जयराम रमेश हे कॉग्रेसचे एक हुशार तल्लख व अभ्यासू नेता आहेत. त्यांच्यापाशी लोकप्रिय चेहरा नाही, तरी राजकारणाचा बारीक अभ्यास करणारे जे मोजके पुढारी कॉग्रेस पक्षात आहेत, त्यात रमेश यांची गणना होते. म्हणूनच नित्यनेमाने वाहिन्यांवर पोरकटपणाचा बचाव मांडणार्या कॉग्रेस नेते प्रवक्त्यांपासून रमेश यांना वेगळे काढावे लागते. अनेकदा वरीष्ठांना व श्रेष्ठींना नावडते बोलल्याने रमेश यांना आपल्याच पक्षातील सहकार्यांच्या लाथाही खाव्या लागलेल्या आहेत. पण मागच्या चार वर्षात त्यांनी वारंवार सांगितलेले सत्य पक्षाने गंभीरपणे समजून घेतले असते, तर त्या पक्षाची आज इतकी दुर्दशा नक्कीच झाली नसती. अशा रमेश यांनी मध्यंतरी एकदम मौन धारण केलेले होते. आता अकस्मात पुन्हा सत्य बोलण्याची उबळ त्यांना आलेली आहे आणि त्यांनी कॉग्रेसच्या नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे. रमेश म्हणतात, कॉग्रेसमध्ये आता नुसत्याच सुलतानांचा भरणा आहे आणि सलतनत तर केव्हाच गमावलेली आहे. त्याचेच प्रत्यंतर मंगळवारी गुजरात विधानसभेत राज्यसभा मतदानाच्या निमीत्ताने येत होते. पक्षाचे ५७ आमदार असतानाही पक्षाचे ज्येष्ठ नेते उमेदवार अहमद पटेल यांना ४५ मते मिळवण्यासाठी पळापळ करावी लागत होती. आपल्याच पक्षाचे आमदार कसेही वागत आहेत आणि नेतृत्वाला झुगारत आहेत. इतकी अनागोंदी कॉग्रेसमध्ये कुठून आली? ज्या पक्षात मंत्रीपद उपभोगणारे नेते राहुल गांधी यांची पादत्राणे उचलण्यातही धन्यता मानत होते, तिथे आज राहुलच्याच आदेशाला झुगारून मतदान करण्यापर्यंर बेशिस्त कुठून आली? ५७ पैकी ४५ मते मिळाली तरी अहमद पटेल जिंकणे शक्य असताना, त्या ४५ मतांसाठी किरकोळ इतर पक्षाच्या आमदारांच्या दाढीला हात लावण्याची नामुष्की कशामुळे आली असावी? याचा विचार कॉग्रेस कधी करणार आहे?
अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राहुल गांधी मुंबईत आलेले होते आणि पार्ला येथील कार्यक्रम उरकून त्यांनी विक्रोळीच्या रमाबाई आंबेडकर नगरात जायचे ठरवले होते. तिथे राहुल येण्यापुर्वीच मुख्यमंत्री अशोक चव्हाण जाऊन पोहोचले आणि दोनतीन तास कामधंदा सोडून प्रतिक्षा करीत बसले होते. राहुल पोहोचले आणि तिथल्या बौद्धविहारात गेले. बाहेर आले तेव्हा बागवे नावाच्या राज्यमंत्र्याने राहुलची पादत्राणे उचलून त्यांच्या पायात घालण्यापर्यंत तत्परता दाखवली होती. हाच प्रकार मागली काही वर्षे देशाच्या अनेक भागात लोकांनी बघितला होता. कॉग्रेसचा राज्यातील वा शहरातील कुठलाही नेता राहुल गांधींची आपल्या अंगावर पायधुळ झाडली जावी, म्हणून उतावळा होऊन त्यांच्या इर्दगिर्द घुटमळताना दिसायचा. कुणा शहजादा राजपुत्राच्याही भोवताली आजकाल इतके लाचार लोक दिसत नाहीत. राहुल गांधी भारतीय लोकशाहीतले असे बिगडे इल शहजादे असल्याने त्यांना तो सन्मान मिळत राहिला. ज्यांना ते शक्य नव्हते, त्यांच्यासाठी पक्षाबाहेर पडण्याचा दरवाजा खुला होता. अनेक नेते त्याच दरवाजाने बाहेर पड्ले. हे बघूनच बहुधा रमेश यांनी सलतनत हा शब्द वापरलेला असावा. अशी राहुलची सरबराई चालत होती, तेव्हा देशामध्ये दहाबारा राज्यात कॉग्रेसची सत्ता होती आणि केंद्रातही कॉग्रेसची सत्ता होती. आता दोनतीन राज्यात कॉग्रेस सत्तेत असून लोकसभेतही त्या पक्षाचा बोजवारा उडाला आहे. पण आपले घटलेले सामर्थ्य किंवा बुडालेले साम्राज्य राहुल बघू शकलेले नाहीत, की सोनियांना त्याची जाणिव झालेली नाही. त्यांच्यापेक्षाही त्यांच्या जवळीकेचे भांडवल करून आपापल्या भागात सुलतान म्हणून वावरणार्या चमच्यांनाही त्याचे भान आलेले नाही. असेच रमेश यांना सुचवायचे असणार. तसे नसते तर अहमद पटेल यांना साधी राज्यसभेची जागा इतक्या अटीतटीने लढवण्याची वेळ कशाला आली असती?
राष्ट्रपती वा उपराष्ट्रपती अशा दोन महत्वाच्या निवडणूका भाजपाने सहजगत्या जिंकल्या. सहजगत्या अशासाठी म्हणायचे, की त्यांना विरोधातल्या आव्हानाची पर्वाही करावीशी वाटली नाही. आपली लोकसभा व विधानसभातली शक्ती क्षीण झालेली आहे आणि मित्रपक्षांना सोबत घेऊनच आपण भाजपाला थोडेफ़ार आव्हान उभे करू शकतो. याची कुठलीही जाणिव राहुल वा सोनियांमध्ये दिसत नाही. त्यांच्या कृतीमध्ये गमावलेल्या सत्तेचे भानही दिसत नाही. जुन्या ऐतिहासिक नाटकात विंगेत बघून एक राजा आदेश देताना दिसतो, तशीच आजही कॉग्रेस चालविली जात आहे. म्हणूनच नितीशकुमार त्या पक्षाची साथ सोडून जाण्याच्या बातम्या आल्या, तरी सोनिया वा राहुलना हातपाय हलवण्याची इच्छाही झाली नाही. गुजरातमध्ये राष्ट्रपती निवडणूकीत अकरा आमदारांनी विरोधात मते दिली, तरी कॉग्रेस झोपा काढत राहिली. मग राज्यसभेच्या मतदानापुर्वी बंडाचा आवाज झाला, तेव्हा धावपळ सुरू झाली. पण संकट कोणते आहे त्याचेही आकलन करणारा कोणी राहुल व सोनियांपाशी नव्हता. यात भाजपा वा अमित शहा कोणता डाव खेळत आहेत, त्याचे भान येईपर्यंत संकट अधिकच अक्राळविक्राळ होऊन गेलेले होते. आमदारांचे राजिनामे घेऊन कॉग्रेसच्या एकाच उमेदवाराला मिळू शकणारी पहिल्या पसंतीची मते घटवण्याचा डाव अमित शहांनी टाकला होता. तो लक्षात आल्यावर आपलेच आमदार अन्य राज्यात पळवून नेण्याची नामुष्की कॉग्रेसवर आली. कारण शहा-मोदी कसा विचार करतात, त्याचीही दखल घेण्याची यांना गरज वाटली नाही. आताही रमेश नेमकी तीच गोष्ट सांगत आहेत, जमाना बदलला आहे आणि देश व राजकारणही बदलले आहे. मोदी-शहा कसे विचार करतात, ते ओळखूनच डावपेच खेळावे लागतील, असे रमेश म्हणतात. त्यात ते त्या भाजपा नेतृत्वाचे कौतुक करीत नसून वास्तविक संकट दाखवत आहेत.
कालबाह्य मुद्दे व कृती करून टिकता येणार नाही आणि कॉग्रेस समोर टिकून रहाण्याचे घोर संकट असल्याची कबुली, रमेश यांच्या पक्षातून हाकालपट्टीचेही कारण होऊ शकेल. कारण या बिगडे दिल शहजादे मंडळींना सत्य ऐकायची इच्छा व हिंमत राहिलेली नाही. सत्य वा संकट बघण्यापेक्षा ते नाकारून अधिक गाळात जाण्याला आजकाल कॉग्रेसची रणनिती मानले जात असते. इतके दारूण पराभव लागोपाठ वाट्याला येत असताना चाललेली अरेरावी, रसातळाला घेऊन जाण्याला पर्याय नसतो. चार वर्षापुर्वी म्हणजे लोकसभेचे वेध लागले तेव्हाही रमेश यांनी असाच गंभीर इशारा दिलेला होता. देशातल्या कुठल्याही राजकीय अभ्यासक संपादकापेक्षाही डोळसपणे रमेश यांनी तो धोका ओळखला होता व बोलून दाखवण्याची हिंमत केलेली होती. तर त्यांची तेव्हा कॉग्रेसी तोंडपुज्या नेत्यांनी ‘मोदीभक्त’ म्हणून संभावना केली होती. त्या हेटाळणीमुळे रमेश यांचे कोणतेही व्यक्तीगत नुकसान झाले नाही. मात्र कॉग्रेसचा बोर्या वाजला आहे. चार वर्षापुर्वी रमेश म्हणाले होते, ‘स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेससमोरचे मोदी हे सर्वात मोठे आव्हान आहे.’ आज त्याची प्रचिती येत आहे. आज त्यांनी तसेच सत्य बोलण्याची हिंमत केली आहे. गेल्या चार वर्षात ‘मोदीभक्त’ हा हेटाळणीयुक्त शब्द बनला आहे. पण त्याचा सर्रास वापर करणार्यांचे त्यातून काय कल्याण झाले, त्याचा अशा प्रत्येकाने विचार करून बघावे. उलट त्यांच्यावर आली ती संकटे व पराभव यातून बाहेर पडणे मात्र कोणाला शक्य झालेले नाही. रमेश काय सांगत आहेत, ते मुद्दे समजून घेतले असते, तर उपाय शोधता आले असते. पण मुद्दे डावलून त्यांच्यावर ‘मोदीभक्त’ असा शिक्का मारण्यात धन्यता मानणार्यांना यापेक्षा कसली वेगळी प्रचिती होऊ शकते? सत्य नाकारून सत्य सिद्ध करता येत नाही. कारण सत्य संपत नसते की बदलता येत नसते.
👍
ReplyDelete