Monday, May 22, 2017

काश्मिरची जुनीच समस्या (लेखांक - २)

stone pelters के लिए चित्र परिणाम

भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये. मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’
मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.
‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले.
मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.
‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.
हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’
‘लढाई चाललेली पाहिली.’
‘कुणाची जीत होत आहे?’
‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’
कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.
मग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.
मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’
तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’
श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’
===========================

१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली. लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय पुरोगामी वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे?

कालपरवा अनेक वाहिन्यांनी हुर्रीयत नावाच्या ‘आझादी ब्रिगेड’चा मुखवटा फ़ाडून टाकणारे छुपे चित्रण प्रदर्शित केलेले आहे. त्यातून काश्मिर आणि भारत पाक यांच्यातील खर्‍या वादाचा चेहरा काहीसा समोर आलेला आहे. आज अकस्मात काश्मिरी प्रदेशातील मुस्लिमांचा चेहरा असा झालेला नाही. तो गेल्या अर्धशतकात तसा विकृत करण्याचे पद्धतशीर प्रयास झालेले आहेत. त्याच्यामागे जसा पाकिस्तान आहे, तसेच भारताबाहेरचे अनेक शत्रूही गुंतलेले आहेत. त्यांचा हेतू या खंडप्राय देशाला खंडीत करण्याचा असून, त्यासाठी विविध बहुरुपी मुखवटे लावून ही मंडळी आपल्यात उजळमाथ्याने वावरत असतात. ५२ वर्षापुर्वी हमीद दलवाई आपल्या साध्या डोळ्यांनी ही समस्या स्पच्छपणे बघू शकले आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करू शकले. तीच समस्या आजच्या एकाहून एक बुद्धीमंतांना बघणेही कशाला अशक्य झाले आहे? त्यांनी डोळ्यावर कुठली झापडे लावली आहेत? मध्यंतरी एका हिजबुल कमांडरने स्पष्टपणे सांगितले, की आझादी वगैरे काहीही नाही. आमची लढाई राजकीय स्वातंत्र्याची नसून इस्लामची लढाई आहे. आम्हाला काश्मिरात इस्लामचे राज्य व सत्ता प्रस्थापित करायची आहे. हे त्या हिजबुलचे शब्द आणि ५२ वर्षापुर्वी एका हॉटेलात कुणा कामकरी पोराने दलवाईंना सुनावलेले शब्द; यात तसूभर तरी फ़रक आहे काय? तो कळ्कळीने सांगतो, सर्वकाही भारतात चांगले आहे. थोडक्यात भारत सरकार खुप मेहरबान आहे आणि यापेक्षाही पाकिस्तानातील परिस्थिती भयंकर दयनीय आहे. पण जगण्यातील गरीबी व समस्येपेक्षा त्याला ‘इस्लामका झंडा’ प्यारा आहे. अशी मनस्थिती आज काश्मिरातील प्रत्येक तरूणाची आहे असे मानायचे कारण नाही. पण देशातील पुरोगामी लोक त्याच मानसिकतेला खतपाणी घालणे, हे आपले कर्तव्य मानत आहेत आणि तीच खरी काश्मिरची समस्या झाली आहे.

काश्मिरात आज जो हिंसाचार उफ़ाळला आहे किंवा सीमेलगत पाकिस्तान धुमाकुळ घालत असतो, त्याचा बोलविता धनी पलिकडे बसलेला आहे. पण त्याच धन्याच्या इशार्‍यावर इथे धमाल उडवून देणारे तर इथले आहेत ना? त्यांना जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचा विघातक कृत्यांसाठी वापर करण्याची मुभा त्यांना मिळत गेली, हे समस्येचे मूळ आहे. त्यामुळेच हा आजार मागल्या तीनचार दशकात पोसला गेला आहे. किंबहूना हा रोग पद्धतशीर जोपासला गेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आधीच काश्मिरात विविध पंथाचे वा प्रवृत्तीचे पाकवादी नेते होते. पण कायदा सुरक्षा देत नसल्याने त्यांना आझादीची भाषा बोलता येत नव्हती. तशी मोकळीक मिळताच त्यांनी आपले देशद्रोही दात बाहेर काढले आहेत. आता तर त्यांच्या अशा देशद्रोही भूमिकेला पाठीशी घालणार्‍या अनेक पाक हस्तकांचा देशाच्या अन्य भागातही सुकाळ झाला आहे. हेरगिरीच्या भाषेत ज्याला परकीय हस्तक वा असेट म्हणतात, तशा लोकांची पाकिस्तानने भारतात जोपासना केलेली आहे. शांतीवार्ता किंवा संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण अशा भाषेत हे हस्तक सातत्याने बोलत असतात. १९९६ नंतरच्या काळात त्याला मोकाट रान मिळाले, कारण त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढणार्‍या भारतीय हस्तकांचा पाकिस्तानात पुरता नि:पात करण्यात आला. मोदी सरकार सत्तेत येईपर्यंत पाकिस्तानात भारतीय हस्तक वा हेरांचे जाळे विस्कळीत होऊन गेलेले होते. आता गेल्या तीन वर्षात ते नव्याने उभारले जाते आहे आणि इथल्या पाक हस्तकांचा बंदोबस्त जोरात सुरू झाला आहे. त्यामुळेच अखेरचे आचके दिल्यासारखे हे पाक हस्तक आदळआपट करू लागले आहेत. कारण प्रथमच त्यांच्या खर्‍या हेतूचा हिडीस चेहरा समोर आला असून, आजवरचा आझादीचा मुखवटा पुर्णत: फ़ाटून गेला आहे. हे पाकिस्तानी प्रेमाचे जंजाळ म्हणूनच उलगडण्याची गरज आहे.

1 comment: