Monday, August 7, 2017

नितीशकुमार, तुमचे चुकलेच

modi nitish के लिए चित्र परिणाम

राजकारणात बाजू बदलली की मग कुठलाही नेता सफ़ाईने आपल्या कालच्या भूमिका विसरून नव्या भूमिका आक्रमकपणे मांडू लागतो. समोरच्याने त्याच नेत्याच्या कालच्या जुन्या भूमिकांविषयी विचारणा केली, तर आपण त्या गावचेच नव्हे; इतकी कोलांटी उडीही मारून दाखवतो. बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीशकुमार सध्या तीच कसरत करीत आहेत. मागल्या आठवड्यात त्यांनी बिहारचे महागठबंधन मोडून आपल्या पदाचा राजिनामा दिला आणि काही तासातच भाजपाशी हातमिळवणी करून दुसर्‍या दिवशी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथही घेऊन टाकली. अशा स्थितीत २०१९ सालात लोकसभेच्या निवडणूकीविषयी त्यांना कोणीही प्रश्न विचारणे गैरलागू होते. कालपर्यंत विरोधात बसून मोदींना पर्याय शोधण्याची भाषा करणार्‍या नितीशनी, तसा पर्याय उपलब्ध नसल्यानेच महगठबंधन मोडलेले आहे आणि आपली खुर्ची टिकवलेली आहे. मोदींच्या आशीर्वादाशिवाय इतक्या वेगाने हे सत्तांतर होऊ शकले नसते. मग त्याच आशीर्वादकर्त्याच्या विरोधात नितीश अवाक्षर आज बोलू शकतील काय? मोदींना दुखावणारे बोलून त्यांना भाजपाचा मिळालेला पाठींबा टिकवणे शक्य आहे काय? नसेल तर नितीश याक्षणी मोदींचाच जयजयकार करणार ना? ज्या आघाडीत नितीश सहभागी झालेत, त्या आघाडीचा आज जो म्होरक्या आहे, त्याच्याच नेतॄत्वाखाली पुढली निवडणूक लढवली जाणे अपरिहार्य असेल, तर त्याला अन्य कुठले आव्हान असल्याचे नितीशना कसे मान्य करता येईल? म्हणून तर नितीशनी या प्रश्नाला उत्तर देताना २०१९ सालात मोदींना कोणी आव्हान देण्याच्या स्थितीत नसल्याचे बिनदिक्कत सांगून टाकले. म्हणून ते शब्दश: खरे आहे असेही मानायचे कारण नाही. मोदी कधीच अजिंक्य नव्हते आणि २०१९ सालाचे भविष्य आज कोणी इतक्या ठामपणे सांगणेही योग्य होणार नाही.

पुढल्या लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला अजून किमान दिड वर्ष शिल्लक असून, इतक्यात कुठलेही आव्हान नाही असे कोणी म्हणू शकत नाही. राजकारणात एक महिनाही खुप मोठा कालावधी असतो. महिनाभरापुर्वी भाजपाने रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी जाहिर केले, तोपर्यंत नितीशना तरी आपण त्यांनाच पाठींबा देणार असल्याचे कुठे माहिती होते? तेव्हा कोणी म्हटले असते, की नितीश तुम्ही भाजपाच्या राष्ट्रपती उमेदवाराला मते देणार काय? तर अशा ठामपणे होकारार्थी उत्तर नितीश देऊ शकले असते काय? पण कोविंद यांचे नाव जाहिर झाले आणि नितीशनी सर्वात प्रथम त्यांचे अभिनंदन करायला धाव घेतली होती. तेव्हा विनाविलंब अनेकांनी नितीश एनडीएत चालल्याचा निष्कर्ष काढला होता. पण त्याविषयी तरी नितीश काय ठामपणे सांगू शकलेले होते? कोविंद यांचे समर्थन केल्याचा असा अर्थ लावू नये, अशी भाषा तेव्हा कोण बोलत होता? नितीशकुमारच ना? मग ज्याला महिनाभरापुर्वी आपण एनडीएत जाणार असल्याचे ठामपणे सांगता येत नव्हते, त्यानेच आज २०१९ सालातल्या लोकसभा निवडणूकीविषयी इतके ठामपणे बोलणे योग्य मानता येईल काय? त्यातली राजकीय कसरत लक्षात घेतली पाहिजे. भाजपाच्या पाठींब्याने व मोदींच्या आशीर्वादाने खुर्ची टिकवायची असेल, तर अशी भाषा आज बोलणे अगत्याचेच आहे. किंवा आजच्या स्थितीत तरी मोदींना पर्याय नाही असाच त्याचा अर्थ घेण्यापुरती ही गोष्ट मर्यादित मानता येईल. त्यावर विसंबून राजकारण कोणी खेळायची वा गृहीत धरायची गरज नाही. कारण अजून दीड वर्ष शिल्लक आहे आणि तेवढ्या काळात अन्य कुठलाही पर्याय उभा राहू शकतो. किंवा मोदींना नवे आव्हानही उभे ठाकू शकते. कारण राजकीय पर्याय केवळ प्रचलीत संसदीय राजकारणात उपलब्ध असलेल्या पक्षातूनच येतो असे अजिबात नाही.

२०१४ सालात सोनिया वा त्यांच्या कॉग्रेस नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या युपीएला कोणी पराभूत करू शकेल, असे कोणाला वाटत नव्हते. कारण विरोधाचे नेतृत्व करणारा अडवाणी, सुषमा स्वराज यांचा भाजपा खुपच दुबळा होता आणि त्याला अन्य विरोधकांची मोट बांधणे शक्य होताना दिसत नव्हते. संसदीय राजकारणातील प्रस्थापित विरोधी पक्ष प्रक्षुब्ध जनभावनेचे नेतृत्व करायला इतके नाकर्ते ठरले होते, की अण्णा हजारे वा बाबा रामदेव अशा राजकारणबाह्य लोकांनी लोकक्षोभाचे नेतृत्व हाती घेतले होते. त्यातून आंदोलनाचा संघर्ष सुरू केला होता. त्यापैकी कोणी निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याची बिलकुल शक्यता नव्हती. खेरीज नरेंद्र मोदींचे नाव कुठून तरी पटलावर यायचे. पण त्याची टिंगलटवाळीच चालली होती. खुद्द मोदी गुजरातची विधानसभा तिसर्‍यांदा जिंकण्याच्या धावपळीत मग्न होते. म्हणून तर निर्भया वा लोकपाल अशा आंदोलनातून प्रक्षुब्ध जनभावना समोर धुमाकुळ घालत असतानाही, सोनिया-राहुल वा पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बहुतेक वरीष्ठ सहकारी पुर्णपणे गाफ़ील होते. त्याच आंदोलनातील केजरीवाल व काही लोकांनी दिल्लीतला नवा पक्ष स्थापन करून कॉग्रेसला तिथल्या विधानसभेत धुळ चारली. अन्य तीन राज्यात कॉग्रेसचा धुव्वा उडाला तरी सोनिया निर्धास्त होत्या. कारण आपल्या नेतॄत्वाला राष्ट्रीय आव्हान देऊ शकणारा कोणी चेहरा समोर नसल्याची त्यांना पक्की खात्री होती. खरोखरच कुठला राष्ट्रव्यापी नेतृत्व करू शकेल असा नेता समोर दिसत नव्हता, की दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून पुढे येऊ शकलेला नव्हता. मोदींच्या नावाविषयी चर्चा असली, तरी गुजरात दंगलीमुळे ते बदनाम असल्याने अगदी राजकीय अभ्यासकांनाही तशी शक्यता दिसत नव्हती. पण मोदी झंजावात होऊन काही महिन्यात देशभर पसरले आणि त्यांनी लोकक्षोभाचे वादळ आपल्या शीडात भरून घेतले.

मतदानाचा कार्यक्रम वेळापत्रक जाहिर होऊन मोदी प्रचाराला फ़िरू लागले; तेव्हा एकेकाला जाग येऊ लागली. केवळ सहा महिने आधी कॉग्रेसला आपल्या समोर उभे राहिलेले आव्हान ओळखता आले. पण तोवर वेळ गेलेली होती. दीडदोन वर्षे आधी, म्हणजे २०१२ च्या मध्याला किंवा गुजरात निवडणूकीपुर्वी मोदी हे आव्हान असल्याचे कोणी कॉग्रेसवाला मान्य करत होता काय? कोणी राजकीय अभ्यासक विश्लेषक कॉग्रेसला निवडणूक सोपी नसल्याचे म्हणत असला, तरी अशक्य मानायला तयार होता काय? फ़ार कशाला खुद्द भाजपामध्ये कोणी प्रवक्ता तरी मोदी हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे ठामपणे सांगायला धजावत होता काय? राजकारणामध्ये दीड दोन वर्षे खुप मोठा अवधी असतो आणि त्याचा घटनाक्रम अशाच दिशेने जाईल, अशी कोणी छातीठोक खात्री देऊ शकत नाही. २०१४ जिंकल्यापासून लागोपाठ अनेक विधानसभा पादाक्रांत करीत गेलेले नरेंद्र मोदी वा अमित शहा यांनाही आज कोणी विचारले, तर २०१९ सहज जिंकू असे ते सांगणार नाहीत. कारण निवडणूका इतक्या सोप्या नसतात. काळाची कुस कुठल्या क्षणी बदलून उलथापालथ होईल, हे सांगणे इतके सोपे नसते. कारण घटनाक्रम उलगडत जात असतो आणि घटनाक्रम अनपेक्षितच असतो. त्यावर भाकिते करता येतात आणि ती कधी चक्क उलटी सुद्धा ठरू शकतात. खुद्द नरेंद्र मोदी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. जो गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नालायक व घातक ठरवण्यात जाणत्यांनी व राजकारण्यांनी बारा वर्षे खर्ची घातली, तो देशाचा आजचा सर्वात लोकप्रिय नेता होण्याचे भाकित कोणाला तरी करता आलेले होते काय? तसे असते तर नितीशनी मोदींच्याच उमेदवारीला विरोध करून चार वर्षापुर्वी एनडीए कशाला सोडली असती? मोदी हा पर्याय असल्याचे तेव्हा नितीशना ओळखता आले नसेल, तर त्याच मोदींना आज आव्हान नसल्याचे बोलण्याच्या अधिकार नितीशना असतो काय?

नितीश यांची जितकी राजकीय कुवत आहे तितका त्यांनी मोदींना कडाडून विरोध केला आणि पर्यायही होण्याचा प्रयत्न करून बघितला. त्यासाठी विरोधकांची जुळवाजुळव सुद्धा करून बघितली. पण चार वर्षाचा अनुभव नितीशना एक गोष्ट शिकवून गेला. ते ज्या घोळक्यात शिरले होते. त्या घोळक्याला मोदींशी टक्कर देता येणार नाही, की त्यापैकी कुठला पक्ष वा उपलब्ध नेत्यामध्ये मोदींशी दोन हात करण्याची क्षमता नाही. हे नितीश अनुभवाने सांगत आहेत. त्यांचा पक्ष एका राज्यापुरता असून त्या बळावर मोदींच्या राष्ट्रव्यापी प्रतिमा व लोकप्रियतेला आव्हान देणे शक्य नाही, हे नितीश अनुभवातून शिकले आहेत. म्हणूनच त्यांनी व्यक्त केलेले मत तेवढ्यापुरते मान्य करता येईल. जे कोणी आज मोदी विरोधात दंड थोपटून बेडकुळ्या काढून दाखवत आहेत, त्यापैकी कोणातही मोदींना पराभूत करण्याची कुवत नाही, असे नितीश यांना सांगायचे आहे. राहुल-सोनिया, ममता वा कॉग्रेस-डाव्यांची आघाडी यांच्याकडून कोणी अशा पर्यायाची अपेक्षा करू नये, इतकेच नितीशना म्हणायचे आहे. असे सर्वच पक्ष एकत्र येऊनही मोदींना पराभूत करू शकत नाहीत, हा नितीश यांचा निष्कर्ष आहे. मागल्या तीन वर्षाच्या अनुभवाचे ते सार आहे. पण म्हणून अन्य कुठल्या मार्गाने मोदींना राजकीय पर्याय वा आव्हान उभेच रहाणार नाही, असे कोणी बोलू नये. तसे नितीश यांचे मत असेल, तर ती त्यांची चुक आहे. सत्य इतकेच आहे, की मोदी अजिंक्य नाहीत. त्यांना पराभूत करणेही अशक्य नाही. त्यासाठी मोदींपेक्षा अधिक कष्ट घेणारा, संपुर्ण वेळ राजकारणाला वाहून टाकणारा नेता असायला हवा आहे आणि त्याच्यापाशी भाजपा संघासारखी भरभक्कम कार्यकर्त्यांची फ़ौज अधिक अमित शहा सारखा एकाग्रचित्त व्यवस्थापक असायला हवा. तसा मोणी दिसत नाही म्हणून नितीश पर्याय नसल्याचे सांगतात. त्याचा अर्थ असा आहे, की मोदी जिंकत नसून नाकर्ते विरोधक आपल्या कर्माने पराभव ओढवून आणत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून मोदी जिंकताना दिसत आहेत.

2 comments: