Monday, May 22, 2017

भारत पाकिस्तानची गुंतागुंत (लेखांक - १)

stone pelters के लिए चित्र परिणाम

गेल्या सत्तर वर्षात भारत व पाकिस्तान यांच्यात दुष्मनी आहे. ही दुष्मनी पाकिस्ताननेच पोसलेली व जोपासलेली आहे. त्यामागे एक मानसिकता कायम राहिलेली आहे. विविध कालखंडामध्ये भारतात इस्लामी सुलतानांची राजवट होती आणि औद्योगिक क्रांतीनंतर जगाचा चेहरामोहरा बदलून गेल्यावर, इथे ब्रिटीशांनी आपली सत्ता स्थापन केली. सहाजिकच ब्रिटीश भारत सोडून निघाले, तेव्हा इथल्या बहुतांश मुस्लिम नेतृत्वाच्या लेखी त्यांनी सत्ता मुस्लिमांच्या हाती सोपवावी, असेच होते. ते स्विकारले जाण्यासाठी लोकशाही योग्य माध्यम नव्हते. म्हणूनच अनेक अडथळे निर्माण करण्यात आले आणि शेवटी देशाची विभागणी करण्यात आली. त्यातला मोठा प्रदेश हिंदूस्तान वा भारत म्हणून हिंदूबहुल देश झाला आणि जिथे मुस्लिम बहुल लोकसंख्या होती, त्याला पाकिस्तान ठरवले गेले. तिथे जे काही मूठभर हिंदू वा अन्यधर्मिय होते, त्याना हिंसात्मक वा सतावण्याच्या योजना आखून पिटाळून लावण्यात आले. सहाजिकच उर्वरीत हिंदुस्तानला इस्लामच्या जोखडाखाली आणणे, हे मुस्लिम नेते व त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचे ध्येय बनून गेले. त्याचे नेतृत्व करायला आता पाकिस्तान नावाचा देश वा प्रस्थापित सरकार उभे राहिलेले होते. म्हणूनच त्या देशाची मानसिकता भारताचा द्वेष एवढ्याच राजकीय भूमिकेतून विकसित होत गेली. त्यासाठीच्या धाडसी लष्करी चढायांना भारताने चोख उत्तर दिले. पण राजकारणात भारताच्या उदारमतवादी पांगळेपणाने पाकिस्तानला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेले. १९७१ सालात इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडून, त्या देशाला अधिक पांगळा करून टाकल्यावर, त्या देशाने वा तिथल्या नेतृत्वाने आपली रणनिती बदलली. आज त्याचेच दुष्परिणाम आपण भोगत आहोत. त्या पराभवानंतर पाकने लढाईचा मार्ग सोडुन घातपाताचा मार्ग स्विकारला. त्यातून आजची गुंतागुंत उभी राहिली आहे.

दरम्यान भारतामध्येही काही राजकीय बदल सुरू झाले होते. राजकीय मतप्रवाह बदलत होते आणि उदारमतवादाचे प्राबल्य माजलेले होते. त्यात हिंदूत्ववादाला रोखण्याचे जे प्रयास उदारमतवाद किंवा पुरोगामी विचारांनी आरंभले होते, त्याचा आडोसा घेत पाकिस्तानने आपली लढाई या पुरोगाम्यांच्या गळी उतरवण्याची खेळी यशस्वी केली. भाजपा, संघ वा कुठल्याही हिंदूत्ववादाला विरोध करण्याच्या नादात; पुरोगामी चळवळी, संस्था व राजकारण इतके बहकत गेले, की त्यांनी थेट इस्लामी कट्टरवाद वा जिहादी मानसिकतेच्या समर्थनापर्यंत मजल मारली. त्यासाठी मानवाधिकाराची ढाल जिहादींच्या पाठीशी उभी केली आणि अशा पुरोगाम्यांमधील काही बदमाश मतलबी लोकांसाठी पाकिस्तानने आपले खजिने खुले केले. कुठल्याही युद्धात अब्जावधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा भारतामध्ये आपले हस्तक मोक्याच्या जागी बसवून, भारतीय धोरण व नितीलाच पोखरून टाकण्याचा डाव पाकिस्तान खेळू लागला. कुठलेही राष्ट्र वा समाज अभिमानाच्या पायावर उभा रहातो. त्यालाच पोखरून काढले, मग त्या देशाचा पाया खिळखिळा होऊन जातो. पाकने तेच डावपेच मोठ्या खुबीने खेळले आणि भारतात राष्ट्रप्रेमी वा राष्ट्रवादी या शब्दाचीच खिल्ली उडवली जाऊ लागली. त्याची व्याख्याच शंकास्पद करून टाकण्यात आली. सरकारी खर्चाने उच्चशिक्षण घेणारी मुलेच मातृभूमीचे तुकडे करण्याच्या घोषणा तावातावाने  देऊ लागली आणि त्यांच्या बचावासाठी (देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या) कॉग्रेस पक्षाचेच नेते वकील उभे राहू लागले. यातून पाकिस्तानने भारताचा पाया किती पोखरून काढला असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो. हिंदू, राष्ट्र वा स्वाभिमान हे शब्दच लज्जास्पद बनवले गेले आणि आज आपण त्याचे एकत्रित दुष्परिणाम अनुभवत आहोत. पाक व मुस्लिम यांची चुकीची सांगड घालण्यातून पाकिस्तानचे हस्तक असलेला बुद्धीवादी वर्ग, आज उजळमाथ्याने आपल्यात वावरतो आहे.

आज काश्मिर पेटला आहे आणि हिंसेचा वणवा तिथे पेटलेला आहे. लष्कर व निमलष्कराच्या तुकड्या तैनात करूनही तिथली हिंसा रोखण्यात अपयश येते आहे. त्याची सुरूवात कुठून झाली? अकस्मात काश्मिरात इतक्या मोठ्या संख्येने जिहादी घुसलेले नाहीत वा तरूण मुले सैनिकांवरही दगड मारण्याची हिंमत अचानक करू शकलेली नाहीत. कुठल्याही भागात दंगल माजली, की सामान्य वाटणारी माणसेही लूटारू म्हणून हाती लागेल ते पळवून न्यायला पुढे येतात. बंदोबस्त वा पहारा ढिला पडला, मग असेच होत असते. ही गोष्ट पद्धतशीरपणे घडवून आणली गेली आहे. आज कॉग्रेसचे नेते, मोदी सरकार आल्यापासून काश्मिरची स्थिती बिघडल्याचे दावे करीत असतात. पण त्याची पुर्वतयारी युपीए कॉग्रेस सरकारच्या काळातच केली गेली होती. आज जे काही बिनसले आहे, त्याची पेरणी युपीएच्या कारकिर्दीत करण्यात आलेली होती. कारण भारत सरकारच्या धोरण व निर्णयात मोक्याच्या जागी तेव्हा पाकिस्तानचे हस्तक येऊन स्थानापन्न झालेले होते. कालपरवा आंतरराष्ट्रीय कोर्टात युपीएने हरीष साळवे यांना हटवून पाकिस्तानी वंशाचा वकील आणल्याची बातमी प्रसारीत झाली आहे. त्याचे काय कारण होते? वाजपेयी सरकारने एनरॉन खटल्यात हरीष साळवे यांनाच आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडण्यासाठी नेमले होते आणि २००४ सालात सत्तांतर झाले. युपीए म्हणून सोनियांच्या हाती सत्ता आली आणि त्याच सरकारने साळवे यांना हटवून पाकिस्तानी वकिलाकडे भारताचे वकीलपत्र सोपवले. याविषयी साळवे यांनी विचारणा केली असता, देशात सत्ता बदलली आहे असे उत्तर त्यांना मिळाले होते. सत्ता बदलली म्हणजे कोणाची सत्ता आली होती? भाजपा वा वाजपेयी जाऊन कॉग्रेसची सत्ता आली, की पाकच्या हस्तकांची सत्ता देशात आली होती? केवळ हा पाकिस्तानी वकील नेमणे इतकाच त्याचा पुरावा नाही. अशाच पुराव्यांचा व पुढल्या घटनाक्रमाचा उहापोह या मालिकेत करायचा आहे.

२००४ सालात सत्तांतर होताच आणि युपीएचे सरकार आल्यापासून, प्रत्येक सरकारी निर्णय हा भारताला अपायकारक व पाकिस्तनला हितकारक घेतला जावा, हा निव्वळ योगायोग नव्हता. त्याची सुरूवात पाकिस्तानी वंशाचा वकील आंतरराष्ट्रीय कोर्टात नेमून झाली होती. पण त्याखेरीज अनेक अशा गोष्टी घडत गेल्या, की काश्मिरवरची भारताची पकड ढिली व्हावी आणि तिथे पाकवादी प्रवृत्तीने शिरजोर व्हावे. यासाठी बुद्धीमंतांपासून माध्यमांपर्यंत अनेकांना कामाला जुंपण्यात आले होते. इशरत जहान या पाक हस्तक मुलीचा चकमकीत मृत्यू झाल्यावर तिच्या न्यायाचे नाटक रंगवून भारतीय पोलिस व गुप्तचर खात्यालाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यापर्यंत मजल गेली होती. आता त्यातल्या भानगडी चव्हाट्यावर आलेल्या आहेत. तात्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी इशरतला निर्दोष ठरवण्यासाठी कागदात कशी खाडाखोड केली वा अनेक प्रामाणिक अधिकार्‍यांचा कसा बळी घेतला; त्याचेही तपशीला आलेले आहेत. याकुब मेमन वा अफ़जल गुरू अशा देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी बुद्धीमंत व मान्यवर कसे पुढे सरसावले, ते आपण बघितलेले आहे. पाक हेरखात्याच्या आशीर्वादाने योजलेल्या समारंभांना भारतातले संपादक लेखक कसे मेजवान्या झोडायला तिथे जात होते, त्याचे तपशीलही बघणे अगत्याचे आहे. पण नेमक्या त्याचवेळी भारताची सुरक्षा किंवा काश्मिरातील लष्करी कारवाईतून प्रस्थापित होणार्‍या शांततेला सुरूंग लावण्याच्या अशाच हस्तकांकडून झालेल्या उचापती मात्र फ़ारश्या उजेडात आलेल्या नाहीत. म्हणूनच त्यांची संगतवार मांडणी अगत्याची आहे. भारतीय सैनिकांवर दगड मारण्याची हिंमत कुठून आली? काश्मिर आज इतका हाताबाहेर कशाला गेला आहे? भारतात आज पाकिस्तानचे प्रेम मुठभर बुद्धीमंतामध्ये कशाला उफ़ाळून आलेले आहे? त्याची झाडाझडती म्हणूनच अगत्याची आहे. पुढल्या काही भागात एक एक प्रसंग व घटना घेऊन आपण त्याचीच छाननी करूया.

2 comments:

  1. खूप छान लेख आहे आपल्या मुळे माझ्या सारख्या अनेक तरुणांना मार्गदर्शन लाभते धन्यवाद

    ReplyDelete
  2. केवळ पाकप्रेमी म्हणणे तितकेसे बरोबर नाही. हे लोक भारत विरोधी आहेत, आणि भारत विरोधात जो कोणी उठेल त्याची पैसे घेऊन तळी उचलून धरणारे आहेत. सध्या पाकिस्तान आहे, पण ह्यांना पैसा पाकिस्तान देतो आहे ही 'वरलिया रंगा' ची गोष्ट आहे. देणारा हात पाकिस्तानचा आहे, खिसा नाही.

    ReplyDelete