Wednesday, August 9, 2017

चैतन्य फ़डके

 किती दिवस झाले रे तुला ‘आय क्वीट’ म्हणून? मग अजून त्या फ़ोटोतल्या सारखा आमच्या मनाचा कोपरा धरून कशाला जिथल्या तिथे बसला आहेस?



आय क्वीट असे दोन शब्द फ़ेसबुकवर टाकून कोणी जगाचा निरोप घेऊ शकतो कारे चैतन्य? त्या दिवशी भल्या सकाळी तितकेच इंग्रजीतले शब्द फ़ेकून तू जगातून निघून गेलास? असे जाता आले असते, तर आमच्यासारख्या कित्येक म्हातार्‍यांनी इतके दिवस कशाला जगायची आशा धरली असती रे? आणि तू तरी मोठे काय केलेस? गळफ़ास लावून घेतलास, म्हणून तुला जगातून निघून जाणे साध्य झाले, असे समजतोस कारे? ज्या देहाचा श्वासोच्छवास थांबवून तू मुक्ती मिळवल्याच्या भ्रमात आहेस, ती मुक्ती नाही रे बाबा! कारण तू आहेस तसाच आहेस आणि आम्हाला मात्र तुझ्या जगण्यातून हद्दपार करून गेलास. चैतन्य कोणाला मारलेस रे, त्या सकाळी? तुझ्या आयुष्यातून आम्हा, तुझ्या सुहृदांना हाकलून लावलेस आणि म्हणतोस आय क्वीट? तू जसाच्या तसा आहेस, होतास तिथेच आमच्या मनात, मेंदूत, स्मरणात, काळजाच्या एका कोपर्‍यात दबा धरून बसलेला आहेस. ज्या मर्त्य देहाला अचेतन करून क्वीट म्हणालास ना, तो कोणी चैतन्य फ़डके नव्हता. तो निव्वळ मातीमोल देह होता. त्यात चैतन्याचा वास होता, ज्याला आम्ही सगळे चैतन्य फ़डके म्हणून ओळखत होतो. तो आजही आमच्या काळजात तसाच ठाण मांडून बसला आहे आणि त्याला आय क्वीट बोलायची हिंमत अजून झालेली नाही. मग बाकी काय आहे? तू आम्हाला मारून टाकलेस चैतन्य! तुझ्या स्मरणातून, मनातून व मेंदूतून! आम्हाला हाकलून लावलेस दोन शब्दात! आय क्वीट? जन्माला येण्याइतके यातून बाहेर पडणे सोपे नाही चैतन्य! कारण जन्माला एकटे येणे शक्य असले तरी इथून क्विट करणे सोपे नाहीरे बाळा! जशी वर्षे उलटत जातात, तसे आपण इतक्या गुंत्यात फ़सत गुरफ़टत जातो, की देहापलिकडे आपले आपण उरतच नाही. तर क्वीट म्हणून यातून सुटायचे कसे? कोण सोडवणार?

घरातले कुटुंबिय, आप्तस्वकीय, मित्रपरिचित आणि शत्रू देखील आपल्या भल्याबुर्‍या आयुष्याचे अविभाज्य अंग बनुन जातात. त्या प्रत्येक क्षणाला तयार होणार्‍या आठवणी स्मृती म्हणजे असतो भाऊ तोरसेकर, अंबर कर्वे, गुरू सावंत किंवा चेतन केळकर! चैतन्य तुही तसाच एकजण होतास आणि आहेस. कारण त्या आठवणी म्हणजे माणूस असतो. त्या पुसून टाकल्या, तर स्मृतीभ्रंश झाला म्हणतात. तशा व्यक्तीला माणसात राहिला नाही म्हणतात. त्याच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या, मग तो माणसात आला असेही म्हणतात. अशा कुणा स्मृतीभ्रंश झालेल्याची गणना माणसात होत नाही, की तोही स्वत:ला माणूस म्हणून ओळखत नाही. त्याला आय क्वीट म्हणायचा अधिकार असतो. कारण सर्वकाही तसेच असूनही तो त्यापासून मैलोगणती दूर असतो. ते शब्द फ़ेसबुकवर टाकण्यापर्यंत तुला प्रत्येक मित्राची परिचिताची फ़िकीर होती. त्यांचा निरोप घेण्याचा मोह तुला आवरला नाही. कारण आपण गुन्हा करतोय याचे भान तुझ्यामध्ये असेल, तर क्वीट म्हणायला काय अर्थ उरला रे चैतन्य? कारण तुलाही ठाऊक होते, आमच्या कुणाच्याही स्मरणातून वा आयुष्यातून क्वीट करणे तुला शक्य नव्हते. तुझ्या आवाक्यातलेही नव्हते. अशा प्रत्येकाच्या मनात मांडलेले ठाण उठवून निघणे, आपल्या हातात नाही, म्हणून निराश झाला होतास काय? अन्यथा तितकेही दोन शब्द टाकण्याची गरज काय होती? आपण ह्या सर्वांच्या आठवणी आपल्याच एका कृतीतून पुसून टाकतोय, अशा अपराधगंडाने ते शब्द लिहून घेतले ना तुझ्याकडून? आपल्याच इच्छा आकांक्षा आपली वाट रोखून उभ्या रहातील, म्हणून दोन शब्दात पळ काढलास ना? पण कुठवर पळशील? कारण त्या मर्त्य देहाच्या मर्यादेत तू राहिलाच नव्हतास. कोणीच तितक्या मर्यादेत रहात नसतो. मरणाच्या दारात पोहोचला, तरी तो आठवणीत गुरफ़टलेलाच असतो. मग तू अपवाद कसा असशील?

चैतन्य तुझी माझी ओळख कितीशी होती? चेतन केळकरच्या कर्वे रोडवरच्या ऑफ़िसात मी येऊन पोहोचलो, की तासाभरात तू तिथे हजर व्हायचास. कुठून कसा माहित नाही, पण प्रत्येकवेळी तू तिथेच टपकला होतास. तू, गुरू, अंबर अशी पोराच्या वयातली मुले फ़ेसाबुकने मित्रासारखी जवळ आणली. या वयातही जगण्याची आकांक्षा तुमच्यासारख्यांनी फ़ुलावली जोजवली. बिनधास्त अवखळपणा करतानाही आपल्या वयोमर्यादा नेमक्या जपण्यातून तुम्ही माझ्यासारख्या सत्तरीतल्या माणसाला तरूण राखत होता. सिंहगडाच्या पायथ्याशी गप्पांचा कार्यक्रम अंबरने योजला, तेव्हा कोथरूडच्या घरी तू सकाळी मला न्यायला आला होतास. आठ तास सलग बडबडताना मी दमलो नाही, याचे आजही नवल वाटते. पण त्यातले चैतन्य तूच होतास रे! अखंड त्या दिवशी तू सोबत होतास. आसपास पिंगा घातल्यासारखा बागडत होतास. याखेरीज तू काय उद्योग करतोस? घरी कोण कोण आहेत? पुण्यातही वास्तव्य कुठे? व्यवसाय कोणता? यापैकी मला काहीही माहिती नाही रे! मी विचारले नाही आणि तू कधी सांगितलेही नाहीस. म्हणून काय फ़रक पडला होता? परवा तुझ्या अशा घटनेची माहिती फ़ोनावरून गुरू सावंतने दिली, तर मी त्याच्यावरच भडकलो. अकारण त्यालाच चार शब्द ऐकवले. त्यानेही काही गुन्हा नसताना माझा राग संताप निमूट ऐकून घेतला. कशासाठी? अशी घटना घडण्याला आपणही जबाबदार असल्याची अपराधी भावना त्याचीही होऊन गेली. तुला आय क्वीट म्हणायला काही क्षण लागले असतील. पण त्यालाही गुरू किंवा नंतर अंबर कर्वे स्वत:चा अपराध समजून माझे शिव्याशाप निमूट ऐकून घेत राहिले. त्यांना हा स्वत:चा अपराध कशाला वाटला असेल रे चैतन्य? एक सेकंद मनातले वादळ सोसून विवेकाला सामोरा गेला असतास, तर ते शब्दच कुठल्या कुठे विरून गेले असते ना?

चैतन्य खरेच तुला आय क्वीट म्हणायची इतकी हौस वा हिंमत होती, तर आमच्या प्रत्येकाच्या समोर येऊन बेधडक सांगायचे होतेस, आय क्वीट! तुमच्या मनातून आठवणीतून. तुमच्या मैफ़लीतून उठून जातोय! आय क्वीट असे नुसते लिहून बाहेर पडता येत नाही. कारण इतक्या लोकांच्या मनात स्मरणात ठाण मांडून बसलेला आ्हेस तू; तितक्या जागेवरून सहजासहजी उठून उभे रहाणेही सोपे काम नाही रे पोरा! कोरी पाटी घेऊन आपण जन्माला येतो आणि तिथून जो इतिहास लिहीला जात असतो, तो नुसते क्वीट म्हणून पुसला जात नाही. एकाचवेळी इतक्या मेंदूत व स्मरणात त्याची नोंद होत असते, की कोणालाही काही डिलीट करता येणे सोपे रहात नाही. कुठे कुठे चैतन्य फ़डके सेव्ह झालाय ते त्याला ठाऊक नसते आणि जिथे सेव्ह झालाय त्या सर्व्हरलाही त्याची नेमकी माहिती असतेच असे नाही. सहाजिकच तू क्वीट म्हणालास म्हणून डिलीट होऊ शकत नाहीस. शिवाय अशा प्रत्येकाच्या मनातला स्मरणातला चैतन्य वेगवेगळा आहे. एकाशी दुसर्‍याची तंतोतंत तुलनाही करता येणार नाही. प्रत्येकाचा चैतन्य फ़डके वेगळाच आहे. त्यातले अनेक चैतन्य तुलाही ओळखता आले नसते. मग कुठल्या चैतन्यने क्वीट केले, हे जाणायचे कसे? मर्त्यदेह म्हणून आम्ही ज्याच्याकडे चैतन्य समजून बघत होतो. तो तरी कुठे चोविस तास आमच्या सोबत असायचा? आम्ही आपल्या सोयीनुसार निवडीनुसार त्याच्या जपलेल्या आठवणी हाच आमचा चैतन्य फ़डके होता. त्याला तू कसा डिलीट करू शकतोस? तो क्वीट करू शकत नाही. त्याला तसा अधिकारच नाही. तू क्वीट करताना आम्हाला पुसून टाकलेस चैतन्य! कारण तुझी पाटी तू कोरी करून गेलास. तुझ्या देहात त्या आठवणी साठलेल्या होत्या. त्यातला गुरू, अंबर वा चेतन पुसून गेलास. आमच्या ध्यानीमनी नसताना तूझ्या स्मरणातून आम्हाला क्वीट व्हायला भाग पाडलेस. पण आम्ही एक एकजण संपत नाही आणि तोपर्यंत तुही संपणार नाहीस, चैतन्य!

भाऊ तोरसेकर

6 comments:

  1. डोळ्यातून पाणी आलं भाऊ. माझी आणि त्याची ओळख नव्हती. तुम्ही ओळख करून दिलीत.

    ReplyDelete
  2. Bhavu speechless ��������

    ReplyDelete
  3. Your writing skills are amazing....

    ReplyDelete