Tuesday, August 8, 2017

राहुल, लालू आणि कुबेर



या महिन्याच्या उत्तरार्धात गणेशाचे आगमन व्हायचे आहे. तेव्हा घरोघरी आरत्यांची धमाल सुरू होईल. समोर गणपतीची मुर्ती असेल, पण जमलेले भक्तगण देवीची वा विठ्ठलाचीही आरती घोळवून घोळवून गाताना ऐकायला मिळणार आहे. उद्या कुणाच्या घरी सत्यनारायण असेल तर तिथेही गणपतीची वा देवीची आरती होणारच. या एका देवाच्या पुजाप्रसंगी अन्य देवांचे गुणगान कशासाठी? असा प्रश्न रास्त असला तरी तो तुम्ही त्या भक्तगणांना विचारू शकत नाही. त्यांच्यापाशीही त्याचे उत्तर असू शकत नाही. तशी प्रथा वा परंपरा असल्याचे गोलमाल उत्तर ऐकायला मिळू शकते. अशा श्रद्धाळू भक्तगणांपेक्षा तथाकथित शहाण्यांची कथा अजिबात वेगळी नसते. त्या शहाण्यांनाही कुठल्याही प्रसंगी कुठल्याही अन्य व्यक्तीचे गुणगान करून विपर्यास करण्याची खोड जडलेली असते. त्यामुळे आपल्यामध्ये किती शहाणपण मुरलेले आहे, त्याची ग्वाही असे लोक देत असतात. तसे नसते तर ‘लोकसत्ता’कारांना ‘एक अरविंद राहिले’ अशी आरती गुणगुणण्याची गरज भासली नसती. निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारीया यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्यावर त्यांची आरती गाताना मध्येच कुबेरांनी रघुरामाची आरतीही घुसवून घेतलेली आहे. युपीएच्या कालखंडातील रिझर्व बॅन्केचे गव्हर्नर रघुराम राजन यांची मुदत संपल्यावर त्यांना कायम करावे, अशी अनेकांची इच्छा होती. हा माणुस बाजूला झाला तर अन्य कोणी रिझर्व बॅन्क चालवूच शकणार नाही, याविषयी त्यांच्या मनात पुर्ण खात्री होती. किंबहूना राजन यांच्या नेमणूकीपुर्वी भारतात रिझर्व बॅन्क नव्हती आणि असली तर तेव्हाही राजनच गव्हर्नर असावेत; अशी या लोकांची ठाम समजूत होती. म्हणूनच त्यांची मुदत संपल्यावर देशाची अर्थव्यवस्था बुडाल्याचा आक्रोश अशा लोकांनी केला होता. पण त्यामुळे देश बुडाला नाही, की अर्थव्यवस्था बुडालेली नाही.

मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कालबाह्य झालेला नियोजन आयोग रद्दबातल करून निती आयोग नावाची नवी व्यवस्था उभी केली. त्यात अरविंद पनगारिया यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. असे अनेक अर्थशास्त्रज्ञ असतात. ते पुस्तक पंडित असतात आणि प्रत्यक्ष व्यवहाराशी त्यांचा कधी संबंध आलेला नसतो. बहुतांश घटना घडत असतात वा घडून गेलेल्या असतात, त्याचे विश्लेषण करून ही मंडळी आपले पांडित्य सांगत असतात. रघुराम राजन वा पनगारिया त्यापैकीच असतात. असे महापंडीत प्रत्यक्ष जबाबदारी अंगावर पडली, मग कसे देशाचे दिवाळे वाजवून जातात; त्याचा जिताजागता अनुभव मनमोहन सिंग यांनी दिलेला आहेच. पनगारिया वा रघुराम राजन यांच्यापेक्षा मनमोहन सिंग यांची महत्ता खुप मोठी होती. पण त्यांच्याच हातात दहा वर्षे भारताची सुत्रे आल्यावर, त्यांनी देशात कसे भयंकर अराजक उभे केले; ते आपण बघितलेले व अनुभवलेले आहे. किंबहूना म्हणूनच कुठल्याही देशातली जनता अशा शहाण्यांच्या हाती सत्ता सोपवत नाही. कारण त्यांना पुस्तकातील आकडे, अक्षरे आणि खरीखुरी जिवंत माणसे; यातला फ़रकच कधी उमजत नाही. ते वास्तवाकडे पाठ फ़िरवून आकड्यांचे मनोरे उभे करतात व संख्यांचे डोंगर इकडून तिकडे करून टाकतात. त्यातला कोणी पनगारिया यांच्यासारखा प्रामाणिक असेल, तर त्याच्यात हे आपल्या आवाक्यातले काम नाही, म्हणून बाजुला होण्याची हिंमत असते. पण राजन वा मनमोहन तितके प्रामाणिक नसतात. म्हणून ते अराजकातही सुबत्ता व प्रगतीच्या कथा कादंबर्‍या सांगून दुनियेला भुलवत असतात. सामान्य जनता अशा भुलभुलैयात फ़सणारी नसते. पण अशाच भ्रमात रमणार्‍या कुबेरांना तो भ्रम प्राणप्रिय असतो. सहाजिकच राजन वा पनगारियांनी जे म्हटलेले नाही, तेही कुबेर वाचू शकतात आणि न सांगितलेलेही ऐकू शकत असतात.

पनगारिया हे अमेरिकेच्या प्रतिष्ठीत विद्यापीठातील अभ्यासक आहेत आणि तिथून सुट्टी घेऊन त्यांनी निती आयोगात काम करण्यास मान्यता दिलेली होती. त्यांची तिथली सुट्टी संपली असल्याने व त्यांना सरकारी जबाबदारीपेक्षा पुस्तकी अभ्यासात स्वारस्य असल्याने, त्यांनी आयोगातली जबाबदारी सोडली आहे. तसे पत्रच त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहीलेले आहे. पण त्या पत्रात न लिहीलेले कुबेर यांनी आपल्या अग्रलेखातून कथन केलेले आहे. आपण लालू वा राहुल गाधींपेक्षा अधिक शहाणे वा बुद्धीमान नसल्याचीही ग्वाही कुबेरांनी या लेखातून दिलेली आहे. मोदी पंतप्रधान होण्यापुर्वी पनगारिया कसे मोदींचे प्रवक्ते होते आणि मोदींच्या कौतुकात रमलेले होते, याची साक्ष काढून कुबेरांनी पनगारिता भ्रमिष्ठ असल्याचे सांगितले आहे. थोडक्यात गुजरात पद्धतीचा विकास हा भ्रम असून त्याचे कौतुक करताना पनगारिया निर्बुद्ध असल्याचे कुबेरांनी कथन केलेले आहे. अशा पनगारियांना बक्षिसी म्हणूनच मोदींनी निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी आणल्याचीही ग्वाही कुबेर देतात. पण पनगारियांनी राजिनामा देताच ते भ्रमातून बाहेर पडल्याचा साक्षात्कार कुबेरांना होतो. तात्काळ त्यांच्यासारखे महान अर्थतज्ञ भारताला वा मोदींना परवडणारे नाहीत, अशीही माहिती कुबेर देतात. पनगारिया यांची पात्रता वा लायकी कशावर ठरत असते? ते मोदींच्या सोबत असतात किंवा नसतात, यावर कुठल्याही व्यक्ती वा महापुरूषाची गुणवत्ता मोजली जात असते. जोवर मोदींचे कौतुक तोपर्यंत गुणवत्ता शून्य आणि मोदींची साथ सोडताच पात्रता क्षणात अफ़ाट होऊन जाते. राहुल वा लालू यापेक्षा किती वेगळे असतात? महागठबंधनात नितीश असेपर्यंत महान असतात आणि एनडीएत सहभागी होताच नितीश सत्तालंपट होऊन जातात. आहे ना कुबेर लालू व राहुल यांच्यात साम्य? तिघांच्या भाषेत व विश्लेषणाच्या निकषात तसूभर फ़रक आहे काय?

रघुराम राजन असोत किंवा पानगरिया असोत, त्यांना ज्या अमेरिकन विद्यापीठात जाडजुड पगारावर अभ्यासक म्हणून नेमलेले आहेत, त्यातले एक विद्यापीठ तरी त्यांनी चालवून दाखवलेले आहे काय? ती विद्यापीठे व्यवहारी व्यवस्थापकांच्या हाती सोपवलेली आहेत. अभ्यासकांना तिथल्या अर्थकारणाची वा व्यवहारी उलाढालीची फ़िकीर करावी लागत नाही. त्यांच्यासारखे काही शहाणे भारतातील विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमले जातात आणि त्यांचा बोजवारा उडालेला आपण बघत असतो. अशा भारतीय विद्यापीठांना सरकारी भिक्षा वा दानशूरतेवर उपजिविका करावी लागत असते. कुठलेही विद्यापीठ स्वयंभूपणे आपले अर्थव्यवहार उरकू शकत नाही वा संभाळू शकत नाही. अमेरिकन विद्यापीठांना बुद्धीमंत चालवित नाहीत, तर पक्के व्यवहारी बाजार‘बुणगे’ चालवित असतात. त्यांच्या व्यवहारी शहाणपणावर राजन वा पनगारिया यांच्यासारख्या बुद्धीमंत अर्थशास्त्रज्ञांचे पोटपाणी सुखनैव चालत असते. मुंबई विद्यापीठात सध्या परिक्षांच्या निकालावरून बोजवारा उडालेला आहे. त्याला मोदी वा तत्सम कोणी राजकारणी जबाबदार नसून, कुबेरांना कौतुक असलेल्या कुणा बुद्धीमान कुलगुरूच्या नाकर्तेपणाचा तो परिणाम आहे. कारण व्यवहार पुस्तकात असते तसे दोन अधिक दोन चार होण्याचे गणित नसते. व्यवहारात कधी दोन अधिक दोन तीन होतात, तर कधी पाचही होतात. त्याचा समतोल राखुन व्यवहार चालता ठेवणे ही बाजारू बाब असते आणि तिथे बुद्धीला स्थान नसते. तसे नसते तर कुबेरांना अग्रलेख खरडत जगावे लागले नसते, की राजन पनगारिया प्राध्यापकीत आपली बुद्धी नासवत राहिले नसते. त्यांनी बिल गेट्स वा झुकेरबर्गला आपल्या कंपनीत संगणक चालवायला बसवले असते आणि कुबेरांवर ‘असंताचे संत’ शिर्षकाचा अग्रलेख मागे घेण्याची नामुष्की आली नसती. उलट गोयंकांना त्या अग्रलेखाचे गुणगान करावे लागले असते.

7 comments:

  1. वा भाउ लाजबाब,
    Fantastic Mindlowing

    ReplyDelete
  2. लेखात कुबेरांवर ओढलेले चाबूक हे वास्तव चाबकापेक्षाही जबर आहेत.
    And kuber is more than deserving for it.

    ReplyDelete
  3. भाऊ ............एकदम झकास लेख आणि विवेचन !! वाचून समाधान झाले....अमर्त्य सेन हा पुस्तक पंडित त्यातलाच ज्याचा उल्लेखही झाला आहेच. या ' अमर्त्याचे ' कुबेर आणि तथाकथित ( अ ) भद्र लोकांना काय कवतिक ........!! कुबेर नेहमी त्यासारख्या भाषणात सांगतात कि ते स्वतः ' प्रवाहाच्या ' विरुद्ध दिशेला बघतात आणि त्यांना नेहमी वेगळाच ' साक्षात्कार ' होतो. गोएंका शेठजी यांच्या तालावर नाचणारा हा ' कुबेर ' पूर्वी मला वाचलेले आठवते कि विद्याधर गोखले एकदा म्हणाले होते कि गोएंका म्हणत असत कि त्यांच्या गाडीच्या चालकाला जरी ' संपादक ' केले तरी लोक त्यांचे वर्तमानपत्र घेतीलच...काय हा गोएंकांचा आत्मविश्वास.. !! ' नोटाबंदी ' हा विषयच मुळी या रघुराम राजन आणि तत्सम पुस्तकी विचारवंतांच्या अभ्यासक्रमात नसल्याने....या लोकांनी त्याला विरोध केला. आता भारतातील ' यशस्वी ' नोटबंदीवर अमेरिकेत कुणीतरी ' डॉक्टरेट ' करेल आणि मग हे पुस्तकी विचारवंत ' बडबडू ' लागतील हे निश्चित.... !!

    ReplyDelete
  4. बर झाल खरडपट्टी काढलीत ते.कुबेर आॅफिस मध्ये बसुन काही वाटेल ते लिह्त असतात.

    ReplyDelete
  5. भाऊ नेहमीप्रमाणे उत्तम लेख पण आरतीचे उदाहरण अचूक असले तरी त्यामागे भक्त जो तर्क देतील किंवा नाही देणार तो मात्र बरोबर वाटत नाही. केवळ गणपतीच्या आरती बरोबर जश्या इतर देवांच्या आरत्या गातात तसच अरविंदाबरोबर रघुरामाची आरती गाणे एवढाच संदर्भ अधिक अचूक झाला असता.
    (लोकसत्ताचा अग्रलेख वाचायचे चिडून दिले आहे पण तुमच्या लेखामुळे त्यातले महान विचार आणि तर्क अधूनमधून माहिती होतात त्याबद्दल धन्यवाद)

    ReplyDelete
  6. आदरणीय भाऊ
    लेख वाचला ,एक वाचक म्हणून लोकसत्ताबद्दल आदर नक्कीच आहे. आणि वेळो वेळी तुम्ही तुम्ही त्यांची दखल घेता. म्हणजे ते नक्कीच काहीतरी चांगले काम करत असतील. बाकी लोकशाही मध्ये प्रत्येकाला मत्प्रदर्शनाला अधिकार आहे. कोणी जागता पहारा ठेऊन समाजाच्या बऱ्या वाईट प्रवाहाची दिशा किंवा त्याला आरसा दाखवत असेल तर त्यात वावगे काय ? बरं राहुल लालू आणि कुबेर या शीर्षकामधून आणि खालच्या मजकुरातून तुमचे विस्तृत म्हणणे आम्हास काही समजले नाही बाकी सगळा सूर गिरीशच्या आहे हे जाणवले . असो .. विरोध असतो पण तो हि इतका कि मागच्या कुठच्या लेखाचा माफीनामा इथे जोडला गेला. लोकसत्ताच्या संपादक मंडळींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत नक्कीच भर घातलीय. तुम्हास हि हे वावगे नसावे . आणि एक संपादक म्हणून गिरीश नक्कीच चांगले काम करतोय त्याचे स्वतःचे मतप्रवाह समोरच्या माणसास नक्की विचार भाग पाडतात .. नाहीतर तुमचा एवढा लेखप्रपंच झालाच नसता .. असो .. मत वेगळी असली म्हणून माणूस वाईट नसतो म्हणून जागल्याच काम करताना काही मागच्या चुकांचा दाखला देण्याची गरज नसावी बाकी कुबेराची श्रीमंती त्याच्याकडेच पण तुमच्याकडून अपेक्षून आहोत ... लोभ असावा.. नमस्कार.. लिहिते व्हा... !!

    ReplyDelete
  7. कोलंबिया विद्यापीठ हे ईस्ट इंडिया कंपनी च्या मालकांनी अफीम च्या धंद्यातून आलेल्या पैशातून उभारलेले आहे. त्यांनी च ह्या पांघरीया ना नीती आयोगावर पाठवलेले असू शकते....मला वाटत की मालकांचा आणि मोदी च काही बिनसलाय.

    ReplyDelete