Sunday, June 10, 2018

फ़ॉर्म्युला १४४

मातोश्री भेटीत अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात काय शिजले, त्याविषयी अजून तरी कुठली अधिकृत बातमी समोर आलेली नाही. कारण त्या बैठकीपासून दोन्ही पक्षांनी आपापले वाचाळवीर दुर ठेवले होते. त्यामुळे कुठल्याही मार्गाने आतल्या गोष्टी बाहेर येण्याची शक्यता संपलेली होती. सहाजिकच या बैठकीतल्या चर्चा वा मुद्दे याविषयी काही सत्य बाहेर यायचे असेल, तर ते चारच लोकांकडून येऊ शकते. त्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे, तसाच मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. पण त्यांनी त्याविषयी कुठलेही भाष्य वा विधान केलेले नाही. दोन दिवसांनी एक बातमी आतल्या गोटातली म्हणून समोर आलेली आहे. ती लोकसभा विधानसभा जागावाटपाची. त्यात ज्या कारणास्तव युती फ़ुटली वा मोडली, तोच मुद्दा कायम आहे. म्हणजे १९८८ सालात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुंडे-महाजन यांच्यात झालेला करार, आजही मानायला शिवसेना तयार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. बातमीचा सूर बघता, ती बातमी सेनेच्या गोटातून आलेली दिसते. लोकसभेत भाजपा मोठा भाऊ आणि विधानसभेत शिवसेना मोठा भाऊ, हाच तीस वर्षापुर्वी दोन पक्षात झालेला अलिखीत करार होता आणि त्याचे कुठल्याही वादाशिवाय पालन होत राहिले. मागल्या लोकसभेपर्यंत त्यात कुठला व्यत्यय आला नाही आणि विधानसभेच्या जागांवरून वाद होऊन भाजपाने युती मोडली होती. तेव्हा जुनी परिस्थिती बदलल्याचा दावा भाजपाने केला होता. आता आपणच सर्वकाळ मोठा भाऊ असल्याचे सांगून सेनेला एकाकी सोडून दिलेले होते. त्यातून सावरत सेनेने एकाकी झुंज देत आपली शक्ती दाखवली. त्यानंतर सत्तेत सहभागी होऊनही सेनेने अजून जुना करार पाळण्याची तयारी दाखवावी, याला मोठेपणा नक्कीच म्हणावे लागेल.

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच राष्ट्रीय महत्वाकांक्षा बाळगल्या नाहीत. आपण प्रादेशिक पक्ष असल्याचे स्विकारून त्यांनी भाजपाला राष्ट्रीय राजकारणात हिंदूत्वाचा मुद्दा मान्य करून निर्भेळ पाठींबा दिलेला होता. पण त्यांच्या निधनानंतर सेनेला तितका सन्मान देण्यात भाजपाने चालढकल केली आणि युतीचा पाया ठिसूळ होत गेला. आदित्य ठाकरे यांनी मागल्या विधानसभेपुर्वी मिशन १५१ असा नारा दिला आणि त्याला शह देण्याच्या नादात भाजपा सेनेला १५०हून अधिक जागा देण्यविषयी अडून बसला. तिथून विचका सुरू झाला होता. राष्ट्रीय पक्षाने राज्यातील महत्वाकांक्षेला वेसण घालून आपले राजकीय हित बघायला हवे, याचे भाजपाच्या राज्यनेत्यांना भान राहिले नाही. आज त्याची किंमत किती त्याचा अंदाज येऊ लागला आहे. तेव्हा फ़िकीर नव्हती. पण चार वर्षांनी विविध विरोधी पक्ष एकवटू लागल्यावर भाजपाला जुने मित्र महत्वाचे वाटू लागले आहेत. कारण आता राज्यातील सत्ता व मंत्रीपदापेक्षा केंद्रातील बहूमताला धोका निर्माण झाला आहे. अनेक पोटनिवडणूकात फ़टका बसला आणि आगामी लोकसभा सोपी नसल्याचे लक्षात आले आहे. विरोधी एकजुट झाली तर कित्येक काठावर जिंकलेल्या जागा गमावणे भाग आहे आणि तसे झाले तर आघाडी म्हणून लहानसहान पक्षांच्या मेहरबानीवर केंद्रातील सत्ता टिकवावी लागेल. हा धोका आता लक्षात आला आहे. ते स्वाभाविक आहे. जेव्हा आपण मित्रांमध्येच शत्रू शोधू लागतो, तेव्हा शत्रुंची गरज नसते. भाजपाचे तेच झाले आहे. चंद्राबाबू एनडीए सोडून विरोधी गोटात दाखल झाले आहेत आणि विरोधी पक्ष एकास एक लढत देण्याची भाषा बोलू लागले आहेत. तेव्हा मतविभागणीचा धोका भाजपाच्या लक्षात आला आहे. त्यातून ही बोलणी करायची गरज वाटली. त्यात आता शिवसेनेने केलेला जागांचा दावा समोर आला आहे. तो अधिकृत नसला तरी वास्तविक वाटणारा आहे.

तसे पाहिल्यास असा वाद १९९० सालातही झालेला होता. लोकसभा उरकल्यावर विधानसभेच्या जागाही भाजपाने अधिक मागितल्या होत्या. त्यात मुंडे महाजन यांच्याशी उद्धव-राज यांची बोलणी झालेली होती. दोघांनी १७१ व ११७ अशी जागांनी विभागणी स्विकारली होती. आकडा असा हवा की त्याला ९ ने भाग जायला हवा, असे काही त्यावेळी बोलले गेले होते. अखेरीस त्यात लालकृष्ण अडवाणी यांनी हस्तक्षेप करून भाजपाच्या राज्यनेत्यांना गप्प केले होते. तेव्हा महाजनांनी केलेले एक वक्तव्य अजून आठवते. नवरी आवडलेली नाही. पण वडीलधार्‍यांनी पसंत केली तर नाकारता येत नाही, असे़च प्रमोद महाजन म्हणाले होते. थोडक्यात नकटीच्या लग्नाला सतरा नव्हेतर एकशे सतरा विघ्ने म्हणावे, अशी स्थिती तेव्हा होती. पुढे दोनचार निवडणूकात जागांची संख्या कमी अधिक होत गेली व जागाही अदलाबदल होत गेल्या. पण युतीमध्ये सहसा वितुष्ट आले नाही. मात्र २०१४ च्या लोकसभेतील यशानंतर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचा सुर बदलला होता. हरयाणात त्यांनी तात्पुरती झालेली युती आधीच मोडली होती आणि महाराष्ट्रात बोलणी चालू ठेवून सेनेला गाफ़ील केले गेले. प्रत्यक्षात भाजपाने स्वबळावर सर्व जागा लढवण्याची जोरदार तयारी केलेली होती आणि युती मोडण्याचा छुपा करारही पवार यांच्याशी केलेला होता. म्हणूनच युती मोडल्याची घोषणा भाजपाने करताच काही तासात पवारांनीही कॉग्रेसशी असलेली जुनी आघाडी तात्काळ मोडीत काढली. उमेदवारी अर्ज भरण्याचे सहा दिवस शिल्लक असताना युती मोडली आणि सर्व जागा एकाकी लढवताना उमेदवार मिळवतानाही सेनेची तारांबळ उडाली होती. आज ती स्थिती नाही आणि सेना कुठल्याही परिणामांना सज्ज असल्याने भाजपाला युतीची गरज आहे. प्रामुख्याने विधानसभेपेक्षा लोकसभेतील जागांसाठी भाजपा अगतिक आहे. पण तरीही सेनेने दाखवलेले औदार्य समजूतदारपणाचे आहे.

देशाची सत्ता हातात ठेवायची असेल तर भाजपाने राज्यातील महत्वाकांक्षेला मुरड घालावी ही अपेक्षा मोठी मानता येणार नाही. सेनेला राष्ट्रीय राजकारणाची हाव नाही. उलट भाजपाला केंद्रातील सत्ता टिकवायची आहे. ते लोकसभेतील अडीचशेहून अधिक जागा वा बहूमत यावरच शक्य आहे. त्यापैकी २३ खासदार एकट्या महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातली घट भरून काढायला अन्य राज्यात पोषक स्थिती हुकमी नाही. वास्तविक इतक्या गरजू स्थितीत भाजपा असताना सेनेने आणखी अडवणूक केली तरी चालली असती. राजकीय सौदेबाजीत ते क्षम्य असते. पण अडवणूक शक्य असूनही सेनेने विधानसभेच्या फ़क्त १५२ जागा व मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला असेल, तर तो स्वस्तातला सौदा म्हटला पाहिजे. निम्मेहून कमी जागा असलेल्या कुमारस्वामींना कॉग्रेस अगतिक होऊन मुख्यमंत्रीपद देते आहे. कारण त्याला केंद्रातील सत्ता मिळवायची आहे. मग त्यापेक्षा महाराष्ट्रात शिवसेना खुप बलवान आहे. तिने मागितलेल्या जागा व पद शेवटी भाजपाच्या मदतीशिवाय शक्य नाही. म्हणजे अजून सेना भाजपावर विसंबून सरकार बनवण्याची इच्छा बाळगत असेल, तर त्याला मैत्रीचा हात मानावे लागेल. तितकी लवचिकता भाजपाला दाखवता येणार नसेल, तर भावी राजकारणात तो पक्ष एकप्रकारे कॉग्रेसच्या जिर्णोद्धारालाच हातभार लावत असल्याने म्हणावे लागेल. पुर्वी नाक चोंदले वा खुप सर्दी झाली तर त्यावरचा हुकमी इलाज म्हणून फ़ॉर्म्युला ४४ अशी एक जाहिरात व्हायची. शिवसेनेचा १५२ चा फ़ॉर्म्युला प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी एकत्रित १४४ चा पल्ला पार करण्याचाच आहे. आपल्या बळावर १४४ गाठण्याचा अहंकार सेनेने दाखवलेला नाही. मग तो पल्ला गाठण्यासाठी युती मोडलेल्या भाजपाने फ़ार अट्टाहास करण्यात अर्थ नाही. त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी तो भाजपाच्याच कृपेने पदावर आरुढ होणार असेल, तर त्याला किंमत म्हणतात, नुकसान नव्हे. हे भाजपाच्या चाणक्यांना समजते आहे का?

10 comments:

  1. BJP-Shivsena alliance is welcome or favored. But Shiv-sena CM may not be good for Maharashtra People. Shivsena under the leadership of Udhav has never done any good work / 'Vidhayak karya'. Especially they are known for their arrogant nature, corruption but never a quality work. Look at few names from Shivsena CMs like Manohar Joshi, Narayan Rane...and now all mumbaikar are behind BJP when since last 25 years Mumbai municipal corporation is run by Shivsena. fortunately Mr. Fadnavis is performing much better job. Who will like a copy of RaGa (Mr. Aaditya Thackray) teaching a lesson to much knowledgeable and convincing candidates ..Shivsena has no convincing face which people will like to see as CM today..

    ReplyDelete
    Replies
    1. Definetion of "BHAKTA"
      knowing the Truth
      Seeing the Truth
      But still believing the Lies

      Delete
  2. अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण ...

    ReplyDelete
  3. भाऊ एकदम सही शतप्रतीशत भाजप याची मस्ती नही सस्ती हे शहाजोग झलेल्या भाजपला अनुभव आला आहे.
    या काही जातीचे प्रबल्य असलेल्या भाजपला थोडी सत्ता हातात आली की माज येतो त्याचे हेच ऊच्च जतीय आहेत. शतकानुशतके हेच करत गोत्यात आले आहेत. देशाला व हिंदू धर्माला पण गोत्यात आणले आहे.
    बरं एवढे असुन सुद्धा मोदीना पण कोणी वेढलेले आहे समजत नाही. का त्यांचा बाळासाहेब झाले आहेत. अंतिम काही वर्षात बाळासाहेब पर्यंत काही घडामोडी जाऊ दिले जात नव्हते असे सामान्य माणसाच्या चर्चेत येते. त्याच प्रमाणे मोदींचे झाले काय हे समजत नाही. किंवा छोट्या गोष्टीत तुम्ही पडु नका असा मोठेपणा मोदींना देऊन टाळले जाऊ शकते. पण पक्षाला टाळे लागेल व देश परत बरबादी कडे जाईल हे घातक आहे.
    बंगलुरु मधील सुशिक्षीत मतदारांनी मतदानाकडे का पाठ फिरवली हे यांना कोणी सांगायचे? हे आयटी सुशिक्षीत पिढी अंत्यत अॅटिट्युड वाले असतात व अनेक नविन एमबिए काॅलेज मध्ये हेच शिकवले जाते. व सोसायटी, आॅफीस ट्रेन मध्ये हे कसे वागतात हे सामान्य रस्त्यावर ट्रेन मध्ये फिरणार्या माणसाला समजते. थोडे मना विरोधात झाले की आटिट्युड दाखवतातच.
    पेट्रोल डिझेल रेट बद्दल हा वर्ग तावातावाने बोलताना दिसतो. येव्हडे टेम्पो रिक्षा ट्रक वाले पण बोलत नाहीत. (प्रत्येक वेळी डिझेल भरताना चान्स मिळाला तर आय माय सरकरची काढतात पण आपला स्वार्थ धर्मात पण आहे हे जाणतात.
    पण बंगलुरी प्रकारचा सुशिक्षित वर्ग देशभरात पसरलेला आहे व अनेक वर्षे भाजपचा पाठिराखा राहिलेला आहे. पण हा नाराज वर्ग किती धोकादायक आहे हे दिल्ली व बंगलुरी मतदारांनी दाखवून दिले आहे. (आठवा दिल्लीतील निवडणूकी आधी मोदी चहा मा बरोबर दिल्लीतील मोठ मोठ्या गार्डन मध्ये फिरत होते मोदी खिसमत दारी करत होते. चानल वाले चढवत होते. पण भाजपला लगेचच झालेल्या निवडणूकीत अशीच 4 सिटची कमी पडली होती.
    यामुळे विदेशात कितीही मोदी फेमस असले तरी काही वर्गाला याचे काही पडलेली नाही. यामुळे हा मुद्दा येणार्या 2019 साठी उपयोगी नाही.
    परंतु अशा युत्या निश्चित ऊपयोगी पडतील. व एक एक सिट महत्वाची आहे हे जितके लवकर लक्षात येईल तेव्हडे महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  4. भाऊ या जाती पाती नी धर्मानी प्रादेशिक अस्मीताच फुंकर घालणारा खंडप्राय देश आहे. त्यात साऊथ म्हणजे तामिळनाडू केरला आंध्रप्रदेश हे अत्यंत स्वार्थी लोकांची राज्य आहेतच बरोबरच भ्रष्टाचार हा या प्रांतात अतीव आहे. त्या राज्यातील जनता लोकल राज्यकर्ते किती भ्रष्टाचारी व्याभिचारी असले तरी रामायण काळा पासुन अशा राज्यकर्तयांची सवय पिढीजात आहे व हे तेव्हा पासुन रक्तातच आहे. तेथे देशातील ईतर भागातील म्हणजे नाॅर्थ व वेस्ट भागातील आध्यात्मिक व राष्ट्रवादी संस्कृती रुजवणारा संत महात्मे असल्याचे ऐकिवात नाही. त्यातच व म्हणुनच येथे फिल्म स्टार हे राजकारणी झाले आहेत व तेच त्यांचे संत महात्मा आहेत. येथे भाजपला यशाची काहीच खात्री नाही. व असे संत महात्मे आत्ता पासुन रुजवायला लागतील तेव्हा अनेक दशकांनी त्यांना स्वार्थी राक्षसी वृत्ती पासुन बाहेर काढावे लागेल. एनटीआर नी ईतर मुद्द्या बरोबर 2 रु कीलो तांदुळ या मुद्द्यावर निवडणूका जिंकल्या होत्या. अशी अमिशांना साऊथ इंडियन मतदारांनी साथ दिली आहे. मुड आणि निड आॅफ नेशन प्रमाणे खजीतच काय जवळ जवळ नाहीचे मतदान केले आहे. त्यामुळे हा भारतीय भाग मोदी शहांना जमेत धरुन ऊपयोग नाही.
    महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात राजस्थान ही राज्य संत महात्म्याची संसकारीत सुशिक्षीत व कठोर राष्ट्रीभक्त जनतेची राज्य आहेत. नेहमीच देशाच्या मुड आणि निड प्रमाणे मतदान करुन देशाला व जनतेला दिशा देणारी व्यक्तीमत्वे निर्माण करणारी राज्य आहेत. आणि त्यामुळे यावरच मोदी शाहा अवलंबून असतात.
    परंतु गुजरात व महाराष्ट्र यात बरीच हाणामारी चालु आहे. यात समेट करुन राष्ट्रीय हिता साठी नमते घेणे आवश्यक आहे. व त्या द्रुष्टीने शहा ठाकरे भेट महत्वाची आहे.
    युपी ऊत्तराखंड हरयाणा जाती धर्म काही पक्षांनी ठेकेदारी घेतली आहे. काँग्रेसचा मतदार राज्य पातळी वरिल अनेक दशकांच्या पोकळी मुळे व कल्याण सिंह विश्वनाथ प्रताप सिह मुळे तळ्यात मळ्यात राहतो. रामजन्मभूमीवरील 2004 चा अनुभव यामुळे काहीही आखलाक वैगरे प्रकरणात मायावती व तरुण व्ययसाईक राजकारणी आखिलेश याच्या भवती फिरत राहतो. आखिलेश चे मुल्ला राजकारण भाजप किती हवा देउन एनकॅश करतो हे पहायला लागेल. मायावती व आखलेश यांना एकत्र येण्या शिवाय पर्याय नाही. त्यात नगण्य काँग्रेसला आपला फरफटत जाण्या शिवाय पर्याय नाही.
    अजितसिग यांना तरी भाजपला जवळ करुन लोकल मुलामा देणं आवश्यक आहे. 70 सिट निवडणुन आणण्याचा या विरोधी एकी वर मात करण्याचे काम अवघड होऊन बसले आहे.
    70 मधिल घट केवळ नाॅर्थ ईस्ट वर भरुन काढणे मोठे आवाहन आहे.
    त्याचमुळे महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश राजस्थान यातुन आणखी घट न होता भरुन काढणे अत्यंत आवघड आहे.
    जराशी गाफिली पण देशाला परत एकदा बरबादी च्या रस्त्यावर नेऊन ठेवेल.
    पेट्रोल डिझेलचा फटका बंगलुरु मधील सुशिक्षीत व नविन अॅटीट्युडच्या मतदारांनी भाजपला दिला पण जेटली काही ऐकणार नाहीत. व हा मोठा हदरा देणारा ठरेल.
    यातील सर्व मनसुबे 2019 निकालाच्या दिवशीच खुलतील

    ReplyDelete
  5. भाऊ शिवसेनेला राष्ट्रीय महत्वाकांक्षा नाही असे म्हणता येणार नाही कारण लोकसभेला भाजप 26 तर सेना 22 जागा लढवते याचाच अर्थ या जवळपास बरोबरीच्या जागा आहेत 1996 मध्ये रामभाऊ म्हाळगी यांच्या पासून असलेली ठाण्याची जागा भाजपकडून काढून घेण्यात आली त्यामुळे लोकसभेत बरोबरीचा भाऊ आणि विधानसभेत छोटा भाऊ अशी भाजपची स्थिती होती दुसरी गोष्ट म्हणजे भाजप बरोबर युतीचा मित्रपक्षांना होणारा फायदा म्हणजे भाजप साठी काम करणाऱ्या संघाच्या यंत्रणेचा लाभ मित्रपक्षांना मिळतो याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात सेना आणि बिहारमध्ये नितीश,नितीश भाजप सोबत असताना त्यांना मिळालेले यश आणि लालू सोबत गेल्यावर लालू एवढ्याच जागा लढवून ते दुय्यम भूमिकेत गेले महाराष्ट्रात 171 आणि 117 फॉर्म्युला असताना सेनेला आणि भाजपला प्रत्यक्ष मिळणाऱ्या जागांमध्ये फारसे अंतर नव्हते कदाचित उद्धवजी याच कारणामुळे औदार्य दाखवत असावेत.अमित शहा यांच्या मातोश्री भेटीचे कारण युती तुटली तर आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले पण समोरून प्रतिसाद मिळाला नाही हे जनतेला दाखवण्यासाठी असावे कदाचित विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल पण प्रादेशिक पक्षांच्या नाकदुर्या काढणे नको अशी मोदी आणि शहा यांची मानसिकता असावी पाहूया पुढे काय घडते ते

    ReplyDelete
  6. ओल्ड टेस्टामेंट कि न्यू टेस्टामेंट एव्हडाच काय तो फरक. मोदी असो नाहीतर राहुल .

    बाकी भाऊ, प्रमोद महाजनांना प्रतिपंतप्रधान असे संबोधणारा लोकसत्ताचा अग्रलेख वाचल्याचे अजूनही आठवते .

    ReplyDelete
  7. with due respect to you Bhau, BJP was asking SS to give seats to RPI and others whom SS had brought to alliance. but Udhhav Thackrey was helpless due to Bal hatta from Aditya Thackrey. and regarding winning the seats in short margin, all maharashtra was Modi-fied. hence there was no issue for BJP to win the major seats.and also comments like afjal khan etc and bringing modi's father into campaign by SS hurted some voters and BJP kept its cool and shown respect to Balasaheb Thackrey.

    ReplyDelete
  8. असे ब्लॉग भक्तांना जाम झोमतात,बाकी सुंदर विश्लेषण.

    ReplyDelete
  9. बहुतांश कुलकर्णी लोकांचा चष्मा एकाच नंबरचा असतो . 😂😂

    ReplyDelete