Thursday, May 25, 2017

रक्तबंबाळ बुद्धीबळ

Image result for 26/11

सोशल माध्यमातून वा अन्य माध्यमातून आपल्या तोंडाची वाफ़ दवडणार्‍यांमध्ये किती प्रामाणिकपणा असतो? आपण जे शब्द उच्चारतो, त्याच्यामागे ठामपणे उभे रहाण्याची त्यापैकी किती लोकांमध्ये हिंमत असते? शब्दवीर आणि कृतीवीर यांच्यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. शब्दवीर हा तावातावाने बोलू शकतो. त्यातून तो कुठल्याही मोठ्या लढवय्याला पादाक्रांत करू शकतो. पण शब्दांची धार संपून जेव्हा शस्त्राची धार प्रभावी होते, तेव्हा शब्दवीराचे हातपाय गळपटू लागतात. सर्वात आधी ढुंगणाला पाय लावून पळणारा शब्दवीर असतो. ह्यात नवे काहीच नाही. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत अजमल कसाब आपली टोळी घेऊन आला आणि दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडू लागला; तेव्हा किती शब्दवीर गोळ्या झेलायला पुढे सरसावले होते? करकरे, कामटे वा साळसकर त्या गोळ्यांन बळी पडले. त्यांनी कधी इतकी तोंडाची वाफ़ दवडली नव्हती. पण गोळ्या अंगावर झेलायचा प्रसंग आला, तेव्हा तेच आघाडीवर होते. वाहिन्यांवरून आपल्याला नित्यनेमाने शहाणपण सांगणारे वा कसाब इत्यादींचा भ्याडपणाची प्रवचने ऐकवणारे, तेव्हा आपापल्या सुरक्षित बिळात दडी मारून बसले होते. पुढे सरसावला तो तुकाराम ओंबाळे! आपण त्याच्याकडे शहीद म्हणून बघतो. पण तोही कसाब इतकाच बेधडक नव्हता काय? हातात कुठली बंदुक वा पिस्तुल नसताना कसाबला मिठी मारायला पुढे झालेला ओंबाळे, क्षणभरही आपल्या घर कुटुंबाचा विचार करीत मागे सरला नाही. आपल्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे म्हणून त्याने प्राण पणाला लावले. कसाबनेही त्याची जी काही जिहादची भूमिका आहे, ती सत्य ठरवण्यासाठी त्याचा जीव धोक्यात घातला होता. बाकीचे आपण तोंडाळपणा करणारे, अशा कसोटीच्या प्रसंगी कुठे होतो? कधीतरी असा प्रसंग येतो तेव्हा आपण कुठे असतो? आपण कसाब इतके तरी प्रामाणिक असतो काय?

पाकिस्तानातून सागरी मार्गाने मुंबईत येऊन हिंसेचे थैमान घालण्यासाठी आलेला कसाब, विकृत विचारांनी प्रवृत्त झालेला होता आणि ओंबळे करकरे सत्प्रवृत्त होते. पण दोन्ही बाजू बघितल्या तर आपल्या भूमिकेसाठी आपले सर्वस्व पणाला लावायला त्यांनी मागेपुढे बघितले नाही. त्या दोघांमध्ये असलेला आपल्या भूमिका विचाराशी निष्ठावान प्रामाणिकपणा, आपण कधीतरी दाखवू शकलो आहोत काय? ही शब्दवीर लोकांची शोकांतिका असते. जाज्वल्य स्फ़ोटक शब्द बोलण्यात आघाडीवर असलेले, सर्वाधिक पळपुटे असतात आणि आपल्या शब्दांनी ते सामान्य माणसाच्या मनात आगी लावत असतात. पण ज्याक्षणी त्या आगी प्रलय समोर येण्याची चिन्हे दिसू लागतात, तेव्हा सर्वात आधी पळ तेच शब्दवीर काढतात. मग सर्वकाही शांत सुरक्षित झाल्यावर त्यांच्या तोंडाची टकळी पुन्हा सुरू होत असते. कसाब टोळी मुंबईत आली, त्याच्या तीन दिवसानंतर मुंबईतला हिंसाचार थांबला होता आणि राजदीप सरदेसाई आपल्या नेहमीच्या पोपटपंचीचा प्रयोग घेऊन मुंबईर फ़िरत होता. ठरल्याप्रमाणे त्याने शोभा डे नावाच्या नटव्या महिलेला ‘मुंबई स्पिरीट’ हा शब्द ऐकवला. तर तिने आपण कसे भयभीत आहोत, त्याचा पाढा वाचला होता. कारण स्पष्ट होते. तो हल्ला कुठल्या बसस्टॉपवर किंवा रेल्वेपुरता मर्यादित नव्हता. तर शोभा डे ज्या वाचाळवीरांच्या टोळक्यात मौजमस्ती करीत पंचतारांकित हॉटेलात पांडीत्य झाडत असते, त्याही जागी कसाब टोळीने हिंसेचे थैमान घातले होते. तात्विक व वैचारिक अलिप्तपणा संपला होता आणि साक्षात मृत्यू समोर असल्याची जाणिव त्या महिलेला झाली होती. म्हणूनच मुंबई स्पिरीटचे शब्द तिला हिंमत देऊ शकले नाहीत. कारण आता आपलाही जीव धोक्यात येऊ शकतो, याची जाणिव झालेली होती. अशा लोकांपेक्षा क्रुरकर्मा कसाबही खुप प्रामाणिक असतो. कराचीहून मरायलाही इथपर्यंत येऊ शकतो.

कसाबचे मुंबईतील थैमान असो किंवा आजकाल काश्मिरात चाललेला हुर्रीयतचा जिहादी हिंसाचार असो. त्यातला रक्तपात अस्सल आहे. त्याच्याशी कसे झुंजावे किंवा त्याला कसे सामोरे जावे, याची भाषा वातानुकुलीत दालनात बसून बोलणार्‍या  बदमाशांना आपला जीव धोक्यात घालायचा नसतो. अन्य कोणी करकरे, ओंबाळे, कामटेंनी यांच्यासाठी आपल्या जीवावर उदार व्हावे आणि मरावे, असा त्यांचा वैचारीक लढा असतो. मग त्यात मरणारा कोणी भारतीय सैनिक असो किंवा कसाबसारखा जिहादी असो. या शहाण्यांना दोघांपैकी कोणाच्याही सुरक्षेची, स्वातंत्र्याची वा अधिकाराची काडीमात्र फ़िकीर नसते. एकप्रकारे असे लोक सामान्य माणसाच्या भावनांशी रक्ताचा पोरखेळ करत असतात. त्यांच्या शब्दांना भुललेला सामान्य कसाब किंवा ओंबाळे आपले सर्वस्व पणाला लावत असतो. या हुर्रीयतच्या नेत्यांपैकी जिलानी नामे एकजण आहेत. त्यांची मुले परदेशात उच्चशिक्षण घेत आहेत आणि काही भारत सरकारच्या नोकरीत आहेत. म्हणजे जी व्यवस्था उपलब्ध आहे, त्याचे सर्वच्या सर्व लाभ घेऊन अशा लोकांचे कुटुंबिय मौजमजा मारीत असतात. त्यांच्यात उठबस करून अरूंधती रॉय आझादीच्या गप्पा रंगवत असते. उलट कायदा राखला पाहिजे म्हणून त्याच जिलानीच्या सुरक्षेला आसामच्या सामान्य घरातला गोगोई आपले प्राण धोक्यात घालायला सज्ज असतो. अरुंधती असो, शोभा डे असो किंवा जिलानी, फ़ारूख-उमर असोत, त्यांच्या वाचाळतेसाठी गोगोईने आपला जीव धोक्यात घालायचा असतो. त्यांच्याच शब्दाने भारावलेला कोणी बुर्‍हान वाणी लपूनछपून घातपाताचे खेळ करत असतो आणि मारला जात असतो. गोगोई, बुर्‍हान वा कसाब, ही सगळीच अशा बुद्धीमंतांना आपल्या रक्तलांच्छित पटावरची प्यादी वाटत असतात. किती भयंकर सत्य आहे ना? त्यातले एक प्यादे स्वयंभू झाल्याने सर्वजण विचलीत झाले आहेत.

या रक्तपाती बुद्धीबळाच्या पटावर इकडचे तिकडचे सर्व मोहरे प्यादे आपल्या इच्छेने काहीही करू शकत नाहीत. त्यांना जसे खेळवले जाईल तसे त्यांनी खेळायचे आहे आणि प्रसंगी मरायचेही आहे. पण आपला जीव धोक्यात असताना आपली विवेकबुद्धी वापरून त्यापैकी एका मोहर्‍याने, म्हणजे मेजर गोगोईने काही केल्यामुळे देशातले तमाम बुद्धीमंत बिथरले आहेत. त्यांच्या लेखी मेजर गोगोईला तिथे दगड खायला वा कुणातरी जिहादीने झाडलेल्या गोळीचा बळी होण्यासाठी धाडले होते. त्याने आपली बुद्धी वापरून आपलीच वेगळी चाल खेळलीच कशी? ही खरी समस्या आहे. कसाबला जशी स्वत:ची बुद्धी वापरण्याची मुभा त्याच्या बोलवित्या धन्याने दिलेली नाही, तशीच गोगोईलाही आपली बुद्धी वापरण्याची मुभा संविधानाने दिलेली नाही, अशा काहीसा हा चमत्कारीक युक्तीवाद आहे. त्याने एकही गोळी झाडली नाही. पण योग्य वेळी आपल्या विवेकाचा वापार करून सर्वांनाच जीवदान दिले. म्हणून रक्तपात टळला आणि रक्तलांच्छित बुद्धीबळाचे विक्रमवीर शब्दवीर चवताळले आहेत. त्यांच्या शब्दाखातर गोगोईने मरायचे असते आणि शक्य झाल्यास आणखी कोणाला मारून टाकायचे असते. रक्तपात घडवायचा असतो. त्याने माणसाला निसर्गाने दिलेली विवेकबुद्धी वापरल्याने बुद्धीमंत विचलीत झाले आहेत. कारण आज एक गोगोई आपली बुद्धी वापरू लागला आहे. उद्या जिहादच्या आझादीच्या नावाने चिथावलेले मोहरे प्यादे आपापला विचार करू लागले, तर या रक्तपाती बुद्धीबळाच्या खेळाचे भवितव्य काय असेल? त्याच्या पटावर सरकणार्‍या वा मरणार्‍यांना कुठलाही विवेकी विचार करण्याची मुभा नाही. कारण अशी प्यादी मोहरे आपलाच विचार करू लागली, तर त्यांच्या हातातही मारक हत्यारे शस्त्रेल खेळाडू म्हणून मिरवणार्‍या शब्दवीरांवर रोखली जाणार आहेत. गोगोईने त्याची सुरूवात केली आहे. म्हणून तर एका सैनिकाच्या पराक्रमाने देशातले पुरोगामी विचारवंत भयभीत होऊन गेले आहेत.

No comments:

Post a Comment