Saturday, February 25, 2017

एक्झीट पोल आणि पोलखोल

exit poll के लिए चित्र परिणाम

मंगळवारी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या दुसर्‍या फ़ेरीचे मतदान संपले. मग काही तासातच अनेक महापालिकांत कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार, त्याचे आकडे वाहिन्यांवर झळकू लागले. अर्थात मतमोजणी दोन दिवस पुढे असताना इतक्या वेगाने अशा लोकांनी जागांचे आकडे कसे मिळवले? तर त्याला एक्झीट पोल असे नाव दिलेले आहे. एक्झीट पोल म्हणजे मतदार आपल्या मताचे दान करून बाहेर पडला, मग त्याला ठराविक प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या उत्तरातून त्याने कोणाला मत दिले असेल, त्याचा अंदाज काढला जातो. हजारो वा लाखो मतदारांपैकी मुठभर मतदारांची अशी नमूना म्हणून चाचणी केली जाते आणि त्यात सर्वच गटातील मतदारांचे प्रातिनिधीक मत मिळेल असे काम उरकले जाते. मग अशा जमा झालेल्या मतांची टक्केवारी काढली जाते आणि कुठल्या पक्षाकडे लोकांना कल झुकतो आहे वा कोणा़च्या विरोधात लोकांचे कडवे मत आहे, त्याचाही आडाखा बांधला जातो. मग त्याचेच निकष मतदारसंघाला लावून कुठली जागा कुठल्या पक्षाला मिळू शकते, त्याचे आकडे तयार केले जातात. त्यामागे कुठली जादू नाही की किमया नसते. निव्वळ मतचाचणी व राजकीय अभ्यास यावर आधारीत असे आकडे सादर केले जातात. म्हणूनच असे आकडे काही प्रसंगी नेमके येतात, तर काहीवेळी साफ़ फ़सलेले दिसतात. पण त्यामागचे प्रयास खोटे वा लबाड असतात, असे मानायचे कारण नाही. लोकांमध्ये भविष्याविषयी उत्सुकता असते, त्याचा लाभ जसे ज्योतिषी लोक उठवतात; तसेच बातमीदारीच्या क्षेत्रात अशा अंदाज वा चाचण्यांचा वापर होत असतो. मुंबई पालिकेच्या निमीत्ताने इतकी उस्तुकता निर्माण झालेली आहे, की त्यासाठीच मग अशा एक्झीट पोलचा प्रयत्न झालेला आहे. मागल्या खेपेसही असेच झाले होते. लोकसभा विधानसभेतही तो खेळ झालेला आहे.

खरे तर आपल्या देशात अशा मतचाचण्या नव्या असल्या, तरी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात शतकाहून अधिक काळ अशा चाचण्यांचा खेळ रंगलेला आहे. अनेकदा त्या चाचण्यांचे आकडे जसेच्या तसे खरे झाले, तर काही प्रसंगी ते आकडे संपुर्णपणे चुकीचे ठरलेले आहेत. आपल्याकडे १९८० सालात तसा प्रयास प्रथमच सुरू झाला. इंडिया टुडे नावाच्या पाक्षिकाने त्यावेळी लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका लागल्या असताना, अशी चाचणी घेतली व त्याचे आकडेही जाहिर केलेले होते. पण त्यावर राजकीय अभ्यासकांनी अजिबात विश्वास ठेवला नव्हता. उलट अशा प्रयत्नांचीच खिल्ली उडवली गेलेली होती. पत्रकार संपादकांनीही त्या प्रयोगाला नाके मुरडलेली होती. परंतु ते आकडे शंभर टक्के खरे ठरले होते. तेच छापताना त्या पाक्षिकाच्या संपादकांनी त्याची जबाबदारी घेण्यास साफ़ नकार दिलेला होता. ते आकडे छापले, त्यात इंदिराजींनी नवा पक्ष सुरू केला, त्याला तब्बल दोनतृतियांश जागा लोकसभेत मिळतील असे भाकित करण्यात आले होते. पण आणिबाणीने बदनाम झालेल्या व नव्याने कॉग्रेसमध्ये फ़ुट पाडणार्‍या इंदिराजी इतके यश मिळवतील, हे कोणाही राजकीय पंडिताला पटणारे नव्हते. पण तेच खरे ठरले. तरीही त्याला योगयोग मानला गेला होता. मग १९८४ सालात पुढली लोकसभा लागली, तेव्हाही त्याच पाक्षिकाने मतचाचणी घेतली व सादर केलेली होती. तेव्हा इंदिरा हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्ष निवडणूकांना सामोरा गेलेला होता. त्यात राजीवना ४०० हून अधिक जागा मिळण्याचे भाकित करण्यात आले होते. नवख्या पोराला इतके मोठे यश मिळू शकेल, यावर कोणी विश्वास ठेवात्यला राजी नव्हता. कारण त्याची आई इंदिराजी वा आजोबा पंडित नेहरूंनाही तितके यश कधी मिळालेले नव्हते. पण ते अंदाज खरे ठरले आणि भारतीय माध्यमात मतचाचणीने कायमचे स्थान मिळवले.

या मतचाचण्यांचा भारतीय जनक म्हणून प्रणय रॉय ओळखला जातो. त्यानेच १९८० व १९८४ अशा दोन्ही चाचण्या केल्या होत्या आणि मतचाचणीने काही निकष व नियम तयार केलेले होते. मग अनेकांनी त्या क्षेत्रात उडी घेतली. राजीव गांधी तर त्याच्यावर इतके खुश होते, की अशा रितीने मतचाचणी घेऊन त्याचे दुरदर्शनवर सादरीकरण करण्याची मुभा त्यांनीच प्रणय रॉय याला दिलेली होती. त्यामुळे मतचाचण्या व निवडणूक निकालांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण, थेट टिव्हीवर सुरू झाले. त्यातच मग १९८८ च्या दरम्यान एक्झीट पोलची एन्ट्री झाली. राजीव गांधी यांचे निकटवर्ति व अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांचे पुढे पटेनासे झाले. त्यांनी बोफ़ोर्स तोफ़ा खरेदीचा मामला उकरून काढला. त्यातून त्यांचे मंत्रीपद गेले आणि कॉग्रेसमधूनही हाकालपट्टी झाली. त्याच प्रकरणात अलाहाबादचा खासदार असलेल्या अभिनेता अमिताभ बच्चनवर किटाळ आलेले होते. म्हणून त्याने वैतागून खासदारकीचा राजिनामा दिला. मग त्याच जागेसाठी पोटनिवडणुक झाली आणि तिथे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग उभे राहिले होते. त्याच जागेवरून लालबहादूर शास्त्री पुर्वी जिंकलेले होते. म्हणून कॉग्रेसने ती जागा शास्त्रींचे पुत्र अनिल शास्त्री यांना बहाल केली. सिंग विरुद्ध शास्त्री अशी अटीतटीची लढत रंगलेली होती. सिंग यांनी राजीवना आव्हान दिल्यानंतरची ती पहिली निवडणूक होती आणि लोकमत राजीव विरोधी जात असल्याचा पुरावा देण्यासाठी विरोधकांनी ती संधी साधली. सर्व पक्ष सिंग यांच्या पाठीशी एकवटले. सहाजिकच त्याविषयी देशभर लोकांना उत्सुकता होती. त्याचा फ़ायदा घेऊन प्रणय रॉय याने मतचाचणीचा नवा प्रयोग केला. मतदानापुर्वी चाचणी घेण्यापेक्षा त्याने मतदान झाल्यावर चाचणी घेऊन प्रत्यक्ष मोजणी होण्यापुर्वी निकालाचे आकडे सादर केले होते. त्याला एक्झीट पोल म्हटले जाते.

मतदान संपताच त्या पोटनिवडणूकीत सिंग जिंकणार व अनिल शास्त्री एक लाखाच्या फ़रकाने पराभूत होणार, असे विश्लेषण त्याच संध्याकाळी रॉयने आपल्या दुरदर्शन कार्यक्रमातून जाहिर केलेले होते. दुसर्‍या दिवशी मतमोजणी झाली आणि खरोखरच ९९ हजार व काही मतांनी शास्त्री पराभूत झाले. तितक्याच मताधिक्याने सिंग यांनी ती जागा जिंकली होती. ती भारतातील एक्झीट पोलची सुरूवात होती. पुढे भारतात नेहमीच दुरदर्शनवर असे कार्यक्रम होत राहिले आणि खाजगी वाहिन्यांचा काळ आल्यावर प्रत्येक वाहिनीला प्रेक्षक आकर्षित करण्यासाठी मतचाचण्या आवश्यक वाटू लागल्या. केवळ निवडणूकीची प्रतिक्षा न करता अधूनमधून केव्हाही लोकमताचा राजकीय अंदाज व्यक्त करणार्‍या चाचण्या वा पोल सादर होऊ लागले. मोदींनी राष्ट्रीय राजकारणात उडी घेतल्यावर प्रत्येक महिना मतचाचण्या होत राहिल्या. अखेरीस लोकसभा मोदींनी जिंकली, तेव्हाच त्या थांबल्या. कारण चाचण्यांचा पाऊस पडला तरी कोणालाही ठामपणे मोदी स्वबळावर बहूमत संपादन करतील, असे भाकित करता आलेले नव्हते. गेल्या पाव शतकात शेकड्यांनी चाचण्या झाल्या आहेत आणि त्यातल्या मूठभर खर्‍या ठरताना डझनावारी खोट्याही पडलेल्या आहेत. तरीही लोकंमध्ये त्याविषयी असलेली उस्तुकता संपलेली नाही. म्हणूनच आता पालिका वा छोट्यामोठ्या विधानसभांच्या निमीत्ताने अशा चाचण्या होत असतात. फ़ार कशाला, अनेक पक्ष आता उमेदवार ठरवण्यापासून आपल्या जाहिरनाम्यातले प्रचाराचे विषय निश्चीत करण्यासाठीही लोकमताची चाचणी करून घेत असतात. त्याच्याच आधारे निवडणुकीची रणनितीही आखत वा बदलत असतात. हा इतिहास तपासला तर मंगळवारी संध्याकाळी जो एक्झीट पोल समोर आला, त्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते प्रत्येकाने आपल्या मनाशी ठरवावे. आणखी काही तासातच खरी मोजणी होऊन आकडे समोर येतीलच.

1 comment:

  1. bhau,
    he ek chan article wachnyat ala(eka mitracya Facebook wall war)
    tumhi je nehmi sangta tyacyashi barachsa julatat vichar lekhakache
    http://maxmaharashtra.com/?p=1567

    ReplyDelete