Saturday, August 12, 2017

मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम

Image result for ram lalla

अयोध्येचा श्रीराम हा मर्यादा पुरूषोत्तम म्हणून जगभर ओळखला जातो. त्याचे नाव घेऊन राजकारणात वावरणार्‍यांनी निदान त्याचे थोडे अनुकरण करावे, अशी अपेक्षा कोणीही बाळगणार यात शंका नाही. रामायणात श्रीरामाचे अनेक किस्से वा कथा आलेल्या आहेत. त्यातील एक कथा वनवासातून माघारी अयोध्येला परतलेल्या श्रीरामाची आहे. पुन्हा त्याने अयोध्येचा कारभार हाती घेतल्यावरची ही कथा आहे. कोणा एका शंकेखोर धोब्याने रामाची पत्नी सीतेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावले, तेव्हा आपले पावित्र्य सिद्ध करण्याची जबाबदारी श्रीरामाने पत्नीवर टाकलेली होती. दिर्घकाळ रावणाच्या कब्जात असलेली सीता पवित्र कशी, असा त्या धोब्याचा सवाल होता आणि त्याने कुठलाही सज्जड पुरावा दिला नाही. नुसता संशय व्यक्त केला होता. तरी कर्तव्यकठोर श्रीरामाने आपल्या लाडक्या प्रिय पत्नीला पुरावा देता येत नाही म्हणून बाजुला केलेले होते. अशा श्रीरामाला पुजणार्‍यांनी व त्याचे कौतुक सांगणार्‍यांनी निदान आपल्या आयुष्यात कुठले आरोप झाल्यावर पुरावे मागण्यापेक्षा पुरावे देण्याची हिंमत दाखवली पाहिजे. भाजपा सतत अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभारण्याची गोष्ट सांगत असतो, त्यातले राजकारण बाजूला ठेवून फ़क्त अयोध्येतील रामाचे अनुकरण करायला काय अडचण आहे? तो श्रीराम खरेच भाजपाला इतका प्रिय व अनुकरणीय वाटला असता, तर चंडीगडच्या घटनेमध्ये कोणा भाजपा नेत्याने उनाड पोराचे समर्थन केले नसते. वार्णिका नावाच्या तरूणीने ज्याच्यावर अपहरण वा विनयभंगाचा आरोप ठेवलेला आहे, त्याचे पुरावे मागितले नसते. किंवा पोलिस योग्य कारवाई करतील असे म्हणत त्या कारट्याला पाठीशी घातले नसते. पण विकास बारला नावाच्या त्या टपोरी पोराच्या बचावासाठी त्याचा पिता पुढे सरसावला आहे आणि भाजपाच्या कुणा वरीष्ठ नेत्याने अजूनही अशा पित्याला खडे बोल ऐकवण्याची हिंमत केलेली नाही.

कायद्याचे राज्य व कायद्यानुसार कारवाई हे शब्द कुठलाही सत्ताधीश नेहमीच वापरत असतो. जिथे संघ कार्यकर्त्यांची हत्या होते, म्हणून भाजपाची तक्रार आहे; तिथले मार्क्सवादी मुख्यमंत्री पिनयारी विजयन यांनीही केरळातील हत्याकांडाच्या बाबतीत कायदा आपले काम करील असेच म्हटलेले आहे. मग त्यांच्यात आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यात कुठला फ़रक राहिला? विजयन हे रामभक्त नाहीत, की आपल्या कुठल्या बोलण्यात कधी श्रीरामाचा हवाला देत नाहीत. भाजपाचे नेते व खट्टरही नेहमी रामाचे दाखले देत असतात. म्हणूनच त्यांनी मार्क्सवादी नेत्याचे अनुकरण करण्यापेक्षा रामाचे अनुकरण करायला हवे. रामभक्त केवळ मंदिर उभारून होता येत नाही. त्या मर्यादा पुरूषोत्तमाने आपल्या वर्तन व कृतीतून काही आदर्श निर्माण करून ठेवलेले आहेत. त्यामुळेच भाजपाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला वा नेत्याला रामाचा आदर्श पाळता आलाच पाहिजे. तसे असते तर या विकास बारला नावाच्या दिवट्याला वाचवायला त्याचा पिता पुढे सरसावला नसता. उलट पोलिसांनी असे कृत्य करताना आपल्या पोराला पकडल्याचे लक्षात येताच, त्या पित्याने फ़ोन करून अधिकाधिक कठोर कारवाई करण्याचा सल्ला पोलिसांना दिला असता. दुर्दैवाने बारलाचा पिता उचापतीला संरक्षण द्यायला पुढे आला. ही भाजपासाठी खरेच शरमेची गोष्ट आहे. किंबहूना बेटी बचावची घोषणा देणार्‍या पंतप्रधानांना अडचणीत टाकून देणारी कृती आहे. पंतप्रधान मोदींनी याविषयी पाळलेले मौन म्हणूनच खटकणारे आहे. निदान त्यांच्यासारख्यांना तरी असे लोक पक्षाला प्रतिष्ठीत करत नसतात, याचा अनुभव आलेला आहे. नुसती कठोर कारवाई नव्हेतर पक्षाशी संबंधित असूनही आपण बेटी बचाव भूमिकेचे सार्थ पाठीराखे असल्याचे दाखवण्याची ही उत्तम संधी असते. पण अजून तसे काही घडलेले दिसले नाही.

पंतप्रधान होण्यापुर्वी एका मुलाखतीत मोदींनी सांगितलेला एक किस्सा आठवतो. गुजरातचे मुख्यमंत्री असताना कुठल्या तरी महानगरात रस्त्याची कोंडी करणारे अतिक्रमण हटवण्याचा विषय होता. तर त्यांनी त्यावर आदेश जारी केलेला होता. तो कळल्यावर भाजपाचेच काही कार्यकर्ते त्यांना येऊन भेटले होते. ती दुकाने व टपर्‍या तोडल्यास तिथले नागरिक व दुकानदार नाराज होतील. म्हणून आदेश मागे घेण्याची विनंती त्यांनी मोदींना केली होती. कारण लौकरच महापालिका निवडणूका व्हायच्या होत्या आणि त्यात पक्षाला फ़टका बसेल, असे कार्यकर्त्यांचे मत होते. पण निघालेला आदेश मागे घेण्यास मोदींनी नकार दिला. पुढे ती कारवाई यशस्वी झाली आणि नंतरच्या निवडणूकीत तिथून भाजपाचे दोन नगरसेवक अधिकचे निवडून आले. तो किस्सा कथन करताना मोदींनी असे मत व्यक्त केले होते, की कुठल्याही अवैध कृतीचे समर्थन करायला आलेले कार्यकर्ते आपले नसतात, की पक्षाचे हितचिंतक नसतात. त्यांच्या अशा बेकायदा वर्तनाने पक्ष बदनाम होतो व लोकांच्या मनातून उतरतो. हा धडा मी या अनुभवातून शिकलो असे मोदींनी कथन केलेले होते. तो खरा असेल तर आता चंडीगडमध्ये आपल्या पुत्राला गुन्ह्यातून वाचवायला बघणारा भाजपा नेता बारला पक्षालाच बुडवतो आहे. असा पिता वा नेता भाजपाचे भले करू शकत नाही. हे आपल्या समर्थकांना मोदी कशी शिकवणार आहेत? कारण या पिता व नेत्याने मोदींच्याच बेटी बचाव घोषणेला हरताळ फ़ासलेला आहे. ही एक बाजू झाली. पण अशा नेत्यांना व पित्यांना उद्देशूनही मोदींनी मागल्या वर्षी एक उपदेश केलेला होता. दुर्दैवाने आज त्यांचे अनेक नेतेच त्याला छेद देणारी विधाने करीत आहेत. भाजपाच्या हरयाणातील दुसर्‍या नेत्याने अवेळी ही वार्णिका नावाची मुलगी घराबाहेर काय करीत होती, असा प्रश्न विचारला आहे.

मातापित्यांनी आपल्या मुलीला सुरक्षित वावरण्याचे सल्ले देण्यापेक्षा आपल्या सुपुत्रांनाच जगात सभ्यपणे वागायला शिकवावे; असा सल्ला पंतप्रधानांनी बेटी बचावची घोषणा करताना दिलेला होता. तो अशा भाजपा नेत्यांनी ऐकलेलाच नाही काय? ऐकला असता तर हा दुसरा कोणी भाजपा नेता वार्णिका उशिरा घराबाहेर काय करत होती, असा सवाल करूच शकला नसता. पण त्याने असा सवाल केलेला आहे. केंद्र सरकारमधील एक मंत्री व बंगाली भाजपाचे नेता बाबुल सुप्रियो यांनीही अशीच मुक्ताफ़ळे उधळल्याचे ऐकायला मिळते. उठसुट पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचे हवाले देणारे कधी मोदींचे भाषण मन लावून ऐकतात काय? असतील तर त्यांना असली मुक्ताफ़ळे उधळण्याची हिंमत झाली नसती. मुलींनी कसे वागावे हा सवाल नसून सभ्य समाजातील कुठल्याही पुरूषाने जनावरासारखे वागू नये, ह्याला महत्व आहे. पंतप्रधान त्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना साथ देणार नसतील, तर त्याची किंमत उद्या भाजपाला व पंतप्रधानांनाही मोजावी लागेल. श्रीराम हे नुसते एका देवाचे नाव नसून तो एक आदर्श आहे. राजकारणात त्यामुळे मते मिळत असतील, तर त्यासोबत एक जबाबदारी येत असते. त्याच जबाबदारीचे पालन करता आले नाही, तर करोडो लोकांच्या मनात वसलेला श्रीराम धडा देऊ शकतो. विषय ह्या एका मुलीचा नसून लक्षावधी मुलींच्या सुरक्षेचा सवाल आहे. आज ही सुशिक्षित धाडसी मुलगी उठून पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे आणि नेटाने अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे. पण ज्यांच्यात तितकी हिंमत नाही किंवा ज्यांचे पालक अशा बाबतीत साथ द्यायला उभे रहात नाहीत, त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. कारण अशा घटनांना राजकीय आश्रय मिळाला, मग तळागाळातल्या किंवा सामान्य घरातल्या मुलींवर हात टाकण्यालाच राजाश्रय मिळणार असतो.

विषय एका मुलीचा वा तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा नसतो. देशात व समाजात आपल्याच मुली महिला किती सुरक्षित आहेत, त्याचा इथे संबंध येतो. प्रतिष्ठीत लोकांनी आदर्श निर्माण करायचे असतात. एका नेत्याचा मुलगा असे अधम कृत्य करीत असेल वा त्याचा राजकीय पिता त्याच्या सुरक्षेला धावणार असेल, तर गरीब मुलींनी कोणता धडा घ्यायचा? असे लहानमोठे नेते व त्यांच्या सोकावलेल्या भुरट्या पोरांनी काय समजावे? आपल्याला कुठल्याही महिलेवर हात टाकायचा अधिकार मिळाला आहे, अशीच त्यांची समजूत होणार ना? कायद्यानुसार सर्व काही व्हायचे असते आणि तशी पित्याला खात्री असती, तर त्याने पुत्राच्या बचावासाठी कशाला धाव घेतली असती? धोब्याचे तोंड बंद करायला रामाने आपला राजकीय अधिकार वापरला नाही. आपल्या पत्नीला अग्नीदिव्य पार पाडायला लावले होते. भाजपाच्या या नेत्यानेही आपल्या पुत्राला तसेच शब्द ऐकवले असते, तर मतदारांचा विश्वास अधिक मिळवता आला असता. पण ती संधी आता भाजपाने गमावलेली आहे. या पोराला अटक करण्यात झालेला विलंब आणि पुरावे गोळा करण्यातली दिरंगाई किती महागातली गोष्ट आहे, त्याची किंमत पुढल्या मतदानाच्या वेळी लक्षात येऊ शकेल. मोदी यांना लोकांनी अशा गोष्टी व अराजक संपावे म्हणून सत्तेवर बसवलेले आहे. त्याचे भान त्यांच्याच पक्षाला राहिलेले नसेल, तरी किंमत मोदींनाच मोजावी लागेल यात शंका नाही. म्हणून म्हटले श्रीरामाचे नाव घेऊन भागत नाही. त्याचे अनुकरण करणे भाग असते. तेच लोकशाहीतल्या कुठल्याही पक्षासाठी अग्नीदिव्य असते. सामान्य लोक अशा विषयावर सवाल करीत नसतात. सहनशीलता संपली, मग निकाल लावून टाकत असतात. हे पुत्रप्रेमाने आंधळा झालेला स्थानिक नेता समजू शकला नसेल. तर त्याचे कान उपटण्याचे धाडस वरीष्ठ नेत्यांना दाखवता आले पाहिजे.

3 comments:

  1. एकदम बरोबार

    ReplyDelete
  2. Bhau another side to bring to your notice

    http://www.beingcynical.com/2017/08/chandigarh-stalking-plot-within.html

    ReplyDelete