Sunday, June 17, 2018

नेपोलियन म्हणतो

No automatic alt text available.

शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी अन्य तीन मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत आले आणि पत्रकारांसमोर त्यांनी केजरीवाल यांच्या धरण्याला पाठींबा जाहिर केला. पण त्याच्याही आधी बंगलोर येथे त्यांनी एक महत्वपुर्ण विधान केलेले होते. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुमारस्वामी म्हणाले, निदान २०१९ च्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागण्यापर्यंत माझ्या मुख्यमंत्रीपदाला कोणापासून धोका नाही. जेव्हा माणूस अधी भाषा वापरतो, तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाचीच साक्ष देत असतो. कुमारस्वामी यांना आपली सत्ता व सतापद किती डळमळीत आहे, त्याचीच खात्री या वाक्यातून दिसून येते. त्याच्या बोलण्याचा अर्थ इतकाच, की आपल्या मुख्यमंत्रीपदाची शाश्वती विरोधी एक्जुटीपुरती मर्यादित आहे. जगाला विरोधकांची आघाडी चालू शकते आणि निर्वेध चालविली जाऊ शकते, असा देखावा निर्माण करून ठेवायचा आहे, तोपर्यंतच आपली खुर्ची पक्की आहे. ज्यादिवशी ती गरज संपेल त्यादिवशी आपण मुख्यंमंत्रीपदी टिकणार नाही. असे कुमारस्वामी कशाला म्हणतात? तर आपले मुख्यमंत्रीपद विचाराधिष्ठीत आघाडी वा राजकारणातून आलेले नसून, मोदी विरोध नावाच्या नकारात्मकतेतून आले, हे सत्य त्यांना सांगायचे आहे. लोकसभेत मोदींना पराभूत करण्याचे उद्दीष्ट जोपर्यंत कायम असेल, तोपर्यंत आपली खुर्ची पक्की. त्यासाठीचा कालावधी २०१९ च्या लोकसभा निकालापर्यंतचा आहे. त्यात पर्यायी आघाडी जिंकली वा पराभूत झाली, तरी आपल्या मुख्यमंत्रीपदाची हमी संपुष्टात येते, असेच त्यांना सांगायचे आहे. कॉग्रेसने खुल्या मनाने आपल्याला सत्तापदावर बसू दिलेले नाही, तर मोदी विरोधाच्या राजकारणातली अगतिकता म्हणून तो मान आपल्याला मिळाला आहे. ती अगतिकता संपली, की सर्वकाही संपले, असा त्याचा अर्थ आहे. त्याची प्रचिती दुसर्‍याच दिवशी दिल्लीत आली. कारण तिथे या विरोधी आघाडीच्या घोळक्यातून कॉग्रेस बेपत्ता होती.

सत्तेत आल्यापासून केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी काय केले माहित नाही. पण प्रत्येक निमीत्त शोधून त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग उभे करण्यासाठी आपली बुद्धी व शक्ती पणाला लावलेली आहे. सहाजिकच आता त्यांनी त्याच वाटेवर आणखी एक पाऊल टाकलेले आहे. त्यांच्या मते दिल्ली सरकारचे नोकरशहा निवडून आलेल्या आप सरकारला काम करू देत नाहीत आणि सहकार्य देत नाहीत. मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अधिकारी येत नाहीत आणि दिल्लीची कामे ठप्प झालेली आहेत. अधिकारी आपापल्या कार्यालयात येतात आणि त्यांना हवे ते काम करीतही असतात, पण त्यांनी मंत्री मुख्यमंत्र्यांशी असहकार पुकारलेला आहे. सहाजिकच केजरीवाल व आपच्या शब्दकोषानुसार त्याला संप घोषित करण्यात आलेले आहे. तो संप निकालात काढण्यासाठी नायब राज्यपाल व पंतप्रधानांनी काही करावे, म्हणून केजरीवाल दिल्लीतल्या राजभवनात धरणे धरून बसलेले आहेत. हे सर्व दिसायला जितके सोपे वाटते तितके सरळ नाही. पंतप्रधान वा नायब राज्यपालांच्या इशार्‍यावर अधिकार्‍यांनी हा पवित्रा घेतलेला नाही, तर केजरीवालांच्या उचापतीमुळे अधिकार्‍यांनी हा असहकार पुकारलेला आहे, ते सत्य केजरीवाल व त्यांचे चहाते माध्यमकर्मी चतुराईने लपवून ठेवतात. केजरीवाल यांच्या निवासस्थानी मुख्यंमंत्र्यांनी एक बैठक बोलावलेली होती आणि त्याला हजर असलेल्या मुख्य सचिवांना बोलाचाल होऊन आपच्या आमदारांनी मारहाण केली. त्यामुळे मंत्र्यांच्या बैठकीत असुरक्षितता असल्याने अधिकार्‍यांनी त्या बैठकांवर बहिष्कार घातलेला आहे, हे सत्य आजच्या कुठल्याही बातमीत येत नाही. तेव्हाच आपल्या गुंड साथीदारांना केजरीवाल यांनी रोखले असते आणि मुख्य सचिवांची माफ़ी मागितली असती, तर ही वेळ आलीच नसती. पण तितकेच सत्य दडपून बातम्या रंगवल्या जात असतात. केजरीवाल आजही माफ़ी मागून हा विषय निकालात काढू शकतात.

थोडक्यात दिल्लीतला केजरीवालांचा तमाशा हा त्यांनीच निर्माण केलेला घटनात्मक पेच आहे आणि तो सोडवणे त्यांच्याच हाती आहे. ममता, चंद्राबाबू, पी विजयन व कुमारस्वामी यांनी केजरीवाल यांना कानपिचक्या दिल्या असत्या, तरी योग्य झाले असते. पण त्यांना दिल्लीचा घटनात्मक पेच संपवण्यापेक्षा त्याचा मोदी विरोधातल्या राजकारणासाठी गैरवापर करायचा आहे, म्हणून ते शनिवारी अवेळी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केजरीवालच्या धरण्याला पाठींबा जाहिर केला. पण मुद्दा असा की त्यातून मोदी विरोधी संघाचा कर्णधारच बेपत्ता होता. कॉग्रेसचा कोणीही मुख्यमंत्री वा ज्येष्ठ नेता त्यांच्यासमवेत आला नाही. उलट दिल्लीच्या दिर्घकालीन माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसनेत्या शीला दिक्षित यांनी केजरीवाल हा भामटा असल्याचे सांगून टाकले. दोष केंद्राचा नसून केजरीवाल यांच्या कार्यशैलीत असल्याचेच दिक्षित यांनी सांगितले, तेच सत्य आहे. त्यांनी इतकी वर्षे दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांना कधी राज्यपाल वा इतर अधिकार्‍यांनी अडवणूक केली नसेल, तर केजरीवाल यांना सतत नियम कायदे व अधिकार्‍यांची अडचण कशाला होते आहे? पण मुद्दा तोही नाही. बंगलोरच्या शपथविधीत उंचावलेले हात बघून ज्यांना विरोधी एकजुटीचे डोहाळे लागलेले होते, त्यांचा गर्भपात होऊन गेला ना? कारण केजरीवाल यांना पाठींबा द्यायला कॉग्रेसने साफ़ नकार दिला असून कुमारस्वामी आपली अगतिकतता जाहिरपणे सांगू लागलेले आहेत. ही विरोधी आघाडी कुठल्याही विचार वा भूमिकेतून आकार घेत नसून, कमाल द्वेषाच्या आधारावर तिचा पाया घातला गेलेला आहे. मोदीद्वेष जितका पक्का व प्राधान्याचा, त्यानुसार पक्ष एकत्र येतात. त्यापेक्षा अधिक द्वेष अन्य कुणा व्यक्ती वा पक्षाचा असेल, तर तो नेता गट आघाडीपासून दुर रहातो आहे.

त्रिपुरातील भाजपा विजयानंतर काही तासातच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ममतांशी संपर्क साधून तिसर्‍या आघाडीची कल्पना मांडली होती व विनाविलंब ते कोलकात्याला ममतांची भेट घ्यायला पोहोचले होते. आज ते अशा आघाडीच्या घोळक्यात कुठे दिसतही नाहीत. बंगलोरला कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदी बसवणारे पुण्यात्मा राहुल गांधीही शनिवारी रात्री चार मुख्यमंत्र्यांच्या जवळपास कुठेही नव्हते. राहुलच्या इफ़्तार पार्टीला अगत्याने उपस्थित रहाणारे सीताराम येच्युरी गायब आहेत आणि त्यांच्या पक्षाचे केरळी मुख्यमंत्री ममताच्या सोबत केजरीवाल यांच्या प्रकृतीची विचारपुस करायला पोहोचले होते. दर महिन्यात मोदी विरोधी आघाडीतल्या नेते पक्षांचे चेहरे मुखवटे बदलत आहेत. त्यामुळे त्यांच्या लढाईची दिशा कोणती व त्यांचा हेतू काय, त्याचीही शंका त्यांनाच येत असावी, नेपोलियन बोनापार्ट इतिहास गाजवलेला सेनापती म्हणून ओळखला जातो. तो म्हणतो, शंभर सिंहांची सेना उभारली व तिचे नेतृत्व कुत्र्याकडे सोपवले, तर सिंहही कुत्र्याच्या मौतीने मारले जातात. उलट शंभर कुत्र्यांची सेना उभारून तिचे नेतृत्व सिंहाकडे दिलेले असेल, तर कुत्रेही सिंहासारखे लढतात. विरोधी आघाडीत एकत्र येणार्‍या एकाहून एक सिंहांची अवस्था त्यापेक्षा वेगळी आहे काय? हे डरकाळ्या फ़ोडणारे वाघ आणि सिंह अजून आपला नेता कोण, ते ठरवू शकलेले नाहीत. किंचीत बोलाचाल झाली तरी त्यांची आपसातच जुंपायला वेळ लागत नाही. मोदीद्वेष त्यांना एकत्र आणतो यात शंका नाही. पण मोदी नावाची नाडी जराशी सैल पडली, तरी अशा आघाडीचा लेंगा कंबरेवरून सुटून गुडघ्याच्या खाली निसटू लागतो. केजरीवाल समर्थनाच्या निमीत्ताने त्याचीच ग्वाही चार मुख्यमंत्र्यांनी दिली आणि कुमारस्वामींनी आपल्या मुख्यमंत्री पदाची मुदत जाहिर करून काय वेगळे सांगितले आहे?

4 comments:

  1. भाऊ ......!! नेहमीप्रमाणे लेख मस्तच. !! पुढील शब्द योजना तर एकदम झकासच ...' पण मोदी नावाची नाडी जराशी सैल पडली , तरी अशा आघाडीचा लेंगा कंबरेवरून सुटून गुडघ्याच्या खाली निसटू लागतो.'

    ReplyDelete
  2. हे सर्व चालू असताना भाजप चे नियोजनबद्ध काम सुरु आहे ,सुरजकुंड येथे rss व भाजप यांची कूटनीती ठरवणारी बैठक झाली जशी २०१३ मध्ये झाली होती ,त्याचा फारसा गाजावाजा केला नाही,तिथे काय ठरले हे कळून पण येणार नाही ,पण त्याचे परिणाम २०१९ मध्ये दिसतील .मोदी पुन्हा सत्तेत आले तर rss किंवा बैठकीतले लोक श्रेय घ्यायला पुढे पण येणार नाहीत,सर्व मोदींच्या नावाखाली झाकले जाईल हेतू मात्र साध्य होईल मीडिया पण लक्ष देणार नाही त्यांना तेच हव आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आख्या जगात बौद्धिके होतात ती फक्त
      रामभाऊ म्हाळगीत !!
      बाकीचे सगळं प्रभातफेरीत मिरवायला ..
      तांतर ताता ता तांतर ताता ता ...

      Delete
  3. @ anonymous :- Tu Confused Distos Tula Nemke Kaay Sangayache Aahe Hech Samajat Nahiye, Pan Aav Kaay Aanlay Pratikriya Denyacha.

    BALYA Aaplyala Mulat Nasalelya Akkaleche Ase Jahir Pradarshan Kadhi Mandu Naye, Hya Asapya Blogvar Jethe Uttam Bouddhik Likhan Hote Tya Thikani Tar Nahich Nahi, He Fesbuk Nhave.....!!

    ReplyDelete