Monday, May 29, 2017

खरी मोदीलाट की पळवाट?

kureel cartoon on modi के लिए चित्र परिणाम

दोनच दिवसांपुर्वी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून झालेल्या शपथविधीला तीन वर्षाचा कालावधी पुर्ण झाला. त्यानिमीत्ताने एका वाहिनीने देशात आज मोदी सरकार व कारभाराविषयी काय जनमत आहे, त्याचा आढावा घेणारी चाचणी सादर केली. गेल्या काही वर्षात अशा मतचाचण्यांना खुप विश्वासार्हता मिळालेली आहे. पण सतत अशा चाचण्या घेऊन, त्याचा राजकीय मत बनवण्यासाठी वापर झाल्याने, त्यांचे अंदाजही संशयास्पद बनत गेले होते. मोदींनी लोकसभेत मोठे यश मिळवले आणि त्यांच्या पक्षाला लोकसभेत बहूमत मिळाले. त्याचाही अशा चाचण्यांना फ़टका बसला होता. कारण तब्बल आठ निवडणुकांनंतर कुठल्या तरी एकाच राजकीय पक्षाला संसदेत मतदाराने स्पष्ट बहूमत दिलेले होते. पण त्याचा अंदाज कुठल्याही एका मान्यवर संस्थेला देता आलेला नव्हता. एका चाचणीत तसे भाकित होते. पण ती संस्था नवी असल्याने कोणी गंभीरपणे घेतली नव्हती. मात्र पुढल्या कुठल्या निवडणुकीत त्याही संस्थेचा अंदाज फ़सला आणि हळुहळू अशा चाचण्यांची लाट ओसरून गेली. अन्यथा मोदी रिंगणात उतरण्यापुर्वी अशा चाचण्यांचे पेवच फ़ुटलेले होते. पण गेल्या दोन वर्षात अशा चाचण्यांना बराच लगाम लागला आहे. जेव्हा कुठल्या तरी निवडणूका लागतात, तेव्हाच तिथल्या मतदानाविषयी अशा चाचण्या होतात. आता तरी तशी कुठली निवडणूक जवळ नाही. पण एका वाहिनीने तशी चाचणी मोदींच्या तीन वर्षाच्या कारभाराच्या निमीत्ताने घेतली आणि आजही मोदींची लोकप्रियता कितपत शिल्लक आहे, त्याचा आढावा घेण्याचा प्रयास केला. तो स्वागतार्ह असला, तरी त्यातील निष्कर्ष मात्र जपून तपासणे भाग आहे. त्यात आजही मोदीलाट कायम असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, लगेच मतदान झाल्यास मोदी व भाजपा आपले बहूमत टिकवतील; अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ती कितपत विश्वासार्ह आहे?

अजून लोकसभेच्या मतदानाला दोन वर्षे शिल्लक आहेत आणि किमान दिड वर्ष तरी लोकसभेसाठी प्रचाराला आरंभ होण्याची शक्यता नाही. दरम्यान अनेक विधानसभा निवडणूका व्हायच्या असून, त्यातही मोदीलाटेची कसोटी लागायची आहे. सहाजिकच आजच्या चाचणीवर आधारीत पुढल्याही लोकसभेत मोदी बहूमत मिळवतील, असले भाकित करणे धोक्याचे आहे. पण मतचाचणी करून जागांचे आकडे काढणारे केवळ मतांचाच नमुना घेऊन आपले अंदाज बांधत नाहीत. विद्यमान राजकीय परिस्थिती सुद्धा त्यासाठी विचारात घेतली जात असते. म्हणूनच या चाचणीने मोदीविजयाचे केलेले भाकित आजच्या राजकीय संदर्भातील आहे, हे विसरता कामा नये. कुठल्याही राजकारण्याला बहूमत मिळवणे सोपे असले, तरी आपली मतदारातील लोकप्रियता टिकवणे अवघड असते. म्हणूनच मायावती वा मुलायम सिंग, यांना एकाच विजयानंतर पराभूत व्हावे लागले होते. पण दुसरीकडे दोनदा सत्तेत आलेली युपीए किंवा नविन पटनाईक, ममता बानर्जी वा जयललिताही आहेत. त्यांना आपली लोकप्रियता टिकवत आली होती काय? त्यांचा राज्यकारभार अप्रतिम होता, म्हणून मतदाराने त्यांना दुसर्‍यांना सत्ता सोपवली होती काय? तसे नक्कीच म्हणता येणार नाही. मुंबईत कसाब टोळीचा हल्ला झाल्यानंतर काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. सहाजिकच मनमोहन सरकारला लोकांनी पुन्हा सत्ता देण्यासारखे काहीही कारण नव्हते. पण निकाल तर युपीएला पुन्हा सत्ता देणारे लागले होते. तेच जयललिता वा ममताच्या बाबतीत सांगता येईल. त्यांच्याही उत्तम कारभाराची चर्चा नव्हती, पण त्यांनाही लोकांनी दुसर्‍यांदा सत्ता सोपवलेली होती. ती लोकप्रियतेला दिलेली पावती नव्हती वा नसते. त्यापेक्षा अन्य काही पर्याय नसल्याने मिळालेले यश असते. म्हणून मतचाचणीचे आकडे तपासताना असे अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात.

आजही तीन वर्षे उलटून गेल्यावर मोदीच पुन्हा जिंकण्याची शक्यता अशा चा़चणीतून दिसते आहे. ही त्यांच्या लोकप्रित्यतेची खूण नक्की असू शकत नाही. त्याला अन्य कारणही असू शकते. ते अन्य कारण म्हणजे त्यांच्यासमोर असलेले राजकीय आव्हान होय. निवडणूकीत आपल्याला देशाचा वा राज्याचा कारभार करणारा कोणी निवडून द्यायचा असतो आणि मतदार त्याच निकषावर आला कौल देत असतो. ममता किंवा जयललितांना दुसरी संधी म्हणूनच मिळाली. त्या राज्यात अन्य कोणीही नेता तितक्या खंबीरपणे सरकार चालवण्यासाठी पुढे सरसावला नव्हता. उलट मायावतींना मुलायम हा पर्याय होता, म्हणून सत्तापालट झाला. २००९ सालात मनमोहन यांच्यासमोर तसे आव्हान लालकृष्ण अडवाणी उभे करू शकले नाहीत. लोक नाराज आहेत म्हणून आपोआप भाजपाला मते मिळतील; अशा आशाळभूतपणाने अडवाणींना पराभव पचवावा लागला होता. उलट २०१४ सालात पद्धतशीर प्रचार व मांडणी करून त्याच भाजपाचा नेता म्हणून नरेंद्र मोदी पुढे आले. तर सर्वांना नाकारून मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचा नेमका अर्थ कॉग्रेस व अन्य पक्षांनी समजून घेतला असता, तर गेल्या तीन वर्षात त्यांनाही मोदींना पर्याय उभा करणे शक्य झाले असते. पण मोदी विरोधातील कोणाही राजकारण्याने तसा विचारही केलेला नाही, की त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली नाही. म्हणूनच लोकसभा जिंकणार्‍या नरेंद्र मोदींना विविध विधानसभेतही आपल्याच व्यक्तीमत्वावर सत्ता संपादन करून दाखवणे शक्य झाले आहे. त्याला मोदीलाट संबोधणे ही निव्वळ पळवाट आहे. वास्तवात विरोधी पक्षांचा तो नाकर्तेपणा आहे. किंबहूना आजही विरोधक २०१४ च्याच मनस्थितीत असल्याची ती साक्ष आहे. बंद पडलेली गाडी चालू झाली व पुढला प्रवास सुरू झाला, तरी प्रवासी खुश होतात. तशी आजची मोदींची लोकप्रियता आहे.

नुसत्या मतांच्या बेरजा करून मोदींना पराभूत करण्याची समिकरणे विरोधक मांडत आहेत. त्याविषयीची मतदाराची नाराजी म्हणजे आजची मोदीलाट आहे. भाजपाला वा मोदींना मिळालेल्या मतांपेक्षा विरोधात पडलेल्या मतांची बेरीज मोठी आहे. अशा भ्रमात वागणार्‍यांना मतचाचणी उपयोगाची नसते किंवा सत्ताही मिळवणे सहजशक्य नसते. मोदी नकोत, या सिद्धांतावर मते मिळू शकत नाहीत. मोदींना बाजूला केल्यास तुम्ही काय करणार; त्याचे उत्तर मतदाराला आतापासून दिले पाहिजे. लोकसभा निवडणूक प्रचारात उतरलेल्या मोदींनी क्रमाक्रमाने सहा महिने आपल्या भावी सत्तेविषयी अनेक कल्पना लोकांसमोर मांडल्या होत्या. त्यामुळे पर्याय गवसला, असे लोकांना वाटू लागले होते. त्यातून नवा मतदार त्यांच्याकडे ओढला गेला होता. त्याच्याच जोडीला अधिकाधिक मतदान घडवून, आपल्या मतांचा टक्केवारीतला घटक वाढवण्याची योजनाही भाजपाच्या संघटनेला हाती धरून मोदींनी राबवली होती. आज विरोधकांपाशी तशी कुठली पर्यायी राजकारणाची संकल्पना वा भूमिका नाही आणि संघटना पातळीवर आनंदच आहे. तिथे मोदी सर्वांना भारी पडत आहेत. बेरजेने समाजवादी पक्ष व कॉग्रेस एकत्र येऊनही काही फ़रक पडला नाही. त्यात मायावतींची भर पडली म्हणून निकालावर फ़ारसा फ़रक पडणार नाही. देशातील तमाम विरोधी पक्ष एकवटले म्हणून त्यांच्या मतांची बेरीज निवडणूकीत होत नसते, याची वारंवार प्रचिती आलेली आहे. म्हणूनच या मतचाचणीने मोदीलाट कायम दाखवली, त्याचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. ती मोदीलाट कायम असल्याची साक्ष नसून, आजसुद्धा विरोधक तीन वर्षापुर्वी होते तितकेच दिशाहीन व विखुरलेले आहेत, असा त्या चाचणीचा अर्थ आहे. लोकसभा विधानसभांचे कामकाज बंद पाडणे लोकांना मान्य नाही, तर काही विधायक व सकारात्मक भूमिकेची गरज आहे, इतकाच या चाचणीचा अर्थ आहे.

मोदी सरकारने विरोधकांची मुस्कटदाबी केली आहे. हुकूमशाही चालवली आहे. अशा आरोपांनी काहीही साध्य होणार नाही. लोकांना जाऊन भिडणार्‍या समस्या, प्रश्नांना हात घालण्याची गरज आहे. गेल्या लोकसभा निकालांनी व मोदींच्या आगमनानंतर राजकारणाची संपुर्ण मांडणी व रचनाच बदलून गेलेली आहे. त्यात नियम व निकषही बदलून गेलेले आहेत. सहाजिकच जुन्या नियम व समजुतीनुसार मोदींवर मात करता येणार नाही. आजारातला माणूस त्रासलेला असतो आणि त्याला उपचाराने थोडा दिलासा मिळाला तरी तो सुखावतो. त्याला अच्छे दिन नाहीतर काय म्हणतात? बिघडत चाललेल्या स्थितीला रोखण्यापर्यंत मोदींनी तीन वर्षात मजल मारलेली आहे आणि तितकीही लोकांना सुखदायी वाटत असेल, तर ती समजून घेतली पाहिजे. त्याहीपेक्षा अधिक सुखकारी आपण काय करू शकतो, त्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करावा लागेल. तो करण्यात वा त्या दिशेने विचार करण्यातही आज विरोधक अपेशी ठरलेत. इतकाच त्या मतचाचणीचा अर्थ आहे. मोदी पुन्हा जिंकतील म्हणजे विरोधक त्यांना आव्हानही देण्याच्या स्थितीत आज नाहीत, असा यातला निष्कर्ष आहे. आपली कुवत व मर्यादा ओळखून राजकारण खेळण्याची मोदींची चतुराई त्यांना यशस्वी करीत चालली आहे. कल्पना व महत्वाकांक्षा यांच्यापेक्षा वास्तविकतेला राजकीय आखाड्यात प्राधान्य असते. इतके यश मिळवल्यानंतरही त्याचे नेमके भान मोदींना असावे आणि विरोधकांमध्ये त्याचा अभाव दिसावा, यातच सर्वकाही आले. कालबाह्य कल्पना व भूमिका झुगारून, नव्याला गवसणी घालण्याची मोदीमधली क्षमता, जो विरोधी नेता दाखवू शकेल व त्याच्या पाठीशी विरोधी पक्षांची एकजूट उभी राहिल, त्यालाच मोदींना आव्हान देणे शक्य आहे. तशी कुठली हालचाल असल्याची चाहूल कोणाला लागते आहे काय? नसेल तर विरोधकांच्या त्या अपयशालाच आजची चाचणी मोदीलाट संबोधते आहे असे खुशाल समजावे.

3 comments:

  1. भाऊ, सध्या फेसबूक वर देशाची अर्थव्यवस्था वाईट परिस्थिती मध्ये आहे. मोदी सरकार ला गेल्या ३ वर्षात ती नीट सांभाळता आली नसल्याचा आरोप होतो आहे. सध्याच्या सरकार च्या अर्थव्यवस्थेबद्दल च्या कामगिरी संदर्भात तुमचं विश्लेषण वाचायला मिळाल्यास आनंद होईल.

    ReplyDelete
  2. भाऊ ऊतकृष्ट अनालेसिस..
    या पैकी काही मतचाचण्या काही ठराविक अजेंडा ठरवून केलेल्या असतात असे विचार केला तर वाटते..
    याची विश्वासार्हता आपण चोख पणे अनेक लेखातुन तपासली आहे.. तसेच बर्याच वेळा ह्या मतचाचण्या दिशाभूल करण्यासाठी केलेले असतात. यातुन एक प्रकाची जनभावना तयार करण्याचा उद्देश असतो तो काही वेळा विकत घेऊन ही करुन घेता येवु शकतो.
    कारपोरेट वल्ड मध्ये जसे पुरस्कार मिळण्यासाठी हे लोक प्रोग्रॅम स्पाॅनसर करतात व आपला पुरस्कार निश्र्चीत करतात.. व लोकांची दिशाभूल करुन आपल्या मालाची बाजारपेठ तयार करतात तसेच काहीसे हे प्रकार आहेत.

    या मुळे अनेकदा सुमार काँग्रेसने राज्यकारभार करुन सुद्धा दशकानुदशके राज्य केले आहे. आधी पोलीस सर्वेक्षण म्हणुन हे आतल्या गोटतील बातमी म्हणुन हे लोकांच्यात चर्चा करुन पसरविले जायचे व कमकुवत व गोधंळलेल्या मतदाराचे मत वळवले जायचे. तसाच प्रकार चालू आहे...

    परंतु एक म्हण आहे यु कान्ट फुल ऑल ऑल द टाइम..
    त्यामुळे जनतेला हे आता उमेजले आहे. व एवढे मोठे च्यानलाधीश मोदी या अजब रसायनावर अजुन उपाय करु शकले नाहीत..

    परंतु नक्कीच हे सर्व आता पासुन मोदी पराभवा साठी माष्टर प्लॅन तयार करत आसतील.. याचा शोध घेणे आवश्यक आहे..
    कारण मोदी 2019 ची निवडणूक जिंकले तर पुढील 7 वर्षे राज्य करतील व नुसत्या भारताला नाही तर जगाच्या राजकारणा वर याचे दुरगामी परिणाम होतील व सर्व समीकरणे बदलतील .. व भारतीयांच्या नशिबात हे आहे काय हे टिम मोदी यांच्या पुढील दोन वर्षे चे कामगिरी वर व मोदी वरिल आवाहने कशी पेलतात या वर ठरेल.
    Aks

    ReplyDelete