लोकसभा निवडणूका संपून आता तीन वर्षे उलटली आहेत. तीन वर्षापुर्वी आज म्हणजे १२ मे २०१४ रोजी विद्यमान लोकसभेसाठीच्या मतदानाची अखेरची फ़ेरी संपली होती आणि चार दिवसांनी मतमोजणी व्हायची होती. म्हणजेच आणखी चार दिवसांनी कॉग्रेसचे ऐतिहासिक पानिपत झाल्याच्या घटनेला तीन वर्षे पुर्ण होतील. इतक्या दिवसांनंतर राहुल गांधी वा कॉग्रेसश्रेष्ठींना आपल्या पक्ष संघटनेत काहीतरी बिघडाले असल्याची जाग आलेली आहे. कारण गुरूवारी राहुल गांधींनी पक्षात काही संघटनात्मक बदल करण्याची पावले उचलल्याची बातमी झळकली आहे. लोकसभेनंतर अनेक राज्यात पाठोपाठ विधानसभांच्या व अन्य स्थानिक निवडणूका पार पडल्या. कालपरवाच उत्तरप्रदेश विधानसभेचे मतदान झाले आणि त्यातही कॉग्रेस संपुर्ण भूईसपाट होऊन गेली. पंजाबचा अपवाद करता, अन्य कुठल्याही राज्यात कॉग्रेसला पुन्हा लोकमताची दाद मिळू शकलेली नाही. उत्तरप्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात कॉग्रेस सर्वात लहान पक्ष झाला आहे. त्यानंतरही कुठली हालचाल करण्याची इच्छा पक्षाच्या नेतृत्वाला झालेली नसेल, तर त्यांना नेता किंवा श्रेष्ठी का म्हणावे हा प्रश्नच आहे. पण उशिरा का होईना, पक्षात काही बिघडल्याचा शोध लागला आहे आणि त्यावर उपाय योजणे सुरू झाले असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे. कारण कॉग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असून, आजही तोच देशातील दुसरा व्यापक संघटना असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. म्हणूनच त्याची डागडुजी होत असेल तर चांगलेच आहे. पण खरोखरच तितक्या गंभीरतेने हे काम चालू झाले आहे काय? की निव्वळ रंगरंगोटी करण्याचा हेतू त्यामागे आहे. यातली एक घोषणा तरी काहीशी आशादायक वाटते. ज्योतिरादित्य शिंदे यांची लोकसभेतील पक्षनेता म्हणून नेमणूक व्हायची असून कमलनाथ यांची मध्यप्रदेशचे सर्वाधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.
कमलनाथ हे सातत्याने आपल्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले नेता आहेत आणि असे असूनही कधी त्यांचा मध्यप्रदेशातील नेतृत्वासाठी विचार झाला नाही. त्यांच्याऐवजी सत्यव्रत चतुर्वेदी वा इतर सटरफ़टर नेत्यांच्या तिथे नेमणूका झाल्या. पक्षाला निवडणूका जिंकायच्या असतील, तर ज्याला थेट जनतेत जाऊन मते मिळवता येतात, अशा नेत्यांना प्राधान्य असायला हवे. मागल्या तीन निवडणूकांमध्ये मध्यप्रदेशात कॉग्रेस क्रमाक्रमाने नामशेष होत गेली. कारण तिथल्या ज्येष्ठ अनुभवी कॉग्रेस नेत्यांमध्ये कायम बेबनाव राहिलेला आहे. गेल्या विधानसभेपुर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हाती सुत्रे सोपवण्यात आलेली होती. तर दहा वर्षे सलग मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या दिग्विजयसिंग यांना खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आलेले होते. त्यांच्यातले वैमनस्य इतके टोकाला गेलेले होते, की एका संघटनात्मक बैठकीत हाणामारीपर्यंत प्रसंग आलेला होता. या बैठकीत सिंग यांना प्रवेश मिळू नये म्हणून शिंदे यांनी भलेथोरले कुलूप पक्ष कार्यालयाला बाहेरून ठोकले होते आणि तिथे घुसखोरी करण्यासाठी दिग्विजयसिंग कुंपणाची भिंत ओलांडून आलेले होते. त्यातून मोठी खडाजंगी झालेली होती. अशा प्रदर्शनातून लोकांची मने जिंकता येत नाहीत, की मतेही मिळत नाहीत. उलट जी कही थोडीफ़ार मते मिळणे शक्य असते, तेही उदासिन होऊन दुरावतात. त्याची प्रचिती मग विधानसभा निकालातून समोर आलेली होती. मध्यप्रदेश विधानसभेच्या ८० टक्के जागा भाजपाने तिसर्यांदा जिंकल्या आणि मग त्याचेच प्रतिबिंब लोकसभा निकालातही पडले. कमलनाथ व शिंदे असे दोन उमेदवार वगळता कॉग्रेसचे जवळपास सर्व उमेदवार मध्यप्रदेशात पराभूत झाले. त्यातून पक्ष संघटनेची त्या राज्यात किती दुर्दशा झालेली आहे, त्याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नव्हती. पण बदल कुठला होऊ शकला?
उत्तरप्रदेशात तर लागोपाठ दोन विधानसभा व लोकसभा प्रचाराची धुरा राहुल गांधींनी संभाळली होती. तिथे गेल्या दहा वर्षात कोण प्रदेशाध्यक्ष होता व त्याचे कर्तृत्व कोणते, त्याचेही उत्तर कोणी देऊ शकणार नाही. लागोपाठ त्या मोठ्या राज्यातून कॉग्रेस पुरती नामशेष होऊन गेलेली आहे. अशा मोठ्या राज्यात पक्षाची संघटना नव्याने उभी करण्यासाठी कोणाची नेमणूक होणार आहे? त्याचे उत्तर मिळालेले नाही. पण लौकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या राज्यात नेतृत्वामध्ये बदल होणार आहेत. त्यापैकी हिमाचल प्रदेश व कर्नाटक राज्याचा समावेश आहे. त्या दोन्ही राज्यात आज कॉग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे हाती असलेली ही दोन राज्ये टिकवण्याची कसोटी कॉग्रेसला द्यावी लागणार आहे. त्यातल्या कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन्ही पोटनिवडणूका जिंकून आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांना सुखनैव तिथले नेतृत्व करू दिले जाणार आहे काय? या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नकारार्थीच आहे. कारण एका बातमीनुसार ज्योतोरादित्य शिंदे यांना लोकसभेतील नेता करण्यासाठी विद्यमान नेते मल्लीकार्जुन खरगे यांना हटवले जाणार आहे. त्यांची वर्णी कुठेतरी लावणे भाग आहे. तर त्यांना माघारी आपल्या कर्नाटक राज्यात नेतृत्व करायला धाडले जाणार असल्याचे म्हणतात. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूकांपुर्वीच तिथे सिद्धरामय्या व खरगे यांच्यात मुख्यमंत्री पदाची झोंबाझोंबी सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून खरगे यांनी विधानसभा निवडणूकीचे नेतृत्व करायचे, की मुख्यमंत्र्यानेच नेतृत्व करायचे; असा वाद सुरू होणार यात शंका नाही. शिवाय तसा वाद सुरू झाला, तर गटबाजीचा फ़टका कॉग्रेसला बसू शकतोच. पण त्याहीपेक्षा सिद्धरामय्या यांच्या कारकिर्दीवरच शंका घेतल्या जाऊ शकतात. मग याला पक्षाची नवी संघटनात्मक रचना म्हणायचे, की नुसती ढवळाढवळ म्हणायचे असा प्रश्न उरतो.
अर्थात हे होऊ घातलेले बदल संघटनात्मक पुनर्रचनेसाठी आहेत, की राहुल गांधींना अध्यक्षपदी बसवण्यासाठी चाललेली पुर्वतयारी आहे? गेल्या चार वर्षापासून राहुलना पक्षाध्यक्ष बनवण्याचा घाट घातला गेला आहे. पण श्रेष्ठी वा कार्यकारिणी म्हणून बसलेल्या ढुढ्ढाचार्यांनी राहुलची डाळ शिजू दिलेली नाही. मग अशा वयोवृद्धांना संसदीय मंडळ व कार्यकारिणीतून हटवून, राहुलचा मर्ग प्रशस्त करण्याची खेळी या नव्या डागडुजीचा हेतू असेल काय? सध्या तरी तसे़च वाटते. कारण उत्तरप्रदेश व अन्य राज्यातील कॉग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुलनी लोकांपासून दूर रहाणेच पसंत केले आहे नवे काही तरी केल्याशिवाय आता प्रकाशझोतामध्ये येणे, त्यांनाही अवघड झालेले असावे. त्यामुळेच नवी फ़ौज उभारल्याने नाटक रंगवून राहुल, गुजरात आदी राज्याच्या विधानसभेत सामोरे येण्याची तयारी करीत असावेत. पण नुसती सामानाची हलवाहलव करून घर नवे होत नाही. त्यात दुरूस्ती करून गळती थांबवावी लागत असते. भिंतीला पडलेल्या भेगा भरून काढाव्या लागत असतात. उडालेला रंग नव्याने देऊन त्यातही साजरेपण आणावे लागत असते. या खिडकीचा तुटला दरवाजा त्या दाराच्या चौकटीला लावून डागडुजी होत नसते. तशा भ्रमात राहिले म्हणून ते घर किंवा वास्तु वास्तव्याला योग्य होत नसते. पाऊसपाणी वा कडाक्याच्या उन्हाळ्यात त्याची कसोटी लागत असते. लोकांना मतांसाठी आकर्षित करणे, हेच कठोर मोसम असतात आणि त्यात ज्या पक्षाचे घरटे टिकून रहाते, त्यालाच उंच झेपा घेण्याची हिंमत करता येत असते. जुन्या नेत्यांच्या वारसांना महत्वाच्या पदावर आणुन कॉग्रेसला तरूण करता येणार नाही. तर हुशार व महत्वाकांक्षा असलेल्या तरूणांना संधी देण्यातून नवी कॉग्रेस उभारली जाऊ शकेल. वतनदारीने नेतेपदी येऊन बसलेल्यांना हटवावे लागेल. त्यापैकी काही होताना दिसले तर गोष्ट वेगळी!
जुन्या घराची रंगरंगोटी..पक्षाचे घरटे..
ReplyDeleteव्वा भाऊ, बहारदार लेखन..