Wednesday, May 10, 2017

कायद्याचा धाक हवाय

nirbhaya के लिए चित्र परिणाम

निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फ़ाशीवर आता सुप्रिम कोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. सहाजिकच यापुढे त्या प्रकरणावर पडदा पडला असेही मानले जाऊ शकते. पण एका प्रकरणापुरता हा विषय मर्यादित नाही. त्याचे अनेक पैलू आहेत. निर्भया हा देशात घडलेला पहिला विकृत बलात्कार नव्हे, किंवा बलात्कारानंतरची ती पहिलीच हत्याही नव्हे. म्हणूनच त्या घटनेनंतर देशभर प्रक्षोभ कशाला उसळला, ते विसरून चालणार नाही. निर्भयाला न्याय असे पोकळ शब्द त्यात वापरले, म्हणून तो विषय संपत नाही. कारण या एका विषयात अनेक गंभीर मुद्दे गुंतलेले आहेत. त्यात जसा महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे, तसाच शिक्षेविषयी जनमानसातील धाक व विश्वासाचाही मुद्दा गुंतलेला आहे. कायद्याचे राज्य चालवताना कोणावर अन्याय होऊ नये, ही अपेक्षा असते. त्याच्याही आधी गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होते, हा मुद्दा अधिक गंभीर आहे. कायद्याची गरज दुर्बळांना संरक्षण देण्यातून पुढे आली व त्यात कायद्यापासून संरक्षण, ही नंतर पडलेली भर आहे. पण आजकाल कायद्याकडूनच अन्याय होण्याला इतके महत्व मिळत गेले, की दुर्बळाला संरक्षण व कायद्याने न्याय करण्याची संकल्पनाच बाजूला पडून गेली आहे. त्यामुळेच गुन्हेगारीला वेसण घालण्याच्या कायद्याच्या प्राथमिक कर्तव्याचे भान पुरते सुटलेले आहे. एक तर गुन्हेगाराला घटनेनंतर पकडले असताना त्याच्यावरील गुन्हा सिद्ध करण्याची प्रक्रीया अतिशय जटील होऊन गेली आहे. तो गुन्हेगाराला मिळालेला दिलासा असून, त्यामुळेच गुन्हेगारी फ़ोफ़ावली व सोकावलेली आहे. ही बाजू लक्षात घेतली, तर निर्भयावर झालेला अत्याचार व हल्ला हा दुय्यम असून त्यामागची मुजोर मानसिकता, ही खरी समस्या असल्याचे लक्षात येऊ शकेल. त्या मानसिकतेला भयभीत करणे ही अशा प्रकरणातील खरी गरज असते. ते साध्य झाले आहे काय?

निर्भया ज्या अनुभवातून गेली, त्याला आता सहा वर्षाचा कालावधी होत आला आहे आणि देशव्यापी प्रक्षोभ होऊनही तितकाच काळ उलटला आहे. पण त्यानंतरही असे गुन्हे थांबलेले नाहीत वा तशा गुन्हेगारांना कुठलाही पायबंद घातला गेलेला नाही. देशात तर सोडाच, दिल्लीतही बलात्कार व लैंगिक हल्ल्याच्या घटना त्यानंतरही सतत घडत राहिल्या आहेत. थोडक्यात निर्भयाला न्याय म्हणजे तिच्यावरील गुन्ह्यात आरोपींना शिक्षा, अशी लोकांची अपेक्षाच नव्हती. गाजावाजा झाल्यावर आरोपी शोधून त्यांना न्यायासनासमोर उभे केले जाणार, ही गोष्ट उघड होती. लोक त्यासाठी रस्त्यावर उतरले नव्हते. कारण तशा कुठल्याही शिक्षेने निर्भया पुन्हा जिवंत होणार नव्हती, की तिच्या नशिबी आलेल्या यातनांची भरपाई कुठल्याही व कितीही कठोर शिक्षेतून होऊ शकणार नव्हती. हे सामान्य माणसालाही कळते. म्हणूनच आरोपींना फ़ाशी वा त्या फ़ाशीवर शिक्कामोर्तब, ही कोणाचीच अपेक्षा नव्हती. लोक रस्त्यावर उतरले त्याचे कारण एकदम वेगळे होते. अशा रितीने त्यानंतर अन्य कुठल्याही मुलगी वा महिलेला यातनेच्या अनुभवातून जाण्याची पाळी येऊ नये, अशी खरी अपेक्षा होती. ती अपेक्षा पोलिस बंदोबस्त केल्याने किंवा सुरक्षेचे उपाय योजल्याने पुर्ण होऊ शकत नाही. कारण असे आरोपी गुन्हेगार तशा संधीच्या कायम शोधात असतात आणि प्रत्येक कानाकोपर्‍यात पोलिसांचा बंदोबस्त ठेवताही येत नसतो. किंवा गुन्हा घडून गेल्यावर आरोपींना पकडल्याने कुठल्याही मुलीच्या नुकसानाची कसलीही भरपाई होऊ शकत नसते. म्हणूनच बंदोबस्त हा अशा विकृत मानसिकतेचा झाला पाहिजे आणि तो बंदोबस्त अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक बसण्यातूनच होऊ शकतो. केलेल्या कृतीचे परिणामच अशा मनोवृत्तीला भयभीत करून, कृतीपासून परावृत्त करू शकतात. त्या दिशेने एक तरी पाऊल पडले आहे काय?

अर्थात ही आता कायद्याच्या राज्याची लंगडी बाजू बनून गेली आहे आणि त्यामुळेच सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारी सोकावत गेलेली आहे. मल्ल्यासारखे उद्योगपती मुजोर होऊन हजारो कोटीचा गंडा घालू शकतात आणि कुठल्याही गावखेड्यात मुली महिलांना जीव मुठीत धरून जगावे लागत असते. आपण गुन्हेगार नसतो, हाच एक गुन्हा झाल्यासारखे लोकांना जगावे लागते. कारण गुन्हा करणार्‍याला कायद्याचे भय उरलेले नसून, न्यायावरील लोकांचा विश्वास ढासळला आहे. उत्तरप्रदेशात एका मुलीवर बलात्कार करून पुन्हा तिची हत्या करणारा माणूस मंत्रीपदी राहू शकला. त्याच्या विरोधात गुन्हाही नोंदण्यात चालढकल झाली आणि अखेरीस कोर्टानेच त्याला अटक करायचे आदेश दिल्यावरही तो निवडणूक प्रचार करत राजरोस फ़िरू शकत होता. यातून कायदा अगतिक व गुन्हेगार शिरजोर झाल्याचा अनुभव लोकांना येत असतो. सहाजिकच ज्यांच्या मनात गुन्हेगारीचे बीज रुजलेले असते, त्यांना त्यातून हिंमत मिळत असते. त्यांच्या मनात असलेला कायदा व शिक्षेचा किरकोळ धाकही संपून जात असतो. म्हणून तोच धाक जपण्याला व त्यालाच खतपाणी घालण्याला हातभार लागला पाहिजे. त्यासाठी निर्भया खटल्याची महत्ता मोठी असते. अशा गाजलेल्या प्रकरणातील शिक्षा इतकी भयानक व अमानुष असली पाहिजे, की तिचे वर्णनही गुन्हा करू इच्छिणार्‍याच्या मनाचा थरकाप उडवणारे असायला हवे. निर्भया क्षणा क्षणाला मरत होती. तितकेही भीषण मरण ज्यांना आपण देत नाही, त्यांच्यासाठी फ़ाशी ही मौज होऊन जाते. अन्य कुणाही गुन्हेगाराला शिक्षेची भिती वाटण्याची शक्यता नसते. ही झाली शिक्षेची गोष्ट! पण तेवढीही शिक्षा गुन्हेगाराला होण्याच्या कल्पनेने विरघळून जाणारा मानवतावाद ही आणखी एक भयंकर समस्या झालेली आहे. आता या फ़ाशीला रोखण्याचे नवे नाटक समोर येण्याचा आणखी एक अडथळा आहे.

गुन्हेगार हा कधीही बलवान नसतो. तो मर्द नसतो की सामर्थ्यशाली नसतो. खरा सामर्थ्यवान आपल्यातील बळाचा वापर करून दुबळ्यांना धाकात ठेवत नाही. केवळ आपल्या बळाचा धाक त्याला पुरेसा असतो. कायदा म्हणूनच तितका बलवान असला पाहिजे. कायदा तितका बलशाली असला, मग संधीसाधू गुन्हेगार त्याला वचकून असतात आणि त्यांच्या मनातला हा कायद्याचा धाकच दुर्बळ समाजासाठी सुरक्षेचे कवच असते. म्हणूनच कठोर शिक्षा हेच न्याय व कायद्याने खरे भेदक हत्यार असते. पोलिसाच्या वा सैनिकाच्या हातातील बंदुक वा शस्त्र भेदक नसते. तर तो अशा प्राणघातक हत्याराचा उपयोग करील, ही त्यातली भेदकता असते. त्याचाच धाक कायद्याला प्रभावी व परिणामकारक बनवित असतो. आज त्याची प्रचिती आपल्याला काश्मिरात येत असते. सशस्त्र पोलिस सैनिकांवर कोणीही भुरटे दगडफ़ेक करतात वा त्यांच्या टोप्याही उडवत असतात. पण त्यापैकी एकाचीही हिंमत पाकिस्तानातून घुसखोरी करणार्‍या मुजाहिदीन वा जिहादीवर दगड फ़ेकण्याची नसते. कारण तो जिहादी हातातली बंदुक वा बॉम्ब मारण्याची भिती वास्तव असते. हिंसेपेक्षा तिच्या शक्यतेची भितीच अधिक परिणामकारक असते. कायदा वा त्याचे अंमलदार पोलिस वा सैनिक यांच्या हातातील शस्त्राला अनेक कायद्यांनी निकामी करून टाकलेले असेल, तर जिहादी असो की बलात्कारी असो, त्याने कुणाला घाबरण्याचे कारण उरत नाही. त्याच शस्त्रांना धार लावण्याचे काम कठोर शिक्षेत सामावलेले आहे. निर्भयाच्या प्रकरणात शिक्षा ही तितकी कठोर व मनाचा थरकाप उडवणारी नसल्यानेच, त्याला न्याय म्हणता येत नाही. त्यातून कायद्याची बूज राखली गेली असे म्हणता येत नाही. एकूणच आजकाल कायद्याचे राज्य आहे ते महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, की कायद्याची महत्ता प्रस्थापित करू शकत नाही. यातून आपली सुटका कशी होणार आहे?

4 comments:

 1. Court ani tyat milnar so called nyay ..he ata cheshte che vishay zale ahet... watsapp var lavkar ch tyavar gamatidaar msgs yeu lagatil

  ReplyDelete
 2. भाऊ आपला आणखी एक घणाघाती लेख...
  सदर घटनेला आजुन एक संर्धभ आहे.. आणि या बाबत मी त्या वेळचे तथाकथित मिडिया किंग राजदिप सरदेसाई, केतकर, निखिल वागळे व इतर यांना ईमेलद्वारे विचारले होते की ती घटना घडल्या नंतर चार दिवसांनी मिडियावाले का जागे झाले?
  याचा संर्धभ संशोधन संशयास्पद आहे कारण ही घटना 16 तारखेला घडली व 17-18 ला छोटी बातमी दाखवली गेली.
  त्याच वेळी गुजरातमध्ये नुकतेच मतदान झाले होते व मोदी झिंकतात का यावर लोकसभेचे भाकीत ठरवले जात होते. कमाल म्हणजे राजदिप निखिल हे तर म्हणत होते की मोदी नी एक जरी कमी जागा जिंकली तर तो मोदींचा पराभव असेल व ते त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभा निवडणूक हरेल. (यावरुन मोदींचा धसका काँग्रेस रुपी मिडियाला कीती होता याचा अंदाज घेऊ शकतो व मिडियावाले कीती मोदी विरोधी होते व आहेत हे समजते... तसेच काँग्रेस असताना % मध्ये सत्तेत भागिदारी पण असते हे मोदी अता सत्तेत असताना बाहेर काढणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात मिडिया रोगावर काही प्रमाणात उपाय होईल )
  परंतु 19 तारखेला निकालात मोदी सरकारने प्रचंड मतांनी विजय मिळवल.
  आणि त्या रात्री थातुरमातुर विश्लेषण वाहिन्या वर झाले व एका रात्रीत निर्भया सर्व वाहिन्या वर झळकु लागली व मिडियाल्या नी ही एक मोठी न्युज बनवली. व लगेचच यावर दुसर्य दिवशी पासुन धुमाकुळ चालू झाला.
  मोदी विजयाची चर्चा वाहिन्या वर झालीच नाही.. कारण मोदी जिंकल्या मुळे त्या बाबत चर्चा पुढील काही दिवस वाहिन्याच्या प्राइम टाइम वर करावी लागेल या मुळे मोदींचे उदात्तिकरण होइल व मोदी लोकसभा निवडणूका जिंकणार असे मान्य करावे लागेल.
  या भिती मुळे निर्भया प्रकरण पुढे अनेक आठवडे महिने गाजले..
  त्याचमुळे निर्भयाला हा न्याय मिळाला.
  अशा अनेक घडामोडी मिडियावाले कशा फिरवतात याचा अंदाज आपण करु शकतो..
  आता मिडियावाले योगी सरकार ऊत्तर प्रदेश मध्ये कसे सरकार चालविते यावर मोदी सरकारचे 2019 चे भविष्य ठरवण्यात आपली अशी च एनर्जी खर्च करत आहे व जनमानसात भावना तयार करत आहे...
  याचा मोदी परत कसा खुबीने ऊपयोग करतात हे पहावं लागेल..
  व मतदार या मिडियावाले चे पाशात फसतात की आपण नेहमी म्हणतात त्याप्रमाणे शिकारी खुद शिकार हो गया या वर या खंडप्राय देशाचे भवितव्य अवलंबून आहे..
  मोदी व टीमची एखादी चुक मिडियावाले डोक्यावर घेतील व या भारतवर्षाचे परत वाटोळे करतील...का हे पहाणे सामान्य माणसाच्या हातात आहे.
  अमुल

  ReplyDelete
 3. "आपण गुन्हेगार नसतो, हाच एक गुन्हा झाल्यासारखे लोकांना जगावे लागते."
  क्या बात !

  ReplyDelete