Sunday, May 14, 2017

‘सच्चाई’चा ‘सामना’ करा

uddhav raut के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशच्या निवडणुका चालू असताना भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात शेतकर्‍यांना कर्जमाफ़ीचे आश्वासन दिलेले होते. तेव्हा त्याचा आधार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातही शेतकर्‍यांना कर्जमाफ़ी मिळावी, असा आग्रह धरला होता. उत्तरप्रदेशात सत्ता मिळाल्यावर जे करणार ते महाराष्ट्रात सत्ता हाती असताना करून टाकावे, असा त्यांचा दावा होता. त्याहीपुढे जाऊन त्यांनी भाजपाला कायमचा पाठींबा देण्यासाठी तीच अट घातली होती. शेतकरी कर्ज माफ़ केल्यास भाजपाला कायमचा विनाअट पाठींबा देऊ असेही घोषित केले होते. दुसरीकडे कॉग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी यात्रा काढल्या आणि कर्जमाफ़ीची मागणी केली होती. त्यानंतर जेव्हा अशा बाबतीत सरकारला कोंडीत पकडण्याची वेळ अर्थसंकल्पी अधिवेशना आली, तेव्हा शिवसेना कर्जमाफ़ी पुर्ण विसरून गेली. विधानमंडळात विरोधक कर्जमाफ़ीसाठी धुमाकुळ घालत होते आणि शिवसेनेचे आमदार मंत्री गप्प बसून होते. जिथे सरकारला धारेवर धरण्याचे मोक्याचे स्थान होते, तिथेच सेना मौन धारण करून बसली. बाकी ‘सामना’ या आपल्या मुखपत्रात गुरगुरणे कायम चालू असते. पण शिकारीची वेळ व जागा आली, तेव्हा सेनेचा वाघ निमूट बसला होता. राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षानेही त्यासाठी सेनेची कायम टवाळी केली आहे. फ़ार कशाला किरीट सोमय्या वा आशिष शेलार यांच्यासारख्या किरकोळ भाजपा नेत्यांनीही सेनेच्या अशा वर्तनाची सतत खिल्ली उडवली आहे. सत्तापदावर लाथ मारायची कुवत नसलेल्या कोणी उगाच क्रांतीच्या गमजा करायच्या नसतात. हे वास्तव सेनेला नेमके कळते. पण सत्ताही हवी आणि ती पुरेशी मिळत नाही, म्हणून तक्रारही करायचा हव्यास सुटत नाही. अशा जंजाळात सेनेचा वाघ सध्या अडकून पडला आहे. भाजपा त्याला यथेच्छ खेळवतो आहे. पिंजर्‍यातल्या वाघाला गुरगुरता येते व शिकार जमत नाही.

ज्या शेतकरी कर्जबाजारीपणा व आत्महत्येचे आपण एकटेच मसिहा असल्याचा आव सातत्याने शिवसेना व तिचे नेतृत्व आणत असते, तो पक्ष या विषयात खरोखरच किती गंभीर आहे? अलिकडेच या बाबतीत आपण आघाडीवर आहोत असे दाखवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शिवसेनेच्या अभ्यास पथकांना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या ४० आमदारांना गटागटाने जिल्हे तालुक्यात जाण्याचे आदेश दिलेले होते. त्यांच्या सोबतीला मुंबई ठाण्यातले काही शाखाप्रमुख, विभागप्रमुख व संपर्कप्रमुखही देण्यात आलेले होते. त्यांनी माहिती गोळा करून व शेतकर्‍यांशी संवाद साधून अहवाल आणायचा होता. मात्र त्यापैकी काहीच होऊ शकले नाही. ४० पैकी म्हणे २७ आमदार मराठवाड्याकडे फ़िरकलेच नाहीत. त्यांच्या सोबत जाणारे काही मुंबईचे प्रतिनिधीही तिकडे गेले नाहीत. थोडक्यात शेतकरी कळवळ्याचा पुरता बोजवारा उडाला. अनेकजण पक्षप्रमुखांचा आदेश धुडकावून घरी बसले, तर अनेकांनी कुठलाही अहवालही पाठवला नाही. तशी सविस्तर बातमीच एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली आहे. यापैकी अनेकांचे मतही त्या बातमीत आलेले आहे. आपले काम व कर्तृत्व किती, यापेक्षा आपले मातोश्रीवर वजन किती, यावर आमदार व पदाधिकारी विसंबून असतात. त्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. मातोश्रीवर वजन असले मग काहीही केले नाही तरी खपून जाते, इतकाच त्याचा अर्थ लागू शकतो. पण आपल्या अशा राजकीय मोहिमेचा विचका झाल्याने पक्षप्रमुख खवळले व त्यांनी अशा आमदारांना शिवसेना भवनात पाचारण केल्याचेही बातमीत म्हटले आहे. ही शिवसेनेच्या संघटनेची आजची अवस्था आहे. किंबहूना त्याच अवस्थेमुळे मुंबईत सेनेच्या बरोबरीला भाजपा येऊन पोहोचला आहे. कारण सेनेची संघटना आता विभागात काम करणार्‍यांची राहिली नसून, मातोश्रीवर मुजरा करणार्‍यांपुरती उरली आहे.

पुर्वीच्या काळात शिवसैनिकांची लढाई व काम रस्त्यावरून चालायचे. त्याच्याच बातम्या वृत्तपत्रातून झळकायच्या. आजकाल शिवसैनिक वा शिवसेना नावाची संघटना काय करते, त्याच्या बातम्या फ़ारश्या कुठे झळकत नाहीत. मात्र रोजच्या रोज ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपावर कोणत्या दुगाण्या झाडलेल्या आहेत वा कुठल्या शिव्याशाप दिलेल्या आहेत, त्याची बातमी नित्यनेमाने छापली जात असते. सामान्य शिवसैनिक व वाचकाला अशा बातम्यातून शिवसेनेच कार्य कळत असते,. थोडक्यात शिवसेना आता ‘सामना’च्या अग्रलेखापुरती कार्यरत राहिली आहे. बाकी शाखा वा आंदोलनाच्या बाबतीत शिवसेनेने अंग आखडून घेतले आहे. कधीतरी कुणा खासदाराच्या वादग्रस्त वागण्यातून खळबळ माजली, तर शिवसैनिक रस्त्यावर येतात आणि धमाल उडवतात. पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बाजारात विक्रीशिवाय पडलेली तूर वा कांदा इत्यादीसाठी रस्त्यावर येण्याची शिवसैनिकांना गरज वाटेनाशी झाली आहे. किंबहूना संघटना म्हणून विविध सामाजिक राजकीय प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची गरजही राहिलेली नाही. ती आघाडी आता ‘सामना’ अग्रलेखातून पार पाडली जात असते. रस्त्यावर उतरणार्‍या शिवसैनिकांच्या जमावाची कुणाला गरजच वाटात नाही. ही कार्यशैली झालेली असेल, तर ४० आमदारांनी तरी मराठवाड्यात खेडोपाडी जाऊन माहिती घेण्य़ाचे कारणच काय? शेतकर्‍यांशी संवाद साधून समस्या समजून घेण्याची गरज काय? ‘सामना’मधून शिवसेना इतकी जोरात चालू आहे, की शाखा वा विभागात शिवसैनिकही असायची आता कुणाला आवश्यकता भासेनाशी झाली आहे. तर त्या आमदारांनी तरी खर्‍याखुर्‍या शेतकर्‍यापर्यंत खेड्यापर्यंत कशाला जायला हवे? ही आजच्या शिवसेनेची ‘सच्चाई’ आहे. पक्षप्रमुखांना त्याची जाणिव नसावी. २७ आमदार खरेच मराठवाड्यात फ़िरकले नाहीत, तेव्हा त्यांचा या ‘सच्चाई’शी ‘सामना’ झाला असावा.

खरी बातमी पुढेच आहे. २७ आमदार मराठवाड्याकडे फ़िरकले नाहीतच. पण त्यांची कानउघडणी खुद्द पक्षप्रमुखांनी केल्यावरही त्यापैकी अनेकांनी आपल्या गैरहजेरीचा खुलासाही दिला नसल्याची माहिती आहे. याचा अर्थ काय घ्यावा? पक्षप्रमुखांना त्यांचेच आमदार दाद देत नाहीत, की नेत्याचा आमदारांना धाक राहिलेला नाही? रोजच्या रोज पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांची कानउघडणी पक्षप्रमुख आपल्या ‘सामना’ अग्रलेखातून करीत असतात. त्यामुळे त्यांना दिर्घकाळ आपल्या आमदार व पदाधिकार्‍यांच्या कानात काही सांगण्याची सवड मिळालेली नसावी. पर्यायाने आमदार व अशा पदाधिकार्‍यांच्या कानात खुप मळ साचून राहिलेला असावा. अन्यथा मोहिमेची माहिती दिली असून त्यांना ऐकू आली नसावी. किंवा नंतर कानउघडणी केल्यावरही ऐकण्याची सवय गेली असावी. मुद्दा इतकाच, की गेल्या तीन वर्षात आपल्याच ह्या आमदार वा पदाधिकार्‍यांची वेळोवेळी कानउघडणी करण्याकडे साफ़ दुर्लक्ष झाले आहे. पर्यायाने शिवसेना नावाच्या संघटनेकडे पक्षप्रमुखांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्या आमदार वा पदाधिकार्‍यांना शिवसेनेसाठी लोकांमध्ये जावे आणि विश्वास वगैरे संपादन करावा, असे काही करण्याची गरजही भासलेली नसावी. सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी वा लोकप्रतिनिधी हे जनतेत जाऊन आपली भूमिका मांडत असतात. त्यातून जनतेत पक्षाची प्रतिमा उभी रहात असते व त्यातूनच संघटना आकाराला येत असते, बाळसे धरत असते. ते आजवरचे बाळसे शिवसेना गमावून बसली, ही सच्चाई आहे. शिवसेना आता संघटना उरलेली नसून ते एक मुखपत्र होऊन बसले आहे. असे आमदारांना व पदाधिकार्‍यांनाही वाटू लागल्याचा हा संकेत आहे. दिल्लीतले केजरीवाल माध्यमातील आपली प्रतिमा गोंजारत बसले आणि त्याची किंमत त्यांनी अलिकडेच मोजलेली आहे. शिवसेनेला त्यापासून शिकता आले नाही, तर भविष्य काय असेल?

2 comments:

  1. संजय राऊत याच्या सारखी वाचाळ, बडबडी निर्बुद्ध सल्ल्यासाठी असल्यावर काय होणार

    ReplyDelete