Wednesday, May 10, 2017

यशापेक्षा अपयशाची चिकित्सा

modi amit shah के लिए चित्र परिणाम

प्रत्येक अनुभव माणसासाठी एक धडा असतो. कधी तो अनुभव वाईट असतो तर कधी चांगला असतो. त्या अनुभवात चांगले वा सोपे असेल त्या़च्या आहारी जाणार्‍यांना त्यातून धडा घेता येत नाही. तर वाईट अनुभवाने खच्ची होणार्‍यांनाही काही शिकता येत नाही. प्रामुख्याने आपल्या यशातही काही त्रुटी राहिली असेल तर ती शोधणारा अनुभवातून शिकत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या़ वर्गातले आहेत. म्हणूनच त्यांनी देशाचे राजकारणच बदलून टाकले आहे. तीन वर्षापुर्वी लोकसभेचे निकाल लागण्यापर्यंत टिंगल वा टिकेचा विषय असलेली ही जोडगोळी, आज भल्याभल्या राजकीय अभ्यासक विश्लेषकांना न सुटणारे कोडे होऊन बसले आहे. कारण अशा अभ्यासकांना अजूनही त्यांची कार्यपद्धती व शैली समजून घेण्याची इच्छाही झालेली नाही. २०१४ च्या लोकसभा मतदानाने भारतीय राजकारण व निवडणूकांची मोजपट्टी बदलून टाकली आहे. सहाजिकच जुन्या कालबाह्य मोजमापांनी नव्या राजकारणाची गणिते मांडता येत नाहीत, की समिकरणे सोडवता येणार नाहीत. पण त्याच विश्लेषकांच्या कालबाह्य विवेचनात गुरफ़टून बसलेल्या अनेक पक्षांना मात्र, त्याचे चटके बसत असतात. २०१४ च्या अपुर्व यशानंतर दोनचार राज्यातही भाजपाने यश मिळवले आणि मोदीलाट कधी ओसरणार वा कोण रोखणार; अशी चर्चा रंगलेली होती. अशावेळी दिल्ली विधानसभेच्या मध्यावधीत केजरीवाल यांच्या पक्षाने मोठे यश मिळवले आणि बिहारमध्ये नितीश-लालूंनी कॉग्रेसला सोबत घेत भाजपाचा विजयरथ रोखला. त्यामुळे आता मोदीलाट संपली वा ओसरली, असा निष्कर्ष काढला गेला. पण तो लौकरच खोटा पडला. किंबहूना अमित शहांनी तो खोटा पाडून दाखवला. कारण तो विरोधकांचा विजय नव्हता तर शहा यांनी केलेल्या चुकांची ती किंमत होती. नंतर शहांनी चुक सुधारली आणि सर्वांना पुन्हा मोदीलाट भेडसावू लागली आहे.

मोदीलाट म्हणजे तरी काय? वास्तवात मोदीलाट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. हे खुद्द मोदी जाणतात व शहांनाही त्या़ची पक्की खात्री आहे. पण विरोधकांनी ज्याचा बागुलबुवा तयार केला आहे, त्याला विरोधकच घाबरत असतील, तर मोदी-शहांनी गैरसमज दूर करण्याचा विचारही करण्याची गरज नसते. उलट त्याच भितीला आपले बलस्थान बनवून विजयाकडे झेप घ्यायची असते. तीच आता या जोडगोळीची रणनिती होऊन बसली आहे. विरोधकांनी कितीही तयारी वा बेरीज वजाबाक्या कराव्यात, आपण त्यावर मात करायची, असे गणित मोदी-शहांनी मांडलेले आहे. अर्थात तेच अन्य पक्षांचेही गणित असते. पण त्यातला फ़रक थोडा लक्षणिय आहे. विरोधक नेहमी आपल्या बलस्थानावर विसंबून रहातात आणि दुर्बळतेचा अजिबात विचार करत नाहीत. शहांची निती नेमकी उलट आहे. ते बलस्थाने गृहीत धरतात व दुबळेपणा कुठे व किती आहे, त्यावरून समिकरणे मांडत असतात. आपली शक्ती मर्यादित आहे आणि ती सर्वत्र सारखीच लावली; तर अपव्यय होत असतो. जिथे आपण प्रबळ आहोत, तिथे किरकोळ शक्ती लावायची आणि त्यातली उचलून दुर्बळ असलेल्या जागी अधिक शक्ती लावायची, अशी त्यांची रणनिती असते. परिणामी दुर्बळ जागीही जिंकण्याची शक्यता वाढते आणि जिथे जिंकणे सहजशक्य आहे, तिथे शक्तीचा अपव्यय होत नाही. हे कसे शक्य होते? तर निवडणूका नुसत्या विजय पराजयाची कथा नसते. त्यात प्रत्येक पक्ष वा उमेदवाराचे बलाबल स्पष्टपणे समोर आलेले असते. त्या आकडेवारीचा अभ्यास करून बलस्थाने व दुर्बळस्थाने निश्चीत करता येत असतात. म्हणून तर शहा यांनी आता दोन वर्षे आधीच २०१९ च्या लोकसभेची तयारी आरंभली आहे आणि त्यांचे लक्ष दुर्बळ स्थानावर आहे. ९५ दिवसांचा त्यांनी देशव्यापी दौरा आखला आहे आणि त्यात अशा दुबळ्या १२० जागी, संघटना उभी करण्याला प्राधान्य दिलेले आहे.

रणनिती वा युद्धनिती म्हणजे तरी काय असते? त्यात जिंकायचे असते आणि त्यासाठी जे डावपेच खेळले जातात, त्यात एक सुसुत्र धोरण असते. त्याला रणनिती म्हणतात. अशा रणनितीमध्ये विरोधक वा शत्रूच्या दुर्बळ जागी हल्ला चढवून, त्याला बेजार करायची योजना असते. तशीच आपल्या बलस्थानी कमकुवतपणा येऊ नये याचीही काळजी घेतली जात असते. शहा यांनी भाजपाची सुत्रे हाती घेतल्यापासून देशव्यापी पक्षाचा विस्तार करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचे कारण कुठल्याही राज्यामध्ये आपल्याला अन्य कुणाशी युती आघाडी करून परावलंबी रहायची अगतिकता शिल्लक राहू नये. अशी त्यांची निती आहे. त्यातला महत्वाचा भाग असा, की मित्रपक्ष म्हणून जवळ घेतलेल्या पक्षांचा लाभ यश मिळवण्यासाठी करायचा. पण नुसत्या यशावर खुश रहायचे नाही, तर आपला प्रभाव वाढवून स्वबळावर यशस्वी होण्याची सज्जता निर्माण करायची. यात आपल्या दुर्बळ जागा बलवान करणे, हीच रणनिती असू शकते. गेल्या लोकसभा निवडणूकीत २८२ जागा व बहूमत भाजपाने मिळवले, तरी २४१ जागी भाजपाला यश मिळालेले नाही. त्यात काही जागा मित्रपक्षांच्या आहेत तर काही जागी भाजपाने अपयश पचवलेले आहे. अशा जागी पक्षाला मजबूत करणे, ही रणनिती त्यांनी आखलेली आहे. त्यात बंगाल, ओडिशा, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, केरळ अशा अनेक राज्यांचा समावेश होतो. अशा जागी पक्षाची भक्कम संघटना उभी करण्याला, हा पक्षाध्यक्ष प्राधान्य देतो आहे. त्याच्या नेमके उलट कॉग्रेस वा इतर विरोधी पक्ष, आपापली शक्ती एकजुट करून मोदींना रोखण्याची स्वप्ने रंगवत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याची चिंता मोदी-शहांना सतावत नाही. त्यांना आपला पक्ष कुठे दुर्बळ आहे, तिथे मजबूत करण्याची चिंता लागलेली आहे. हाच मोठा फ़रक आहे. तिथेच मोदीना पराभूत करण्यात विरोधक तोकडे पडत आहेत.

सध्या देशात विविध पक्षांची बडी आघाडी उभी करून मोदींना रोखण्याची गणिते मांडली जात आहेत. त्यात कुठे कोण नेता वा कुठला पक्ष बलवान आहे, त्याचे हिशोब मांडले जात असतात. उलट ९५ दिवसांचा प्रदिर्घ दौरा करायला निघालेल्या अमित शहांनी भाजपाची स्थिती जिथे दुबळी आहे, अशा १२० मतदारसंघांची निवड केली आहे. मागल्या लोकसभेत ज्या मतदारसंघात भाजपाला चांगली मते मिळवता आली नाहीत, तिथे पुढल्या दोन वर्षात लक्ष केंद्रीत करण्याचा विचार या अध्यक्षाच्या मनामध्ये घोळतो आहे. पण कॉग्रेससहीत अन्य पक्ष आपण कुठल्या भागात व जागी दुबळे आहोत, तिथे मजबूत होण्याचा विचारही करायला तयार नाहीत. आपली त्रुटी भरून काढण्यासाठी अन्य पक्षाला सोबत घेण्याची पळवाट शोधण्यात प्रत्येक विरोधक गर्क आहे. असे गणित मांडण्यातच पराभूत मनोवृत्ती दिसते. आपण स्वबळावरब भाजपाशी लढू शकत नसल्याची, ही अप्रत्यक्ष कबुलीच असते. ती लढण्याची इच्छा मारून टाकत असते. निवडणूकांचे रणमैदान जवळ आल्यावर जागावाटप वा आघाडीची कल्पना समजू शकते. कारण पक्षाची संघटना बांधायला तेव्हा सवड नसते. पण अजून लोकसभा निवडणुकांना दोन वर्षे बाकी असताना, संघटना बांधणे वा असलेली संघटना मजबूत करण्याचा विचारही ज्यांना सुचत नाही, ते लढणार म्हणजे काय? उसनवारीने लढता येत नाही आणि दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढाया जिंकता येत नसतात. याचे भानही नसल्यांना मोदी-शहा म्हणूनच घाबरत नाहीत. ते यश मिळाल्यानंतरही त्यात रममाण होण्यापेक्षा कुठे कमी पडलो, त्याचा शोध घेतात. त्यामुळेच त्यांची रणनिती यशस्वी होताना दिसते आहे आणि विरोधकांना त्यांच्या विरोधातली रणनिती आखणेही अशक्य होत चालले आहे. राजकारणाची ही नवी दिशा भाजपाचे नवे नेतृत्व घेऊन आले आहे आणि त्याच्याची टक्कर देऊ शकतील, त्यांनाच राजकारणात टिकून रहाता येईल. नुसत्या शिव्याशाप देऊन वा टिकेच्या तोफ़ा डागून काहीही उपयोग नाही. त्यातून केजरीवाल होता येते. मोदी होणे कदापी शक्य नाही.

2 comments:

  1. नेहमी प्रमाणे उत्तम सखोल विश्लेषण.

    ReplyDelete