Wednesday, June 13, 2018

पुत्र मानवाचा

भय्यूजी महाराज के लिए इमेज परिणाम

इंदुर येथे जाऊन वसलेले आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराज यांनी स्वतंवरच गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या बातमीने सुरू झालेल्या चर्चा, त्यांच्यावर अन्याय करणार्‍या आहेतच. पण विज्ञानाचे हवाले देणार्‍यांच्याही बुद्धीची कींव करण्यायोग्य आहेत. आयुष्यात वैफ़ल्याने निराशेने गांजलेल्या लोकांना आधार देण्याचे काम करणार्‍या व्यक्तीने आत्महत्या केली, मग तो इतरांना कसला आधार देत होता? अशा स्वरूपाचे विविध प्रश्न विचारायला सुरूवात झाली. हे अर्थातच नवे नाही. कुठल्याही सामान्य माणसाच्या बाबतीत हेच होत असते आणि भय्युजी महाराज प्रतिष्ठीत नामवंत होते. म्हणून त्यावर जाहिर चर्चा झाल्या. यात सहभागी होणार्‍यांची अशी मनस्थिती असते, की असे पाऊल उचलणार्‍याच्या जागी आपण असतो, तर कसा शहाणपणा केला असता. जणू आत्महत्येचे पाऊल उचलणारा तद्दन मुर्ख होता आणि त्यावर चर्चा करणारे अतिशय संयमी शहाणे व प्रत्येक कृती विचारपुर्वक करणारे असावे,त असाच मग भास होतो. व्यवहारात तसे कधीच होत नाही. जन्माला आलेला प्रत्येकजण माणूस असतो आणि कृती कर्माने भिन्न असला, तरी त्याच्यात मानवाचे विकार भावना जशाच्या तशा सुप्तावस्थेत असतात. बाह्य जगात त्याचा वावर त्याने पत्करलेल्या भूमिकेनुसार चालू असतो. आतल्या आत तोही एक सामान्य माणूस असतो आणि लोक त्याला महाराज वा अध्यात्मिक गुरू वगैरे ठरवून बसलेले असतात. असे लोक त्याच्या आश्रयाला जात असतात. दगडाचा किंवा सोन्याचा देव करून त्याचे भव्यदिव्य देवालय बांधले, म्हणून त्या दगडाला वा सोन्याला आपण देव असल्याचेही ठाऊक नसते. तो निर्जीव पदार्थ असतो. तितकेच महाराज वा आध्यात्मिक गुरू सामान्य माणूसच असतात. मग त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे आत्महत्या केली, तर त्याचे अर्थ लावण्याची काय गरज आहे?

भय्युजी महाराज असोत किंवा आणखी कोणी आध्यात्मिक गुरू असो, त्याला देवत्व त्याच्या भक्तांनी बहाल केलेले असते. रामरहिम वा आसाराम यांच्यासारखे गुरू तर वाटेल ती थेरे करीत होते आणि तरीही हजारोच्या संख्येने लोक त्यांच्या भजनी लागलेले होते. इतर कोणी महंत संत निदान तसे तमाशे करीत नाहीत. या प्रत्येकातील मानवी विकारांवर त्यांनी मात केली आहे, असा आपला समज असतो. किंवा आपण तसे गृहीत धरलेले असते. म्हणून मग त्याने इतरांच्या समजुतीनुसारच जगायला हवे, हा आपला आग्रह असतो. थोडक्यात त्याचे मनाप्रमाणे जगणे, भक्त वा इतरांनी हिरावून घेतलेले असते. नामवंत होणे वा प्रतिष्ठीत म्हणून मिरवणे, जितके कौतुकाचे असते तितकेच जाचक असते. ते एकप्रकारचे लादलेपण सोसून त्या माणसाला कोंडमारा सहन करावा लागत असतो. भय्युजी महाराज त्याचाच बळी आहेत. आपण जीवनमरणाच्या फ़ेर्‍यातून मुक्त झालोय, किंवा जगरहाटीतून आपल्याला मोक्ष मिळाल्याचा दावा त्यांनी केलेला नव्हता. इतर सामान्य लोकांपेक्षा त्यांच्यापाशी सोशिकता वा संयम अधिक असतो इतकेच. त्यातून त्यांच्यावर मग अशा गोष्टी लादल्या जात असतात. त्यांच्या दर्शनाने वा दोन शब्दांनी कुणाला दिलासा मिळतो वा समस्या सोडवण्याचा मार्ग सापडला असेही वाटते. पण बदल्यात अशा व्यक्तीला सामान्य म्हणून जगण्याचीही संधी नाकारली जात असते. मग लोकांच्या अपेक्षा व समजूतींचे ओझे घेऊन त्यांना चालावे लागत असते. मात्र त्याचा ताण किती असतो, ते इतरांच्या लक्षात येत नाही. एकूण समाज असा असतो, की तो कुणाला तरी देव बनवून टाकतो आणि नसेल तर चोर सैतानही ठरवून टाकतो. मग अशा ज्या कल्पना आहे, त्याच पिंजर्‍यात अशा लोकांना बंदिस्त करून टाकले जात असते. त्यातून होणारा कोंडमारा सहन करू शकणारे गुण्यागोविंदाने नांदतात आणि असह्य होणारे भय्यु महाराजांचा मार्ग चोखाळतात.

आपली सगळी दु:खे समस्या घेऊन त्यावर फ़ुंकर घालण्यासाठी लोक जेव्हा तुमच्या भोवती जमू लगतात, तेव्हा सामान्य माणसालाही तो मोठेपणा हवाहवासा वाटतच असतो. साधा कॅमेरा समोर आला, तर सामान्य माणसाच्या वागण्यात किती फ़रक पडतो? आपण टिव्हीवर दिसतोय म्हटल्यावर किंवा दिसू इतक्या जाणिवेनेही माणूस झकपक दिसण्याचा प्रयत्न करतो. आपण असे दिसावे किंवा आपल्याविषयी बघणार्‍याचे मत असे व्हावे, यासाठी धावपळ सुरू होते. मग ज्यांना लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी ओळखले जात असते, त्यांच्या वागण्याजगण्यावर किती निर्बंध येत असतील? तो त्यांच्यातल्या माणसाचा कोंडमाराच नसतो काय? जगाची दु:खे समस्या ऐकून घ्यायच्या आणि त्यावरचे उपाय सांगण्यात आयुष्य खर्ची पडत असते. त्यांना स्वत:च्या दु:ख समस्या कोणासमोर मुक्तपणे मांडण्याचीही मोकळीक राहिलेली नसते. जगाला न दिसणार्‍या एका अदृष्य पिंजर्‍यात त्यांना बंदिस्त करून टाकले जात असते. त्याचा किती तणाव माणसावर येत असेल? ती व्यथा त्यांनी कुठे मांडावी आणि त्यावरचे उपाय कोणाकडून मिळवावे? तो सगळा बोजा कुठेना कुठे व कधीना कधी असह्य होतोच. त्यावर संयमाची पराकोटी करूनच जगणे शक्य असते. त्याचा कडेलोट करण्यासाठी कमालीचे बेशरम व अमानुष असावे लागते. चारसहा लाखाच्या सावकारी कर्जासाठी आत्महत्या करणारा शेतकरी वा गरीब आणि भय्यू महाराज यांच्यात किंचीतही फ़रक नसतो. दारात देणेकरी उभा राहिल्यावर अब्रुचे धिंडवडे निघतात म्हणून तो शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतो. उलट त्याच्या लाखो पटीने कर्ज घेऊन परदेशी फ़रारी होऊ शकणारा मल्ल्या किंवा नीरव मोदी यात मोठा फ़रक असतो. अब्रु नावाच्या गोष्टीला तिलांजली देऊनच त्यांनी थाटामाटात जगण्याची सिद्धी प्राप्त केलेली असते. अशा लोकांनी भय्यु महाराज वा शेतकरी आत्महत्येविषयी चर्चा करण्यात कितीसे तथ्य असू शकते?

आपल्या सुपुत्रावर घोटाळ्याचे आरोप दाखल झालेत असे चिदंबरम, चारा घोटाळ्याच्या चार आरोपात शिक्षापात्र ठरलेले लालू, नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर मुक्त असलेले व रोज मोदींवर आरोपाची सरबत्ती करणारे सोनिया वा राहुल गांधी, हे खरे सिद्धपुरूष साध्वी असतात. बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात शिक्षा भोगणारे रामरहिम, आसाराम बापू एकाच रांगेतले असतात. त्यांना जगाच्या अपेक्षा झुगारूनही प्रतिष्ठेने जगणे शक्य असते. ती खरी सिद्धी असते. भय्यु महाराज तितकी मोठी सिद्धी प्राप्त करू शकलेले नव्हते. लोकांना दिलासा देताना आपण सामान्य माणूस म्हणून भावनाविवश होऊ नये, इतकेही त्यांना उमजले नाही आणि त्यांना यातून मुक्तता हवी असू शकेल. साधूसंत असण्याच्या बोजाखाली चिरडून जगण्यापेक्षा सामान्य माणूस म्हणून कितीही संकटात जगणे अधिक सुखदायी असल्याची जाणिव त्यांना आत्महत्येकडे घेऊन गेलेली असू शकते. नित्यनेमाने त्यांच्या दारी येणार्‍या राजकीय नेते प्रतिष्ठीतांचा निर्ढावलेपणा, आपल्या अंगी बाणवता येत नसल्याच्या वैफ़ल्याने भय्यु महाराजांना अधि्क निराश केलेले असू शकते. इतरांना जगण्याचा आशय समजावून देताना आपणच त्याला पारखे राहिल्याची धारणा त्यांना आत्महत्येकडे घेऊन गेलेली असू शकते. जो कोणी सामान्य माणूस आहे व आपले सामान्य जीवन जगताना सतत निराशेशी झगडत असतो, त्यालाच भय्यू महाराज यांच्या अशा आततायी कृतीचा अर्थ समजू शकेल. ज्यांना आयुष्यात आशा-निराशा वा प्रतिष्ठा अप्रतिष्ठा असल्या भावनांच्या झोक्यावर बसायची फ़िकीर उरलेली नाही, त्यांच्याकडून असल्या घटनांचे अर्थ लावले जाऊ शकत नाहीत. शेवटी भय्यु महाराजही एक माणूस होते आणि त्यांची कृती मानवी विकारी मनाला शोभणारीच होती. हे ज्यांना उमजत नाही, त्यांच्या विश्लेषणाला कवडीचा अर्थ नाही. कारण महाराज वा अध्यात्मिक गुरू आभाळातून पडत नाही. आईच्याच पोटी जन्माला आलेला माणूस असतो. गदिमांनी म्हटलेच आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!

14 comments:

  1. गाईड मधला इंटरवल नन्तरचा राजू गाईड बनाम स्वामीजी आठवला.
    ग्रेट विवेचन भाऊ!

    ReplyDelete
  2. अगदी चपखल शब्दात भाऊ तुम्ही सर्व विचार मांडलेत. आमच्या मनात देखील अशाच भावना होत्या परंतु त्या शब्दरूप करता येत नाहीत आम्हाला. ती सिद्धी तुम्हाला प्राप्त आहे. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

    ReplyDelete
  3. Super Bhau, Apratim lekh. Aapan ch perfect jaganya chya mage lagun he sagle taan nirman kelele astat.

    ReplyDelete
  4. अतिशय छान शब्दात वर्णन केले भाऊ

    ReplyDelete
  5. श्री महाराज हे चांगले साधक होते. ते सद्गुरु नव्हते. त्यांनी कशासाठी दिक्षा देण्याचा प्रपंच केला ते त्यांनाच माहित. चांगली व्यक्ती होते. परंपरेची आज्ञा असल्याशिवाय सद्गुरु पदाचा निर्वाह करणे अशक्य आहे. ते सामर्थ्य पाठिशी असले तरच ठीक आहे अन्यथा असे होते. वाईट वाटते, अनेकांच्या श्रद्धा भंगल्या, आधीच शेकडा ९९% सद्गुरु म्हणवणारे भोंदूगिरी करणारे किंवा अपात्र आहेत. श्री माउलींनी सहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे कर्मसाम्यदशा येण्यासाठी प्रयत्न करण्याची कोणाचीही तयारी नाही. त्यामुळे असद्गुरूंची प्राप्ती होते व अध्यात्मिक आयुष्य लयाला जाते. श्री महाराज आत्महत्या करून गेले पण आधीच असलेल्या नास्तिक वातावरणात या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. रामरहीम सार्ख्यांमुळे फारसा फरक पडत नाही पण भैय्यू महाराजांच्या आत्महत्येने फरक पडतो. इतकेच असह्य होत होते तर परंपरेतल्या अधिकारी पुरुषांना शरण जावून निग्रहाद्वारे ते मूळ अवस्थेला येऊ शकले असते. पण उलटा प्रवास करायला प्रचंड धैर्य लागते, शरणागत भाव असावा लागतो. मला माहित आहे की, हे सर्व मी अस्थानी लिहतोय पण श्री भाऊंचा ब्लॉग आहे म्हणून इतके तरी वरवरचे लिहले.

    ReplyDelete
  6. अप्रतिम विवेचन 👌

    ReplyDelete
  7. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. भाऊ..काहीही..पटत नाही आहेत तुमचे विचार..लोकांनी त्यांना महाराज केले होते तर त्यांनी ते पत्करले होते..आणि त्या प्रमाणे वागत होते..आत्महत्या हे पाप आहे..गरीब शेतकरी असो वा राजा कोणी असे करता कामा नये..भैयु महाराजांनी असं केले असेल तर मग ते ज्या अधिकाराने महाराज किंवा संत म्हणून वागत होते..ते चुकीचे आहे..ह्या गोष्टीचा आणि राजकारणातल्या ढोंगी लोकांचा संबंध नाही..असेल तर मग आत्महत्या करणारे महाराज पण ढोंगीच म्हणावे लागतील

    ReplyDelete
  9. Bhau
    I am regularly reading your arrivals.
    But now I feel that before giving any comments on Aasaram Bapu you must visit their Ashram.Work done by him.Experience of his followers. I hope you r person who write o n reallity.

    ReplyDelete
  10. ह्या विषयावर श्री. शरद उपाध्ये ह्यांच्या नावे एक लेख माझ्याकडे आला आहे. तो खाली देत आहे.

    *भैयु महाराज by शरद उपाध्ये*
    गुरुत्वाची गादी काटेरी आसन आहे. आपणहून त्या गादीवर बसून आपल्या मनाने कोणालाही कसलीही उपासना करायला सांगणे म्हणजे त्याचे प्रारब्ध ओढवून घेणे आहे.आपली उपासना आधी प्रखर होऊन सद्गुरू प्राप्त होतात आणि त्यानी अनुग्रह देऊन आज्ञा केली तर दुस-याला उपासना देण्याचा अधिकार प्राप्त होतो.

    उठसूठ कोणालाही काहीही साधना करायला सांगणे हे स्वतःवर संकटे ओढवून घेणे आहे. मी आणि भैयुमहाराज गुरूबंधू होतो. आमचे आणखी एक गुरुबंधू विवेक किरपेकर अशा आम्हा सर्वांना सद्गुरू आवर्जून सांगायचे, "गुरू,महाराज बनून आपल्या पायावर कोणाचे डोके ठेवून घेऊ नका.महाराज बनण्याच्या भानगडीत पडू नका लोकांची खडतर प्रारब्धे घ्यावी लागतील." पण गुरूवाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी.

    किरपेकर अनेकांकडून पैसे घेऊन त्यांच्या पितरांची श्राध्दकर्मे काशीला जाऊन करू लागले. एके दिवशी त्यांना महाऊग्र काळपुरुषाचे दर्शन झाले. घाबरून त्यांनी सद्गुरूंना फोन केला. सद्गुरू म्हणाले आता संपले. अंत अटळ आहे. तुम्ही पितरांच्या अर्यमा देवतेच्या प्रांतात ढवळाढवळ केली आहे. किरपेकरांची मुत्रपिंडे खराब होऊन आठ दिवसात मृत्यू ओढवला

    “माझे कोणीही गुरू नाहीत. मी स्वयंभू आहे" असे म्हणणारे शिष्य गुरूद्रोही ठरतात आणि भयाण अंत होतो. म्हणून अधिकारी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची उपासना करत रहाणे उत्तम. लोकांनी महाराज बनवून उपयोग नाही. त्या महाशक्तीने गुरुत्वाच्या गादीवर बसवले पाहिजे. लोकेषणा, वित्तेषणा सर्वांचा त्याग केला पाहिजे.

    सतत सद्गुरूंशी संपर्कात राहिले पाहिजे. मध्यंतरी मधुर भांडारकर यांच्या मार्फत एका परलोकांतील गतिसंबंधी फिल्ममध्ये मला भूमिका करण्यासाठी खूप आग्रह केला होता पण मी सद्गुरूंची परवानगी मागितली तर त्यांनी त्वरित नकार दिला.

    पण अनुग्रह मिळाला म्हणून आपल्या मनाने लोकांकडून पैसे घेऊन यज्ञयाग करायचे याची फार अशुभ फळे भोगावी लागतात कारण त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते. अनुग्रहित शिष्याची जबाबदारी गुरूंवर असते पण त्यांच्याशी संपर्क न ठेवता आपणच महाराज म्हणून मिरवणे फार महागात पडते.

    म्हणून म्हंटले आहे “पानी पीना छानके! गुरू करना जानके!" पण एकदा गुरू केले की सतत लक्षात ठेवावे “न गुरोर् अधिकं न गुरोर् अधिकं”

    भैयूजी, आत्महत्येने समस्या समस्या संपत नाहीत आणि आत्महत्या हा महादोष आहे हे तर आपण जाणतच होतात. मग केवळ ताण असह्य झाला म्हणून आपली आई,पत्नी यांना एकाकी सोडून जाणे हे सामान्यांचे दुबळेपण नाही का?

    गुरूंनी एवढे सामर्थ्य,मनोबल दिले असताना एकदा त्यांच्याशी तरी संपर्क साधायचा! ते गुरू अशक्यही शक्य करतात. ‘महाराज’ म्हणतात आपल्याला, तर लाखो लोकांना पोरके का करायचे!

    माझ्या कुटुंबाची काळजी घ्या हे लोकांना का सांगायचे?
    ती महाशक्ती आहे ना! पण ज्या महादेवांना आपण अखेरची प्रार्थना केली आहे त्यांनी ‘कालकूट’ पचविले आहे. त्यांना आत्महत्या रुचणार नाही. अध्यात्मिक माणसाची एक विलक्षण खंबीर, आदरणीय, आधार देणारी, लढवय्या माणसाची प्रतीमा असते. लष्कर प्रमुख आघाडीवर असला पाहिजे. तर सैनिकांना बळ मिळते.

    असो.

    आपल्या जाण्याचे दुःख मला झालेच आहे पण जनतेच्या श्रध्देला तडा जातो त्याचे फार वाईट वाटते. ज्याच्यावर भार टाकला तो असे जीवन संपवितो हे अध्यात्म क्षेत्राला नुकसानकारक ठरू शकते.

    वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, संभाजी राजे यांनी काय सोसले! पण टक्कर दिली. आत्महत्या नाही केली.

    असो.

    गुरू प्रेमळ असतात. ते आपल्याला सद्गती देतीलच कारण तसे आपले इतर समाज कार्य महान आहे. सरकारी सुविधा नाकारण्याइतके निरिच्छही होतात. आम्ही तुमचे सर्व गुरूबंधु भगिनी तुमच्या उत्तरगतीसाठी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो.

    🙏

    मित्रमैत्रिणींनो सामान्य जीवन जगण्यातच फार समाधान असते. फार उंचावर गेल्यावर आपण प्रेमळ जनतेपासून दुरावतो. पडलो तर जखमाही गंभीर खोल होतात. अध्यात्म स्वतःपुरते ठेवा. अधिकार नसताना सल्ले देत बसू नका. हत्ती होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी.

    *लेखक : श्री.शरद उपाध्ये*
    साभार फेसबुक वॉल

    ReplyDelete
  11. भय्यू महाराज डावखुरे होते का ?

    ReplyDelete
  12. भाऊ अगदी योग्य शब्दात तुम्ही भय्यु महाराजांच्या आयुष्याचे प्राक्तन मांडलं, तुमच्या आमच्यापैकी काहींमध्ये महाराज लपलेला असतो,छोट्या का असेना पण आपल्या आपल्या वर्तुळात तो मार्गदर्शक असतो,हळूहळू त्याचं सामान्य जगणं हिरावल जात,मग तो कातर होतो,सगळं निरर्थक वाटायला लागतं आणि त्यातून निर्माण होते टोकदार प्रतिक्रिया..तुमच्या लेखामुळे अश्या छोट्या भय्यु महाराजांना ही मोठेपणाची झूल फेकून सामान्य जगणं जगण्याची प्रेरणा मिळावी...

    ReplyDelete