भूतान हा भारताच्या नजीकचा सीमावर्ती देश आहे आणि त्याच्याशी सध्या चिनचा सीमावाद वाढला आहे. भूतान व सिक्कीमच्या सीमांमध्ये एक चिंचोळी पट्टी आहे. ती चिनच्या कब्जात आहे. तिची रुंदी वाढवून चिनला तिथे पक्का रस्ता बनवायचा आहे. पण सीमेलगत किती अंतरावर पक्का रस्ता बनवावा, याचेही काही संकेत आहेत. त्याला झुगारून चिनने तिबेटच्या भूमीत हा रस्ता बनवण्याचा घाट घातला, त्यातून तो वाद पेटला आहे. सहाजिकच दिसायला तो भूतान व चीन यांच्यातला वाद आहे. पण व्यवहारात भूतान तितका स्वतंत्र व सार्वभौम देश नाही. त्याच्या सीमांची सुरक्षा भारताने पत्करलेली आहे. चीन त्या डोकलाम खोरे मानल्या जाणार्या प्रदेशात आपली भूमी रुंद करण्याच्या बदल्यात भूतानला दुसरीकडे चौपट पाचपट जमीन द्यायला तयार आहे. याचा अर्थच हे खोरे चीनला अतिशय मोक्याचे स्थान वाटते आहे. पण भारताला म्हणूनच ते खोरे चिनी कब्जात जाण्यातला धोका जाणवला आहे. तो धोका असा आहे, की तिथून इशान्य भारताशी मुळच्या भारतभूमीला जोडाणारा तुकडा खुपच निमुळता आहे. त्याला कोंबडीची मान असे इंग्रजीत म्हटले जाते. म्हणजे इशान्य व मुख्य भारत यांना जोडणारी ही निमूळती मान पिरगाळण्याची सज्जता चीनला करायची आहे. तो धोका उदभवू नये, म्हणून विषय भूतानचा असूनही भारताने त्यात नाक खुपसले आहे. कारण त्या भूतानी सीमेवरही भारतीय सेनाच पहारा देत असते. तिथे भारत व चिनी सेनेत झोंबाझोंबी झालेली आहे आणि नंतर चिनी शहाणे व सेनाधिकारी भारताला धमक्या देण्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. अर्थात त्या धमक्यांना भारताने धुप घातली नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण लौकरच चिनलाही अक्कल आलेली दिसते. कारण महिनाभर अशा धमक्या व इशारे देऊन झाल्यावर चिनी शहाण्यांनी तोंड लपवायला जागा शोधलेली आहे.
मागल्या महिन्यात ही घटना घडली आणि सीमेलगतच्या भारताच्या चौक्या चिनी सेनेच्या पथकाने उध्वस्त करून टाकल्या होत्या. पण त्यानंतर भारताने तिथे अधिक रसद व कुमक पाठवल्यावर चिनी सेनेने निमूट माघार घेतली आणि इशारे व धमक्या सुरू केलेल्या होत्या. त्यात नेहरूंच्या कारकिर्दीत तिबेट काबीज करण्यापासून भारतीय सेनेच्या माघारीपर्यंतचा इतिहास सांगून झालेला आहे. भारताला १९६२ चा पराभव आठवत नाही काय? पुन्हा एकदा त्यापेक्षा कठोर धडा भारताला शिकवावा लागेल. अशी भाषा आधी झाली. मग तिबेटी भागात मोठे चिनी फ़ौजेचे संचलन करून नाट्य रंगवण्यात आले. ग्लोबल टाईम्स या चीन सरकारच्या मुखपत्रातून अनेक दाखले व धमक्या देऊन झाले. पण भारतावर त्याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तेव्हा उत्तराखंडातील भारतीय प्रदेशात थोडी घुसखोरी करूनही कळ काढली गेली. तरी भारत डोकलाम भागातून माघार घ्यायला राजी झाला नाही. अशावे्ळी चिनी अध्यक्ष जिनपिंग यांनी मोठ्या सैनिकी संचलनात लालसेना कुठल्याही शत्रूला पाणी पाजायला सज्ज असल्याची दर्पोक्तीही करून झाली. मात्र याविषयी भारत सरकारने काहीही चिथावणीखोर प्रतिक्रीया दिली नाही, की माघारही घेतलेली नाही. सहाजिकच चिनला त्याचा अर्थ उमजला आणि अधिक शहाणपणा सांगण्यात अर्थ नसल्याचे ताडून त्यांनी विषय गुंडाळण्याची तयारी सुरू केली. त्यामुळेच भारतीय सेनेने किंचीतही माघार घेतलेली नसताना, तिथून भारतीय फ़ौजा माघारी हटल्याने विषय निकालात निघाल्याचे निवेदन चिनकडून आलेले आहे. थोडक्यात आपण डोकलामवर पडदा पाडत असल्याचे चिनने परस्पर सांगून टाकले आहे. मात्र इथल्या पाकप्रेमी व चिनप्रेमी लोकांच्या जीवाची घालमेल संपलेली नाही. म्हणून तर तथाकथित डाव्यांनी त्यात न विचारलेला सल्ला भारत सरकारला देण्याचा आगावूपणा केलेला आहे.
डाव्या आघाडी व पुरोगामी राजकारणाचे पौरोहित्य करणार्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिपल्स डेमॉक्रेसी नावाचे मुखपत्र आहे. पुर्वी त्याचे संपादक म्हणून सीताराम येच्युरी काम करीत होते, तर पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून प्रकाश कारत सरचिटणिस होते. अलिकडे त्यांनी आपसात जागा बदलल्या आहेत. अशा मुखपत्रात अग्रलेख लिहून कारत यांनी भूतानच्या भानगडीत भारताने नाक खुपसण्याचे कारण नसल्याचा सल्ला दिलेला आहे. उलट चिनशी भारताने निर्विवाद दोस्ती करावी आणि अमेरिकेशी असलेली जवळीक संपवावी; असा कारत यांचा अग्रलेखातील सल्ला आहे. चिनचे भारताशी कुठलेही वैर नसून अमेरिकेशी भारताने जवळिक केल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. तर त्याच्या समाधानासाठी भारताने आपले धोरण बदलून अमेरिकेशी दुरावा करावा, असा हा सल्ला आहे. तो त्यांनी आपल्या बुद्धीने दिला आहे, की चिनच्याच कुणा अधिकार्याच्या इशार्यावर दिलेला सल्ला आहे, अशी शंका येते. कारण डोकलाम वाद सुरू झाल्यावर चिनी मुखपत्राने भारताला १९६२ सालचा इतिहास सांगताना असाच काहीसा युक्तीवाद केलेला होता. त्या युद्धाच्या प्रसंगी अमेरिका भारताच्या मदतीला धावून आलेली नव्हती. म्हणूनच आजही अशा मैत्रीचा उपयोग नसल्याचा निर्वाळा ग्लोबल टाईम्सने दिलेला होता. त्याचीच री ओढत आता मार्क्सवादी पक्षाचे मुखपत्र म्हणते, अमेरिकेशी दोस्तीचा भारताला काहीही उपयोग नाही. याचा अर्थच कॉम्रेड प्रकाश कारत हे चिनी चड्डी परिधान करून अग्रलेख लिहायला बसलेले असावेत. अन्यथा त्यांनी भारतीय नागरिक असतानाही चिनी धोरणाचे समर्थन करण्याचे अन्य काही कारण नव्हते. पण तसे करण्याखेरीज त्यांनाही पर्याय नाही. कारण त्यांना आजचा भारत आठवण्यापेक्षाही १९६२ सालच्या त्यांच्याच भारतीय मार्क्सवादी पुर्वज नेत्यांचे पराक्रम आठवलेले असावेत. त्याच मार्गाने कारतही चालत असावेत.
तेव्हा भारत चीन युद्धात भारताचा दारूण पराभव झाला. कारण तिबेटला भारत संरक्षण देऊ शकलेला नव्हता. तात्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना देशाची सुरक्षा करण्यापेक्षाही आपली जगभरात शांतीदूत अशी प्रतिमा उभारण्यात स्वारस्य होते. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात सेनेच्या कुठल्याही गरजा पुरवण्यापेक्षा सेनादलाची आबाळ करण्यात धन्यता मानली होती. कारत म्हणतात, तसा ‘हिंदी चिनी भाई भाई’ नावाचा खुळचटपणा करण्यात नेहरू मशगुल होते आणि एके दिवशी चिनी लालसेना तिबेट गिळंकृत करून भारतीय सीमेला येऊन धडकली होती. तेव्हा भारतीय सेनेकडे बर्फ़ात वापरण्याचे बुट नव्हते, की आधुनिक हत्यारे बंदुका तोफ़ाही नव्हत्या. थोडक्यात नेहरूंनी तिबेट चिनला आंदण दिला आणि भारतीय सीमा असुरक्षित करून टाकल्या. चीन १९६२ चा इतिहास सांगतो, तेव्हा भारतीय सेना दुबळी व लढण्याच्याही स्थितीत नव्हती. त्याच्या परिणामी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्यावर खापर फ़ोडून त्यांची नेहरूंना हाकालपट्टी करावी लागली होती. अमेरिकेच्या मैत्री वा शत्रूत्वाचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. अशावेळी आजच्या मार्क्सवादी पक्षाचे तात्कालीन नेते चीनचे खुले समर्थन करून भारत विरोधी घोषणा देण्यात रमलेले होते. त्यांना उचलून तुरूंगात डांबण्याची वेळ नेहरू सरकारवर आलेली होती. कुठल्याही खटल्याशिवाय त्यांना दिर्घकाळ तुरूंगात स्थानबद्ध करण्यात आलेले होते. किंबहूना त्याच कारणाने भारतीय कम्युनिस्ट पक्षात फ़ुट पडली आणि कारत ज्याचे नेतृत्व करतात, तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जन्माला आला. तेव्हा त्याला चीनवादी तर उरलेल्या कम्युनिस्ट पक्षाला रशियावादी म्हणून ओळखले जात होते. थोडक्यात भारताच्या हिताचे काय आहे, ते कॉम्रेड कारत यांनी अग्रलेख लिहून सांगण्याची गरज नाही. आजच्या मार्क्सवादी पक्षात पडलेला एकच महत्वाचा फ़रक म्हणजे आता त्यांनी पाकिस्तानचीही तळी उचलली आहे.
सीताराम येच्युरी त्या पक्षाचे विद्यमान सरचिटणिस असून त्यांनी मध्यंतरी काश्मिरात जाऊन पाकशीही वाटाघाटीचा आग्रह धरलेला होता. दाऊद इब्राहीम हा खराखुरा भारतीय राष्ट्रप्रेमी असल्याचे प्रमाणपत्र द्यायचेच बाकी उरले आहे. ह्या लोकांना भेटायला हुर्रीयतचे नेते आलेच नाहीत, तर येच्युरी हुर्रीयतच्या दारात त्यांच्या पायर्या झिजवायला गेलेले होते. त्यांनी दारही उघडले नाही आणि यांना अपमानित करून हाकलून लावलेले होते. तरीही येच्युरी व त्यांचे गणंग तिथे आशळभूतपणे हुर्रीयतच्या मनधरण्या करीत बसलेले होते. अशा लोकांकडून भारताचे हित वा सुरक्षेची कोणी अपेक्षा बाळगावी? उद्या यातले कोणी पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या जिहादी वा घातपाती नेत्यांना भेटण्य़ासाठी दुबईला गेले, तरी नवल वाटण्याचे कारण नाही. मोदी वा भाजपा विरोधासाठी देशाच्या कुठल्याही शत्रूशी हातमिळवणी करायाला असे लोक केव्हाही सज्ज आहेत. कुठल्या तरी चित्रपटात कुणा अस्लमभाईचे गाणे होते, त्याची आठवण असे शहाणे करून देत असतात. ‘दुबईका चष्मा चीनकी चड्डी’ असेच काहीसे त्यातले शब्द होते. आजकाल पुरोगामी वा डावे म्हणून मिरवणार्यांची दशा काहीशी तशीच झालेली आहे. त्यांच्या डोळ्यावर दुबईचा पाकिस्तानी चष्मा चढवलेला असतो आणि चिनी चड्डी घालूनच ते भारताकडे बघत असतात. म्हणून त्यांना चीन किती सुसज्ज वा महाशक्ती आहे त्याची अखंड स्वप्ने पडत असतात. पण खराखुरा चीन बघायचीही त्यांच्यात हिंमत राहिलेली नाही. इतका शक्तीशाली चीन अकस्मात जगातल्या सर्वात मोठ्या अशा लालसेनेची संख्या व बळ कशाला कमी करायला निघाला आहे? असा प्रश्न या पुरोगाम्यांना पडत नाही. चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या उलाढाली व संपत्तीच्या कहाण्या रंगवून सांगितल्या जातात,. चीन त्याचे प्रदर्शनही करतो. पण तसे प्रदर्शन तर किंगफ़िशरचा विजय मल्ल्याही करत नव्हता काय?
गेल्या दहा पंधरा वर्षात आपल्या अब्जावधी डॉलर्सच्या संपत्ती व उद्योगांचे प्रदर्शन मांडणार्या मल्ल्याला, आज ब्रिटनमध्ये बिळात कशाला लपून बसण्याची पाळी आलेली आहे? दिवाळखोरीमुळेच ना? वर्षभरापुर्वी कोणी म्हटले असते, की मल्ल्याला जीव मूठीत धरून परागंदा व्हावे लागेल, तर कोणी विश्वास ठेवला नसता. चीनच्या अब्जो डॉलर्सची कहाणी सुद्धा तशीच दिवाळखोरीच्या चिखलात फ़सलेली आहे. अफ़ाट उद्योग उभारले तरी चिनच्या उत्पादनासाठी स्वदेशात बाजारपेठ उपलब्ध नाही. त्याला परदेशी मागणीवर विसंबून रहावे लागते आहे आणि मागल्या दोनचार वर्षात ती मागणी घटलेली आहे. अमेरिका व युरोपमध्ये चिनी मालाचा उठाव घटला आहे. तर चिनी प्रदेशात व पाकसारख्या मित्र शेजारी देशात चिनने केलेली अफ़ाट गुंतवणूक अनुत्पादक ठरू लागली आहे. तिथल्या उचापतखोरीने चिनी विकास कामे गोत्यात आलेली आहेत. रोजगारासाठी भव्यदिव्य शहरे व स्मार्ट सिटी चिनने उभ्या केल्या, तिथे चिनी नागरिकांना़च वास्तव्य करणे परवडत नसल्याने अशी शहरे भुतांची गावे बनली आहेत. त्याची झळ पोहोचू लागल्याने आता लालसेनेवर होणार्या खर्चाला कात्री लावण्याची नामुष्की चीनवर आलेली आहे. इकडचे पैसे तिकडे फ़िरवण्यातून मल्ल्या जसा बॅन्का व सरकारला हुलकावण्या देत राहिला, त्यापेक्षा चीनची अवस्था भिन्न नाही. अवघी चिनी अर्थव्यवथा परदेशी निर्यात करायच्या मालावर उभी राहिलेली आहे आणि ट्रंप वा युरोपातील नेत्यांच्या धरसोडीमुळे मालाला उठाव राहिलेला नाही. ते सत्य दिसत असून चीन लपवतो आहे आणि भारतातले डावे शहाणे त्याच आर्थिक शक्तीची भिती आपल्याला व भारत सरकारला घालत असतात. पण तो बागुलबुवा भारत सरकारने झुगारून लावल्यानंतर चीनला शेपूट घालावी लागली आहे. म्हणूनच डोकलाम अधिक चिघळणार नाही, अशी पळवाट चिननेच काढलेली आहे.
भारताला शह देण्यासाठी आशियातील आपले वर्चस्व उभे करण्यासाठी चीनने दक्षिण व पुर्व आशियाचा एकच नवा खुश्कीचा मार्ग उभारण्याची संकल्पना मांडलेली होती. भारत त्यापासून दूर राहिला आणि ती बारगळल्यात जमा आहे. चीन पाकिस्तान महामार्गाचा प्रकल्प गोत्यात आहे. अशावेळी चीनला भारताशी युद्ध परवडणारे नाहीच. शिवाय सगळ्यात मोठी गंमत म्हणजे भारतीय सेना सातत्याने पाकिस्तानच्या अपरोक्ष सेना व घातपात्यांशी झुंजत राहिल्याने कायम युद्धसज्ज रहिली आहे. चिनच्या लालसेनेची नेमकी उलटी कहाणी आहे. क्रांतीनंतर तिला युद्धाचा प्रसंग आलेला नाही आणि १९६७ सालात तिची कुरापतखोरी भारतीय सेनेने मोडून काढलेली आहे. तर व्हीएतनाम सारख्या इवल्या देशात उचापत करायला गेलेल्या लालसेनेला, त्या देशाने पिटाळून लावलेले आहे. त्यामुळे बिजींगच्या लालचौकात ९० अंशात पाय उचलून आपटल्याने कोणी युद्धसज्ज सेना होत नसते किंवा कोणी तिला घाबरण्याचे कारण नसते. ती हिंदी चित्रपटातल्या अस्लमभाईपेक्षा अधिक धाडसी असू शकत नसते. तसे नसते तर भारत सरकारने तडजोडीचा पवित्रा नक्की घेतला असता. पण भारताचे हवाई दलप्रमुख चीनचे नाक कापले जाईल, इतकी सज्जता असल्याची ग्वाही देत आहेत. पंधरा दिवसाच्या लढाईसाठी सज्ज असण्याचे हवाई दलाला आदेशही जारी करून बसले आहेत. तितक्या बातमीनेच चीनने गाशा गुंडाळला आहे आणि त्या डोकलाम खोर्यातला विषय संपुष्टात आणायची तयारी केलेली आहे. पण दुबईचा चष्मा व चिनची चड्डी घालून कबड्डी खेळणार्या भारतातील डाव्या शहाण्यांना यातले वास्तव कोणी कसे समजावून सांगायचे? अशा सीताराम येच्युरी वा प्रकाश करात नावाच्या अस्लमभाईचे सल्ले घेऊन भारत सरकार चालू लागले, तर भारताचा नकाशा कधीच पुसला जाईल. म्हणून की काय देशातील अडाणी सामान्य जनता व मतदार अशा लोकांना सत्तेपासून कटाक्षाने दूर ठेवत आलेला असावा.
भाऊ,
ReplyDeleteअत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे. एक छोटीशी चूक, टायपोग्राफीकल म्हणा हवं तर, तिसर्या परिच्छेदात, सीताराम येच्युरी ऐवजी सीताराम केसरी नाव आलंय! खरं तर हे नाव कॉन्ग्रेसने कधीचेच नेस्तनाबूत केलेलं आहे. असो.
गेल्या १५ ऑगस्ट च्या भाषणात मोदीजींनी पाकव्याप्त कश्मीर मधल्या सांगितलेल्या घटनांमधूनही चीनने योग्य तो धडा घेतला असावा, किंवा त्याची चाचपणी करण्या साठीही हा उद्योग करून पाहत असावा !
पाक व्याप्त कश्मीर मध्ये चेक बसला तर भारत पुन्हा तिबेट बाबत कुरापत काढू शकतो का? अशी काही चीनची अटकळ असावी किंवा कसे ?
येत्या १५ ऑगस्ट ला मोदीजी अजून काय सांगतात ह्यासाठी कान टवकरलेले आहेतच !
Bhau , eke thikani chukun yechuri eivaji sitaram kesari asa ullekh zala ahe. Tevdha krupaya sudharawa. Baki lekh nehami pramane fakad.
ReplyDeleteफार सुंदर लेख
ReplyDeleteभाऊ ,थोडी गफलत झालीय . सीताराम येचुरीच्या जागेवर संपादक म्हणून सीताराम केसरी येऊन बसले आहेत. :D
ReplyDeleteआणि अजून एक म्हणजे ,चीनचे नाक कापले जाणे अवघड वाटते आहे , कारण त्यासाठी ते चपटे आधी हातात गावायला तर पाहिजे... :D :D
भाऊसाहेब एक नंबर##
ReplyDeleteसुंदर विश्लेषण.
ReplyDeleteसुंदर विश्लेषण.
ReplyDeleteKhupach abhyasu vratti aahe sir tumchi. Khare tar ha Lekh davyanni vachla pahije sir.
ReplyDeleteसुंदर लेख भाऊ
ReplyDeleteखुप छान विश्लेषण
ReplyDeleteखुप छान विश्लेषण भाऊ
ReplyDelete