Saturday, May 20, 2017

‘ढोलताशा’च्या गदारोळातअलिकडल्या काही वर्षात मी जवळपास कुठलाही नवा सिनेमा बघितलेला नाही. मराठी-हिंदी वा अगदी इंग्रजी अशा कुठल्याही भाषेतला सिनेमा बघण्याची वेळच आली नाही. सहाजिकच गाजलेले मराठी सिनेमाही बघितलेले नाहीत. ‘ढोलताशे’ नावाचा सिनेमा आल्याचे ऐकले होते. आता त्याचाच निर्माता अतुल तापकीर याच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि अस्वस्थ झालो. त्याने सोशल मीडियात आपल्या वास्तविक जीवनात आलेल्या वादळाची कथा सोशल माध्यमात मित्रांसमोर कथन केली आणि आत्महत्येला सज्ज असल्याचेही सांगुन टाकले. पण त्याने काय लिहीले आहे व त्याचा आशय कोणता, त्याचीही दखल फ़ारशी घेतली गेली नाही. आपला मित्र म्हणून यादीत असलेला माणूस, आत्महत्येच्या तयारीत आहे असे म्हणतो, तेव्हा त्याचे गांभीर्य कोणाला कशामुळे वाटले नसेल? त्यापैकी कोणी ते खरेच वाचले होते काय? की वाचल्याशिवाय त्याला लाईक देत मित्र पुढे सरकले होते? ज्यांना मित्राच्या वेदना-यातनाही जाणुन घेण्याची इच्छा नाही वा सवड नाही, त्यांना आपण मित्र मानावेत काय? यादीत कोणालाही मित्र म्हणून सहभागी करता येते आणि त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करण्याची सुविधा, अशी सोशल माध्यमांची रचना आहे. पण खरेच असे लोक मित्र म्हणावेत काय? निदान अतुल तापकीरच्या यादीत तसे कोणी नसावेत. म्हणूनच त्याच्या त्या यातनांनाही लाईक मिळाल्या आणि मग त्याने आणखी एक प्रतिक्रीया व्यक्त करीत जगाचा निरोप घेतला. खरे तर काढलेला चित्रपट बुडीत गेला आणि डोक्यावर कर्जाचा बोजा चढला, म्हणून त्याचे वैवाहिक जीवन विस्कटून गेले होते. पत्नीशी खटके उडणे व संसारात भूकंप येणे स्वाभाविक होते. त्यावर उतारा म्हणून हा माणूस सोशल माध्यमांकडे वळला. तिथे त्याला काही दिलासा मिळण्यापेक्षा अधिकच निराश हताश होण्या़ची वेळ आणली गेली. मग त्याच्या मित्रयादीला वा एकूणच सोशल माध्यमांना गुन्हेगार ठरवायचे काय?

या आत्महत्येनंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत. त्यात सोशल माध्यमांचा उथळपणा वा बेपर्वाई या्वर सडकून टिका झालेली आह. सोशल माध्यम हे आभासी जग आहे आणि त्यापेक्षा वास्तव जग अधिक संवेदनाशील आहे, अशाही प्रतिक्रीया उमटलेल्या आहेत. जितके तापकीरच्या यादीतले मित्र बेभान होते, त्यापेक्षा त्यावर आलेल्या प्रतिक्रीयाही बेफ़ाम व बेजबाबदार नाहीत काय? वास्तव जग संवेदनाशील असल्याचा कुठला पुरावा आपल्यापाशी आहे? सोशल माध्यमाला संवेदनाशून्य ठरवताना, आज आपण जगतो त्या जगाच्या व समाजाच्या माणूसकीची कुठली साक्ष आपण देऊ शकतो? कालपरवा कुठे तरी मोटरसायकलचा अपघात झाला व त्यात दोघेजण जळून होरपळत होते. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी कोणी धावपळ केली नाही. उलट अनेकजण आपापल्या स्मार्टफ़ोनवर त्या अपघाताचे फ़ोटो काढण्यात गर्क असल्याचेही वाचनात आले. अशाच घटना नित्यनेमाने आपल्याला ऐकायला व वाचायला मिळत असतात. तो अपघात किंवा कुठल्या मुलीला उचलून कोणी गुंड पळवून नेतानाची घटना, तर आभासी जगातली वा सोशल माध्यमातील नसते ना? समाजात इतकी संवेदना असती, तर त्याही घटनेत हस्तक्षेप करायला नागरिक पुढे सरसावले असतेच. पण तसे कुठेही होताना दिसत नाही. आपण अनेक बातम्या वाचून हळवे होतो आणि खरेखोटे तपासल्याशिवाय प्रतिक्रीया देत असतो. आमिरखानचॊ ‘सत्यमेव जयते’ नामक मालिका चालू असताना कोट्यवधी प्रेक्षकांनी अशीच हळवी प्रतिक्रीया दिलेली होती. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लाखो एसएमएस पाठवले गेले आणि विषय निकालात काढला गेला होता. खरी घटना घडते तिथे हस्तक्षेप करण्याला कोणीही पुढे येत नाही. घटना घडून गेल्यावर आपण त्यातले पापी वा गुन्हेगार नाही, हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करीत असतो.

दाभोळकर वा पानसरे यांची हत्या समोर घडत असताना, किती लोकांनी त्यात हस्तक्षेप केला असता? त्यावर अहोरात्र प्रतिक्रीया म्हणून लेखांचा सडा पाडणार्‍यांनी वा वाहिन्यांवर तोंडाची वाफ़ दवडणार्‍यांनी तरी, खरेच पुढे येऊन दाभोळकर पानसरेंना वाचवण्यासाठी काही केले असते काय? ते अवघड असते. त्यासाठी प्रसंगावधान किंवा धाडस आवश्यक असते. त्यासाठी मनामध्ये प्रामाणिक संवेधनशीलता असावी लागते. त्याचाच आजकाल दुष्काळ आहे. अशा घटना घडून गेल्यावर नामानिराळे रहायचे म्हणून खेद वा सहानुभूती व्यक्त करणार्‍यांची गर्दी अफ़ाट असते. पण प्रसंगी नुसता पुढाकार घेऊन ती दुर्घटना टाळण्याची नागरी जबाबदारी कोणालाही नको असते. त्यापेक्षा नंतर ठरल्या वेळी व ठरल्या जागी हातात फ़लक घेऊन घोषणा देण्याची पळवाट सोयीची असते. ‘आम्ही सारे दाभोळकर’ म्हणून मिरवण्यात कोणता पुरूषार्थ असतो? तापकीरच्या त्या आत्महत्या विषयक पहिल्या पोस्टला लाईक देणार्‍यांची टवाळी वा टिंगल करणे खुप सोपे आहे. पण प्रत्यक्ष जीवनात आपण प्रत्येकजण तितकेच बेभान व बेसावध असतो. समोर दिसते आहे ते बघण्याचीही सवड आपल्यापाशी उरलेली नाही. त्याला लाईक करणे किंवा त्याच्याकडे पाठ फ़िरवून पळ काढणे, ही आजकालची जीवनशैली झाली आहे. गर्भातच मुलींना ठार मारणार्‍या भृणहत्येचे दवाखाने सुतिकागृहे आपल्याच आसपास असतात. त्याकडे वळूनही बघायला फ़ुरसत आपल्यापाशी नसते. पण आमिरखानच्या मालिकेसाठी शंभर दोनशे रुपयांची देणगी पाठवून निसटण्याचा मार्ग सोपा असतो. ज्याला शॉर्टकट म्हणतात. आजकालच्या स्मार्टफ़ोनच्या भाषेत त्याला ऍप म्हणतात. आपण आजकाल आपल्या जीवनशैलीत अशी ऍप सामावून घेतली आहेत. कुठलेही काय ते शोधण्यापेक्षाही झटपट तिथपर्यंत पोहोचण्याच्या घाईगर्दीत आपण हरवून गेलो आहोत.

तापकीरने ‘ढोलताशे’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याचे कथानक काय होते ते मला ठाऊक नाही. पण ही वाद्ये कुठला आवाज काढतात व किती गदारोळ माजवू शकतात, ते मला पक्के ठाऊक आहे. अशा वाद्यांचा गदारोळ सुरू झाला, मग आपलाही आवाज आपल्यालाच ऐकू येईनासा होऊन जातो. परिसरात ढोलताशे गर्जू लागले, मग आसपास काय घडते आहे किंवा कोणाच्या कर्कश किंकाळ्या कशासाठी आक्रोश करीत आहेत, त्याचेही आकलन होऊ शकत नसते. यातना, वेदना वा विविध प्रश्नांचा आवाज, त्या गदारोळात विरघळून जात असतो. जवळपास कोणा विवाहितेला हुंड्यासाठी मारहाण होत असते. कोणा मुलीवर बलात्कारही चाललेला असू शकतो. कुणाच्या घरात रुग्णाईत पडलेल्या माणसाच्या अनन्वीत यातनांचाही आवाज त्यात डुबवला जात असतो. ही वाद्ये किंवा तत्सम डिजेसारखी यंत्रे, धुमाकुळ घालतात आणि आपल्या कानठळ्या बसवून टाकत असतात. तेव्हा आपण कुणाचाही आक्रोश ऐकू शकत नसतो वा त्यामागची यातना समजू शकत नसतो. इतका बधीरपणा ढोलताशे आणत असतात. किंबहूना त्यासाठीच त्यांचा गदारोळ केला जात असतो. त्या समारंभ वा कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांना आसपासच्या वास्तविक विश्वात घडणार्‍या अमानुष वा यातनामय दु:खापासून पारखे करण्यासाठीच हा धुमाकुळ घातला जात असतो. जगण्याविषयी, माणसाविषयी वा माणुसकीच्या संबंधाने आपल्याला बधीर करण्यासाठीच तर अशा कानठळ्या बसवणार्‍या आवाजाची योजना केलेली असते. मग ढोलताशे नावाचाच चित्रपट काढणार्‍या तापकीरला त्यामागचा हेतूच ठाऊक नव्हता काय? वास्तव जगापासून माणसाला तोडून टाकण्यासाठी व त्याला काल्पनिक विश्वात घेऊन जाण्यासाठी जे व्यत्यय निर्माण केले जातात, त्यालाच तर ढोलताशे म्हणतात. आज त्याच्याशिवायही आपण स्वत:ला गदारोळात हरवून बसलो आहोत. तापकीरला ते अखेरच्या क्षणी जाणवले असेल काय?

आज जगण्याची व्यवस्था व जीवनशैलीच इतकी अमानुष व संवेदनाशून्य झाली आहे, की आपल्याला सभोवती काय घडते आहे, त्याचे अजिबात भान उरलेले नाही. मग ते एखाद्या सोशल माध्यमातील पोस्टवर लाईक करणे असो, किंवा कुठल्याही वर्तमानपत्र वा वाहिनीवर झोडलेले पांडित्य असो. संवेदनहीनता ही आपली वास्तविकता झालेली आहे. कुणाच्या दु:खाने आपल्या डोळ्यात अश्रू ओघळत नाहीत. तोही आपल्यासाठी लाईकचा वा लेख प्रतिक्रीयेचा एक विषय होऊन गेला आहे. कुणाचे दु:ख वा आनंद आपल्याला हलवू शकत नाहीत. आपला आनंद कशात आहे किंवा आपल्याला कशामुळे राग येतो, त्याची माहिती आपल्याला गुगल करून तपासावी लागते. कोणीतरी जाहिरात करून आपल्याला आनंदाची व्याख्या समजवली, तर आपण आनंदित होतो वा दु:खीकष्टीही होत असतो. त्यात आपला सहभाग नसतोच. सर्वकाही अगदी आपोआप होत असते. मदर्सडे असतो, तेव्हा आपल्याला आईने जन्म दिल्याचे स्मरण होते आणि आणखी कुठला दिवस आठवण करून दिल्यावर आपण यंत्रावर शुभेच्छा देण्याचा रतीब घालू लागतो. कशाचा निषेध करावा आणि कोणाचे कौतुक करावे, तेही आपल्याला आता स्वतंत्रपणे ठरवता येत नाही. आपण आपले राहिलोय कुठे? प्रत्येक बाबतीत आपल्यावर बाजाराचा प्रभाव पडलेला आहे. तापकीरही आपल्यासारखाच होता. कुणा खर्‍या जीवाभावाच्या मित्राला गाठून मन मोकळे करण्याचा विचार त्याला तरी कुठे सुचला? त्यानेही आपली व्यथा यंत्रवत भावनाशून्य सोशल माध्यमात जाहिर करून टाकली आणि एका निर्जीव सत्वहीन यंत्राकडून संवेदनाशील प्रतिक्रीयेची अपेक्षा करीत बसला. ती पुर्ण झाली नाही आणि त्याच्यातला खरा माणूस उफ़ाळून बाहेर आला. आपण कुठल्या प्राणिमात्रामध्ये जगतोय, या कल्पनेनेच भयकंपित होऊन गेला. जिथे माणसाला माणुसकी कळत असेल तिथे निघून जाऊ, म्हणून त्याने या ढोलताशांच्या गदारोळातून स्वत:ला बाजूला केले असावे बहुधा!

2 comments:

  1. डोळ्यात अंजन घालणारे लिखाण

    ReplyDelete
  2. लक्ष्मीकांत दडपेJune 2, 2017 at 3:28 AM

    संवेदनशीलता हरवून बधिर झालेल्या समाजात अजून काय अपेक्षीत असणार आहे..

    ReplyDelete