Thursday, May 18, 2017

तीन वर्षानी झाडाझडती?मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत आणि त्या कालखंडात या सरकारने काय केले, असा सवाल वि़चारला जाणेही स्वाभाविक आहे. त्याचा तपशील भाजपा मांडणारच आहे. सामान्य मतदाराने मोठ्या विश्वासाने मोदींना सत्तेवर आणून बसवले, तर त्यांच्यासाठी मोदींनी काय केले, त्याचा तपशील सरकारला द्यावाच लागणार आहे. पण जनतेच्या वतीने आपणच सरकारला जाब विचारू शकतो, अशा भ्रमात वावरणार्‍यांनी मोदी सरकारला जाब विचारला असेल, तर त्यांच्यासाठी सरकारने काय केले, तेही दाखवणे अगत्याचे आहे ना? त्याची सुरूवात आधीच झाली आहे. या आठवड्यात अकस्मात लालू व चिदंबरम यांच्यावर पडलेल्या धाडी त्याची साक्ष आहेत. नरेंद्र मोदींचे सरकार गेल्या तीन वर्षात विरोधकांसाठी काय करत होते, त्याचे उत्तर या धाडींमध्ये आलेले आहे. त्यात लालू व चिदंबरम यांच्या कुटुंबियांच्या एकाहून एक भयंकर भानगडी चव्हाट्यावर आणल्या गेल्या आहेत. गुन्हेगारी व फ़ौजदारी गुन्ह्यात गोवता येतील, अशी माहिती त्यातून समोर आलेली आहे. ही माहिती अकस्मात एकाच दिवशी हाती आलेली नाही. लालूंच्या मुलांना अल्पावधीत कोट्यवधीची मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत कुठून पैसे मिळाले? किंवा चिदंबरम यांच्या सुपुत्राला अठरा देशात मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत कुठून उत्पन्न मिळाले? त्याचे उत्तर दोघांनाही देता आलेले नाही. त्यांच्या विरोधातले पुरावे इतके सज्जड आहेत, की तमाम वाहिन्यांना त्याचे तपशील सांगत विवेचन करावेच लागले आहे. कुठल्याही पत्रकाराला इतका एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करणे शक्य नाही. किंवा आवश्यक कागदपत्रे मिळवणे वा संगतवार मांडणे शक्य नाही. याचा अर्थच सरकारी खात्यातून त्या शंकाचा आधीच बारकाईने अभ्यास करण्यात आला होता आणि त्याची संगतवार मांडणी केल्यावरच या धाडी घालण्यात आल्या. त्याचे आवश्यक तपशील सज्ज ठेवले गेले. तीन वर्षे मोदी सरकार विरोधकांसाठी तेच तर काम करत असणार ना?

लोकसभेत प्रथमच आलेल्या नरेंद्र मोदींनी आपली नेतेपदी निवड झाल्यावर जे भाषण केले होते, त्याचा आज बहुतेकांना विसर पडलेला आहे. जे कोणी निवडून आलेत किंवा पराभूत झालेत, त्या सर्वांसाठी हे सरकार आहे. ज्यांनी भाजपाच्या व मोदी विरोधात प्रचार केला, त्यांच्यासाठीही हे सरकार काम करणार असल्याची ग्वाहीच मोदींनी दिलेली होती. मग त्यांनी विरोधकांसाठी कोणते काम केले? तर मागल्या दिर्घकाळात ज्यांनी सतत मोदींच्या विरोधात आवाज उठवला, किंवा मोदींना अपशकून केले, त्यांच्यासाठीही काही केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी आधीपासून ठरवलेले असणारच. सहाजिकच सत्तासुत्रे हाती आल्यापासून मोदींनी आपल्या काही ठराविक खास अधिकारी व विश्वासू लोकांना, विरोधकांची कुंडली मांडण्याच्या कामी जुंपलेले असावे. त्यांनी सरकारी कागदपत्रे व विविध आरोप यांची छाननी करून, प्रत्येक विरोधी नेत्याची कुंडली मांडण्याचे काम करायचे होते. नुसते आरोप वा प्रत्यारोप नव्हेत, तर जे आरोप सिद्ध होऊ शकतील, तेच गोळा करायचे. त्याला पुरक ठरतील असे पुरावे सज्ज करायचे काम हाती घेतलेले असणार. तसे नसते तर चिदंबरम वा लालूंना असे गोत्यात घालणे शक्य नव्हते. घाईगर्दीने विरोधकांवर आरोप करणे किंवा खटले भरणे सोपे असते. त्यातून सूडबुद्धीचा वास येतो आणि बाकी काहीही साध्य होत नाही. त्यापेक्षा कारवाई अशी करायची, की त्यात विरोधक गुरफ़टून जायला हवेत. जितके त्या जंजाळातून सुटायची धडपड करतील, तितके त्यात अधिकच फ़सत जातील, अशी सज्जता पहिल्या दिवसापासून हाती घेतली गेली असणार. म्हणूनच ह्या धाडी पडल्यानंतर लालू वा चिदंबरम कुठलेही समर्पक उत्तर देऊ शकलेले नाहीत. आपल्या विरोधात जाणार्‍यांना अशा जाळ्यात ओढायचे, की त्यांना त्यातून मुक्त होण्याचा कुठलाही मार्ग शिल्लक ठेवायचा नाही, ही मोदींची नेहमीची रणनिती राहिली आहे.

गेल्या तीन वर्षात मोदींनी जनतेसाठी काय केले, ते मतदाराला समजावण्याची अजिबात गरज नाही. नोटबंदी असो किंवा विविध जनहितच्या योजना असोत. त्याविषयी सामान्य जनतेला खुप काही अनुभवातूनच कळलेले आहे. दोन कोटीहून अधिक गरीब घरात जाऊन पोहोचलेले गॅसचे सिलींडर, किंवा चौदा हजार गावात प्रथमच जाऊन पोहोचलेला वीजपुरवठा, या गोष्टी डरकाळी फ़ोडून सांगण्याची गरज नाही. त्याच अनुभवामुळे विविध विधानसभेत लोकांनी भाजपाला इतके मोठे यश बहाल केलेले आहे. सवाल ज्यांना यातले काही दिसत नाही, त्यांचे डोळे उघडण्याचा आहे. लालू, राहुल वा चिदंबरम यांच्या सारख्यांचे डोळे उघडले, तरच त्यांना समोरचे सत्य बघता येईल ना? तर त्यासाठी त्यांच्या झोपेतून त्यांना जागे करावे लागणार ना? ती झोप उडवण्यासाठी या धाडी घातल्या आहेत. त्या धाडीसाठी मागली तीन वर्षे अखंड शोधाशोध व जमवाजमव चालली असणार. अन्यथा इतके सारे तपशील व कागदोपत्री पुरावे कुठून जमा होऊ शकले असते? उदाहरणार्थ शीना बोरा खुनातील आरोपी असलेले पीटर मुखर्जी व त्याची पत्नी इंद्राणी मुखर्जी, यांच्या कंपनीला चिदंबरम यांनी बेकायदा व्यवहारात दिलेले संरक्षण, कसे उजेडात आले असते? या दुकलीने चार कोटी परदेशी गुंतवणूकीची परवानगी असताना, तब्बल ३०५ कोटी परदेशी भांडवल भारतात आणले. तर अर्थखाते तिकडे डोळे उघडून बघायलाही राजी नव्हते, कारण अर्थमंत्री पुत्राने पित्याच्या डोळ्यावर कातडे पांघरलेले होते. मुखर्जी दुकलीने चिदंबरम पुत्राला काही कोटीची रक्कम देऊन बापाचे डोळे बंद ठेवण्याच्या कामी जुंपलेले होते. इतका जुना व्यवहार व कागदपत्रे झटपट थोडीच मिळत असतात? त्यासाठी काही वर्षे खर्ची पडणारच ना? मोदी सरकारला त्यात तीन वर्षे खर्ची घालावी लागली. म्हणून आपल्या तिसर्‍या वर्धापनदिनी मोदींनी विरोधकांसाठी काय केले, त्याची साक्ष धाडसत्रातून दिलेली आहे.

नरेंद्र मोदी जनहितासाही कटीबद्ध असल्याचे नेहमी सांगत असतात. पण तेही राजकारणी आहेत आणि अशा नेत्याला नेहमीच आपल्या विरोधकांना नामोहरम करायचे डाव खेळावेच लागत असतात. मोदी त्यात अतिशय पारंगत आहेत. त्यांनीही आपल्या विरोधकांना तीन वर्षे टिकाटिप्पणी करण्याचे मुक्त रान दिले. पण आता पुढल्या लोकसभेचे वेध लागले आहेत आणि विरोधक आपल्या पायावरही उभे राहू नयेत, इतकी सज्जता मोदींना करायची आहे. त्याचा आरंभ या धाडसत्रातून करण्यात आला आहे. जसजसे दिवस जातील, तसतशा अनेक राजकीय विरोधकांच्या भानगडी चव्हाट्यावर आणल्या जाणार आहेत. त्यापैकी काही लोकांच्या तक्रारीतून आरंभल्या जातील, तर काही कोर्टाच्या माध्यमातून सुरू होतील. कुठलीही भानगड चव्हाट्यावर आणली, मग तिचा कोर्टात व कायद्यच्या कसोटीवर पाठपुरावा करण्याची सज्जता आधीपासून राखण्यात आलेली आहे. याला मोदींचा कारभार म्हणतात. त्यांनी आपल्या विरोधकांनाही वंचित ठेवलेले नाही. विरोधकांसाठीही मोदी सरकार अतिशय मेहनत घेत आहे आणि प्रत्येकाच्या पापकर्माची कुंडली सज्ज करण्यात आलेली आहे. सहाजिकच निवडणुका लढायच्या की जुन्या पापकर्माचे खुलासे देत बसायचे, अशी समस्या विरोधकांना भेडसावणार आहे. कारण अशा प्रत्येक भानगडीचे पुरावेही सज्ज आहेत. मोदींच्या विरोधात बोलायला जातील, त्या प्रत्येकाला आपल्या पापकर्मावर प्रश्न विचारले जावेत, अशी ही रणनिती आहे. थोडक्यात अच्छे दिन कुठे आहेत असा सवाल करणार्‍यांसाठी, आता बुरे दिन सुरू झालेले आहेत. किंबहुना मोदी विरोधी असतील त्यांच्यासाठी मोदींनी बुरे दिन आणले आहेत. तीन वर्षात पंतप्रधान म्हणून मोदींनी काय दिवे लावले, त्याचे उत्तर असे चमत्कारीक आहे. विरोधकांचे बुरे दिन म्हणजेच मोदींसाठी अच्छे दिन नव्हेत काय?

5 comments:

 1. Will it be Thakre and Raut after the president's elections ?

  ReplyDelete
  Replies
  1. Why not?
   Sau sundar ki, ek luhaarki!!

   Delete
 2. Atishay marmik vivechan. Abhar

  ReplyDelete