Tuesday, May 16, 2017

टिव्हीमालिकेची पटकथा

republic TV के लिए चित्र परिणाम

गेल्या दोन आठवड्यात एकामागून एक विरोधी पक्षांच्या भानगडी चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत आणि त्यांची मालिका थांबण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. दहाबारा वर्षापुर्वी जशी गुजरात दंगल ही टिव्हीमालिका अखंड प्रत्येक वाहिनीवर चालू होती, त्याची आठवण सध्या होऊ लागली आहे. जे कोणी मागल्या अनेक वर्षात मोदींचे विरोधक म्हणून हिरीरीने पुढे येत होते आणि गुजरात दंगलीच्या जखमेवर चोची मारून भाजपाला अधिकच रक्तबंबाळ करण्यात समाधान शोधत होते; त्यांच्या जखमा शोधून त्यावर तुटून पडण्याचा अजेंडाच आता तमाम वृत्तवाहिन्यांनी हाती घेतल्याचे दिसते आहे. त्यात प्रामुख्याने एक योगायोग लक्षात घेण्यासारखा आहे. मागल्या रविवारी म्हणजे ७ मे २०१७ रोजी अर्णब गोस्वामी याच्या नेतृत्वाखाली ‘रिपब्लिक’ नावाची नवी इंग्रजी वृत्तवाहिनी सुरू झाली. त्या वाहिनीने पहिल्या दिवसापासून स्टींग व शोधपत्रकारितेचा सपाटा लावला आहे. जुन्या अनुत्तरीत विषय व प्रश्नांचा उहापोह करीत, त्याचे कागदोपत्री संदर्भ शोधून भानगडी उकरून काढण्याचा पवित्रा त्याने घेतला. युपीएचे माजी मंत्री शशी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर, यांच्या संशयास्पद मृत्यूपासून झकीर नाईकच्या संदर्भातल्या अनेक भानगडी, कागदपत्रे वा चोरटे संभाषण, अशा मार्गाने अर्णब रोजच्या रोज गौप्यस्फ़ोट करू लागला आहे. त्याच्या त्या झपाट्याने पहिल्या दिवसापासून त्याची वाहिनी चर्चेत आली आणि इतर वाहिन्यांना त्याच स्पर्धेत टिकून रहाणे भाग होते. म्हणून त्याच पद्धतीने धमाल उडवणार्‍या भानगडी चव्हाट्यावर आणण्यात वा सांगण्यात मागे रहाणे परवडणार नव्हते. म्हणूनच बहुतांश वाहिन्या व माध्यमांना त्याच भानगडीच्या जखमांवर चोची मारण्याखेरीज पर्याय उरला नाही. हे सर्व काही योगायोगाने घडले, असे म्हणायचे की व्यावसायिक स्पर्धेमुळे माध्यमांना ही मोहिम उघडावी लागली आहे? की ह्या टिव्हीमालिकेची पटकथा आधीपासून सज्ज केलेली होती?

विविध टिव्हीमालिका असतात, त्यांचे नवनवे भाग रोजच्या रोज प्रक्षेपित केले जातात. ती कथा कशी उलगडत जाईल, त्याचे सामान्य प्रेक्षकाला मोठे कुतूहल असते. पण ज्यांचा त्या मालिकेत सहभाग असतो किंवा जे कोणी त्यात अभिनय करत असतात, त्यांना तरी संपुर्ण कथा ठाऊक असते काय? म्हणजे पटकथा लेखक असतो त्याला कथेचे सुत्र माहिती असते आणि त्याचे पुढले भाग असा लेखक क्रमाक्रमाने लिहीत जात असतोक. दिग्दर्शक त्यात दुरूस्त्या वा सुधारणाही सुचवत असू शकेल. पण त्याचे भाग प्रदर्शित होऊ लागल्यावर मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघूनही, अनेकदा कथानकात काही बदल होत असतात. पण कथेचे सुत्र आधीच निश्चीत झालेले असते. त्यातले कथालेखक व संवादलेखक त्यानुसार मांडणी करीत चाललेले असतात. पण त्यात अभिनय करणार्‍या पात्रांना, म्हणजे कलाकारांना मात्र उद्याच्या भागात आपण काय करणार आहोत, त्याचा पत्ता असेलच असे नाही. लिहून दिलेले संवाद त्यांनी फ़ेकायचे असतात आणि अपेक्षेप्रमाणे अभिनय सादर करायचा असतो. अकस्मात होणारे कथानकातील बदलही त्यांना अगोदर ठाऊक असण्याचे कारण नसते किंवा तशी शक्यताही नसते. पण कथानक रोचक होत जाईल, तसेच पुढे सरकत असते. सध्या ज्याप्रकारे मोदी विरोधकांच्या भानगडी चव्हाट्यावर येत आहेत, त्यांची पटकथा म्हणूनच आधीच कोणी लिहून ठेवलेली आहे काय, अशी शंका येते. तशा वेगाने कथानकात घडामोडी घडत आहेत. यातला कथालेखक व संवादलेखकांचा प्रभाव किती व अभिनय करणार्‍यांचे श्रेय किती; या्चाही बारकाईने उहापोह करण्याची म्हणूनच गरज आहे. पण तसे कुठेही घडताना दिसत नाही. जवळपास एकतर्फ़ी नाट्य रंगत चालले आहे. मोदीविरोधी नेते वा पक्षही त्यात नकळत सहभागी होताना दिसत आहेत. पण या भानगडी अकस्मात माध्यमांना कुठून मिळू लागल्या, त्याचा शोध कोणीच घेतलेला दिसत नाही.

ज्या दिवशी अर्णबचा रिपब्लिक चॅनेल सुरू झाला, त्याच दिवशी अकस्मात आम आदमी पक्षाचा माजी मंत्री कपील मिश्रा याने आपले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उघडे पाडण्याचा निर्धार घोषित केला. तिथून ही मालिका सुरू झाली. त्यानंतर एकामागून एक भानगडींचे भाग विविध वाहिन्या सादर करू लागल्या. त्यांना हवी असलेली कागदपत्रे इतक्या झटपट मिळतात, ही मजेशीर गोष्ट नाही काय? नॅशनल हेराल्ड नावाच्या बंद पडलेल्या वर्तमानपत्राच्या खरेदीविक्रीशी संबंधित कागदपत्रे मिळावी, म्हणून भाजपाचे नेते डॉ, सुब्रमण्यम स्वामी यांना काही वर्षे रखडावे लागलेले होते. त्यांनी २०१२ सालात त्यासंबंधी कोर्टात तक्रार दाखल केलेली होती. मात्र त्यात आवश्यक असलेली कागदपत्रे युपीए सरकारने त्यांना तीन वर्षे मिळूच दिली नाहीत. मग देशात सत्तांतर झाले आणि तरीही इतक्या वेगाने स्वामींना ते दस्तावेज मिळू शकले नव्हते. काही महिने उलटले आणि मोदी सरकारने ती कागदपत्रे स्वामींना दिली. त्यानंतरच त्यांना सोनिया व राहुल गांधी यांच्या विरोधातील न्यायालयीन लढाईत पुढले पाऊल टाकता आलेले होते. त्यानंतर त्या दोघांना कोर्टाने समन्स काढले आणि आता कुर्मगतीने खटला पुढे सरकतो आहे. स्वामींसारख्या दिग्गजाला ही कागदपत्रे सहजगत्या मिळू शकली नाहीत. तशीच महत्वाची कागदपत्रे अन्य कुठल्याही वाहिन्या व पत्रकारांना अकस्मात तात्काळ कशी मिळू शकतात? केजरीवालचे भानगडखोर साडू वा लालूंच्या मुलामुलींच्या मालमत्ता खरेदीचे द्स्तावेज, विविध वाहिन्यांनी दाखवले. त्यातून कोट्यवधीच्या अफ़रातफ़रीचा पर्दाफ़ाश केलेला आहे. त्यासाठी त्यांना दस्तावेज इतक्या सहजपणे कोणी दिले? ते मिळाल्यावर त्याची संगतवार मांडणी करून त्यांनी आपापल्या गौप्यस्फ़ोटाच्या बातम्या अल्पावधीत कशा रंगवून काढल्या? हा सगळा प्रकार नवलाईचा नाही काय?

यातल्या अनेक पत्रकारांचा अनुभव किंवा अभ्यास संशयास्पद आहे. त्यांना अशा गुंतागुंतीच्या प्रकरणाचे आकलन होऊन, त्यांनी त्या त्या भानगडीची प्रेक्षकांसाठी सोपी संगतवार मांडणी करणे, इतके सहजशक्य आहे काय? की सेटवर आलेल्या अनिनेता अभिनेत्रीप्रमाणे हाती पडलेली पटकथा घेऊन, त्यांनी सादरीकरणाचा सपाटा लावला आहे? ज्या भानगडी आयकर, गुप्तचर वा सीबीआय अशा संस्थांना कित्येक दिवस उलगडत बसाव्या लागतात. त्याचा एका तासात खुलासा करण्याची क्षमता भारतीय पत्रकारांनी कुठून अवगत केलेली आहे? त्यांना कोणीतरी तयार पटकथा व संवाद दिले आणि मगच ही सोपऑपेराची टिव्हीमालिका सुरू झालेली असावी काय? गेल्या तीन वर्षात नरेंद्र मोदी सरकारने कोणते अच्छे दिन आणले, असा सवाल सातत्याने विचारला गेला आहे. या आठवड्यात त्या मोदी सरकारचा तिसरा वर्धापनदिन जोरात साजरा करण्याची तयारी चालली होती. नेमक्या त्याच कालखंडात विरोधकांचे ‘बुरे दिन’ यावेत; याला योगायोग मानता येणार नाही. मोदी सरकारचे यश व कौतुक सुरू होण्याच्याच मुहूर्तावर विरोधकांच्या भानगडी चव्हाट्यावर येण्यामागे म्हणूनच काही योजना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात लालू, चिदंबरम वा केजरीवाल यांच्यासह अनेकांनी त्याला षडयंत्र संबोधले तर नवल नाही. पण त्यालाच तर राजकारण म्हणतात. आपले अच्छे दिन म्हणजे आपल्या विरोधकांचे बुरे दिन असतात ना? विरोधकांच चेहरा जितका काळवंडलेला असतो, तितका आपला चेहरा अधिक उजळलेला दिसणार ना? म्हणून तोच मुहूर्त साधून भारतीय वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर ही नवी टिव्हीमालिका सादर होत आहे काय? तसे नसते तर इतक्या वेगाने व इतक्या घाऊक प्रमाणात मोदी विरोधकांच्या अब्रुची लक्तरे उपग्रह वाहिन्यांच्या वेशीवर टांगली गेली नसती. कुछ तो गोलमाल है भाई!

4 comments:

  1. टाइम्स नऊ ग्रुप च्या मालकाने म्हणजे बेनेट कोलमन आणि कंपनीचा मालक विनीत जैन याने अर्णब गोस्वामीवर मुंबई कोर्टात फौजदारी खटला घातला आहे....कारण अर्णब आणि रिपब्लिकची आताची वार्ताहर श्रीदेवी या दोघांनी ते टाइम्स नाऊच्या सेवेत असताना जी छुपी रेकॉर्डिंग केली होती ( मग ती सुनंदा पुष्कर केस असो कि लालूप्रसादशी संबंधित असो )........ती रेकॉर्डिंग टाइम्स नाऊच्या व्यवस्थापनाला अंधारात ठेऊन केल्याचा आरोप आहे. )

    ReplyDelete
  2. भाऊ सुंदर प्रश्नांकीत लेख...आपण विचारलेले प्रश्न अत्यंत रास्त आहेत.. आपल्या विचार शक्तीला लाख लाख सलाम.
    शोध पत्रकारीतेला पुर्रजन्म मिळाला आहे का या शोध पत्रकारांना मिळणारा रसदि झरा जाऊ तिथे सारे मिळुन खाऊ सत्ता गेल्या मुळे आटला आहे हे सामान्य माणसाच्या विचार शक्ती पलिकडेले आहे.
    इतके 2G 3G कोल लाखो कोटीची लुट करणारे घोटाळे बाहेर न काढु देणारी/शकणारी शोध पत्रकारीतेला नोट बंदी व काही राजकीय पक्षांच्या जनतेने केलेल्या व्होट बंदी चा हा परिणाम आहे हे जाणुन घेणे आवश्यक आहे. हे आता बाहेर (हे त्याना आधीच माहिती होते) काढल्या मुळे हेच शोध पत्रकार आता पोपटपंची करत आहेत का ही 2011-12 च्या प्रमाणे 2019 ठिक 2 वर्षे आण्णा आंदोलना प्रमाणे चालवलेली जनतेची, पिडितांची व भाजप सरकारची वाफ बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

    तसेच मिडिया चा बोलवता धनी कोण आहे हे पण शोध पत्रकारीतेचा विषय आहे पंरतु हे मिडियावाले माफीचे साक्षीदार होऊन. भाजपच्या ऐन निवडणूकीच्या आधी अशी प्रकरणे बाहेर काढण्याच्या योजनेला सुरुंग लावत आहेत काय हे सुत्रधार च जाणोत.
    अशा षडयंत्र की पत्रकारीते बद्दल व त्यामागील भाऊ आपण म्हणतात त्याप्रमाणे दिग्दर्शक/सुत्रधार बद्दल मला नेहमीच गुढ वाटत आले आहे.

    ईंदीरा व संजय गांधी यांनी चालवलेल्या नसबंदी मोहीमे विरोधी बिबिसी व तमाम मिडिया ने चलवलेला अजेंडा बद्दल माझ्या त्यावेळच्या बाल मनाला कुतुहल वाटत होते तर राजीव गांधी पंतप्रधान झाल्या नंतर (1985) अमेरिका दऔरया (tour) गेले असताना अचानक एवढ्या बलाढ्य देशाने राजीव गांधी ना रशीया ला स्पेशल मेसेज घेऊन पाठवल्याचे कोतुक वाटायच्या ऐवजी अपप्रुपच त्यावेळच्या किशोर मनाला वाटले होते... व अशा अनेक घटना मागील सुत्रधार कोण आहे हे गुढच आहे.
    याचा पर्दाफार्श कधी होईल का? व त्यासाठी माफीचे साक्षीदार करण्यात भारतीय इंटलिजंस अशा सुत्रधारांना भागपाडतो काय? व सरकार खंबीर धोरण व पाठींबा देते काय? हे येत्या काळात पहाणे रोमांचकारक राहिल.

    मिडियाने गेली कित्येक वर्षे विरोधी पक्षाला, मोदीना व भाजपला कोंडीत पकडण्याचा एकही मोका सोडला नाही व काँग्रेस सत्तेवर असताना विरोधी पक्षांना विचारतात तुम्ही काय केलंत? हे सर्व जनतेची दिशाभूल करण्यासाठी केले.. त्यात आर्णब गोस्वामी पण तीतकाच आघाडी वर होता. तो भाजपचे विरोधक चर्चेत घेऊन त्याना एकाच वेळी हल्ला करायचा. व त्याची एवढी शोध पत्रकारीता घोटाळे बाहेर काढु शकली नाही. कॅग ला त्यसाठी ताशेरे ओढायला लागले. मग येडुरप्पा ला पुढे हेच च्यानलाधीश करत होते व भ्रष्टाचाराला लपवीत प्रोटेक्शन देत होते.. जेणेकरून सर्व पक्ष सारखेच हाच मेसेज जनतेला देत होते.
    असो अशा कसोटीच्या क्षणी मोदी विकास, महागाई (सुशासन करुन सुद्धा एका कांद्याच्या भावा मुळे भाजपने दिल्ली गमावली हे पण भाजपला लक्षात ठेवणे आवश्यक आहे) रोजगार, 370 कलम, काळा पैसा, समान नागरिक कायदा हे पुढील 2 वर्षात कसे पार पाडतात हे पण मोठे आवाहन आहे मोदी पुढे व भारतीय मतदारां पुढे.
    Aks

    ReplyDelete
  3. Bhauji...
    Faarach marmikpane v vicharapravrut karanare lekhan vachun santosk vaatale.
    thnxs.

    ReplyDelete