Sunday, February 19, 2017

तळे राखी तो पाणी चाखी

Image result for corruption

प्रत्येक निवडणुकीत वा राजकीय आंदोलनामध्ये भ्रष्टाचार हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. मनमोहन सरकार असताना विरोधातील भाजपाने कॉग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले होते आणि आता नरेंद्र मोदींचे भाजपा सरकार सत्तेत असताना कॉग्रेससह मनमोहनही त्या विद्यमान सरकारवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करीतच आहेत. माध्यमातून अशा आरोपांवर पोटभर चर्चाही रंगवल्या जात असतात. पण लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याचा विषय किंवा जयललिता यांचे प्रकरण वगळता; सहसा अशा घोटाळ्यांसाठी कोणाला शिक्षा झाल्याचे लोकांना बघायला मिळालेले नाही. शिवाय अशा घोटाळ्यावर प्रचंड काहूर माजवले गेले तरी त्याचा सामान्य जनतेवर किती परिणाम होतो, त्याचीही दखल संबंधीत शुचिर्भूत लोक घेताना दिसत नाहीत. खरेच जयललिता वा लालूंचा भ्रष्टाचार जनहिताला बाधक असेल, तर इतक्या मोठ्या संख्येने मतदार त्यांनाच मते कशाला देत असतो? जयललिता यांना मुख्यमंत्री पदावर असताना तुरूंगात जावे लागले होते आणि तरीही त्यांनाच दुसर्‍यांदा लोकांनी बहूमत कशाला दिले होते? मतदार आणि तत्सम शहाणावर्ग यात कुठेतरी संपर्क तुटला आहे काय? की सामान्य जनतेची भ्रष्टाचार विषयक कल्पना आणि समाजातील शहाण्यवर्गाची त्याच भ्रष्टाचाराबद्दल असलेली धारणा, यात फ़रक आहे काय? की लोकांना भ्रष्टच नेता किंवा पक्षाने आपल्यावर राज्य करावे असे वाटते? नसेल तर सर्वाधिक बदनाम झालेल्यांना लोक असा कौल कशाला देत असतात? समाजप्रबोधन करणार्‍यांनी त्याचा कुठेतरी विचार करणे आवश्यक नाही काय? कारण ज्या चर्चा व उहापोह चालतात, त्याचा समाजमनावर कुठलाही प्रभाव पडत नसेल, तर शहाण्यांनी तरी वेगळा विचार करणे भाग आहे. शशिकला नटराजन यांना तुरूंगात जाण्यापुर्वी जी सलामी दिली जात होती, त्याचा अर्थ शोधण्याची गरजच नाही काय?

निवडणूकांचे निकाल आणि भ्रष्टाचार यांची कुठेतरी सांगड घालण्य़ाची गरज आहे. कारण आजकाल राजकारण आणि भ्रष्टाचार जुळे भाऊ होऊन बसले आहेत. मायावती यांच्या भ्रष्टाचारावर आरोप करून मुलायमच्या समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशची सत्ता मिळवली होती. पण तेच व तसेच आरोप समाजवादी पक्षावरही झाले. पण म्हणून त्यांचा मतदार पाठीराखा घटल्याचे दिसत नाही. आज त्याच मायावती समाजवादी पक्षावर आरोपांची बरसात करीत आहेत. मग भ्रष्टाचाराची व्याख्या कोणती? आपल्या गल्लीतला कोणी नेता वा प्रतिनिधी करतो, त्याला भ्रष्टाचार म्हणायचे, की मोठमोठ्या घोटाळ्यात फ़सलेल्यांना भ्रष्टाचारी म्हणायचे? सामान्य माणूस याकडे कसा बघत असतो? एक उदाहरण देण्यासारखे आहे. साडेचार वर्षापुर्वी मनमोहन सिंग यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री वीरभद्रसिंग यांची हाकालपट्टी केली होती. कारण त्यांच्यावर खात्यातल्या गडबडीचा आरोप झाला होता. त्याचा गवगवा झाल्यामुळे त्यांना बाजूला करण्यात आले. मग त्या ज्येष्ठ नेत्याला दुखवू नये म्हणून सोनिया गांधींनी त्याच बडतर्फ़ नेत्याला हिमाचल प्रदेशचा पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. पुढे त्या राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि बहूमत मिळाल्याने आपोआप वीरभद्रसिंग यांना मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. मग त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे काय? या वर्ष अखेरपर्यंत पुन्हा तिथल्या निवडणुका व्हायच्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा तोच नेता लोकमताला सामोरा जाणार आहे. ज्याला मनमोहन सिंग यांनी भ्रष्ट म्हणून बाजूला केले, त्यालाच हिमाचलच्या मतदाराने पुन्हा सत्ता बहाल केली. याचा अर्थ जनतेला भ्रष्ट नेताच हवा असतो, असा निष्कर्ष काढायचा काय? तर तसा अर्थ नसून, भ्रष्टाचार म्हणजे नियमबाह्य वर्तन असते आणि सत्तेत आलेला माणूस थोडाफ़ार मस्ती वा लाभ उठवतो, अशी लोकांची धारणा असते.

योगायोगाने हिमाचलमध्ये भाजपाने सत्ता गमावली, तेव्हाच दक्षिणेत कर्नाटकातही भाजपाने हाती असलेली सत्ता गमावली होती. कर्नाटकात भाजपाने प्रथमच स्वबळावर बहूमत संपादन केले आणि त्याचे शिल्पकार असलेल्या येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालीच ते यश मिळालेले होते. मग त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि पक्षाने त्यांच्याकडून राजिनामा घेतला. त्यांनी कोर्टातून आपले नाव धुवून आणावे, अशी पक्षाची भूमिका होती. तसे झाल्यावरही येदीयुरप्पा यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. त्यामुळे ते विचलीत होते. उलट त्यांच्याजागी ज्या नेत्यांना राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली, त्यांना पक्ष संभाळता आला नाही की लोकप्रिय कारभार करता आला नाही. सहाजिकच पक्ष विस्कळीत होत गेला आणि दुभंगलाही. परिणामी येदीयुरप्पा बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन करून पक्षालाच आव्हान दिले. पण त्यांच्यावरचे सर्व आरोप साफ़ झालेले नाहीत, म्हणून शुचिर्भूतपणाचा आव आणलेल्या भाजपा श्रेष्ठींनी येदीयुरप्पांना दाद दिली नाही. परिणाम असा झाला, की साडेचार वर्षापुर्वी कर्नाटकात भाजपाच्या मतांची विभागणी होऊन कॉग्रेसला लाभ मिळाला. सेक्युलर जनता दलालाही लाभ मिळाला. ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्या येदीयुरप्पा यांनाही व्यक्तीगत लोकप्रियतेमुळे मते मिळाली आणि भाजपाच्या हातची सत्ता गेली. पण तेच येदीयुरप्पा लोकसभेपुर्वी भाजपात आले आणि पुन्हा भाजपाने लोकसभेच्या बहुसंख्य जागा जिंकल्या. मग तथाकथित भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी भाजपाने येदीयुरप्पा यांना बाजूला करून काय मिळवले होते? माध्यमातील मुठभर शहाण्याच्या वा पत्रकारांच्या मतासाठी भाजपाने एका राज्यातील सत्ता गमावली नव्हती काय? कर्नाटकातील जनतेला भ्रष्ट येदीयुरप्पा हवे होते असेही कोणी म्हणू शकत नाही. मुठभर शहाण्यांना वाटणारा भ्रष्टाचार सामान्य जनतेला ग्राह्य नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे.

लोकांना भ्रष्टाचारी नेता किंवा पक्ष नकोच असतो. पण ज्याच्या हाती सत्ता किंवा अधिकार जातो, तो कितीही झाले तरी सत्तेचा थोडाफ़ार लाभ उठवणारच. हेही जनता समजून असते. त्याला लोक भ्रष्टाचार म्हणत नाहीत. आपल्या पुर्वजांनीच तसे म्हणून ठेवलेले आहे. तळे राखी तो पाणी चाखी. तसा कित्येक पिढ्यांच्या अनुभवातून निघालेला निष्कर्ष आहे. त्यामुळेच लहानमोठा जो काही अधिकार एखाद्या व्यक्तीच्या हाती येतो, त्याचा लाभ त्याच्यासह त्याच्या आप्तस्वकीयांना मिळणार आणि त्यांनी तसा घेण्य़ाविषयी सामान्य माणसाची तक्रार नसते. पण पुस्तकपंडितांना वास्तविक जीवनापेक्षा पुस्तकाशीच कर्तव्य असल्याने, अशा बारीकसारीक गोष्टीवरून काहूर माजवण्यात धन्यता वाटत असते. मग त्यातले तारतम्य सोडले जाते. तळे राखी तो पाणी चाखणार याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही. पण तळे राखताना कोणी तळ्याचे पाणी उपासून झाल्यावर खाली उरलेला गाळही चोरू लाग्ला, मग लोकांना त्याच्याविषयी संताप येऊ लागतो. गल्लीबोळातला नगरसेवक वा आमदार किरकोळ गोष्टी मिळवतो, तसाच लोकांच्या गरजांनाही धावून येत असेल, तर लोक त्याचे अपराध पोटात घालत असतात. अनेकजण काही रक्कम घेऊन लोकांची कामे उरकून देतात. तेव्हा लोकांना तो भ्रष्टाचार वाटत नाही. कारण त्यांना आपले अडकलेले काम सुरळीत करण्याशी मतलब असतो. म्हणूनच अशा किरकोळ गोष्टी आणि तळेच्या तळेच उपसून नेण्याचा अपराध; यात तफ़ावत असते. त्याचे भान सुटलेले असल्याने आरोपबाजी खुप होते. पण लोकांना भ्रष्टाचार शब्दाची किंमत वाटेनाशी झाली आहे. जनतेच्या जगण्यात व्यत्यय येत नसलेल्या गोष्टीविषयी नुसते काहूर माजवून म्हणूनच फ़रक पडत नाही. जोवर लोकांना वास्तविक जीवनात भ्रष्टाचार बाधक असल्याचे अनुभव येत नाहीत, तोपर्यंत जनता त्यावर प्रतिक्रीया देत नाही. मात्र अशा गडबडीत भ्रष्टाचार शब्दाचा अर्थच गुळगुळीत होऊन गेला आहे.

No comments:

Post a Comment