Sunday, August 27, 2017

बरबादे गुलिस्तां करनेको,

panchkula violence के लिए चित्र परिणाम

हरयाणात पंचकुला येथे जे काही घडले ते आकस्मिक घडलेले नाही, तर पद्धतशीर घडवले गेलेले आहे. म्हणूनच सरकार नावाची यंत्रणा त्याला जबाबदार आहे. जेव्हा ह्या खटल्याचा निकाल अमूक दिवशी येणार असे जाहिर झाले; तेव्हापासून हा बाबा रामरहिम उर्फ़ गुरमित आपले शक्तीप्रदर्शन घडवण्याची खात्री कोणीही देऊ शकत होता. कारण ह्या बाबाचा अध्यात्माशी वा कुठल्याही धर्मपावित्र्याशी संबंध नसून, तो शक्ती व प्रसिद्धी अशा दोन गोष्टीवर पोसलेला आत्मा आहे. आपली थोरवी सांगणे व ऐकवणे ह्याचा त्याला छंद आहे. म्हणूनच तो नित्यनेमाने कायदे व नियमांना धाब्यावर बसवत आलेला आहे. आपली प्रतिमा निर्माण करणे व तिच्या भक्तीमध्ये सामान्य लोकांना गुंगवून ठेवणे, हा त्याचा धंदा आहे. असा माणूस आपल्या प्रभावाखाली असलेल्या जनसमुदायासाठी आदेश काढून अमूक एका पक्षाला मते देऊ शकतो, म्हणून त्याचे महात्म्य वाढलेले आहे. सहाजिकच त्याच्यावरच खटला व त्याला शिक्षा होण्याची शक्यता लक्षात घेतली, तर पंचकुला येथे जमणारे त्याचे भक्त किंवा अनुयायी, त्याच्या दर्शनासाठी एकत्र येणार नव्हते. बाबानेच आपले शक्तीप्रदर्शन घडवून न्यायप्रशासनावर दडपण आणण्याचा केलेला तो खेळ होता. अशावेळी त्याची नांगी ठेचून सरकारने कायद्याची थोरवी त्याच्या मेंदूत घालण्याला प्राधान्य दिले पाहिजे होते. त्यात हरयाणाचे सरकार तोकडे पडले असेल, तर तिथल्या राज्यकर्त्यांना तितकेच गुन्हेगार मानले पाहिजे. कारण पंचकुलात असे काही घडणार असे स्पष्ट करून सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची वा गुप्तचर विभागाने टेहळणी करण्याची गरज नव्हती. सर्वकाही डोळ्यादेखत घडत होते आणि ते रोखण्य़ाचे अधिकार सरकारपाशी होते. पण मुख्यमंत्री व गृहमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्याचा योग्यवेळी उपयोग केला नसेल, तर तेही तितकेच दोषी आहेत. यात वाद होऊ शकत नाही.

भारतीय कायद्यामध्ये दंडविधान हा सर्वात जुना कायदा आहे आणि तो नेमका अशाच अराजकाला मोडून काढण्यासाठी १८५७ च्या बंडानंतर निर्माण झालेला आहे. त्याने सरकारला खास अधिकार दिलेले आहेत. सामान्य नागरिकांनी संगनमताने कायदेशीर प्रस्थापित झालेल्या सरकारला उलथून टाकण्याचे खेळ करू नयेत, म्हणून अशा जमाव किंवा त्यांच्या सामुहिक हेतूला परावृत्त करण्यासाठीच दंडविधानाची निर्मिती झाली. आजही तेच दंडविधान भारतात लागू आहे. मग पंचकुला येथे दंगलीची स्थिती निर्माण होत असताना भाजपा सरकार नुसते प्रेक्षक बनून बसले असेल, तर त्याला गुन्हेगारच मानायला हवे. एका इवल्या शहरात लाखाहून अधिक बाबाभक्त केवळ त्याच्या दर्शनाला जमा होत नसतात. त्याचे दर्शन घ्यायला असा जमाव त्याच्या तथाकथित चित्रपटांच्या चित्रणस्थळी कधी जमल्याचे आपल्या ऐकिवात नाही. म्हणूनच भक्तांना अकस्मात बलात्कारी बाबाच्या खटल्याचा निकाल असताना दर्शनाची सुरसुरी येण्याचे काही कारण असू शकत नाही. सहाजिकच भक्तगणांचे कोणी नेते म्होरके पाठीमागे राहून सुत्रे हलवित असणार, हे पोलिस यंत्रणेत काम केलेल्यांना सहज लक्षात येऊ शकते. सरकार चालवणार्‍यांना समजू शकते. म्हणूनच त्यांनी जमणार्‍या जमावाला पांगवण्याची तातडी दाखवायला हवी होती. त्यात दिरंगाई झाल्यानेच कोणा नागरिकाने हायकोर्टात जाऊन दाद मागितली, तर न्यायालयाने थेट हत्यार उचलण्याची वेळ आली तरी बेहत्तर; अशा कारवाईचे आदेश जारी केले होते. खट्टर यांनी तिकडेही काणाडोळा केलेला आहे. कागदोपत्री आदेश जारी करण्यात आले, पण त्यानुसार कुठलीही कारवाई प्रत्यक्षात झाली नाही. म्हणजेच दंगलीची शक्यता दिसत असताना, ती हिंसा करण्याची संबंधितांना सरकारनेच मुभा दिलेली होती, हा आरोप योग्य आहे. यातले संगनमत लपून रहात नाही.

इवल्या शहरात स्थनिक लोकसंख्येच्या इतके बाहेरचे लोक दोन दिवस येत रहातात आणि रस्त्यावर ठाण मांडून मुक्काम करतात,. तेव्हा त्या शहराचे नागरी जीवनच अस्ताव्यस्त होऊन जात असते. त्या जमावाची सार्वजनिक खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते, यातच त्यामागची योजना दिसून येते. कुठल्याही सामान्य पोलिसाला त्याची शंका येऊ शकते. म्हणजेच काय घडणार, कुठे घडणार व कधी घडणार, हे जणू प्रत्येकाला माहितीच होते. जे अनुयायी भारावलेले असतात व बाबावर अपार प्रेम भक्ती करतात, ते आपला जीव धोक्यात घालून कुठल्याही थराला जाण्याची शक्यता असते. कळपाची वा जमावाची मानसिकता क्षणार्धात हिंसक होऊ शकते. मग इथे काय वेगळे घडणार होते? त्याचे भान व जाण मुख्यमंत्र्याला नसेल, तर असा माणूस राज्याचा कारभार करण्यासाठी पुर्णत: नालायक असतो. जे भाजपावाले किंवा त्या पक्षाचे समर्थक ममता बानर्जी यांच्या अशाच हलगर्जीपणा वा नाकर्तेपणासाठी बशिरहाट वा कालिचक घटनांसाठी बोटे मोडतात, त्यांनी तितक्याच आवेशात पुढे येऊन मनोहरलाल खट्टर यांचाही निषेध केला पाहिजे. कारण या एका माणसाच्या नाकर्तेपणाने इतक्या लोकांचा बळी गेला आहे आणि त्याच्याच पक्षाला बट्टा लागला आहे. असे असूनही जर भाजपावाले खट्टर यांचा बचाव मांडणार असतील, तर त्यांच्यात आणि पुरोगामी म्हणून ममताला पाठीशी घालणार्‍यांमध्ये कुठलाही फ़रक उरत नाही. किंबहूना असे लोक कितीही राजकीय बौद्धिक वाचाळता करणारे असोत, त्यांच्यात आणि डेरावाल्यांमध्ये तसूभर फ़रक नसतो. कारण त्यांना सत्य वा वास्तवाशी काडीमात्र कर्तव्य नसते. बाबाभक्त अंधश्रद्ध मानायचे, तर राजकीय समर्थक तरी कुठे विवेकाने व आपल्या बुद्धीने सत्याला सामोरे जात असतात? हा विषय पक्षीय वा राजकीय नसून शासनव्यवस्थेचा आहे. तिथे पक्ष वा भूमिकेला स्थान नसते.

झाकीर नाईकच्या शब्दांनी भारावलेले कोणी फ़िदायीन व्हायला जात असतात, तर गुरमित बाबासाठी आपला जीव धोक्यात घालून दंगल माजवायला जाणारेही तसेच समाजाला विघातक असतात. अशा हिंसाचाराला व विध्वंसाला राजकीय मतलबासाठी पाठीशी घालणारे कॉग्रेसी वा पुरोगामी असोत; किंवा भाजपावाले असोत, दोघेही समाजासाठी तितकेच संकट होत असतात. बाकी राजकीय प्रतिक्रीया बाजूला ठेवा. पंचकुलातील सामान्य नागरिक आज विचलीत झाला आहे, त्याला भाजपाविषयी प्रेम नसते की कॉग्रेसविषयी आस्था नसते. त्याला सुखरूप सुरक्षित जीवन हवे असते. त्यालाच य घटनेतून बाधा आलेली आहे. बंगालमधला हिंदू आजवर कधी भाजपाच्या पाठीशी आलेला नव्हता. पण ममताच्या मुस्लिम लांगुलचालन व पक्षपाती कारभाराने तो भाजपाच्या मागे येऊ लागला. याचा अर्थ त्याला हिंदू गुंडांची हिंसा हवी असा होत नाही. त्याला अराजकापासून मुक्ती हवी असते. हरयाणातल्या घटना बंगालचा अस्वस्थ मातदार बघत असेल, तर त्याला ममता वा भाजपा यात तसूभरही फ़रक दिसणार नाही. कारण जे ममतांनी बंगालमध्ये केलेले आहे, त्याचीच उलट्या बाजूने पुनरावृत्ती उद्या भाजपा सत्तेत आल्यावरही होईल, असेच त्या मतदाराना वाटल्यास नवल नाही. ममतांनी मौलाना बरकतीला पाठीशी घालणे, किंवा खट्टर यांनी बाबा रामरहिमकडे काणाडोळा करून पंचकुला जळू देणे; यात कुठलाही फ़रक नसतो. पंतप्रधान मोदी व भाजपाचे नेतृत्व, खट्टर यांना प्रतिष्ठेखातर पाठीशी घालणार असेल, तर त्यांची लौकरच कॉग्रेस झाली म्हणावे लागणार आहे. चुका स्विकारण्यातून चुका सुधारण्याला आरंभ होत असतो आणि तोच योग्य मार्ग असतो. उलट अहंकाराच्या आहारी जाऊन चुका नाकारण्याने विनाशाला आमंत्रण दिले जात असते. हरयाणातील बेपर्वाई वा नाकर्तेपणा ही चुक सुधारायची असेल, तर ती स्विकारून खट्टर या नाकर्त्या मुख्यमंत्र्याला बाजूला करणेच अपरिहार्य आहे. कुणा शायराने म्हटलेलेच आहे,

बरबादे गुलिस्तां करनेको, बस एकही उल्लू काफ़ी था!

2 comments:

  1. डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा लेख!

    ReplyDelete
  2. भाऊ अत्यंत समर्पक लेख ..
    असे खडे बोल बेलणारे कणखर नेतृत्व भाजपचे असुन सुद्धा अशा घटना घडतात हे अंत्यत लाजीरवाणे आहे. संघ शिस्तीचे दाखले देणार्या हे शोभत नाही.
    अशा केवळ 2-4 घटना नी भाजप सारखा अत्यंत अल्प अनुभव असलेला पक्ष लोकसभा निवडणूकीत सहज पराभुत होऊ शकतो. आणि हेच फाॅरेन मालकी असलेल्या पेड मिडिया व त्यांच्या मालकांना पाहिजे आहे. असे कणखर राष्ट्रवादी नेतृत्व भारता सारख्या सुजलाम सुफलाम खंडप्राय देशाला मिळणे हिच खरी इतर राष्ट्रांची पोटंदुखी आहे.
    त्याचमुळे पुढील दिड वर्षांत असे अनेक प्रसंग सहज निर्माण होऊन परत एकदा भ्रष्टाचारी, कमकुवत, राष्ट्रविके व लंपट नेतृत्वाखाली (पक्षांनी मिळुन ) देश जाऊ शकतो..
    या बाबा ची केस 2002 पासुन चालू आहे व अत्ता जाग आली पण यांना कोण विचारणार? मांजराच्या गळ्यात घंटा घालणारा मायका लाल अजुन भारतात जन्माला यायचाय?.. सारेच अजब या देशात

    मिडियावाले एका बाजुने प्रिंन्स व अखलाक, सारखा बागुलबुवा व दुसर्या बाजुने महागटबंधनचा गाजरी पर्याय जनतेला दाखवून बिहार प्रमाणे सहज जनमत फिरऊ शकतो. याचे प्रात्यक्षिक झालेले आहे.
    तसेच असे लाखो लोक भारतासारख्या 130 करोड लेकसंख्येच्या देशात अनेक ठिकाणी जमत असतात/ जमवणे सहज शक्य आहे.. आता एक मराठा लाख मराठा सारखे दिसायला निर्नायकी ( सुत्रधार पडद्याआड आहे कमाल आहे नाही अशाच एखाद्या शांती मोर्चाला सहज गालबोट/ उतपात लागलेतर परत सरकारच जबाबदार कोणीही भिड जमवायची आणि ऊतपात माजवला की झाले. लोकशाही सरकार कीती कचकड्या प्रमाणे असतात?)

    आता याचाच मोठा पट कदाचित तयार करण्यात आलेला असेल. व टप्प्या टप्प्यांत केला जाइल व मोदी शहा सारख्या मानवांना हे आवरणे अशक्यच आहे.
    यातच भर म्हणुन अनेक काँग्रेसी व इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते भाजपत सामील झाले आहेत यांना फितवुन व साथीने सहज कल्लोळ माजवला जाऊ शकतो.
    व मोदी सरकारची बाहेरुन भक्कम दिसणारी नौका लोकसभा निवडणूकीत सहज डुबु शकते व हे सत्तेचा फायदा घेणारे उंदीर भ्रष्टाचार न करु शकल्याने उपासमार होऊन बोटीतुन पटापट उड्या मारुन बाहेर पडतील. व साधुवाण्याच्या नौके प्रमाणे मोदींची नौका फुला पाण्याने भरलेली होऊ शकते. कारण भाजपा किंवा कोणताही (अगदी 1971 मधला इंदिरा गांधी च्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष ) राष्ट्रवादी राष्ट्रभक्त पक्ष जगाला भारताचा सत्ताधारी पक्ष म्हणुन नको आहे. त्यांना देशाशी गद्दारी करणारेच लंपट नेतृत्व पाहिजे आहे म्हणजे सत्तेत भागिदारी करून लुटमार करता येते व दुसरीकडे स्वार्थी व मश्गुल व गरिब व मजबुर जनतेला सहज भुलवुन/प्रलोभने दाखऊन दशकांनु दशके राज्य करता येते..
    या घटना याचीच चाहुल देतात..
    भाऊ तुम्ही कान टोचणी बरोबर केलेली आहे....

    ReplyDelete