Wednesday, May 31, 2017

उपाय हीच समस्या आहेमागल्या काही दिवसात कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नाही. म्हणूनच पक्षाची सर्व सुत्रे राहुल गांधी यांच्या हाती आलेली आहेत. त्यांनी कॉग्रेसला संकटातून बाहेर काढावे आणि पक्षाचे पुनरुत्थान करावे, अशी तमाम कॉग्रेसजनांची अपेक्षा आहे. पण दुर्दैव असे, की राहुल गांधी हे कॉग्रेससाठी उपाय नसून तीच त्या पक्षासाठी मोठी समस्या बनलेली आहे. आज ज्या स्थितीत कॉग्रेस सापडलेली आहे, ती नेतृत्वाची समस्या आहे. बदलत्या काळाबरोबर पक्षाला व संघटनेला कार्यान्वित करणारे नेतृत्व आवश्यक असते. नवनव्या कल्पना घेऊन कार्यकर्त्याला उत्तेजित करण्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. तिथे नेता कमी पडू लागला, मग कितीही मोठी संघटना असो, ती पराभूतच होऊ लागते. २००४ सालातही हाच भाजपा होता. पण त्याचे नेतृत्व आळसावलेले होते आणि त्यातला नवेपणा संपलेला होता. उलट तुलनेने अशक्त संघटना असूनही कॉग्रेसला सोनियांच्या रुपाने आक्रमक व नवा नेता मिळालेला होता. त्याचे परिणाम तेव्हा दिसले आणि दहा वर्षे भाजपाला त्यातून बाहेर पडता आले नाही. दहा वर्षानंतर नरेंद्र मोदींसारखा नेता पुढे आला आणि त्याने भाजपाचे असे पुनरुत्थान घडवून आणले, की त्याची संघटना व यश अक्राळविक्राळ भासू लागले आहे. हा चमत्कार जसा घडला तसाच चमत्कार कॉग्रेसलाही घडवणे अवघड नाही. त्यांना उद्धार करणारा त्यांचा मोदी शोधण्याची गरज आहे. राहुलमध्ये तो चमत्कार घडवण्याची कुवत नाही. ऐंशी वर्षाचे अडवाणी ही जशी चार वर्षापुर्वी भाजपाची समस्या होती, तशी पन्नाशीतले राहुल ही आजच्या कॉग्रेसची समस्या झाली आहे. पर्यायाने पुरोगामी राजकारणाची तीच समस्या आहे. त्यातून बाहेर पडायचे तर मोदींनी भाजपासाठी काय केले, त्याचा शोध घ्यायला लागेल. सलग दोन वर्षे मोदींनी आपल्या व्यक्तीमत्वाने सामान्य पक्षकार्यकर्त्याला भारावून टाकले आणि लढवय्या म्हणून सज्ज केले. राहुलपाशी तितकी किमया आहे काय?

२०१२ पासून नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जाऊ लागले. पण त्यांनी कधी तसा दावा केला नाही. तरीही देशभरच्या भाजपा कार्यकर्त्यामध्ये त्यातून एक उत्साह निर्माण होत गेला. दिल्लीत बसलेल्या भाजपा नेतृत्वालाही मोदींचा तो दावा मान्य नव्हता. म्हणूनच अशी चर्चा सुरू झाली, मग भाजपाचे नेते प्रवक्ते त्याविषयी मूग गिळून गप्प बसायचे. कारण तोपर्यंत तरी भाजपाचे एकमुखी नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांच्याकडेच असल्याचे मानले जात होते. त्याला आव्हान उभे करणे सोपे काम नव्हते. मोदींची लोकप्रियता अडवाणींपेक्षाही अधिक असली तरी पक्ष मोडून काहीही साध्य होणार नव्हते. म्हणूनच मोदींनी अतिशय चतुरपणे कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने ओढायची मोहिम हाती घेतली. गुजरातबाहेर पडून त्यांनी अन्य राज्यात प्रचार व सभा घेण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांच्या लोकप्रियतेला प्राधान्य असल्यामुळेच अन्य राज्यातून त्यांना मागणी होती. मते मिळवण्यापेक्षाही मोदी स्वपक्षातील कार्यकर्त्याला आपल्याशी जोडून घेण्याला प्राधान्य देत गेले. सहाजिकच नजिकच्या काळात पक्षात त्यांचे वजन वाढत गेले आणि संघटनेतही त्यांना प्राधान्य देण्याची वेळ आपोआप येत गेली. राहुल गांधींना जसे जन्मामुळे कॉग्रेसचे उपाध्यक्षपद किंवा नेतृत्व मिळाले, तशी मोदींची स्थिती नव्हती. पक्षाचे कालबाह्य झालेले नेतृत्व झुगारण्याची मानसिकता त्यांनी आधी पक्षाच्या पाठीराखे व कार्यकर्त्यात जोपासली आणि पर्यायाने पक्षाच्या पुनरुत्थानासाठी संघटनेत राबणारा प्रत्येकजण मोदींकडे त्याच आशेने बघू लागला. त्यात अडवाणींनी कितीतरी अडथळे आणुन बघितले, पण त्याचा उपयोग झाला नाही. नेत्यांना मान्य नसलेला पण कार्यकर्त्यात लोकप्रिय असलेला नेता म्हणून श्रेष्ठींना नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय राजकारणात पुढे आणण्याखेरीज काही गत्यंतर उरले नाही. त्यांच्या अन्य राज्यातील सभांना मिळणारा प्रतिसाद त्यांची शक्ती होती.

कॉग्रेसला तसेच करावे लागेल. त्या पक्षाची जी मूठभर कार्यकर्त्यांची संघटना आजही शिल्लक आहे, तिला नव्याने पुनरुज्जीवित करावे लागेल. तसे करणारा कोणी नेता पुढे आणावा लागेल. तसा नेता उपलब्धच नाही, असेही म्हणायचे काही कारण नाही. जगमोहन रेड्डी वा ममता बानर्जी यांनी तशी चुणूक दाखवली आहे. जगमोहनला अननुभवामुळे तितके यश मिळालेले नसेल. पण ममता बानर्जी यांनी बंगालमध्ये तो प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. १९७७ ला बंगालची सत्ता गमावल्यापासून कॉग्रेसने कधी त्या राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयासच केला नाही. तिथे प्रस्थापित झालेल्या डाव्या आघाडीला राजकीय आव्हान देण्याचा प्रयासही केला नव्हता. त्यासाठी खुप अट्टाहास करून थकलेल्या ममता बानर्जींनी १९९९ सालात बंड पुकारले आणि वेगळी चुल मांडली. सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून त्यांनी तृणमूल कॉग्रेस या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. कधी भाजपासोबत तर कधी कॉग्रेससोबत युती आघाडी करून आपला अट्टाहास चालू ठेवला. बारा वर्षे गेली, पण २०११ सालात त्यांनी डाव्या आघाडीला पराभूत करून सत्तेपर्यंत मजल मारून दाखवली. त्यांनी कुठली नवी पक्ष संघटना उभारली नव्हती. आधीपासून कॉग्रेसमध्येच असलेल्या पण केंद्रीय नेतृत्वाच्या नाकर्तेपणाला कंटाळलेल्या कार्यकर्त्याला उभारी देण्याचा सपाटा ममतांनी लावला. त्यातून तृणमूल कॉग्रेसचा विस्तार व प्रसार होत गेला. मिळेल त्या वादात उतरून आंदोलनाचा पवित्रा घेत ममतांनी नव्याने बंगालामध्ये मृत झालेल्या कॉग्रेस पक्षाचे पुनरूज्जीवन केले. मग तशाच मार्गाने आज मरगळलेल्या देशव्यापी कॉग्रेसचे पुनरुत्थान होऊ शकणार नाही काय? पण ते राहुल गांधी करू शकत नाहीत. कारण राहुल हे कॉग्रेसच्या मार्गातील अडवाणी झाले आहेत. पक्षाला उभारी द्यायला ते निरूपयोगी आहेत आणि म्हणूनच राहुल ही कॉग्रेसच्या पुनरुत्थानातील समस्या आहे.

मोदींनी भाजपाच्या पुनरुत्थानाचा विषय हाती घेण्याच्या आधीची भाजपा आणि आजची कॉग्रेस यात कितीसा फ़रक आहे? दोन विधानसभा निवडणूका उत्तरप्रदेशात तोच पक्ष होता. पण त्याला पन्नास आमदारांचा पल्ला गाठता येत नव्हता. आज तिथेच भाजपाने तिनशेचा पल्ला ओलांडला आहे. त्याला मोदींच्या व्यक्तीमत्वाचा करिष्मा असे संबोधून पळ काढता येणार नाही. करिष्मा म्हणजे तरी काय असते? आपल्या कार्यकर्ते व पाठीराख्यांना उत्साहित व कार्यान्वित करणारा नेता, म्हणजेच करिष्मा असतो ना? तेच ममतामध्ये दिसते आणि त्याचीच प्रचिती जयललितामध्ये आढळुन येत होती. आयती गर्दी जमेल अशा जागी पर्यटक म्हणून भेट देणारे राहुल गांधी आणि कुठल्याही राज्यात जाऊन धडकण्याची हिंमत करणार्‍या ममता, यातला फ़रक लक्षात घेतला पाहिजे. आजही कॉग्रेसच्या दुबळ्या मरगळ आलेल्या पक्ष संघटनेत कोणी असा उभारी देणारा कोणी पुढे आला, तर मोदींसाठी राजकारण सोपे रहाणार नाही. मोदींचा करिष्मा बंगाल वा तामिळनाडूत चालला नाही. कारण तिथे स्थानिक पातळीवर त्यांच्याशी टक्कर देऊ शकणारे नेते व पक्ष उपलब्ध होते. देशव्यापी राजकारणात तशी कुवत भाजपाइतकीच कॉग्रेस संघटनेत आहे. पण कॉग्रेसमध्ये कोणी नरेंद्र मोदी त्यासाठी पुढाकार घेऊ शकलेला नाही. सोनिया व राहुल यांना कुशलतेने बाजूला करून कॉग्रेसच्या संघटनेत जान फ़ुंकायला कोणी पुढे आलेला नाही. पर्यायाने अन्य प्रादेशिक वा पुरोगामी पक्षांना एकत्रित करू शकणारा पर्यायही देशात उभा राहू शकलेला नाही. कारण विरोधी वा पुरोगामी पक्षांना एकत्र करण्यासाठी कॉग्रेस सोडून अन्य पर्याय नाही. पण कॉग्रेससाठी सोनियांची इच्छा ही समस्या आहे. कारण त्यांना राहुल सोडून अन्य कोणी कॉग्रेसचा नेता म्हणून नको आहे. पर्यायाने तमाम पुरोगामी पक्षांसाठी राहुल ही देशव्यापी समस्या होऊन बसली आहे. तेच मोदींसाठी बलस्थान झाले आहे.

1 comment:

  1. भाऊ फक्त वरच नाही तर स्थानिक पातळीवरचे नेते सुद्धा घराणेशाही जपुन आहेत हे सर्वात वाईट आहे

    ReplyDelete