बावीस वर्षापुर्वी कॉग्रेसने भाजपा नेते शंकरसिंग वाघेला यांना एक पुरस्कार दिलेला होता. तेव्हा १९९५ सालात प्रथमच भाजपाने गुजरातमध्ये स्वबळावर बहूमत संपादन केले होते. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात कायम सत्तेत बसलेल्या कॉग्रेसला सत्तेबाहेर बसायची वेळ आलेली होती. अशावेळी भाजपात फ़ुट पाडण्याचे प्रयास कॉग्रेसकडून चालू होते. त्याला भाजपातील सत्तालालसेचाही हातभार लागला आणि त्या सत्ताधारी पक्षात उभी फ़ुट पडली. भाजपाला गुजरातमध्ये रुजवायला अखंड कष्ट उपसलेल्या शंकरसिंग वाघेला यांचा भ्रमनिरास झाला होता. कारण मुख्यमंत्रीपदाची माळ केशूभाई पटेल या ज्येष्ठ नेत्याच्या गळ्यात पडली होती. त्यामुळे वाघेला निराश झालेले होते. तर त्या आगीत तेल ओतण्याचे काम कॉग्रेसने केले आणि वाघेलांना चण्याच्या झाडावर चढवले होते. वाघेलांनी एक दिवस बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि केशूभाई सरकार धोक्यात आले. त्यासाठी वाघेला यांनी आपल्याशी निष्ठ असलेल्या भाजपा आमदारांना गोळा करून लपवून ठेवलेले होते. त्यापैकी अनेकजण माघारी जाण्याची भिती त्यांना वाटत होती. म्हणून त्यांनी आपल्या निष्ठावंतांना गुजरातमधून अन्यत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. ५५ आमदारांना गुपचुप विमानतळावर आणले गेले आणि तिथून थेट मध्यप्रदेशात खजुराहो येथील एका पंचतारांकित हॉटेलात लपवले गेले. दिग्विजय सिंग हे कॉग्रेस मुख्यमंत्री या बंडखोर भाजपा आमदारांची बडदास्त राखण्यासाठी पुढे होते. पुढे त्यातूनच वाघेला कॉग्रेस पुरस्कृत मुख्यमंत्री सुद्धा झाले. पण फ़ार काळ त्यांना कॉग्रेसने सत्ता भोगू दिली नाही. मात्र वाघेला यांनी तो पुरस्कार स्विकारून नंतर कॉग्रेसमध्येच प्रवेश केला. आता बहुधा तोच पुरस्कार वाघेलांनी परत करण्याचा निर्णय घेतलेला असावा. अन्यथा खजुराहो नाट्याची पुनरावृत्ती कशाला झाली असती?
आज वाघेला यांच्यापासून कॉग्रेसचे आमदार वाचवण्यासाठी कॉग्रेसलाच आपले ४४ आमदार कर्नाटकात पळवून नेण्याची नामुष्की आलेली आहे. तेव्हा तरी भाजपासाठी राज्याची सत्ता व मुख्यमंत्रीपद वाचवण्याचा प्रश्न होता. आज तर तशी कुठलीही मोठी गोष्ट गुजरातच्या राजकारणात नाही. निवडणूका चार महिन्यांनी व्हायच्या असून आमदार कुठूनही कुठे गेले, म्हणून गुजरातच्या राजकारणात काहीही उलथापालथ होण्याची बिलकुल शक्यता नाही. तरीही कॉग्रेसला आपलेच आमदार अन्य राज्यामध्ये लपवण्याची नामुष्की आलेली आहे. कारण १९९५ नंतर दोन दशकात कितीही लपवाछपवी वा पळवापळवी करून कॉग्रेसला कधीच गुजरातची सत्ता मिळवता आली नाही. उलट प्रत्येक निवडणूकीत भाजपा कायम बहूमत व सत्ता मिळवत गेला. कॉग्रेसच्या अशा फ़ोडाफ़ोडीच्या राजकारणाने भाजपाचे कुठलेही नुकसान होऊ शकले नाही. पण या गडबडीत कॉग्रेसने भाजपाच्या अशा नेत्याला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आणून बसवले, की ज्याने पुढे कॉग्रेसलाच देशातून हद्दपार करण्याची शपथ घेतली. आज तोच माणुस देशाचा पंतप्रधान बनून बसला आहे आणि गुजरातमधून एक राज्यसभेची उरलेली जागा मिळवण्यासाठी कॉग्रेसला आपलेच मुठभर आमदार कर्नाटकात लपवून ठेवण्याची नामुष्की आलेली आहे. किंबहूना कॉग्रेसच्या नादी लागून शंकरसिंग वाघेला यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळवली आणि आता त्याच कॉग्रेसला धडा शिकवण्याच्या जिद्दीने वाघेला यांनी कॉग्रेसला पळता भूई थोडी केलेली आहे. आपल्याशी निष्ठ असलेल्या भाजपा आमदारांना पळवून नेण्याच्या कामात जो पुरस्कार कॉग्रेसने दोन दशकापुर्वी दिलेला होता, तोच एक प्रकारे आता वाघेला परत करीत आहेत. त्यांच्यामुळेच कॉग्रेसला असे पळापळीचे उद्योग करावे लागलेले आहेत. कारण वाघेला यांना आता कॉग्रेसश्रेष्ठींचे नाक कापण्याच्या सूडभावनेने पछाडलेले आहे.
गुजरात आमदारांच्या मतावर मागल्या चारपाच वेळ तरी अहमद पटेल हे राज्यसभेचे सदस्य म्हणुन निवडून आलेले आहे. त्यासाठी त्यांना कधी धडपड करावी लागलेली नाही. दिल्लीत बसून ते आरामात निवडणुक जिंकत राहिले आहेत. सहाजिकच आताही ५७ आमदार असल्यामुळे त्यांचा विजय निश्चीत होता. म्हणूनच वाघेला यांनी बंडाचा झेंडा उभारला, तरीही अहमद पटेल व कॉग्रेस श्रेष्ठी निश्चींत होते. वाघेला यांनी दोन आठवड्यापुर्वीच मेळावा भरवून पक्षाला रामराम ठोकला, म्हणून कोणी ढुंकून तिकडे बघितलेही नाही. वाघेला हा बाजारमूल्य नसलेला नेता असल्याच्या समजूतीमध्ये राहुल व सोनियांसह अहमद पटेल गाफ़ील राहिले होते. पण सुडाला पेटलेला माणुस काही मिळवण्य़ापेक्षा दुसर्याचे नुकसान करण्यात लाभ शोधत असतो. वाघेला त्याला अपवाद नव्हते. आपल्याला कॉग्रेस काही देणार नसेल, तर निदान कॉग्रेसचे नुकसान करण्यात त्यांना रस होता. म्हणुनच त्यांनी कॉग्रेस श्रेष्ठीचे नाक कापण्याचा डाव शिजवला होता. त्यात अर्थातच भाजपाच्या नेत्यांनीही भाग घेतलेला होता. म्हणूनच राज्यसभेच्या निवडणूकीत अहमद पटेलना पराभूत करण्याची कल्पना पुढे आली. त्यामुळे नुसते पटेल पराभूत होणार नाहीत, तर सोनियां व राहुलना आपल्या खास माणसालाही निवडून आणणे शक्य राहिलेले नाही, असा संदेश पाठवला जाणार होता. म्हणून मग आमदार फ़ोडण्यापेक्षा त्यांनी राजिनामे देण्याचा सपाटा लावला गेला. परिणामी अहमद पटेल यांना मते देणारे आमदार घटू लागले आणि श्रेष्ठींची झोप उडाली. पण त्यांना अक्कल मात्र आलेली नाही. त्यांनी उरलेले आमदार पळवून कर्नाटकात नेऊन लपवलेले असले, तरी त्यामुळे अहमद पटेल वाचणार कसे? त्या आमदारांपेक्षाही त्यांच्या मताला किंमत आहे आणि त्यांनी दगाफ़टला केल्यास पटेलांचे भवितव्य गोत्यात येणार ना?
जे ४० वा ४४ आमदार कॉग्रेसने कर्नाटकात लपवलेले आहेत, ते फ़ुटण्याच्या भयानेच पळवलेले आहेत. त्यांना मतदानाच्या दिवशी परत आणले जाईल. पण त्यांनी पटेल यांन मत देताना गफ़लत केल्यास काय उपयोग आहे? या आमदारांनी नुसती मते देऊन उपयोग नाही. मते वैध व अवैध असाही प्रकार असतो. यापैकी ज्यांना दगाच द्यायचा आहे, त्यांना राजिनामे देण्याखेरीज अन्य पर्याय आहे. त्यांनी भाजपाला मते दिली तरी दगा होऊ शकतो. पण व्हीप निघालेला असेल तर दुसर्या पक्षाला मत दिल्यामुळे त्या आमदारांना पुढल्या सहा वर्षासाठी निवडणूक लढवायलाही अपात्र ठरवले जाईल, अशी धमकी कॉग्रेसचे कायदेपंडित अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे. पण तिथेच पर्याय संपत नाही. ज्यांना दगा द्यायचा आहे, त्यांनी आपले मत बाद होईल अशी गफ़लत केली, तर पक्षांतर कायदा त्यांना हात लावू शकणार नाही. कारण मतदान गुप्तपणे करावे लागते आणि त्यात मुद्दाम मतपत्रिकेत अशा आमदारांनी गफ़लत केली, तर त्यांचे मत भाजपाला मिळणार नसले, तरी अहमद पटेल यांनाही त्याचा उपयोग उरत नाही. याचा अर्थ इतकाच की कर्नाटकात आमदार लपवून ठेवले, म्हणून अहमद पटेल यांनाच मतदान होईल याची हमी आज कोणी देऊ शकत नाही. समजा असे काही झाले तर कॉग्रेसश्रेष्ठी व पटेल यांचे नाक आणखी कापले जाईल. किंबहूना तीच तर जुन्या मैत्रीला स्मरून शंकरसिंग वाघेला व अमित शहांनी खेळलेली चाल असू शकते. त्यातून वाघेला यांना आपल्या खजुरिया पापाचे क्षालन करता येते आणि शहा-मोदींना सोनिया-राहुल यांची आणखी एकदा नाचक्की करण्याची अपुर्व संधी उपलब्ध होते. म्हणूनच जे काही गुजरात, कर्नाटकात घडते आहे, त्याला वाघेला यांची खजुराहो पुरस्कार वापसी असेही म्हणायला हरकत नाही. वाघेला यांच्या राजकीय महत्वाकांक्षा संपलेल्या आहेत. पुरस्कार वापसीच्या बदल्यात त्यांच्या सुपुत्राची राजकीय वर्णी लागावी, इतकीच त्यांची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment