सुभाषबाबू मुस्लिम धार्जिणेच होते
Delete