Monday, May 22, 2017

पाक इतका का गडबडलाय?

sarabjit singh के लिए चित्र परिणाम

सोळा प्रसंगी भारताने कुलभूषण जाधवला भेटण्याची परवानगी पाकिस्तानकडे मागितली होती. तो भारताचा नागरिक असेल तर त्याला आपला न्यायालयीन बचाव मांडण्यासाठी मदत करणे, हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठीच त्याची भारतीय वकीलाने भेट घेणे अगत्याचे होते. पण पाकिस्तानने तशी कुठली संमती दिली नाही, किंवा कुलभूषणच्या खटल्याविषयी कुठलीही माहिती भारताला दिली नाही. नुसता त्याच्यावर हेरगिरी व घातपाताच आरोप करून काहूर माजवले आणि त्याच्याच एका मुलाखतीचे चित्रण पुराव्यादाखल समोर आणले. त्या चित्रणापलिकडे कुलभूषणची कुठलीही माहिती गेल्या दिड वर्षात समोर आलेली नाही. खरेतर सर्वजीतप्रमाणे कुलभूषणलाही पाकिस्तान वागणूक देऊ शकत होता. सर्वजीत हा चुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला, असा त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे. त्याला भारताचा हेर ठरवून खुप छळ करण्यात आला. त्याला यातनाही देण्यात आल्या. पण तेव्हा तिथल्या मानवाधिकार संघटनांनी पुढाकार घेऊन त्याचा खटला लढवला होता आणि त्याच्या भगिनीलाही त्याला भेटण्याची मुभा पाकिस्तानने दिलेली होती. त्यासाठी तिला व्हिसाही देण्यात आलेला होता आणि त्याचा खटलाही नागरी न्यायालयात चालला होता. मग कुलभूषणचे प्रकरण वेगळे कसे? दोघांनाही भारताचे हेर म्हटलेले आहे, तर सर्वजीतला मिळालेलीच वागणुक कुलभूषणला मिळायला हवी ना? परंतु पाकने पहिल्या दिवसापासून कुलभूषणला कुठलीही नागरी वागणूक देण्याचे नाकारलेले आहे. त्याला कोणाला भेटू दिले नाही किंवा पाकिस्तानी पत्रकारांच्याही पुढे त्याला हजर करण्यात आले नाही. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या आदेशानंतरही पाक त्याच्याशी कोणालाही भेट घेण्याची मुभा नाकारतो आहे, यातले गुढ काय आहे? कुलभूषण आज हयात नाही, म्हणून ह्या सर्व मागण्या फ़ेटाळल्या जात आहेत काय?

सर्वजीत आणि कुलभूषण यांच्या बाबतीत पाकिस्तान इतका भेदभाव कशाला करतो आहे? दोघेही भारतीय होते आणि दोघांवर हेरगिरीचाच आरोप होता. पण एकाला मानवाधिकाराचा आश्रय घेण्य़ाची मुभा देण्यात आली. त्याला पाकिस्तानी वकील देण्यात आले आणि निदान तिथल्या मानवाधिकार संघटनांना त्यात हस्तक्षेप करायला मोकळीक मिळाली होती. सर्वजीतला ज्या तुरूंगात ठेवलेले होते, तिथले अधिकारी वा पत्रकारही त्याची माहिती देऊ शकत होते. निर्बंध खुप असले तरी लपवाछपवी काहीही नव्हती. सर्वजीत हयात असल्याची खात्री त्याच्या भारतातील कुटुंबियांना व्हावी, याचीही पुरेशी काळजी त्याबाबतीत पाकिस्तानने घेतली होती. पण कुलभूषण हे मोठे चमत्कारीक प्रकरण आहे. त्याला कुठला पाकिस्तानी पत्रकारही आजवर बघू शकलेला नाही. त्याला तिथल्या मानवाधिकार संघटनांना भेटता आलेले नाही. त्याच्या बचावासाठी कोणा वकीलाने काम केले, त्याचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. भारतीय राजकीय वकीलांनाही त्याची भेट नाकारण्यात आलेली आहे. किंबहूना खरोखरच पाकच्या ताब्यात कुलभूषण जाधव आहे, याचा कुठलाही पुरावा पाकिस्तान आजवर देऊ वा दाखवू शकलेला नाही. त्याची चित्रित मुलाखत वा कबुलीजबाबाचे चित्रण, ही एकच गोष्ट पाकच्या ताब्यात तो असल्याचा पुरावा आहे. अगदी पाकचा कोणी पोलिस वा लष्करी अधिकारीही त्याविषयी बोलायला पुढे आलेला नाही. कुलभूषणला आपण इथे पकडले वा त्याला अमूक घातपात करताना शोधले वा पकडले; असे सांगणाराही कोणी पाकचा अधिकारी पुढे आलेला नाही. इतकी गोपनीयता का? खरेच अजून कुलभूषण हयात आहे काय? असा प्रश्न म्हणूनच विचारणे भाग आहे. तो हयात असेल तर त्याचा त्या तथाकथित चित्रणापलिकडे अन्य काही पुरावा पुढे यायला हवा. पण पाकला तो दाखवता आलेला नाही.

सव्वा दिड वर्षापुर्वी केव्हातरी भारताचा एक हेर पाकिस्तानने पकडल्याची बातमी आली. पहिली बातमी त्याला बलुचिस्तानच्या सीमेलगत पकडल्याची होती. नंतर त्याला अफ़गाण सीमेलगत ताब्यात घेतल्याची बातमी आहे. अशा बातम्या देणार्‍यांनी कधीही कुलभूषणला पोलिस वा लष्कराने माध्यमांसमोर हजर केल्याचे म्हटलेले नाही. मग त्याच्या विरोधातल्या अनेक आरोप व घातपातांचे काहूर पाक माध्यमात माजवले गेले आणि एकदम त्याच्या कबुलीजबाबाचे चित्रण अनेक पाक वृत्तवाहिन्यांवर झळकवण्यात आले. पण कुलभूषणला ताब्यात घेतल्यापासून एकदाही पाकच्या प्रशासन वा लष्कराने त्याला लोकांसमोर पेश केलेला नाही. सर्वजीतची गोष्ट म्हणूनच वेगळी होती. त्याच्या बाबतीत हेर ठरवूनही इतकी गोपनीयता राखली गेली नव्हती. कुलभूषण संबंधातील ही लपवाछपवी म्हणूनच कमालीची संशयास्पद आहे. पाकची भूमिका याबाबत एकदम स्पष्ट आहे. बाकी असर्व मान्य आहे. पण कोणी कुलभूषणला प्रत्यक्षात भेटण्याची वा त्याच्या कुठल्याही अलिकडल्या फ़ोटो वगैरेची मागणी पाक साफ़ फ़ेटाळून लावतो आहे. इतके त्यात लपवण्यासारखे काय आहे? कुलभूषणला समोर आणता येत नसेल आणि कुठल्याही नागरी कोर्टात हजर करणेच अशक्य असेल, तर पाकिस्तान काय करू शकतो? तिथल्या कोर्टात न्याय मिळण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. पण कोर्टात आरोपीला हजर तर कराल की नाही? तसा हजर करायचा तर पाचपंचवीस लोकांना ती व्यक्ती आरोपी म्हणून दिसायला हवी. त्यापैकी कोणाकडे स्मार्ट फ़ोन असला आणि त्याने चोरून त्याचा फ़ोटो काढला; तर पुन्हा तोच कुलभूषण आहे किंवा नाही, याची चर्चा व्हायची. ह्या सगळया भानगडी नकोत म्हणूनच कुलभूषणला समोर आणण्यापासून त्याला अन्य कोणी भेटण्याच्या प्रत्येक बाबतीत पाकिस्तान नकारघंटा वाजवत राहिला आहे. त्याचे रहस्य काय असावे?

खरेच अजून कुलभूषण हयात आहे, की त्याचा पाकिस्तानी यातनांनी यापुर्वीच बळी घेतला आहे? मग एका भारतीय नागरिकाला पाकिस्तानी कस्टडीत ठार मारल्याचा आरोप नको, म्हणून बाकीचे नाटक रंगवले गेले आहे? नागरी कोर्ट आणि लष्करी कोर्टात मोठा फ़रक असतो. लष्करी न्यायालया्तील खटला बाहेरच्या कुणासमोर चालवला जात नाही. सर्वकाही गोपनीय. म्हणजेच खटला झाला किंवा नाही, याचाही पुरावा कोणी मागू शकत नाही. सहाजिकच तिथे खटला चालविल्याचे नुसते दस्तावेज तयार केले, तरी पुरेसे आहे. तिथे न्यायाधीश नको, वकील नको किंवा आरोपीही असायची गरज नाही. खटलाही चालण्याची गरज नाही. नुसती तशी कागदपत्रे बनवली म्हणजे संपले. आपल्या छळवादाने व यातनांनी कुलभूषण मृत्यूमुखी पडल्यावर पाकिस्तानने या लष्करी खटल्याचे नाटक रंगवलेले नसेल काय? म्हणजे एका हत्याकांडावर पडदा पाडण्यासाठी लष्करी खटल्याचा नुसता बनाव केलेला असावा. म्हणून तर आता आंतरराष्ट्रीय कोर्टात विरोधी निकाल गेल्यावरही पाकला तो पचवणे अवघड झाले आहे. भारतीय वकीलातीला कुलभूषणला भेटू द्यायचे, तर तो कुलभूषण आणायचा कुठून? त्यापेक्षा प्रत्येकाचा तसा आग्रह हाणून पाडताना, नकारघंटा वाजवायची हे पाकिस्तानचे धोरण झालेले आहे. म्हणूनच तर त्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल मान्य करणे अशक्य झाले आहे. पण जितका पाकिस्तान नाकारत राहिल, तितका अधिकच गाळात जाणार आहे. कुलभूषण हा नुसता भारतीय सैनिक नाही, तो मराठा आहे आणि मराठा लढवय्या मृत्यूलाही मारून लढतो. कुलभूषण असे सहजासहजी मरत नसतात की मारले जात नसतात. हा एक मराठा पाकिस्तानच्या नागरी व लष्करी सत्तेला सुरूंग लावून बसला आहे. हयात असेल तरी आणि मारला गेला असेल तरी, तो पाकच्या नाकी दम आणत लढतो आहे.

No comments:

Post a Comment