Monday, June 11, 2018

पुष्कर मृत्यूचे भूत

Image result for sunanda pushkar

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यूला आता साडेचार वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे आणि तरीही त्याविषयी कुठला नेमका तपशील समोर येऊ शकलेला नाही. किंबहूना त्या मृत्यूच्या भोवती शेकडो प्रश्नांचे जाळे असतानाही पोलिसांनी विनाविलंब त्या काळात थरूर यांना क्लीनचीट देण्याची घाई केलेली होती. अर्थातच थरूर तेव्हा मंत्री होते आणि त्यांना वाचवण्याचा प्रयास सरकारी यंत्रणेकडून झालेला असू शकतो. खरेतर अशा बाबतीत शंकेला जागा रहाणार नाही असा तपास होण्याची गरज असते. पण मृत्यू झाल्यावर लगेच हे प्रकरण गुंडाळले गेले होते. ते संशयास्पद एवढ्यासाठी होते, की दोनतीन दिवस आधी दोघा पतीपत्नीमध्ये जाहिरपणे धुसफ़ुस चाललेली होती. त्याचे अनेक साक्षीदार होते आणि खुद्द सुनंदा हिने काही गोष्टी जाहिरपणे सांगून टाकलेल्या होत्या. शशी थरूर यांच्याविषयी पत्नीनेच काही गंभीर आरोप केलेले होते. म्हणूनच हा मृत्यू नुसता शंकास्पद नव्हता, तर संशयास्पद होता. एका मंत्र्याच्या पत्नीचा पंचतारांकीत हॉटेलच्या बंद खोलीत मृतदेह सापडतो, ही बाब कुणाच्याही मनात शंका निर्माण करणारी आहे. पोलिसांना त्यात संशय आलेला नसेल, तर कोणीतरी प्रयत्नपुर्वक झाकपाक केलेली असणार, हे उघड आहे. नवरा पत्नीला हॉटेलच्या खोलीत सोडुन जातो आणि नंतर उशिरा परत आल्यावर त्यालाच पत्नीचा मृतदेह आढळून येतो, ही बाब शक्य आहे काय? नवरा पक्षाच्या अधिवेशनात रममाण झालेला असतो आणि पत्नी शेवटच्या घटका मोजत असते, यावर कोणी विश्वास ठेवायचा आणि कसा? कारण मृत्यू होण्यापुर्वीची सुनंदा पुष्कर यांची अनेक विधाने संशयाला चालना देणारी आहेत. नवर्‍याने पत्नीचा काटा काढावा, इतकी भयंकर कारणे यात संभवतात. पण पोलिसांनी यापैकी कशाचीही दखल घेतलेली नसेल तर  गुढ आणखीनच वाढत जाते.

सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूपुर्वी अनेक गौप्यस्फ़ोट केले होते. आपल्या पतीवर एक पाकिस्तानी महिला पत्रकार प्रणयाचे जाळे फ़ेकून त्याला आपल्या मोहजालात गुंतवायचा प्रयत्न करते आहे, असा एक आरोप आहे. त्या पाक महिला पत्रकाराचे नाव मेहर तर्रार असे होते आणि तिचे अनेक ट्वीटर संदेश व संभाषण सुनंदाने पकडले होते. पण थरूर यांनी त्याचा इन्कार केला होता. मात्र आपले व थरूर यांचे संभाषण होत असण्याचा कुठलाही इन्कार तर्रार या महिलेने केला नाही. उलट सुनंदाच्या मत्सरीवृत्तीची मेहर तर्रारने खिल्ली उडवली होती. एकटेच थरूर दुबईला गेले असताना त्यांची व तर्रार यांची भेट झाल्याचाही आरोप होता. तसे असेल तर तो पतीपत्नीमधला विषय रहात नाही. कारण थरूर मंत्री होते आणि एका पाकिस्तानी महिलेशी अशी जवळिक, हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर विषय होऊन जातो. कारण सुनंदाने नुसता पतीविषयी संशय घेतला नव्हता ,की आरोप केला नव्हता. मेहर तर्रार ही पाक हेरसंस्थेची हस्तक असल्याचाही आरोप केलेला होता. त्यात किती तथ्य होते, ते सांगता येणार नाही. पण तसे काही असेल तर सरकारी गुपितांच्या बाबतीत हा विषय नवराबायकोचा रहात नाही. या एकूण प्रकरणात त्याची केव्हाही दखल घेतली गेली नाही. उलट घाईगर्दीने त्या मृत्यू प्रकरणात थरूर यांना निर्दोष ठरवण्याचेच प्रयास झाले. पण म्हणून ते प्रकरण संपणार नव्हते. देशात सत्तांतर झाले नसते, तर कदाचित त्यावरचा पडदा आणखी पाच वर्षे उठवला गेला नसता. सत्तांतर झाले तरी राजकीय सुडबुद्धीचा आरोप नको, म्हणून मोदी सरकारने त्याला हात घातला नाही. पण एका वाहिनीने त्याचा पाठपुरावा केला आणि अनेक धागेदोरे शोधून काढले. त्याचा तपास करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी कोर्टात धाव घेतली आणि आता चार वर्षानंतर त्या खुनाला वाचा फ़ुटलेली आहे. जेव्हा त्याची सुनावणी सुरू होईल, तेव्हा ते निस्तरणे म्हणूनच थरूर यांच्यासाठी सोपे काम नसेल.

या मृत्यूपुर्वी थरूर सपत्नीक आपल्या गावी म्हणजे केरळला जाऊन आलेले होते. योगायोगाने त्याच विमानात त्यांचे आणखी एक सहकारी मंत्री मनिष तिवारी देखील होते आणि संपुर्ण प्रवासात नवराबायको अखंड भांडत होते, असे निवेदन तिवारी यांनी त्यावेळीच दिलेले आहे. याचा अर्थ दोघांमध्ये वैवाहिक जीवन गुण्यागोविंदाने चालले होते, असे नक्कीच म्हणता येणार नाही. याखेरीज थरूर यांनी आपला आर्थिक व्यवहारात गैरवापर करून घेतला. आयपीएल क्रिकेटची केरळाची टीम बनवली गेली, त्यात आपला गैरवापर झाल्याचा राग सुनंदाला होता. कारण त्याचा खुप गाजावाजा झाला आणि बालंट तिच्यावर आलेले होते. त्याचाही आपण गौप्यस्फ़ोट करणार असल्याचे सुनंदाने ट्वीटरवर जाहिर केलेले होते. आपल्या गौप्यस्फ़ोटातून अनेकांचे मुखवटे टरटरा फ़ाडले जातील, असेही तिने साफ़ म्हणून टाकलेले होते. इतक्या भानगडी हाती असताना सुनंदा पुष्कर ही अनेकांसाठी प्राणघातक बॉम्ब बनलेली होती. म्हणूनच तिचा संशयास्पद मृत्यू हा निव्वळ घरगुती भांडणातला खुन असू शकत नाही. त्यामध्ये अनेकांचे हातपाय गुंतलेले असू शकतात. तो मृत्यू हा मोठा घातपाती डाव असू शकतो. कारण तिच्या देहावर संशयास्पद जखमा व डागही आढळले होते. तरीही त्याची पुरेशी तपासणी झाली नाही. घाईगर्दीने अंत्यसंस्कार उरकण्यात आले. इतकी घाई कशासाठी झालेली होती? यापैकी कुठल्याही प्रश्नाची समाधानकारक उत्तरे आजवर शशी थरूर यांना देता आलेली नाहीत. जेव्हा केव्हा प्रश्न विचारले गेले, तेव्हा ते झटकून टाकण्यातच त्यांनी धन्यता मानलेली आहे. आताही हे प्रकरण कोर्टात जाऊन समन्स आल्यावरची थरूर यांची प्रतिक्रीया शोभादायी नाही. सुडबुद्धीने आपल्याला सतावले जात असल्याची त्यांची तक्रार आहे. खरोखरच त्यांचे सुनंदा पुष्कर यांच्यावर मनापासून प्रेम असते, तर त्या संशयास्पद मृत्यूचा कसून तपास घेण्याचा अट्टाहास त्यांनीच करायला हवा होता ना?

पहिल्या दिवसापासून थरूर यांनी सुनंदा आजारी होती आणि तिच्यावर उपचार चालू असल्याचा दावा केलेला आहे. पण कुठल्या आजारासाठी उपचार चालू होते आणि कुठल्या डॉक्टरचे उपचार चालू होते, त्याचा एकदाही खुलासा केलेला नाही. या मृत्यूविषयी अनेक शंका घेतल्या गेल्या व अनेक संशय व्यक्त झाले. पण पोस्टमार्टेम करणार्‍या यंत्रणेपासून पोलिसांपर्यंत कोणालाही समाधानकारक खुलासा कधीही देता आलेला नाही. आताही हा खटला पोलिसांनी भरलेला नसून कोर्टाकडून सक्ती झाली, म्हणून नव्याने पोलिसांनी कसून तपास केला. विविध गोटातून आलेली माहिती तपासल्यावर खटला दाखल केला आहे. त्यात थेट थरूर यांचे नाव आल्यामुळे त्यांना पुढल्या महिन्यात कोर्टाच्या पिंजर्‍यात उभे रहावे लागणार आहे. ते फ़ार सोपे असले तरी सरतपासणी व उलटतपासणीच्या प्रश्नांची सरबत्ती चालू होईल, तेव्हा खरीखुरी तारांबळ उडणार आहे. कारण तेव्हा सुडबुद्धीचा बचाव कामाचा असणार नाही. सुनंदाने व्यक्त केलेले संशय वा विविध वक्तव्ये, यांचे कोर्टाला समाधानकारक वाटतील असे खुलासे व स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. त्यात उडवाउडवी करण्याची सोय असणार नाही. त्यात मग तिवारी ह्या सहकार्‍याचे निवेदन वा सुनंदाच्या अनेक खास मैत्रिणी व त्यांचे दावेही तपासले जाणार आहेत. त्यात पाकिस्तानी महिला मेहर तर्रारचाही संदर्भ आल्याशिवाय रहाणार नाही. म्हणजेच जुलै महिन्यात सुरू होणारा सुनंदा पुष्कर मृत्यूचा खटला राजकीय नाट्य ठरणार आहे. आपल्या हसतमुख चेहर्‍याने वाहिन्यांच्या कॅमेराला थरूर उल्लू बनवू शकले, तरी कोर्टातल्या प्रश्नांची सरबत्ती इतकी सरळ नसते आणि झटकून टाकण्यासारखी नसते. त्या जंजाळात जितके तोडत जावे, इतके अधिकच फ़सायला होत असते. राजकीय मुत्सद्देगिरी तिथे कामाची नसते. आरोपांचा भडीमार असतो आणि कायदेशीर पेचात पकडण्याचा खेळ चालतो.

ऐन निवडणूकांच्या वर्षात हे प्रकरण रंगत जाणार आहे आणि युपीएचे मंत्री व कॉग्रेस नेता म्हणून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहाणारे थरूर, हे राजकीय विरोधकांसाठी आयते सावज असणार आहेत. जसजशी ही सुनावणी पुढेपुढे सरकत जाईल, तसतशी त्यातल्या आरोप व पुराव्यांची माध्यमातून नित्यनेमाने चिरफ़ाड होणार आहे. त्याचा राजकीय आखाड्यात गैरवापर होऊ नये, म्हणून कॉग्रेसला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कदाचित ऐन निवडणूकांमध्ये थरूर यांना पक्षापासून बाजुला काढण्याचाही विचार करावा लागेल. कारण त्यांच्यामुळे मुठभर मते मिळणार नसली, तरी त्यांच्यावर होऊ घातलेल्या चिखलफ़ेक व आरोपांमुळे थरूर कॉग्रेस पक्षाच्या गळ्यातील धोंड बनणार आहेत. मात्र एक गोष्ट निश्चीत आहे. जसजसा खटला रंगत जाईल, तसतसा तो राजकीय वळणे घेत जाणार आहे. त्यातील पाकिस्तानी महिला व तिचा हेरखात्याशी असलेला संबंध, कळीचा मुद्दा आहे. सुनंदाच्या पोतडीत लपलेली व झाकली गेलेली अनेक रहस्ये, याच सुनावणीतून उलगडली जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच आज तो केवळ शशी थरूर यांच्यापुरता विषय वाटत असला, तरी पुढल्या काळात कॉग्रेस व होऊ घातलेल्या मोदी विरोधी आघाडीसाठी जिव्हाळ्याचा विषय होत जाणार आहे. त्यापेक्षा थरूर यांना पक्षातून बाजूला करून कॉग्रेस त्यापासून आपले हात झटकूनही टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच सुनंदा पुष्कर मृत्यू ही अलिबाबाची गुहा आहे. ज्यांना न्यायमुर्ती लोयांच्या संशयास्पद मृत्युची इतकी फ़िकीर होती, त्यापैकी कोणालाही सुनंदा मृत्यूविषयी आस्था नसावी, हा एक चमत्कारच नाही काय? पण राजकारणात असे चमत्कार नेहमीच होत असतात. एकाच्या न्यायासाठी आकाशपाताळ एक करणारे, दुसर्‍या बाबतीत पुर्णतया बधीर होऊन जात असतात. काहीही असले तरी सुनंदाच्या मृत्यूचे भुत कॉग्रेस व थरूर यांच्या मानगुटीवरून सहजासहजी उतरण्याची शक्यता नाही.

4 comments:

  1. जेव्हा केव्हा प्रश्न विचारले गेले, तेव्हा ते झटकून टाकण्यातच त्यांनी धन्यता मानलेली आहे. आताही हे प्रकरण कोर्टात जाऊन समन्स आल्यावरची थरूर यांची प्रतिक्रीया शोभादायी नाही. सुडबुद्धीने आपल्याला सतावले जात असल्याची त्यांची तक्रार आहे. खरोखरच त्यांचे सुनंदा पुष्कर यांच्यावर मनापासून प्रेम असते, तर त्या संशयास्पद मृत्यूचा कसून तपास घेण्याचा अट्टाहास त्यांनीच करायला हवा होता ना?

    खूप छान भाउ

    ReplyDelete
  2. pak media madhye isi agent ne indian minister ch jeewan barbad kela honey trap madhun hi charcha sarras chalte ata durani chya book mule parat suru zaliy pan ithe koni bolat nahiye ka kay mahit?

    ReplyDelete
  3. साझा करने के लिए अच्छा काम धन्यवाद

    Best WordPress Security Plugins 2018

    ReplyDelete
  4. पाक महिलेशी समंध ते ही मंत्री असलेल्या व्यक्ती सोबत दाल मे कुछ काला हैं

    ReplyDelete