Monday, August 28, 2017

केजरीवाल आणि शिवसेना

bawana के लिए चित्र परिणाम

सहा महिन्यांपुर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणूका झाल्या. तशाच आणखी नऊ महापालिकांच्या निवडणूका महाराष्ट्रात झाल्या होत्या. त्यात भाजपाने बाजी मारली आणि मुंबई-ठाणे वगळता जवळपास सर्व पालिकांत भाजपाने आपली सत्ता प्रस्थापित केली. मुंबईत भाजपाने शिवसेनेच्या आजवरच्या मक्तेदारीला सुरूंग लावून आपली शक्ती सिद्ध केली. कुठल्याही निवडणूकांचे निकाल तात्कालीन असतात. त्यातला विजय पराजय सुद्धा हंगामी असतो. कारण त्या विजयाला अजिंक्यपद समजले, मग पराभव आपल्या चालीने तुमच्या अंगावर चाल करून येत असतो. म्हणूनच विजय असो किंवा पराजय त्याचा बारकाईने अभ्यास करून त्यावर मात करण्याच्या कामाला लागण्यात खरे राजकारण सामावलेले असते. जे भाजपाने बर्‍याच अंशी आत्मसात केलेले आहे आणि त्यांच्या मागून नवखा राजकारणी असूनही केजरीवाल व त्यांच्या पक्ष आपने ते सत्य स्विकारलेले आहे. तसे नसते तर चार महिन्यांपुर्वी दिल्लीच्या तिन्ही महापालिकात दारूण पराभव पचवलेल्या केजरीवाल यांनी बावना या पोटनिवडणूकीत दणदणित विजय संपादन करताना भाजपाला दिल्लीतच धुळ चारली नसती. याचे उलटे टोक आहे मुंबईतली शिवसेना! तीन वर्षापुर्वी युती तुटल्यानंतरही एकाकी लढताना मिळवलेले विधानसभेतील यश, शिवसेनेने नुसती वायफ़ळ बडबड करून नासवलेले आहे. मुंबई नजिकच्या पनवेल वा मिरा भाईदर या पालिकात सेनेला इतके अपयश येण्याचे काही कारण नव्हते. शिवसेना व केजरीवाल यांच्यातला हा फ़रक म्हणूनच समजून घेण्याची गरज आहे. किंबहूना दिल्लीच्या ताज्या पोटनिवडणूकीचे निकाल, हा शिवसेनेसाठी मोठा धडा आहे. अर्थात शिकण्याची तयारी व मानसिकता असली तरची गोष्ट आहे. अन्यथा मनी व मुनी असल्या शब्दच्छलात गुरफ़टून हातातलेही गमावण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही.

२०१४ च्या लोकसभेपुर्वी पाच महिने केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठी बाजी मारून दाखवत भाजपाला मिळू शकणारे बहूमत हिसकावून घेतले होते. त्या नव्या पक्षाला भले बहूमत मिळवता आले नाही, तरी त्यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा मिळवत सत्तेपर्यंत मजल मारली होती. पण तितक्या यशाची झिंग चढून केजरीवाल पंतप्रधान होण्याच्या स्वप्नात रममाण झाले आणि हातातली दिल्लीही त्यांनी पाच महिन्यात गमावली. दिल्लीच्या मर्यादित सत्तेवर लाथ मारून त्यांनी थेट लोकसभा जिंकण्याचे मनसुबे रचले आणि देशात सर्वाधिक उमेदवार उभे करण्याचा जुगार खेळला होता. त्यात सर्वत्र पराभूत होताना त्यांना दिल्लीही गमवावी लागली होती. पण त्या पराजयाचा अभ्यास करून केजरीवाल पुन्हा दिल्ली जिंकण्यासाठी कंबर कसून उभे राहिले. त्यांनी बाकी सर्व गोष्टी सोडल्या आणि पुन्हा आपली सर्वच्या सर्व शक्ती दिल्लीत कामाला जुंपली. फ़ार कशाला, त्यांनी माध्यमात व वाहिन्यांवर झळकणे बंद केले आणि पुन्हा मध्यावधी निवडणूकीत दिल्लीची सत्ता जिंकण्यासाठी ताकद केंद्रीत केली. आपले बलस्थान म्हणजे कार्यकर्ता व जनसंपर्क हे ओळखून, जे कष्ट पुढल्या दोनतीन महिन्यात उपसले, त्यातून त्यांना ७० पैकी ६७ जागा जिंकणे शक्य झाले. मात्र तिथून पुन्हा त्यांचा तोल गेला. हाती असलेली सत्ता जनहितासाठी राबवायचे सोडून, केजरीवाल दिल्लीबाहेर मोहिमा करताना दिल्लीकरांना वार्‍यावर सोडत राहिले. त्याची किंमत मग महापालिका मतदानाच्या वेळी मोजावी लागलेली होती. गेल्या एप्रिल महिन्यात होणार्‍या पालिका मतदानापुर्वी त्यांच्याच आमदाराच्या राजिनाम्याने रिक्त झालेली जागा आम आदमी पक्षाला गमवावी लागली आणि तिथे डिपॉझीटही जप्त झाले. दोन आठवड्यांनी सर्व पालिकातही तसाच दारूण पराभव त्यांच्या वाट्याला आला. मात्र त्यानंतर केजरीवाल एकदम गप्प झाले. कशाला?

गेले चार महिने केजरीवाल वा त्यांच्या आम आदमी पक्षाचा कुठे आवाज ऐकू येत नव्हता. त्यांच्यावरचे आरोप किंवा भानगडींचाच गवगवा चालू होता. त्याचा खुलासाही देण्यासाठी माध्यमात यायचे त्या पक्षाने टाळले. आपण लोकांची सहानुभूती गमावली आहे आणि लोकांनी दिलेल्या सदिच्छा गमावल्या आहेत, हे त्यांनी ऒळखले होते. म्हणूनच माध्यमे, पत्रकार वा विरोधकांच्या आरोपाला उत्तरे देण्यापेक्षा त्या पक्षाने पुन्हा जनतेत जाण्याला प्राधान्य दिले. आपल्याला माध्यमांनी मते दिलेली नाहीत, तर जनतेने मते दिली आहेत. तर जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केल्यासच निवडणूकीत विजय संपादन करता येईल, हा त्या पराभवातला धडा होता. एप्रिल महिन्यातील पराभव म्हणून आता बवाना या पोटनिवडणूकीत केजरीवाल धुवून काढू शकलेले आहेत. पंजाब विधानसभा, दिल्लीतील राजोरी गार्डन पोटनिवडणूक व महापालिकातील पराभवाने आम आदमी पक्षाला जबरदस्त धक्का बसलेला होता. त्यातून सावरण्याचा पहिला मार्ग म्हणजे माध्यमातून चाललेली पोपटपंची थांबवणे. दुसरी गोष्ट पुन्हा थेट जनतेला जाऊन भिडणे. या दोन गोष्टीत केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी आपल्याला पुर्णपणे झोकून दिले आणि आज त्याचा परिणाम समोर आलेला आहे. त्या पक्षाचेच एक आमदार भाजपात गेले, म्हणून पोटनिवडणूक लागली होती. ते आमदार वेदप्रकाश त्याच जागी भाजपा उमेदवार म्हणून उभे होते आणि ताज्या मतदानात त्यांना आम आदमी पक्षाच्या नवख्या उमेदवाराने पराभूत केलेले आहे. याचा अर्थ इतकाच, की अजून त्या पक्षाविषयी जनमानसात अपेक्षा आहेत आणि योग्य भूमिका घेतल्यास जनता त्यांना प्रतिसाद देते आहे. हेच विधानसभा निकालानंतरच्या तीन वर्षात शिवसेनेने केले असते, तर जिल्हा परिषदा, तालुका पंचायती व पालिका मतदानात शिवसेनेला मोठे यश संपादन करता आले नसते का?

पण मागल्या तीन वर्षात आपला लोकसंपर्क वाढवून अधिकाधिक मतदारामध्ये विश्वास संपादन करण्याचा विचारही सेनेच्या नेतृत्वाल सुचलेला नाही. त्यापेक्षा उठसूट कुठलेही कारण व निमीत्त शोधून भाजपा व त्यांच्या नेत्यावर टिकाटिप्पणी करण्यात कालापव्यय करण्यात आलेला आहे. पालिका मतदानात मार खाल्ल्यानंतर शेकडो विषय टिकेसाठी मिळाले असतील. पण त्यात गुंतून पडण्यापेक्षा केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी, सर्व शक्ती जनसंपर्कात खर्ची घातली. हेच शिवसेनेला महाराष्ट्रात करणे अशक्य होते काय? केजरीवाल राजकारणात निष्क्रीय झालेले नव्हते, तर माध्यमाच्या प्रसिद्धीपासून त्यांनी अलिप्त होत, त्यांनी वादात शक्तीक्षय करण्याचे टाळलेले होते. त्यापेक्षा भाजपाला दिल्लीत गाफ़ील ठेवून तळागाळातून आपली संघटना नव्याने भक्कम करण्याला प्राधान्य दिलेले होते. मागल्या तीन वर्षात शिवसेनेने असे काही केले असते, तर पनवेल, मिरा भाईंदर वा अगदी मुंबई पुण्याच्या पालिकेतही वेगळे निर्णय बघायला मिळाले असते. पण शिवसेनेत आजकाल कार्यकर्त्यांपेक्षा प्रवक्ते म्हणजे तोंडपाटिलकी करणार्‍यांची चलती आहे. म्हणूनच तिथे शिवसेना जोरात आहे आणि संघटना व मतदानात तोकडी पडू लागली आहे. दिल्लीत दुसर्‍यांदा केजरीवाल यांनी पराभवातून शिकून विजय खेचून आणण्याचा धडा घालून दिलेला आहे. तो शिवसेनेने शिकण्यासारखा आहे. पण राहुल गांधींनाही लाजवणारी विधाने करण्यात गुंतलेल्या सेनेच्या शहाण्यांना सत्याचा ‘सामना’ करायला कोणी शिकवायचे? दिल्लीत जी क्षमता केजरीवाल यांची आहे, तीच मुंबई परिसरात शिवसेनेपाशी आजवर होती. पण बाळासाहेबांच्या अस्त्तानंतर ते व्यवहारी शहाणपण कुठल्या कुठे अस्तंगत झालेले आहे. केजरीवाल पराभवातून धडा शिकतात आणि आजची शिवसेना पराभवातही आपला विजय सिद्ध करण्याचा नवा प्रयोग सिद्ध करत असते.

5 comments:

  1. Surekh vishleshan. BJP la aata tari Delhi madhye shaman pan yeil hich apeksha.

    ReplyDelete
  2. भाऊ मला वाटतेय हरियाणा मध्ये जो नपुंसक पणा पण कारणीभूत असेल

    ReplyDelete
  3. Jo development karel tyalach vote milel jo fakt bolbacchan karel to out hoil
    Ata public smart zhaliy aadhisarkh emotional public nahi ata

    ReplyDelete
  4. सुंदर विश्लेषण.
    तुम्ही किहीही जागे करू पाहत असला तरी सेनेच्या शीर्ष नेतृत्वाने डोळ्यावर कागदे ओढले आहे आणि कानात बोळे घातले आहेत.

    ReplyDelete
  5. 2019 la may be tumhala hyncha utter bhetel. ...karan mi tumche sagla lekh vachto....kahi lekha madhe tumhi tarkaa lavle hote teee sampurnachukiche tharle hote ani tumhi tooon ghashi padla hota.....!!! So I am not beliving you...ani kejriwal chaa tumhi kai sangtaa saheb haaa maharastra aaahe ani ti delhi sagle parprantiya...!!!

    ReplyDelete