Monday, August 21, 2017

अमित शहा आणि ममता

Image result for amit shah mamta

अकस्मात बंगालच्या दिदी उर्फ़ मुख्यमंत्री ममता बानर्जी यांना काय झाले आहे? आपला आक्रस्ताळेपणा व कर्कश ओरडणे सोडून, त्या लतादिदींना मागे टाकायला निघाल्या आहेत. दोन दशकापुर्वी दूरदर्शनवर लतादीदीचे एक राष्ट्रभक्तीपर गीत खुप गाजत होते. ममता तेच कशाला गाऊ लागल्या आहेत? ‘मिले सुर मेरा तुम्हारा’च्या चालीवर त्यांनी मोदींना आपण पाठींबा देतो, पण अमित शहांना विरोध करतो; असा सूर आळवला आहे. त्याचा खुलासाही त्यांनी केलेला आहे. अमित शहा हे बेजबाबदार असल्याचे ठासून सांगत, ममतांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे. ती ऐकणार्‍या कोणाचाही आपल्याच कानावर विश्वास बसणार नाही. कारण गेल्या दोन अडीच वर्षात ममता कायम मोदींवर टिकेची झोड उठवित आलेल्या आहेत. कुठलेही निमीत्त शोधून त्यांनी मोदींवर दोषारोपण करण्याची संधी वाया घालवलेली नाही. मग आज अकस्मात त्याच मोदींचे समर्थन करण्याची उबळ त्यांना कशाला आलेली आहे? आणि अमित शहांचा त्यात काय संबंध आहे? तर अमित शहा व त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्ष बेजबाबदार वागतो, असे दिदीचे म्हणणे आहे. तो कुठला बेजबाबदारपणा, त्याचाही खुलासा दिदीने केलेला आहे. केंद्रातील विविध मंत्र्यांच्या बैठका पक्षाध्यक्ष कसा घेऊ शकतो? पक्षाने तो सरकारी कामात केलेला हस्तक्षेप होय, असेच बहुधा दिदींना सुचवायचे असावे. की अमित शहांनी हस्तक्षेप करू नये आणि अन्य कोणीही असा हस्तक्षेप केल्यास तो घटनात्मक असतो; अशी दिदीची समजूत आहे? कारण असे आजवर अनेकदा विविध पक्षांच्या बाबतीत झालेले आहे आणि त्याला कोणी कधी बेजबाबदारपणा संबोधलेले नाही. तृणमूल कॉग्रेस पक्षाच्या संस्थापक नेत्या ममताच आहेत. त्यांनी अशी कृती कधी केलेली नाही काय? इतकी ममता दिदींची स्मृती ढिली पडली आहे काय? आपलाच पुर्वेतिहास त्यांना आठवत नाही काय?

२००९ सालात त्यांनी प्रथमच बंगालमध्ये डाव्यांना धुळ चारून मोठे यश मिळवल्यानंतर, त्या पुन्हा एकदा केंद्रात मंत्री झालेल्या होत्या. त्यांना युपीए सरकारमध्ये रेल्वे खात्याचे मंत्रीपद देण्यात आलेले होते. पण दिदी सहसा दिल्लीला जात नसत. त्यांचा कायम मुक्काम कोलकात्यातच असायचा. तिथूनच त्या रेल्वे मंत्रालयाचा कारभार हाकत होत्या. कारण लौकरच येणार्‍या विधानसभांवर त्यांचा डोळा होता आणि तिथेही डाव्यांना पराभूत करून सत्ता बळकावण्याची रणनिती त्यांनी आखलेली होती. मग दिल्लीत बसून बंगाल कसा जिंकता येणार होता? त्यात ममता यशस्वी झाल्या आणि २०१० सालात त्यांनी डाव्यांना विधानसभेतही पराभूत केलेले होते. त्यानंतर दिदी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आणि दिल्लीत बसून मंत्रालय चालवणारा नवा मंत्री त्या रेल्वे खात्याला मिळालेला होता. अर्थात युपीए ही आघाडी असल्यामुळे ममतांनी ज्याचे नाव सुचवले, त्यालाच रेल्वेमंत्री करणे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भाग होते आणि त्यांनी तसे केलेही. त्यामुळे तृणमूल कॉग्रेसचे वयस्कर नेता दिनेश त्रिवेदी यांची त्या मंत्रीपदी वर्णी लागलेली होती. नंतर आलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्रिवेदी यांनी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडला होता. त्यामध्ये त्यांनी प्रवासी भाड्यात वाढ केल्याची बातमी आली आणि मुख्यमंत्री ममता खवळल्या. त्यांनी अशा दरवाढीला कडाडून विरोध केला. पण दोष कोणाला द्यायचा? कारण मंत्रीच दिदींच्या पक्षाचा होता. तरीही दिदी गप्प बसल्या नाहीत. त्यांनी दरवाढीला विरोध केलाच. पण अशा मंत्र्याला हाकलून लावण्याची मागणी केली. त्रिवेदी थक्क झालेले होते. पंतप्रधान मनमोहन सिंग गडबडलेले होते. पण ममतांसमोर कोणाची डाळ शिजणार होती? ममतांनी त्रिवेदी यांना फ़ैलावर घेतले आणि त्यांच्या बडतर्फ़ीची मागणी पंतप्रधानांकडे केलेली होती. तेव्हा तो केंद्रातील मंत्र्याच्या व पर्यायाने सरकारच्या कामातील हस्तक्षेप नव्हता काय?

संसदेचे अधिवेशन चालू होते आणि त्याच्याशी ममतांचा काही संबंध नव्हता. त्या खासदार नव्हत्या की केंद्र सरकारचा घटक नव्हत्या. त्रिवेदी त्यांच्या पक्षाचे असले तरी ममता पंतप्रधान नव्हत्या. मग त्यांनी कुठल्या अधिकारात त्रिवेदी यांना जाब विचारला? किंवा त्यांच्या हाकालपट्टीचा हट्ट केला होता? त्रिवेदी तृणमूल कॉग्रेस पक्षाचे सदस्य आणि ममता पक्षाध्यक्ष असेच त्यांच्यातले नाते होते ना? मग आजचे भाजपा मंत्री व त्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा, यांच्यातले नाते वेगळे आहे काय? त्रिवेदी यांना फ़ैलावर घेऊन जाब विचारणे पक्षप्रमुख म्हणून ममतांसाठी योग्य व कायदेशीर असेल, तर पक्षाध्यक्ष असलेल्या अमित शहांसाठी कसे चुकीचे ठरू शकते? बहुधा अमित शहा संघाशी संबंधित आणि ममता संघाच्या विरोधक असल्यामुळे त्यांना विशेषाधिकार मिळत असावेत. किंबहूना पुरोगामी असल्यावर सर्व कायदे व घटनेतील बंधनापासून सवलत मिळत असावी. कारण जो आक्षेप त्यांनी अमित शहांविषयी घेतलेला आहे, तोच तसाच्या तसा सोनिया गांधींनाही लागू होऊ शकत होता. मागली दहा वर्षे सोनियाही कुठल्याही दिवशी व कुठल्याही कारणास्तव केंद्रातील मंत्र्यांच्या बैठका घेत होत्या. पण ममतांनी त्याविषयी कधी तोंड उघडलेले नव्हते. त्यातही खुद्द ममतांनी केलेला हस्तक्षे्प अधिक चमत्कारीक होता. त्रिवेदी यांनी रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला असताना दोन दिवसात त्यांची मंत्रीपदावरून हाकालपट्टी करण्यासाठी ममतांनी अट्टाहास केलेला होता. त्यामुळे ऐन अधिवेशन चालू असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपल्या रेल्वेमंत्र्याला बडतर्फ़ करावे लागलेले होते. अर्थात तशी वेळ आली नाही. कारण आपल्या आग्यावेताळ नेत्याची पक्की ओळख असल्याने, त्रिवेदी यांनीच आपल्या पदाचा राजिनामा देऊन मनमोहन सिंग यांची अब्रु राखलेली होती. अशा ममतादिदी आज राजकीय सभ्यतेचे डोस अमित शहांना देत आहेत.

त्यांचे दुखणे घटनात्मक नाही किंवा कायदेशीरही नाही. कारण मंत्री हा सरकारी असला तरी तो एका पक्षाचा सदस्य असतो आणि आपल्या नेत्याला बांधीलच असतो. सहाजिकच प्रत्येक पक्षाचे मंत्री पक्षाच्या बैठकीला पक्षादेशानुसार उपस्थित असतात आणि त्याविषयी कोणी कधी तक्रार केलेली नाही. अमित शहा ही ममतादिदींची बंगालमध्ये पोटदुखी झालेली आहे. किंबहूना राज्यात त्यांच्यासाठी भाजपा हे आव्हान होत चालल्याला विरोध करताना मागल्या दोन वर्षात दिदींनी पंतप्रधान मोदींवर भरपूर दुगाण्या झाडून झालेल्या आहेत. टोलनाक्यावर केंद्रीय राखीव पोलिस कवायत करीत असताना, आपल्या विरोधात मोदींनी लष्कर पाठवल्याचाही कांगावा ममतांनी करून झालेला आहे. पण मोदींवर टिका करून उपयोग होत नसल्याचे भान त्यांना आलेले असावे. किंवा राज्यात भाजपाचा विस्तार मोदींमुळे होत नसून, अमित शहा यांच्या संघटना कौशल्यामुळे भाजपा वाढत असल्याची जाणिव ममतांना झालेली आहे. म्हणून त्यांनी मोदींना गाजर दाखवून शहांना लक्ष्य बनवण्याचा डाव टाकलेला असावा. पण त्यात तथ्य नाही. कारण शहा यांना शिव्याशाप देऊन काहीही होणार नाही. त्यापेक्षा स्वपक्षाच्या गुंड उपटसुंभांनी बंगालभर घातलेल्या धुमाकुळाला आवर घातला, तर भाजपाला तिथे विस्ताराची संधी मिळणार नाही. अमित शहा फ़ार मोठे काही करण्यापेक्षा तृणमूलच्या लोकांनी उच्छाद मांडलेल्या जागी अस्वस्थ होणार्‍या लोकांना गोळा करण्यातून भाजपाचा विस्तार करीत आहेत. त्या जनतेला नाराज करण्याचे उद्योग करणार्‍या तृणमूलच्या गुंडांना रोखले, तरी अमित शहांचा बंदोबस्त होऊ शकतो. त्यासाठी मोदींना समर्थन देण्याची गरज नाही की शहांच्या बैठकीला जाणार्‍या भाजपा मंत्र्यावर काहूर माजवण्याचे कारण नाही. दुसर्‍यांच्या डोळ्यात कुसळ शोधायचे थांबवून ममतांनी आपल्या डोळ्यातले मुसळ बघितले, तरी खुप होईल.

1 comment:

  1. भाऊ,
    सुभाषचंद्र ही बंगालची हळवी जखम आहे. स्वातंत्र्य दिनी घडलेल्या घटनेने आपण मोदींच्या हातात चूड पेटवून दिली आहे हे लक्षात आल्याने दिदीची मस्ती उतरली आहे.
    अचानक आलेले मोदीप्रेम हे त्याच भितीतून आले आहे. अस्सल बंगाली माणूस अस्मितेसाठी काहिही करू शकतो, दिदीने तर अस्मीतेलाच काळे फासले.

    ReplyDelete