Saturday, May 13, 2017

दिग्विजय फ़्लू

raosaheb danve के लिए चित्र परिणाम

सलमान खानच्या कुठल्याशा चित्रपटात एक संवाद आहे. ‘मुझपर इतनी मेहरबानी करो, की मुझपर मेहरबानी ना करो.’ विविध पक्षांना आजकाल आपल्याच अनेक वाचाळवीर नेत्यांविषयी असेच वाटत असेल. कारण असे नेते पक्षाला चार मते मिळवून देऊ शकत नसतात. पण त्यांच्या मुक्ताफ़ळांनी पक्षाच्या कित्येक सहानुभूतीदार मतदाराला मात्र दुखावत असतात. त्याचा अनुभव दंडगा आल्यामुळेच असेल हल्ली दिग्विजय सिंग नावाच्या नेत्याला कॉग्रेस पक्षाने महत्वाच्या पदावरून बाजूला केले आहे. कारण सातत्याने निरर्थक बोलून, त्यांनी कॉग्रेसची अधिकाधिक मते दुरावण्याचे काम अगत्याने केलेले होते. कुठल्याही बाबतीत भाजप वा नरेंद्र मोदी यांना टोमणे मारण्याच्या हेतूने दिग्विजय असे काही बरळत राहिले, की त्यातून भाजपाचे  कुठलेही नुकसान झाले नाही. पण कॉग्रेसविषयी लोकांमध्ये अधिकाधिक शिसारी मात्र निर्माण होत गेली. दिल्लीच्या बाटला हाऊस येथील चकमकीत एक पोलिस निरीक्षक मारला गेला होता. तरीही त्या चकमकीला खोटी ठरवून दिल्लीकरांचा रोष दिग्विजयसिंग यांनी ओढवून आणला. आपल्या अशा बोलण्याने जिहादी दहशतवाद्यांची बाजू घेतली जाते, याचे किंचीतही भान या गृहस्थांना राहिलेले नाही. उलट अशी जिहादी मानसिकतेची बाजू घेतल्याने मुस्लिमांची एकगठ्ठा मते आपल्या पक्षाला मिळतील, अशा भ्रमात हे गृहस्थ नित्यनेमाने बरळत राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपाला वा त्याच्या हिंदूत्वाला सर्वात मोठा हातभार दिग्विजयसिंग यांनी लावला यात शंका नाही. आता बहुधा त्याचे तोटे लक्षात आल्यावर राहुल गांधींनी या  दिग्विजय बाधेतून कॉग्रेसला मुक्त करण्याचा उपाय योजलेला असावा. त्यासाठीच त्यांची हाकालपट्टी सर्व महत्वाच्या पदावरून करीत कॉग्रेसला दिग्विजय फ़्लूपासून मुक्त करण्याचे पाऊल उचलले गेले असावे. पण दरम्यान अनेक पक्षातील लोकांना या रोगाची बाधा झालेली आहे.

बेताल बोलावे आणि आपल्याच पक्षाचे नुकसान करावे, याला आता दिग्विजय फ़्लू असे नाव द्यायला हरकत नाही. कारण त्या आजाराची बाधा अनेक नेत्यांना वेगाने होताना दिसते आहे. कालपरवा समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी आपल्याला तशी बाधा झाल्याचे जणू घोषित करून टाकले. काश्मिरात घातपातामध्ये एक काश्मिरी सेनाधिकारी शहीद झाला. त्यावर बोलताना अखिलेशने गुजरातचा कोणी कधी शहीद झाला आहे काय, असा प्रतिप्रश्न केला. त्यातून अर्थातच या समाजवादी नेत्याला मोदींना टोमणा मारायचा होता, हे लक्षात येते. पण अशा रितीने आपण कोणाच्या जखमेवरची खपली काढत आहोत, याचेही भान राखायला नको काय? मोदी हे विरोधक आहेत आणि त्यांचे नुकसान होण्याचे राजकारण अखिलेशने करण्यात काहीही गैर नाही. पण मोदी वा भाजपाचे नुकसान करताना शक्यतो आपले किंवा आपल्या पक्षाचे राजकीय नुकसान होता कामा नये, याचेही भान असायला हवे ना? समजा आपले थोडेफ़ार नुकसान होत असेल, पण प्रतिस्पर्ध्याचे अधिकच नुकसान होणार असेल, तरीही हरकत नाही. पण याचे किंचीतही तारतम्य अशा लोकांमध्ये आढळून येत नाही. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुका ऐन रंगात आल्या असताना अखिलेशने असेच आत्मघाती विधान केलेले होते. गुजरात सरकारच्या विविध प्रकल्पांच्या अमिताभ जाहिराती करतो. त्यात तिथल्या वाळवंटातील दुर्मिळ जंगली गाढव कळपांचीही जाहिरात होती. त्याचा उपरोधिक उल्लेख करीत अखिलेशने मोदींना गुजरातचे गाढव ठरवले. अमिताभने गाढवांच्या जाहिराती करू नयेत असे काही म्हटले होते. मोदींनी तेही सन्मान समजून असे फ़िरवले, की अखिलेशचीच कोंडी झाली. ज्याच्यावर दगड फ़ेकला त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली व दगड मारणाराच जायबंदी झाला. यापासून काही धडा घ्यायचा की नाही? घेत नाही, त्याला दिग्विजय फ़्लूची बाधा झाली असे खुशाल समजावे.

लोकसभा निवडणूकीपुर्वी कॉग्रेसचे असेच दिवाळखोर नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींचा उल्लेख ‘वो चायवाला’ अशा शब्दात केला होता. मोदींनी त्याचाही निवडणूक प्रचारात चतुराईने वापर करून घेतला होता. त्यातूनच मग ‘चायपे चर्चा’ नावाचा कार्यक्रम पुढे आला आणि गाजला होता. तुम्ही जितके शिव्याशाप द्याल व अपशब्दांचा वापर कराल, तितका त्याचा लाभ मोदी उठवतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. एका मुलाखतीत तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितलेले होते. ज्यांनी माझ्यावर दगड मारले, त्यांच्यावर उलट दगड मारण्यापेक्षा, मी आलेल्या दगडांच्या पायर्‍या बनवून इथवर आलेलो आहे. म्हणूनच दगड मारणार्‍यांच्या आभार मानतो, असे मोदी म्हणतात. तर त्यातली खोच ओळखली पाहिजे. मोदींच्या विरोधात अनेक टिकेचे विषय आहेत आणि अनेक मुद्दे आहेत. पण नुसती खळबळ माजवण्यापेक्षा असे मुद्दे शोधून मोदींची कोंडी करण्याचा विचारही कोणाच्या मनात येत नाही. म्हणूनच हे सर्व विरोधक प्रत्यक्षात मोदींना मदतच करत असतात. किंबहूना आपापल्या पक्षांचे नुकसान मात्र नक्की करत असतात. आताही दिल्लीत भाजपा जिंकला, तेव्हा त्याचे महापालिकेतील काम उत्तम होते म्हणून लोकांनी त्या पक्षाला भरभरून मते दिलेली नाहीत. त्यापेक्षाही आम आदमी पक्षाच्या वाचाळवीरांना लोक खुप कंटाळलेले होते. म्हणून भाजपाला प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्या नाकर्तेपणाला झाकण्यासाठी असे खळबळ माजवणारे मुद्दे वा भाषा चटकदार वाटते. पण सामान्य माणूस त्याचा अनेक बाजूने विचार करत असतो, हे विसरता कामा नये. अखिलेश वा मणिशंकर अय्यर भले मोदींना दुखावणारे बोलले असतील, पण त्यातून गुजराती वा गरीब लोक दुखावले गेल्यास मते विरोधात जात असतात. लोकशाहीत मतेच निर्णायक असतात. ज्यांना त्याचे भान राहिलेले नाही, त्यांना दिग्विजय फ़्लू झाल्याचे म्हणावे लागते.

भाजपातही असे काही नेते आहेत. ज्यांना मोदी दुय्यम आणि आपली अक्कल मोठी असे वाटत असते. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे त्यापैकीच एक आहेत. आपण फ़ार चटकदार व उपरोधिक बोलतो, अशा भ्रमात त्यांनी अनेकदा दिग्विजय बाधेची लक्षणे दाखवली आहेत. विरोधात असताता शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी दिवाळखोरीसाठी आकाशपाताळ एक करणारा भाजपाच आज सत्तेत आहे. तरीही तुर कापूस खरेदीत विलंब झाला आहे. तर त्याचा राजकीय लाभ उठवत विरोधकांनी गहजब करणे स्वाभाविक आहे. खुप कोंडी झाल्यावर मुख्यमंत्र्यांना येईल तितकी तूर खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यापुर्वी सपाटून टिका सहन करावी लागली. तो निर्णय झाल्याचे श्रेय देवेंद्र फ़डणवीस यांनी घेण्यापुर्वीच दानवे यांनी मुक्ताफ़ळे उधळली आहेत. आता आणाल तितकी तूर खरेदी होत असतानाही रडगाणे का चालू आहे? असा सवाल विचारण्यातून दानवे यांनी आपण दिग्विजय सिंग यांचे चेले असल्याचीच साक्ष दिलेली आहे. कारण त्यांच्याच पक्षाने शेतकर्‍यांच्या भल्याचा निर्णय घेतला असताना प्रदेशाध्यक्षानेच त्यावरून बोळा फ़िरवला आहे. सरकार एका पक्षाची मालमत्ता नाही, तो निर्णय सरकारने घेतला म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर्‍यावर भाजपाने उपकार केलेले नाहीत. म्हणूनच तूर उत्पादकाला भीक घातल्याप्रमाणे दानवे यांनी वापरलेली भाषा संतापजनक आहे. ती शेतकर्‍यांना दुखावणारी असल्यानेच त्याच्या जखमेवरची खपली काढण्याचे पाप या नेत्याने केले आहे. प्रदेशाध्यक्षाने आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढवावी किंवा अधिकाधिक मतदार गोळा करावा, अशी अपेक्षा असते. पण दानवे मात्र असलेला मतदारही भाजपापासून कसा दुरावेल, त्याच्याच फ़िकीरीत असलेले दिसतात. एकूणच देशातील विविध पक्षांमध्ये ह्या दिग्विजय फ़्लूची भयंकर बाधा झालेली दिसते. अन्यथा अशी मुक्ताफ़ळे कशाला ऐकावी लागली असती?

2 comments:

 1. नावात दानव असल्यामुळं असं घडलं!

  ReplyDelete
 2. Bhau we are waiting for your post,just because you're straight forward ness of your in depth and balanced knowledge.
  Because of all your previous articles I have strong belief that for the good ahead of my country both the main parties that is BJP and CONGRESS are important with all of their effective ness and always on their toes for the well being of the 'We the Indian people'.
  ( you nicely explain how to stop Modi's storm by claiming that other parties (Congress Shivsena) should work with generosity on a ground level)
  But in above article you claim congress people more than bjp people.
  The main current issue is Danve's abusive language for farmer. So you should point out BJP's politicians for their low temper,half knowledge based confidence by using Modi card so that years should not be repeats as it was in congress era by nonsense people such as manishankar ayyar Digvijay Singh Ajit Pawar Kapil Sibal and so on ....
  But sorry to say that the above article is only smells about Congressmukt Bharat..
  As multidimensional nation we can not afford single party to rule over....

  ReplyDelete