Wednesday, May 31, 2017

बुडत्याचा पाय खोलात



गेल्या तीन वर्षात सातत्याने बेताल बोलून कॉग्रेसला आणखी खड्ड्यात ढकलणार्‍या राहुल गांधी यांनी केरळातील आपल्याच काही युवक कार्यकत्यांना मात्र पक्षातून हाकलले आहे. कारण मोदी सरकारने देशात गोवंशाची बेकायदा कत्तल करण्यावर निर्बंध लागू केले आणि तात्काळ या कार्यकर्त्यांनी एका वासराची कत्तल करून त्याचे मांस शिजवण्याचा मोठा तमाशा सादर केला. सहाजिकच कॉग्रेसच्या अंगाशी हे प्रकरण आले. केंद्राच्या त्या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका केरळातील डाव्यांच्या सरकारने घेतलेली आहे. त्यासाठी तात्काळ मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राने लागू केलेला असा निर्णय राज्यांना नाकारून चालत नाही. कारण ज्या कायद्यान्वये असा आदेश जारी करण्यात आला आहे, तो विषय व कायदा केंद्राच्या अखत्यारीतला असून त्याचे पालन प्रत्येक राज्य सरकारवर बंधनकारक आहे. वास्तवात हा कायदा नव्याने सत्तेत आलेल्या मोदी सरकारने बनवलेला नाही. कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या जन्मापुर्वी त्यांचे पणजोबा पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांनीच १९६० सालात संसदेत हा कायदा संमत करून घेतलेला आहे. त्यातील अनेक तरतुदी व कलमांकडे सरसकट दुर्लक्ष चालले होते. म्हणूनच केंद्राला त्याविषयी खास आदेश जारी करावा लागला आहे. परिणामी त्यालाच आव्हान देत कायदा मोडणार्‍या युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांना हाकलून लावायची नामुष्की राहुल गांधी यांच्यावर आलेली आहे. पण त्या युवकांनी जी कृती केली, त्यामागची प्रेरणा कोणाची आहे, त्याकडेही बघणे आवश्यक आहे. पक्षाचे नेतृत्व राहुलनी हाती घेतल्यापासून इतक्या मर्कटलिला केल्या आहेत, की त्यांच्या अनुयायांना सरकारच्या प्रत्येक निर्णयाला दुसर्‍या टोकाला जाऊन विरोध करण्यातच पुरूषार्थ भासू लागला तर नवल नाही.

काही महिन्यांपुर्वी दिल्लीत जंतरमंतर येथे माजी सैनिक निवृत्तीवेतनाची मागणी घेऊन बसलेले होते. तिथे अकस्मात राहुल गांधी जाऊन पोहोचले. त्यांना पाठींबा देऊन माघारी परतल्यावर राहुल तो विषय विसरून गेले. सर्जिकल स्ट्राईकवर त्यांनी शंका घेतली आणि मोदी ‘खुन की दलाली’ करत असल्याचा आरोप केला. पुढल्या काळात राहुलना त्याही विषया़चे विस्मरण झाले. नोटाबंदीची घोषणा झाल्यावर मोदींना चुकीचे ठरवण्यासाठी राहुल आयुष्यात प्रथमच बॅन्केच्या दारात जाऊन रांगेत उभे राहिले. पण नोटाबंदी संपल्यावर तिच्या परिणामांचा जाब विचारण्याचे राहुलच्या स्मरणातही राहिले नाही. जेव्हा जो विषय चालू असेल व कुठे गर्दी जमली असेल, तिथे धावायचे आणि नंतर तिकडे ढुंकूनही बघायचे नाही, अशी राहुलनिती आकाराला आलेली आहे. मग त्यांच्यापासून प्रेरणा घेणार्‍या पक्षाच्या युवकांनी काय करायचे? मोदी सरकारने कुठलाही निर्णय घेतला, तर त्याच्या विरोधात असेल तितकी कृती करायची, यालाच राहुलचे अनुकरण समजले जाणार ना? त्या केरळच्या कॉग्रेस युवकांनी नेमके तेच केले आहे. मोदी सरकार गायीच्या हत्येला विरोध करणार असेल, तर आपण कॉग्रेस पक्ष म्हणून मिळेल तिथे गायीची कत्तल करायची; असे त्या मुलांना वाटल्यास नवल कुठले? आपण असा आगावूपणा केल्यावर पक्षाकडून आपली पाठ थोपटली जाईल, अशी त्यांची अपेक्षा असल्यासही गैर काहीच नाही. पण राहुलना त्यांनी ओळखलेले नाही. अन्यथा त्यांच्याकडून असा मुर्खपणा झालाच नसता. हेच कृत्य राहूलनी करण्यापर्यंत त्यांनी थोडी कळ काढायला हवी होती. राहुलनी गाय कापल्यावर त्या तरूणांनी वासरू कापले असते, तर त्यांची पाठ थोपटली गेली असती. पण त्या तरूणांनी घाई केली आणि देशव्यापी त्यावर संतप्त प्रतिक्रीया आल्या. म्हणून राहुलना त्या अनुयायांचा बळी द्यावा लागला आहे. त्याच अनुभवातून चार वर्षापुर्वी जयंती नटराजन गेलेल्या होत्या.

ओडिशामध्ये एका आदिवासी मेळाव्याला राहुल गांधी गेलेले होते. तिथे एक मोठा पोलाद प्रकल्प उभा रहायचा होता. त्याला काही संस्थांनी विरोध केला होता आणि त्याच संस्थांच्या पुढाकाराने हा आदिवासी मेळावा भरवण्यात आलेला होता. तर तिथल्या आदिवासींना प्रकल्प नको असल्यास त्याला थोपवले जाईल, असे आश्वासन देऊन राहुल दिल्लीला परतले. त्यांनी तशी सुचना पर्यावरण खाते संभाळणार्‍या मंत्री जयंती नटराजन यांना दिली आणि तात्काळ त्या पोलाद प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. राहुलचे संबंधित संस्थांनी आभार मानले. पण त्यामुळे देशातील उद्योग संस्थांमध्ये नाराजी पसरली. वर्षभराने लोकसभा निवडणूकीचे वेध लागले आणि राहुलना उद्योगपतींच्या संस्थेमध्ये भाषण करायचे होते. तर तिथल्या पदाधिकार्‍यांनी त्याला साफ़ नकार दिला. कारण तोच ओडीशातील प्रकल्प होता. राहुल व सोनिया यांचे सरकार उद्योगविरोधी असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. तेव्हा उद्योग जगताला खुश करण्यासाठी जयंती नटराजन यांचा बळी देण्यात आला होता. एका दिवशी पंतप्रधान मनमोहन यांनी नटराजन यांना बोलावले आणि त्यांचा राजिनामा घेतला. त्यांना पक्षात मोठे पद दिले जाईल अशी हुल देण्यात आली. पण दोन दिवसातच राहुलचे भाषण ऐकल्यावर नटराजन यांना आपला बळी गेल्याचे लक्षात आले. युपीएतील काही मंत्री उद्योगाला अडथळा झालेले आहेत. त्यांना बाजूला केलेले आहे, अशी ग्वाही उद्योगपतींच्या बैठकीत राहुलनी दिली आणि नटराजन यांच्या डोक्यात प्रकाश पडला. पण मुळातच त्यांनी उद्योग बंद पाडला नव्हता, की पर्यावरणाचे कारण दाखवून रोखला नव्हता. तसे करण्यास त्यांना राहुलनेच भाग पाडले होते. मात्र प्रतिक्रीया उलटी आल्यावर त्याच जयंती नटराजन यांचा परस्पर बळी घेतला होता. आताही केरळच्या त्या तरूणांचा तसाच बळी गेलेला नसेल काय?

अशा तरूणांना कायदा मोडायची सुरसुरी आली, असे कोणी म्हणू शकत नाही. आपला नेता सतत मोदींच्या विरोधात काहीही करीत असेल, तर त्यांनाही पक्षाचा तोच कार्यक्रम वाटू लागतो आणि त्यांनी तशाच मर्कटलिला केल्या तर त्यामागची प्रेरणा राहुलच नसतात काय? राहुल गांधींच्या कारकिर्दीत तर्क, कायदा, सभ्यता वा बुद्धी यांना कॉग्रेसने तिलांजली दिलेली आहे. सहाजिकच अशा नेत्याची मर्जी संपादन करणार्‍याला मर्कटलिला करण्याखेरीज अन्य पर्याय उरत नाही. पण त्यामुळेच सतत कॉग्रेसचा जनाधार कमीकमी होत गेला आहे. जिथे म्हणून राहुल गांधी प्रचाराला जातील वा कार्यक्रम करतील, तिथे पक्षाच्या मतांमध्ये घसरण होते. केरळातील त्या युवकांची कृती तशीच देशव्यापी कॉग्रेसी मते कमी करणारी ठरली आहे. कुणाला तरी पक्षात त्याचे भान आले असावे. म्हणून मग घाईगर्दीने तरूण कार्यकर्त्यांची राहुलनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर निंदा केली व त्यांची पक्षातून हाकालपट्टी केली. कॉग्रेसला असा गोवध मान्य नसल्याचा डंका राहुलनाच पिटण्याची नामुष्की आली. पण त्याचे कारण कधी शोधले जाणार नाही. कारण आत्मपरिक्षणाला कॉग्रेसमध्ये आता स्थान उरलेले नाही. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तशी कॉग्रेसची दुर्दशा होत चालली आहे. मुस्लिमांची मते मिळवण्याच्या हव्यासात हिंदूंची मते गेली होती आणि मुस्लिमांचीही मते मिळेनाशी झाली आहेत. अशाही स्थितीत जी काही मुठभर हिंदू मते कॉग्रेसला अजूनही मिळत आहेत, त्यांनाही पिटाळून लावण्याचे पाप केरळात झाले आहे. विषय गोमांस वा गोवधाचा नसून लोकभावनेचा आहे. सरकारी भूमिकेला विरोध करताना मतदारही शत्रूपक्ष असल्यासारखा कोणी वागू लागला, तर त्याला ब्रह्मदेवही वा़चवू हकत नसतो. कॉग्रेसची आज तशीच काहीशी अवस्था झाली आहे. गाळात फ़सलेले जनावर जितका जोर लावून बाहेर पडायला धडपडते, तितके त्याचे पाय अधिकच खोलात जातात ना?

1 comment:

  1. मुस्लिमाचा ट्रिपल तलाक कांग्रेसला आस्थेचा विषय वाटतो तर गाईच्या वासराला सारेआम मारुन हिंदुच्या भावनेची क्रुर थट्टा केली जाते. काडतुसाला लावलेल्या गाईच्या चरबीमुळे १८५७ च्या उठावाची सुरूवात झाली होती एवढे जरी काँग्रेस ने लक्षात ठेवले तरि पुरे झाले. काँग्रेसनेच दाखवून दिले कि हिंदुना आता bjp शिवाय पर्याय नाहि . गाय वासरु हे ऐकेकाळी पक्ष चिन्ह होते हे सुध्दा काँग्रेस विसरली.

    ReplyDelete