Sunday, May 14, 2017

कपील मिश्रा आणि एब रिलेस

kejriwal kapil mishra के लिए चित्र परिणाम

गुन्हेगारांचीही एक आचारसंहिता असते. त्यात एकमेकांच्या विरोधात लढता येते, पण परस्परांच्या विरोधात कायद्याचा आश्रय घेता येत नाही. अमेरिकेत माफ़ियांचा उदय झाला नाही. माफ़िया हे मुळचे इटालियन होते. त्यांचा बंदोबस्त मुसोलिनीच्या कारकिर्दीत सुरू झाल्यावर त्यातले अनेकजण अमेरिकेला पळून गेले व संघटित असल्याने त्यांनी तिथेही निर्वासित इटालियन लोकसंख्येत आपला दबदबा निर्माण केला होता. म्हणूनच पुढल्या काळात तिथे माफ़ियांचे गुन्हेगारी वर्चस्व निर्माण झाले. या गुन्हेगारी टोळ्यांनी अमेरिकेत इतका उच्छाद मांडला, की त्यांच्या विरोधात अनेक कायदे संस्था उभ्या ठाकल्या व तपास संस्थांनीही आपली शक्ती पणाला लावली होती. मात्र त्यांच्या अशा गुन्हेगारी रहस्याचा भेद करणे कायदे यंत्रणांनाही शक्य होत नव्हते. उदाहरणार्थ अनास्थाशिया नावाच्या एका माफ़िया बॉसच्या नावावर बाराशे खुनांचा आरोप होता. पण त्याचा पुरावा-साक्षीदार काहीही नव्हता. सहाजिकच कायदा त्यांच्यासमोर काहीही करू शकत नव्हता. अशा स्थितीत एक असा साक्षीदार पोलिसांना सापडला, की एकामागून एक मोठे सहा माफ़िया बॉस गजाआड गेले. त्याचे नाव होते किड ट्विस्ट उर्फ़ एब रिलेस. योगायोगाने एका किरकोळ गुन्ह्यात हाती लागलेल्या या गुन्हेगाराने, माफ़ीचा साक्षीदार व्हायची ऑफ़र पोलिसांना दिली. बर्टन टार्कस नावाचा एक सरकारी वकील या माफ़िया खटल्यांचे काम बघत होता. एब रिलेसला त्याच्या समोर पेश करण्यात आले. माफ़ीचा साक्षीदार होण्यासाठी तो कुठलेही पुरावे देणार नव्हता. मग त्याचा सरकारला काय उपयोग होता? बर्टन टार्कसने त्याला तोच सवाल केला. तुझ्यापाशी कुठलेही पुरावे नाहीत, तर तुझा सरकारी पक्षाला काय उपयोग आहे? त्यावर एब रिलेसने दिलेले उत्तर समजून घेतले, तरच आज कपील मिश्राची महत्ता काय आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो.

पोलिसांनी माफ़ियांच्या विरोधात खुप पुरावे गो्ळा केलेले होते. पण तरीही त्याचे धागेदोरे अपुरे असल्याने माफ़िया बॉसेसच्या विरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध करण्यात सरकार अपेशी ठरत होते. पुराव्यातील हा अपुरेपणा भरून काढण्याची ऑफ़र एब रिलेसने देऊ केली होती. सरकारच्या दफ़्तरी जमा असलेले पुरावे नेमके संगतवार मांडून गुन्हा सिद्ध करण्याला महत्व असते आणि तिथेच पोलिस व तपास यंत्रणा तोकडी पडत होती. रिलेसने तेच काम करायची ऑफ़र दिलेली होती. त्याच्यापाशी फ़ोटोसारखी स्मरणशक्ती होती. सरकारी पुरावे संगतवार मांडण्याचे त्याने मान्य केले आणि एकमागून एक गुन्हे कोर्टात सिद्ध होऊ लागले. त्याच एका साक्षीदारामुळे माफ़ियांच्या गुन्हेगारीचा अभेद्य किल्ला ढासळू लागला. तेव्हा बॉस ऑफ़ द ऑल बॉसेस, चार्ली लकी लुच्यानो याने एब रिलेसला ठार मारण्यासाठी तब्बल पंचवीस लाख डॉलर्सची सुपारी, त्या काळात दिलेली होती. मुद्दा इतकाच, की आतला कोणी जेव्हा माफ़ीचा साक्षीदार असल्याप्रमाणे साक्ष द्यायला पुढे येतो आणि रहस्यमय वाटणार्‍या पुराव्यांचे कोडे उलगडू लागतो; तेव्हा मोठे गुंतागुंतीचे कोडे साध्यासरळ भाषेत समजू लागते. कपील मिश्रा हा कोणी आम आदमी पक्षाचा विरोधक नाही किंवा विरोधी पक्षातला कार्यकर्ता नाही. केजरीवाल यांच्याशी दिर्घकालीन जवळिक असलेला विश्वासातला निकटवर्ति आहे. त्यामुळेच केजरीवाल किंवा त्यांच्या टोळीने कपीलच्या साक्षीने अनेक गोष्टी बिनधास्तपणे पार पाडलेल्या आहेत आणि त्याची संगतवार मांडणी त्यालाच करणे शक्य आहे. सहाजिकच आजवर अनेकांनी जे खळबळजनक आरोप आम आदमी पक्षावर केलेले आहेत, त्याचे तुकडे आपल्या समोर आधीपासून आहेत. पण त्यांची संगतवार मांडणी कपील मिश्राच सहजगत्या करू शकतो. त्याने कुठले नवे पुरावे समोर आणलेले नाहीत, की नवे आरोप केलेले नाहीत.

गेल्या दोनतीन वर्षापासून आम आदमी पक्ष व केजरीवाल यांच्या एकूण कार्यशैली व व्यवहारावर अनेक शंका घेतल्या गेल्या आहेत. अनेक आरोप करण्यात आले आहेत आणि त्यासाठी अनेक पुरावे समोर आणले गेले आहेत. पण त्यांची संगतवार मांडणी होऊ शकली नाही आणि त्यातून कुठलाही कायदेशीर गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी यंत्रणांना यश मिळू शकलेले नाही. एका तुकड्याचा दुसर्‍याशी नेमका संबंध व संदर्भ जोडण्यात, यंत्रणा फ़सलेल्या आहेत. तिथेच कपील मिश्रा मोलाचा ठरणार आहे. यात गुंतलेल्या अनेक कंपन्या आहेत, तसेच अनेक अज्ञात लोकही गुंतलेले आहेत. त्यांचे परस्परांशी नेमके काय संबंध आहेत, त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. तो केजरीवाल किंवा त्यांच्या आतल्या गोटातलाच कोणी करू शकतो. कपील मिश्रा त्यापैकीच एक आहे. म्हणून तर त्याच्या आरोपानंतर केजरीवाल यांची बोलती बंद झाली आहे आणि त्यांच्या अन्य निकटवर्तियांना कुठलाही ठाम खुलासाही करता आलेला नाही. कपील खोटारडा आहे किंवा तो भाजपाचा हस्तक आहे, अशा उलट आरोपाच्या पुढे केजरीवाल टोळी काहीही सांगू शकलेली नाही. केजरीवाल तर अवाक्षरही बोलायला धजावलेले नाहीत. याचे कारण आपल्या तोंडून चुकीचा शब्द गेला, तरी फ़सण्याच्या भयाने त्यांना पछाडालेले आहे. कपीलवर उपोषणाच्या दुसर्‍याच दिवशी एका तरूणाने हल्ला करताच तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा बेछूट आरोप करीत संजय सिंग, या आपनेत्याने भलत्याच व्यक्तीची सोशल मीडियातील प्रोफ़ाईल माध्यमांना सादर केलेली होती. त्यातून हे लोक किती बेछूटपणे खोटे बोलू शकतात, त्याची प्रचिती आलेली आहे. सहाजिकच आताही आपल्यावरील आरोपाचा खुलासा त्यांच्यापाशी नाही. कारण कपील मिश्रा कुठल्या भानगडी चव्हाट्यावर आणू शकतो. त्याचाही अंदाज या लोकांना आलेला नाही. किंबहूना ते माफ़ीच्या साक्षीदाराला घाबरून गप्प झालेले आहेत.

खरेतर सभ्य माणसांपेक्षाही गुन्हेगार आपली आचारसंहिता काटेकोरपणे पाळत असतात. गुन्हेगार कितीही कायदे मोडत असला, तरी तो गुन्हेगारी जगाची आचारसंहिता कटाक्षाने पाळत असतो. आपसात मिळून जेव्हा गुन्हे केले जात असतात, तेव्हा कमीत कमी लोकांना विश्वासात घेतले जात असते. पण ज्यांना विश्वासात घेतले त्यापैकी कोणाला गद्दार होऊ द्यायचे नाही, अशीही काळजी घ्यायची असते. त्या आतल्या विश्वासाच्या वर्तुळातील कोणालाही आपली फ़सवणूक झाली, असे वाटता कामा नये. कारण तसे झाले मग हा नाराज सोबती रहस्याचा भेद करण्याचा धोका संभवत असतो. म्हणूनच गुन्हेगारांच्या आचारसंहितेमध्ये परस्परांचा एकनिष्ठ विश्वास अत्यंत मोलाचा असतो. त्यात त्रुटी येऊन चालत नाही. कपील मिश्रा हा केजरीवाल टोळीतला एक आतला सदस्य होता आणि त्याला आपल्याशी दगाफ़टका झाल्याची शंका आली आहे. म्हणूनच तो उरलेल्या टोळीच्या विरोधात दंड थोपटून उभा ठाकला आहे. अमेरिकन माफ़ियांच्या बाबतीत जसा एब रिलेस होता, तसाच हा आम आदमी पक्ष नावाच्या टोळीतला एब रिलेस आहे. त्याच्या साक्षीला ही टोळी घाबरून गेली आहे. म्हणूनच त्याला खोटारडा ठरवण्यापेक्षा अधिक कुठलाही खुलासा त्यांना करता आलेला नाही. कपीलचे आरोप किंवा पुरावे नवे नाहीत, जुने भाजपाचेच आरोप असल्याचे मात्र अगत्याने सांगितले जात आहे. नवे काही नासेल तर घाबरण्याचे कारणच काय? ते कारण कपील मिश्राची माफ़ीचा साक्षीदार होण्याची पात्रता आहे. आजवर समोर आलेले रहस्यमय पुरावे संगतवार मांडण्याची कपीलची पात्रता त्यांना भयभीत करते आहे. कपील भाजपाच्या भाषेत बोलत नसून, एब रिलेसच्या भाषेत बोलतो आहे. त्याने फ़ुटण्यापर्यंत वेळ येऊ दिली आणि केजरीवाल यांनी आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतलेली आहे. त्यांनी विरोधकांना माफ़ीचा साक्षीदार पुरवला आहे.

1 comment:

  1. भाऊराव,तुमच्या स्मरणशक्तीस दाद द्यायला हवी.किती तरी वर्षापूर्वी वाचलेल्या गोष्टींचे पुनर्स्मरण झाले.अत्यंत चपखल उदाहरण.

    ReplyDelete