Tuesday, May 29, 2018

पुरोगामी ‘बहिष्कृत भारत’



माजी राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी येत्या महिन्यात नागपूरला संघाच्या एका शिबीरात मार्गदर्शन करायला जाणार आहेत. संघाच्या प्रचारक म्हणून प्रशिक्षण दिलेल्या तीन वर्षाच्या प्रशिक्षणार्थींसमोर त्यांना आपले विचार मांडण्याचे आमंत्रण सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलेले आहे. आजच्या सनातन पुरोगामी धर्मानुसार संघाची सावलीही अंगावर पडणे, म्हणजे धर्मबुडवेगिरी आहे. सहाजिकच येत्या काही दिवसात किंवा तो कार्यक्रम आटोपल्यावर प्रणबदांना पुण्याच्या पर्वतीवर येऊन प्रायश्चीत्त घ्यावे लागले, तर नवल वाटण्याचे कारण नाही. कारण आज पुरोगामीत्वाने सनातन धर्माचा अवतार धारण केला असून, त्याचे जे कोणी मठाधीश असतात, त्यांच्या इच्छा आदेशानेच पुरोगामी धर्माचे आचरण होऊ शकत असते. दोनशे चारशे वर्षापुर्वी असेच चालत होते आणि आजही त्यात कुठला खंड पडलेला नाही. धर्मग्रंथ बदलले आहेत वा मठाधीश मंडळींचा गणवेश बदललेला असेल. पण बाकी सनातनीवृत्ती तितकीच कडवी व कठोर आहे. तेव्हा स्वातंत्र्याचे म्होरके लोकमान्य टिळक ब्रिटीश गव्हर्नरला भेटायला गेले, तर त्यांनी तिथे बिस्कुटे खाल्ली असणार म्हणूनच त्यांनी धर्म बुडवला, म्हणत सनातनी लोकांनी खुद्द टिळकांना पर्वतीवर जाऊन प्रायश्चीत्त घ्यायला भाग पाडलेले होते. टिळकांनाही ते झुगारता आलेले नव्हते. कारण कुठल्याही काळात व समाजात ही मठाधीश मंडळी पावित्र्याचे मापदंड घेऊन बसलेली असतात. त्यांच्याच इच्छेनुसार मान्यवरांना जगावे लागत असते. सहाजिकच टिळकांना त्याच बुद्धीमंतांचे प्रमाणपत्र टिकवण्यासाठी प्रायश्चीत्त घेण्यावाचून पर्याय नव्हता. आजच्या युगात पुरोगामीत्व हाच सनातनी धर्म झालेला असेल, तर त्यातली स्पृष्यास्पृष्यता झुगारून कोणालाही बुद्धीमान मान्यवर कसे रहाता येईल? सहाजिकच संघ ‘बहिष्कृत भारत’ असेल, तर त्याच्या पंगतीला जाऊन बसण्याचा घोर अपराधच प्रणबदा करायला निघालेले नाहीत काय?

सनातनी मानसिकतेमध्ये तुम्ही कुठली कृती करता त्याला महत्व नसते, तर तुम्ही कोणाच्या मान्यतेने ती कृती करता त्याला प्रमाणपत्र मिळत असते. म्हणूनच मग ओवायसी किंवा कुठला मौलवी फ़ादर पुरोगामी धर्मनिरपेक्ष ठरवला जाऊ शकत असतो. उलट निव्वळ सामाजिक सांस्कृतिक कार्य करणार्‍या संघाला जातीय धर्मांधही ठरवले जात असते. कारण पुरोगामी धर्माचार्य मठाधीशांनी त्यांना ‘बहिष्कृत भारत’ घोषित केलेले आहे ना? सहाजिकच संघाने कोणते काम केले वा संघाशी संबंधिताने काय कृत्य केले, त्याला अजिबात किंमत नसते. त्याची कृती कितीही चांगली वा पवित्र असली, तरी पुरोगामी धर्माचार्यांनी ती बहिष्कृत मानलेली आहे ना? मग तिची निंदा करणे हे पुरोगामी धर्मकर्तव्य असते. तीन वर्षापुर्वी मोदी सरकारने नागा बंडखोर गटांमध्ये सामंजस्याचा करार घडवून आणलेला होता. तेव्हा इशान्य भारतात शांतता येण्यास हातभार लागेल म्हणून अरुणाचलचे कॉग्रेस मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी केंद्राच्या प्रयत्नांचे खुलेआम कौतुक केले होते. तर ते कृत्य मोदी सरकारने केलेले व मोदी तर संघाशी संबंधित म्हटल्यावर साध्वी सोनिया गांधींनी तात्काळ नाबाम तुकी यांचा फ़टकारले. त्यांनी धावत पळत ट्वीटरवर येऊन आपला ट्वीट मागे घेतला होता. त्याचा अन्य काही खुलासा असू शकतो काय? जयराम रमेश यांनी मोदी हे कॉग्रेससाठी सर्वात मोठे आव्हान असल्याचे भाकीत केले, तर त्यांना २०१३ सालातच मोदीभक्त ठरवण्यात आले नव्हते काय? थोडक्यात सत्य काय असते, त्याला अजिबात महत्व नाही. ज्याला सनातनी पुरोगामी धर्माचार्यांची मान्यता मिळत नाही, ते पाप असते आणि प्रणबदांनी ते पाप करायचे ठरवलेले आहे. म्हणजे त्यांनी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले विचार अनुभव कथन करण्याचे आमंत्रण स्विकारले आहे. मग त्यांच्यावर कॉग्रेसच काय तमाम पुरोगामी धर्माचार्य तुटून पडले तर नवल नाही.

अर्थात अशा अग्निदिव्यातून जावे लागणारे प्रणबदा पहिलेच नाहीत. एकेकाळी सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायणही त्यातून गेले आहेत आणि समाजवादी नेते जॉर्ज फ़र्नांडिसही त्यातून गेलेले आहेत. जेपींना कोणी नरकात ढकलेले नसले, तरी फ़र्नांडीस यांना मात्र पुरोगाम्यांनी कायमचे बहिष्कृत करून टाकले. पुरोगामी सनातन धर्म ही साधी गोष्ट नाही. मध्यंतरी असाच उद्योग सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी, थॉमस यांनी केलेला होता. केरळातच संघाच्या एका समारंभात थॉमस सहभागी झाले आणि त्यांनी जणू आपल्या नरकाचा मार्गच खुला करून घेतला. प्रणबदा काय ते बोलतीलच. पण थॉमस यांनी जगभरच्या पुरोगामी ख्रिस्ती धर्मालाही लाजवून टाकले होते. भारतात अजून लोकशाही व धर्मनिरपेक्षता टिकून आहे, त्याची चार कारणे देताना त्यांनी चौथे कारण रा. स्व, संघ असल्याचे जाहिरपणे सांगून टाकले होते. भारताची राज्यघटना, सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय लष्कर अशा तीन महत्वाच्या संस्थांनंतर चौथा रखवालदार म्हणून थॉमस यांनी संघाचे गुणगान केलेले होते. यापेक्षा मोठे पाप कुठले असू शकते? त्यांनी चुकूनही कुठल्या पुरोगामी संस्था वा संघटना पक्षाला त्याचे श्रेय दिले नाही. ज्या घटनात्मक संस्था आहेत, त्यानंतर सार्वजनिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ़क्त संघाचाच उल्लेख केला. स्वयंभू विचार करण्याला वा मांडण्याला पुरोगामी सनातन धर्मात स्थान असू शकत नाही. तिथे एका मठाधीशाने काहीही खुळेपणा केला, मग तोच धर्म म्हणून बाकीच्यांनी पोपटपंची करायची असते. आपला मेंदू गहाण टाकून टेपरेकॉर्डरप्रमाणे बोलत जायचे. त्यात आपले शब्दही आपल्याला कळण्याची गरज नसते. मनमोहन सिंग वा कपील सिब्बल असे लोक खर्‍या अर्थाने बुद्धीमंत असतात. त्यांना आपली बुद्धी वापरता येत नसते ना? प्रणबदा त्याला अपवाद आहेत.

आणखी एक मजा आहे. पुरोगामी सनातन धर्मात विचारस्वातंत्र्य हे उद्दीष्ट आहे. पण विचार म्हणजे घोकंपट्टी असते. जुन्या पुरोगामी ग्रंथात जे काही नोंदले आहे, त्याचे घनपाठी होण्याने पंडीत तयार होत असतात. मग ज्ञानेश्वराने रेड्याकडून वेद वदवले, तसे हे अभ्यासक पंडीत बकवास करीत जातात. ज्येष्ठतेनुसार त्यांना पुढे कधी मठधीशही होता येत असते आणि त्याची आशाळभूत प्रतिक्षा करीत हे लोक पोपटपंची करीत रहातात. आपल्या आज्ञेच्या पलिकडे जाणार्‍यांना भक्त म्हणून टिंगल केली, की त्यांचे पांडित्य सिद्ध होत असते. त्यांच्या दुर्दैवाने प्रणबदा त्यांच्यात राहिले तरी त्यांनी आपली विवेकबुद्धी शाबुत ठेवली आणि आताही ते संघाच्या शिबीर वा कार्यक्रमात गेल्याने त्यांच्या बुद्धीला धोका पोहोचण्याची अजिबात शक्यता नाही. तिथे गेल्याने विचारांचा विचारांनी मुकाबला करता येईल आणि आपल्या विचारांचा गोषवारा मांडून विचारांची बाजी मारता येईल; हे समजण्याची क्षमता प्रणबदांपाशी आहे. निदान संघापाशी सर्व बाजू व वेगवेगळे विचार ऐकून घेण्याची सहिष्णूता आहे त्याची साक्ष यातून प्रणबदा देत आहेत. पण ज्यांच्या पोटात गोळा उठला आहे, त्यांना त्याचीच तर भिती सतावते आहे. कारण या घटनेमुळे संघात मोठा बदल होण्याची शक्यता नाही, की प्रणबदा आयुष्यभर उराशी जोपासलेल्या विचारांना तिलांजली देणेही शक्य नाही. पण सदोदीत सहिष्णूतेचा डंका पिटणार्‍यांची असंहिष्णूता त्यामधून पुरती उघडी पडणार आहे ना? म्हणून हा गदारोळ सुरू झाला आहे. सहिष्णूता ही दुसर्‍याचे विचार ऐकून समजून घेऊन, त्यातल्या त्रुटी दाखवण्यात असते. आपल्याच विचारांना लादण्याची घाई व त्यासाठी दुसर्‍याची गळचेपी करण्याला सनातनी वृत्ती म्हणतात आणि आजकाल तोच पुरोगामी धर्म बनून गेला आहे. जिथे विचारस्वातंत्र्य उरलेले नाही आणि विवेकबुद्धी रसातळाला गेलेली आहे.

5 comments:

  1. भाऊसर तुमच्या आशयघनतेला सलाम !!
    प्रणबदा च्या जागी संघ आणि संघाचे जागी प्रणबदा अशी अदलाबदल करून वाचले तरी निष्कर्ष बदलत नाही .
    शीर्षक: संघप्रणित विकसित भारत .

    ReplyDelete
  2. मग तरुण तेजपालाने त्याच्याच स्टाफवर गोव्यामधील हॉटेलमध्ये ' बलात्काराचा ' प्रयत्न केल्यावर हेच ' सनातनी / पुरोगामी ' तेजपालने ' फार गंभीर चूक ' केली असे म्हणतात. का तर तो तथाकथित पुरोगामी टोळीचा सदस्य आहे म्हणून. कालच शीला दीक्षित यांचे पुत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एका वाहिनीवर मनसोक्त शिव्या देत होते....देवूदे बापुडे...........!! सध्या या सनातनी फुरोगाम्यांच्या मागे ' ट्विटर ' वर स्वयंसिद्ध लोक असे काही तुटून पडतात की हे फुरोगामी टोळीसदस्य पाय लावून पळत सुटतात. तो दिवस दूर नाही कि लोक या ' फुरोगामी ' लोकांना सामान्य लोक रस्त्यामधूल ' पळवून - पळवून ' बडवतील.....दगडे मारतील. कारण ' लातो न के भूत बातो न से नही मानते '

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    काँग्रेसमुक्त भारताच्या लढाईतली ही वैचारिक चाल आहे. काँग्रेसमध्ये वैचारिक गळचेपी होते असा छुपा संदेश द्यायचा मोदींचा हेतू आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. भाऊ अप्रतिम लेख.

    ReplyDelete