Saturday, May 20, 2017

रामदेव बाबांचा ‘राज’योग

raj thackeray ramadev के लिए चित्र परिणाम

खरेतर मागल्या विधानसभा निवडणूकीनंतर मनसे म्हणजे राज ठाकरे यांचा राजकीय पक्ष, बराचसा थंडावलेला होता. मनसेचा प्रभाव मोदीलाटेतच वाहून गेल्याचे आधी लोकसभा निवडणुकीच्या निकालातच दिसून आले होते. आपल्याला बसलेला फ़टका राज ठाकरेंच्याही लक्षात आला होता. म्हणून तर त्यांनी लोकसभेच्या निकालानंतर तात्काळ आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची विशाल सभा घेऊन आपणच व्यक्तीगतही निवडणूक रिंगणात उतरू शकतो, असा इशाराही दिलेला होता. ते होऊ शकले नाही, तरी राजकारणात टिकून रहाण्यासाठी त्यांनी केलेला तो अखेरचा प्रयास होता, असेही म्हणता येईल. दोन कॉग्रेस, भाजपा व शिवसेना; अशा चार प्रमुख पक्षांच्या राज्यव्यापी राजकारणात आपली जागा निर्माण करणारा नवा राजकीय पक्ष, म्हणून मनसेकडे लोक बघत होते. त्याच दिशेने त्याची वाटचालही सुरू होती. प्रामुख्याने शिवसेनेला पर्याय म्हणूनही मनसेचे राजकारण आकार घेत होते. जवळपास शिवसेनेचे विषय व मुद्दे घेऊनच राज ठाकरे राजकीय वाटचाल करीत होते. मात्र दरम्यान आकस्मिक येणार्‍या प्रतिक्रीया वा परिस्थितीला संयमाने सामोरे जाणे, त्यांना शक्य झाले नाही. उद्धव ठाकरे यांच्या हाती सेनेची सुत्रे गेल्यानंतर पर्याय होऊ शकणार्‍यांना हळुहळू बाजूला करण्याचे डावपेच झाले. त्यातून नारायण राणेना पक्षातून बाहेर पडावे लागले आणि पुढला नंबर राज ठाकरे यांचा होता. झालेही तसेच! पण सेनेमध्ये किती नाराजी व अस्वस्थता होती, त्याची साक्ष राजनी वेगळी चुल मांडताच मिळाली. त्यांच्या सोबत आमदार वा सेनेचे कोणी नेते गेले नसले, तरी मोठ्या संख्येने तरूणांचा ओढा राजकडे होता. त्याचप्रमाणे मतदारानेही त्यांना कौल दिला होता. आता त्या पक्षाचे भवितव्य काय आहे? मनसे पुन्हा नव्या शक्तीनिशी उभा राहिल काय? परवा योगगुरू बाबा रामदेव, कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन राजना भेटल्यावर हा प्रश्न चर्चेत आला आहे.

मनसे पुन्हा बाळसे धरणार काय? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आधीच्या दहा वर्षात त्या पक्षाला उभारी कशी मिळाली व मरगळ कशामुळे आली, तेही विसरून चालणार नाही. आपल्याला लोकांनी कशासाठी प्रतिसाद दिला होता आणि आपल्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, त्याचा गंभीरपणे नेतृत्वाने विचारच केला नाही. ही मनसेची खरी समस्या आहे. पहिल्या प्रयत्नात तेरा आमदार २००९ सालात त्या पक्षाला मिळाले, तर पाच वर्षात त्याची इतकी दुर्दशा कशामुळे झाली? याचे एक महत्वाचे कारण अपेक्षाभंग हेच असू शकते. मनसेकडे लोक मरगळलेल्या शिवसेनेला पर्याय म्हणून बघत होते आणि राज यांनीही त्या अपेक्षा पुर्ण करण्याचा सपाटा लावलेला होता. मराठी अस्मितेचा विषय असो किंवा पाकिस्तान विषयक सेनेच्या भूमिका असोत. शिवसेना आळसावलेली होती आणि तसे विषय राजनी मोठ्या चतुराईने उचलले होते. पण व्यवहारात आपल्या चुलत भावाला व त्याच्या भोवती जमलेल्या टोळीला शह देण्याच्या पलिकडे राजकीय विचार मनसेचा नेता करू शकला नाही. उद्धवची सेना काय करते, यापेक्षा आपल्या पक्षाचे काय करायचे, याला प्राधान्य असायला हवे होते. त्या काळात मनसे हेच खरे आव्हान असल्याचे ओळखून उद्धवनी भाजपाशी जुळते घेतले आणि लोकसभेत मनसेचा बोजवारा उडवून घेतला. नंतर विधानसभा निवडणूकीत युती तुटली तरी त्याचा लाभ म्हणूनच शिवसेनेला मिळाला. तर मनसेला फ़टका बसला. तरीही पाकिस्तानी कलावंताचा विषय उचलून धरणार्‍या मनसेने आपली शक्ती क्षीण झाली तरी संपली नसल्याचा पुरावा दिला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करण जोहर या निर्मात्यासोबत राजना बसवून, मनसेला संधी दिली होती. पण राज त्याचा पुरेसा राजकीय लाभ उठवू शकले नाहीत. महापालिका निवडणूकीत तर पुत्राच्या आजारपणाने त्यांना जागीच खिळवून टाकले होते.

अशा एकूण स्थितीत आज विधानसभेत मनसे नावापुरती शिल्लक आहे. पण आरंभीची शिवसेनाही तशीच विधानसभा लोकसभेत नगण्य होती. पाव शतकाचा कालखंड शिवसेना महापालिका वा नगरपालिकेतच होती. मात्र तरीही तिचा दबदबा होता, तो रस्त्यावर उतरणार्‍या उत्साही तरूणांच्या जमावामुळे होता. आज तसा शिवसेनेला कुठे दबदबा राहिलेला नाही, किंवा तरूणांचे जमाव सेनेच्या आवाहनामुळे रस्त्यावर येताना दिसत नाहीत. त्या तरूणाला आकर्षित करू शकणारे नेतृत्व सेनेपाशी नाही आणि तशा कृतीला प्रोत्साहन देणारेही नेतृत्व नाही. सहाजिकच त्याचा लाभ उठवून मनसेला पुढे जाता आले असते. पण मधल्या काही वर्षात राज ठाकरे आपली उर्जाच विसरून गेले आहेत. शिवसेना भाजपा यांच्या परस्पर भांडणाचाही लाभ त्यांना उठवता आलेला नाही. मात्र तशी क्षमता या नेत्यामध्ये आजही कायम आहे. याचा राजना किती अंदाज आहे, ते ठाऊक नाही. पण दिल्लीत बसलेल्या अनेक चाणक्यांना राज ठाकरे यांचे बळ कळते. किंबहूना शिवसेनेला शह द्यायचा असेल, तर फ़क्त निवडणूकीच्या मतदानात देऊन भागणार नाही. सेनेला खरे आव्हान रस्त्यावर देता आले पाहिजे. ते भाजपाच्या स्वभावात नाही. तसे वागून राष्ट्रीय राजकारणात भाजपा राहू शकणार नाही. सहाजिकच तसा पर्याय कोणी समोर आला, तर शिवसेनेला खराखुरा शह दिला जाऊ शकतो. असा कुठला डावपेचात्मक विचार दिल्लीत शिजला आहे काय? तसा काही डाव शिजला असेल, तर त्याचा परिणाम म्हणून रामदेव बाबा कृष्णकुंजात येण्यातले राजकारण उलगडू शकते. अर्थात तिथे केवळ व्यक्तीगत सौजन्य म्हणून भेटीला आल्याचे रामदेव यांनी स्पष्ट केले आहे. म्हणून तेवढ्यावर विश्वास ठेवता येत नाही. रामदेव बाबा हे मोदींचे अनेक घटनांमधील संदेशवाहक असल्याचे आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. मग त्यांची भेट राजकारणाशी संबंधित नसेल काय?

विधानसभेची युती मोडल्यापासून महाराष्ट्रात शिवसेना व भाजपा यांच्यात कलगीतुरा रंगलेला आहे. दोघेही आपापल्या परीने एकमेकांच्या जिव्हारी लागणारे घाव घालत असतात. त्यापैकी शिवसेनेची हाणामारी भाजपाला घायाळ करण्यापेक्षानी नुसता शब्दांचा भडीमार असल्याचे दिसून आलेले आहे. कुठल्याही निवडणुकीत वा राजकारणात भाजपाला मात देण्यात शिवसेना यशस्वी ठरलेली नाही. उलट भाजपाने शब्दापेक्षाही शिवसेनेच्या शक्तीस्थानावर घाव घालण्याने सतत यश मिळवले आहे. विधानसभा असो किंवा महापालिका असो. कालपर्यंत मुंबईत दुर्बळ मानला गेलेल्या भाजपाने शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवून दाखवले आहे. मुंबई म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला ही समजूत पुसून काढण्यात भाजपाने नक्कीच यश मिळवलेले आहे. त्यातून सावरण्याचा विचारही अजून शिवसेनेत सुरू झालेला नाही. मुंबईमध्ये भाजपा शिवसेनेला तुल्यबळ पक्ष झालेला असला, तरी त्याला शिवसेनेला नामोहरम करण्यात यश मिळालेले नाही. त्याचे एकमेव कारण शिवसेनेची कृतीशीलता भाजपाही दाखवू शकलेला नाही. क्षणात रस्त्यावर उतरणारे तरूणांचे जथ्थे, ही शिवसेनेची खरी ओळख होती आणि आज शिवसेना त्यातच तोकडी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात तिचा मतदार दुरावलेला आहे. काही प्रमाणात तो मनसेकडे ओढला गेला आहे. अशा मतदाराला शिवसेनेपासून तोडण्यासाठी पर्यायी शिवसेनाच मैदानात आणावी लागेल, असा विचार कुठेतरी सुरू झालेला आहे काय? त्यासाठी मनसेला नव्याने चालना देण्याचा डाव असावा काय? राडा संस्कृती विसरलेल्या शिवसेनेची त्या बाबतीतली जागा मनसेच घेऊ शकते. तसे झाले तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला राज ठाकरे शह देऊ शकतात. उघडपणे भाजपाच्या विरोधात रहायचे, पण व्यवहारात शिवसेनेला अधिकच दुबळे करायचे, असे मनसेकडून करून घेतले जाऊ शकते ना?

कुठल्याही निमीत्ताने राज व रामदेव यांची यापूर्वी भेटगाठ झालेली नाही. असे योगगुरू अकस्मात मुंबईत येतात आणि राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेटतात, यात कुठेतरी गफ़लत भासते. ही फ़क्त सदिच्छा भेट असे त्यांनी जरूर सांगितले आहे. राज यांचा पुत्र अमित याची तब्येत गंभीर आहे आणि त्याविषयी आस्था असणेही समजू शकते. पण त्या गोष्टीलाही आता खुप कालावधी उलटला आहे. म्हणूनच ह्या भेटीकडे राजकीय हेतूच्या दिशेने बघावे लागते. राज ठाकरे यांना राजकारणातून निवृत्त व्हायचे नाही. पुनरागमन करायचे तरी कुठला तरी खळबळजनक विषय घेऊनच यावे लागेल. जो विषय भाजपाला घेता येत नाही आणि शिवसेनाही उघड राजकारणासाठी वापरू शकत नाही, अशा विषयापासून मनसेचे पुनरागमन होऊ शकते. काश्मिर किंवा जिहाद अशा गोष्टी आहेतच. उदाहरणार्थ पाकिस्तानी कलाकारांचा विषय शिवसेना उचलू शकली नव्हती. मनसेने तो उचलून धरला. आताही काश्मिरात पाकिस्तान धुमाकुळ घालतो आहे आणि त्याबाबतीत शिवसेनेने शब्दांच्या पलिकडे कुठलीही कृती केलेली नाही. भाजपालाही काश्मिरच्या सत्तेत सहभागी होऊन फ़ारसे काही करता आलेले नाही. अशावेळी मनसेने तोच विषय उचलून धरला आणि काही आंदोलन उभे केले, तर त्याला मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळू शकते. जितका आक्रमकपणा राज ठाकरे त्यात दाखवतील, तितकी शिवसेनेची आक्रमकता फ़िकी पडताना दिसू लागेल. राज ठाकरे उघडपणे भाजपाशी कुठेही हातमिळवणी करून बसलेले नाहीत. म्हणूनच त्यांनी भाजपा किंवा मोदींवर टिकेचे आसुड ओढत आंदोलन आरंभले व राडा करण्याचाही पवित्रा घेतला, तर हिंदूत्ववादाने भारावलेल्या अनेक शिवसेना समर्थकांचा ओढा राजकडे झुकत जाऊ शकतो. त्याचीच चाचपणी करायला रामदेव बाबा कृष्णकुंजावर येऊन गेले असतील काय?

आज त्याचा कुठलाही खुलासा होऊ शकत नाही. कारण राज वा रामदेव यांनी त्याविषयी मौन धारण केलेले आहे. शिवाय अशा गोष्टी कधीच खुलेआम सांगितल्या जात नसतात. पण सत्तेच्या मागे फ़रफ़टणार्‍या शिवसेनेत जी अस्वस्थता आहे, त्याला राजना लाभ उठवता येऊ शकतो. सत्तेत सहभागी रहायचे, सत्तेवर नित्यनेमाने तोफ़ाही डागायच़्या. पण निष्ठेसाठी सत्तेला लाथ मारायची वेळ आल्यावर शेपूट घालायची, अशी शिवसेनेची आजची कुचंबणा होऊन बसली आहे. राजिनामे खिशात असल्याच्या डरकाळ्या फ़ोडल्या जातात. पण प्रसंग आला मग मौनव्रत धारण करून सारवासारव सुरू होत असते. सरकार स्थीर असावे म्हणून सत्तेत असल्याचे सांगितले जाते. पण त्यासाठी बाहेरून पाठींबा देऊनही सरकारला धारेवर धरता आले असते. सत्तेत वा त्याच्या चुकीच्या निर्णयात सहभागी होण्याची गरज कुठे असते? ह्या अगतिकतेमध्ये फ़सलेल्या शिवसेनेला, मनसे पुढे करून राजकीय शह देण्याची कुठली तरी चाल नक्कीच खेळली जात आहे. त्यामुळेच योगगुरू रामदेव बाबा कृष्णकुंजावर मनसेच्या प्रमुखाला ‘राज’योगासन शिकवायला आलेले असू शकतात. खरेच तसे काही शिजत असले तर आगामी दोनतीन महिन्यात त्याची प्रचिती येऊ शकेल. कदाचित पुढल्या विधानसभेत भाजपासोबत मनसेही युतीत गेलेली दिसू शकेल. विधानसभेत मिळवलेली मते जिल्हा व तालुका मतदानात सेनेला टिकवता आलेली नाहीत. भाजपाने मात्र मते राखली आहेत आणि त्याला स्वबळावर बहूमत संपादन करण्यासाठी कमी पडणारी तीनचार टक्के मते मनसेच्याही माध्यमातून मिळू शकतात. त्याचीच तजवीज करायला राजयोग सुरू झालेला असू शकतो. राष्ट्रपती निवडणूक संपल्यावर गुजरातच्या विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत. त्याच सोबत महाराष्ट्राच्याही विधानसभा निवडणूका घेण्याचा मानस भाजपामध्ये चालू आहे. त्यात मनसेची सोबत सेनेला धडा शिकवण्यास उपयुक्त ठरू शकते ना?

भाजपा व मोदींच्या सोबत राहून मागल्या लोकसभेत उद्धवनी राज ठाकरे यांचा करिष्मा निकालात काढला होता. त्यातून मनसे पुन्हा सावरू शकलेली नाही. पण आता त्याला तीन वर्षाचा कालावधी उलटला असून भाजपाने सत्ता राबवून दाखवली आहे. तर राजकारणातील लवचिकता उद्धवना दाखवता आलेली नाही. महापालिकेत राजना सोबत घेऊन निदान मुंबईत तरी भाजपाला पाणी पाजता आले असते. ती संधी उद्धवनी गमावली आहे. पालिका निवडणूकीत प्रचाराला राज ठाकरे उतरले नाहीत, तरी त्यांनी लक्षणिय मते मिळवलेली आहेत. तितकी मते भाजपाच्या जोडीला गेली तरी शिवसेनेला आपल्या मुंबईच्या बालेकिल्ल्यात आठदहा आमदारही निवडून आणताना दमछाक होऊ शकते. म्हणूनच आतापासून राजना चालना द्यायची व नव्याने पर्यायी शिवसेना उभी करण्यास मदत करायची, असा भाजपाचा बेत असू शकतो. राज यांच्यासारखी मुलूखमैदान तोफ़ शिवसेनेच्या विरोधात आग ओकू लागली तर त्याचा मोठा फ़टका सेनेला मतदानात बसू शकतो. पर्यायाने त्याचा लाभ भाजपालाच मिळू शकतो. महापालिकेत सेनेशी हात मिळवायला आलेल्या मनसेला नाराज करून पाठवल्यावर मराठी माणसाची एकजुट बोलण्याचा अधिकार सेना नेतृत्वाने गमावला आहे. सहाजिकच राज ठाकरे मतविभागणी करतात, असा आरोप करायची यापुढे सोय राहिलेली नाही. त्यालाच आता भाजपाने आपल्या रणनितीचे हत्यार बनवलेले असेल, तर रामदेव बाबांच्या या कृष्णकुंज भेटीचे रहस्य उलगडू शकेल. म्हणूनच हा योगायोग असण्यापेक्षाही मनसेचा ‘राज-योग’ असण्याची अधिक शक्यता वाटते. शिवसेना असल्या विषयांचा हल्ली विचारही करीत नाही. येऊ घातलेल्या संकटावर मात करण्याचीही सेनेला गरज वाटत नाही. त्या गाफ़ीलपणाचा लाभ परस्पर उठवण्याचा भाजपाचा डावपेच असला, तरी तो हाणून पाडला जाण्याची बिलकुल शक्यता उरलेली नाही.

1 comment:

  1. तुम्ही या लेखातून सेनेला सावध करायचा प्रयत्न केला आहात. आता फकत ते सावध होतात की नाही बघावे लागेल

    ReplyDelete